Wednesday, December 29, 2021

२५ डिसेंबर : तुळशी पूजन दिवस

 २५ डिसेंबर : तुळशी पूजन दिवस


सकाळीच एक मेसेज आला, २५ डिसेंबर हा तुळशी पूजन दिवस म्हणून साजरा करूयात वगैरे वगैरे. (डिसेंबर ला डिसेंबर म्हंटलेले चालेल ना? कारण तो ही परदेशी शब्द आहे.)


आपल्याकडे तुळशीचे लग्न असतेच की, तेव्हा आपण काहीच करत नाही. आपले बरेचसे सणवार निसर्गाकडे नेणारेच आहेत, तरी सुद्धा हल्ली कुठे करतो आपण काही ?

कितिकसे लोक मुलांना आवर्जून बैलपोळा बघायला नेतात? श्रावणात झाडाला बांधलेला झोका खेळवतात? वटपौर्णिमेला फांदी न तोडता वडाच्या झाडाखाली तासभर जाऊन बसतात? 

अशी कितीतरी उदाहरणे आहेत. 

केवळ दुसऱ्याचा सणाची लोकप्रियत खोडून काढायला आपले काहीतरी नवीन कुचपट काढणे कितिकसे बरोबर? 

मग लहानपणी बिरबलाच्या गोष्ट शिकून काहीच उपयोग झाला नाही असेच होईल. दुसऱ्याची रेघ लहान करण्यासाठी त्याला हात लावायची गरज नसते, त्याच्या बाजूला स्वतःची मोठी रेघ काढावी. ही बिरबलाची शिकवण व्यर्थ गेली.

ख्रिसमस च्या महिनाभर आधी तुळशी विवाह येतो. पुढच्यावर्षी तो घरोघरी साजरा करण्याची सवय लोकांना लावण्याचा प्रयत्न करूयात. 

ख्रिसमस हे आपल्या कोणत्याही सणावर होत असलेले अतिक्रमण नाहीये, आणि दुसऱ्यांच्या धर्मावर, प्रार्थनास्थळांवर किंवा रीती रिवाजावर अतिक्रमण करणे ही हिंदू परंपरा कधीच नव्हती आणि नसेल.

राहिला प्रश्न हल्ली ख्रिसमस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा किंवा पार्टी करण्याचा तर त्यासाठी आधी शाळा, महाविद्यालये, हॉटेल , इ ठिकाणी आपली मुले ख्रिसमस साजरा करताना दिसतात. त्याबाबत आपल्या मुलांना आपणच समज देऊ शकतो ( ज्यांना हरकत आहे त्या लोकांसाठी). घरात ख्रिसमस ट्री लावून ख्रिसमस साजरा करणारी हिंदू मंडळी विरळच असतील. आणि जे करत असतील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 

ज्या क्षणी आपण आपले सणवार, रूढी, रीती-रिवाज, परंपरा ह्यांना मान देऊन त्या साठी वेळ काढून घराघरात साजरा करण्याची सवय आपल्या मनाला आणि मुलांना लावू त्यानंतर ख्रिसमसच काय मुलांनी ईद पार्टी केली तरी आपले समाजमन असुरक्षित होणार नाही. 

हल्ली हे जे काही वेगळे बदलाचे वारे वहात आहेत, त्याला आपली पिढीच जबाबदार आहे. आपल्या मागच्या पिढीने आपली सर्व परंपरांशी ओळख करून दिली होती. ती धरोहर पुढच्या पिढीला द्यायला आपण चुकलो.

पैसे कमावणे, मोठी मोठी घरे बंधणे, मुलांना उत्तमातले उत्तम 'शालेय' शिक्षण देणे, पैसे साठवणे ह्या चक्रात आपल्याला दसरा, दिवाळी, गणपती सोडले तर इतर सण दिसेनासे झाले होते. त्यासाठी वेळ काढावा लागला तर आपली चिडचिड होत होती, सगळ्या गोष्टींची कटकट वाटायला लागली होती. सणावाराला घरी स्वयंपाक न करता, थाळी रेस्टॉरंट ची वाट आपण पकडली. पुरणपोळी, गुळ पोळी, तिळगुळ, बासुंदी , दिवाळीचा फराळ ह्या सारखे अनेक पारंपरिक पदार्थ आपण विकत आणायला सुरवात केली. त्याचा दरवळ घराघरातून येईनासा झाला. प्रत्येक सणाची पार्टी सोसायटी च्या आवारात साजरी करून  घरात काही करण्याच्या जबाबदारीतून आपण अंग काढून घेतले. ह्या सर्व अतिक्रमणाला आपली पिढी जबाबदार आहे. आपले सण आनंदात साजरे करायला आपल्या मुलांना आपणच नाही शिकवले. कारण त्यासाठी वेळ काढण्याचा , कष्ट करण्याचा आपल्यालाच कंटाळा होता.आहे ते केले नाही आणि अजून नवीन पायंडे पडायचे , हा अधिकार आहे आपल्याला? 

