Friday, January 15, 2021

या चिमन्यांनो, परत फिरा रे घराकडे आपुल्या....

 या चिमन्यांनो, परत फिरा रे

घराकडे आपुल्या.... 


ते गेले ...

का ?? ज्या देशात शाळेची परीक्षा नापास होणे मान्य नाही, तेथे तुम्ही आयुष्याची परीक्षा हारलात? कशी हिम्मत झाली? कोणी परवानगी दिली तुम्हाला? लहानपणापासून शिकवले जाते 'आपण एखाद्याला सुख देऊ शकत नसू तर कमीत कमी दुःख तरी देऊ नये'. समजले नव्हते का तुम्हाला? की लक्षात राहील नव्हते?


आधी मुन्ना,मग सूची आता काका ... काय चालवलेय काय? श्रद्धा सबुरी समजत नाही का तुम्हाला? कोणाशी आणि कसली स्पर्धा आहे ही? पूर्ण खेळ खेळायचाच नव्हता तर आले कशाला मैदानात? डाव मोडून रडीचा खेळ खेळलात तुम्ही, आणी शिक्षा मागे राहणाऱ्यांना का? 


हा कुठला नियम? हारणारा सुटतो आणि जिंकणारा आयुष्य हारतो. एखाद्याच्या आयुष्यात एखादवेळी असा प्रसंग घडला तर समजू शकतो यार, अपघात घडूच शकतात ... पण किती वेळा? आपण काहीही करू शकत नाही ही हतबलता सम्पवते माणसाला हे कळत नसेल का जाणाऱ्यांना?


'उद्या अमुक गोष्ट करू' हा नुसता विचार सुद्धा हलवून टाकतो हल्ली. उद्या असणार आहे का? उगवणार का? आणि असेल तर कोणा कोणाच्या आयुष्यात? कोण असेल कोण नसेल बरोबर? किती योजना किती नियोजन ... कशासाठी आणि कोणाच्या भरवशावर? 


'जग कोणासाठी थांबत नाही' ..नक्कीच. पण हे आणि असे प्रसंग जगण्यावरचा विश्वास मात्र संपवतात.. कायमचा. फक्त आज , आता.... 'उद्या' असे काही नसतेच. जे बरोबर आहेत ते आहेत. फक्त आत्तापुरते आहेत. कदाचित उद्या यातले कोणी नसतीलही किंवा हे सगळेजण असतील पण मी नसेन त्यांच्यात. काय माहीत पुढचा नंबर कोणाचा? 


ह्या तिघांनी सुद्धा किती स्वप्न पहिली असतील. किती गोष्टी भविष्यासाठी राखीव ठेवल्या असतील. कशी होणार आता ती स्वप्न पूर्ण? कोण करेल त्या स्वप्नांचा मागोवा? कळणार तरी आहेत का ती कधी कोणाला? 


कशासाठी जमा करतो आपण हा सगळा गुंता ? हा माझा, ती माझी, हे माझं ... उपयोग काय? कोणी देते का आपले अर्धे आयुष्य मरणार्याला? कशाला हवा समाज, नातेवाईक, मित्र परिवार , कुटुंब ... शेवटी आपली लढाई आपणच जर एकट्यानेच हारायची असेल तर?


जबाबदाऱ्या, अधिकार, प्रेम, राग, लोभ, आवड-नावड, सत्ता , पैसा, मान-अपमान ... कशाचा म्हणजे कशाचाच उपयोग होत नाही? वेळेवर काहीच कामी येत नाही? अगदी चांगुलपणही नाही?   मग आपल्या जगण्याचा हेतू काय फक्त 'अचानक येणाऱ्या मरणाची वाट पाहणे' एवढाच आहे? जो कधीही कुठेही कोणावरही घाला घालू शकतो आणि जाता जाता 'एकावर अनेक आयुष्याचा आनंद ,समाधान, विश्वास फ्री फ्री फ्री' घेऊन जातो. 


तुम्ही सगळे आम्हाला अजून खूप हवे होतात हे तरी तुम्हाला कळतेय का??


- ॲड. स्वाती दीक्षित