नवीन ( पार्टी प्रेमी) पिढी प्रश्न विचारेल तर उत्तर आहे आपल्याकडे?

आणि हा प्रश्न फक्त शहरांचा आहे बरं का. ठराविक बोटावर मोजण्याइतपतच शहरे ह्या समस्येला तोंड देत आहेत. आमच्या ग्रामीण भागात आजही सगळे सणवार धुमधडाक्यात नाते-गोते, शेजारी-पाजारी, मुलाबाळांसह जोरदार साजरे होतात. त्यामुळे नवीन 'तुळशी पूजन दिवसाची' तशी आम्हाला गरज नाही. पण आग्रहच असेल तर तुळशीचे रोप आणि ख्रिसमस ट्री दोन्हीही शेजारी शेजारी नटवून सकाळी पूरणा वरणा चे जेवण आणि संध्याकाळी घरगुती भेळ, केक आणि चॉकलेट ची अंगणात फक्कड धमाल उडवून देऊ शकतो.

जाता जाता एक प्रश्न : हुरडा पार्टी ला किती (शहरी)लोक आपल्या मुलांना घेऊन गेले आहेत ? केसरी टूर, वीणा वर्ड, राजा-राणी ट्रॅव्हल बरोबर परदेश बघून झाला असेलच ना. आता एखाद्या सुट्टीच्या दिवशी कृषी पर्यटनाचे पर्याय शोधून तिकडे पण फेरफटका मारायला हरकत नाही. 

२५ डिसेंबर : हुरडा दिवस म्हणून साजरा केला तर कसं? आमच्या शेतात तुळस ही असते, बदामाचे झाड ही असते आणि कधी कधी ख्रिसमस ट्री पण असतो. आणि नसेल तर लावू की. आम्हाला कोणत्याच झाडाचे वावडे नाही. नाताळाची सुट्टी मॉल आणि हॉटेल मध्ये व्यतीत करण्यापेक्षा या की कृषी पर्यटनाला ( agro tourism). आणि जाताना एक तुळशीचे रोपटे बरोबर घेऊन जा, पुढच्या वर्षी तुळशी विवाहास कामास येईल.


कळावे, लोभ असावा 


- स्वाती दीक्षित

Tuesday, April 20, 2021

दहावीची परीक्षा रहीत- मा. शिक्षणमंत्री

 इयत्ता दहावीची परीक्षा रहीत.

- मा. शिक्षणमंत्री


पेपर मध्ये , दूरदर्शन वर कोरोना बळींची संख्या बघत असताना आपली लेक दहावीच्या पेपर साठी सतत बाहेर जाणार, अजून तिच्या वयासाठी लस द्यायला पण परवानगी नाही, ह्या विचारांनी रोज एक मरण दहावीच्या मुलांचे पालक अनुभवत होते.


दहावीची परीक्षा देऊन पुढे शैक्षणिक कारकिर्दीत काही फार मोठी भर पडणार होती, असेही नाही. मग का मुलांना ह्या मृत्यूच्या सापळ्यात सोडायचे समजत नव्हते. त्यात हल्ली लहान मुले आणि तरुणांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे सतत कानावर पडत होते. घरात मुलांची चलबिचल समजत होती. काय होईल? परीक्षा होईल का? झाली तर कशी होईल? नाही झाली तर मार्क्स कसे देतील? अभ्यास करू की नको? केला तर कसा करू? लिहिण्याचा सराव करू की टायपिंग चा करू ? मुलांचे शंभर प्रश्न आणि पालक निरुत्तर .... काहीही सुचत नव्हते. मुलांची अस्वस्थता कळत होती पण काहीही करता न येण्याची हतबलता परेशान करत होती. आपण वयाने इतके मोठे असून, जगाच्या चांगल्या वाईटाचा अनुभव घेतला असून इतका ताण घेतो तर ह्या कोवळ्या मुलांच्या मनाचे काय होत असेल, ह्या कल्पनेनेच मनाची घुसमट व्हायची?धड लहान नाहीत, धड मोठे नाही असे अर्धवट वय, काय कसे कुठे गुंतवावे ह्या वयाला काही समजत नव्हते. 


पालक म्हणून आपण नापास झालो तर , ह्या विचाराने झोप उडाली होती. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त परीक्षा, परीक्षा आणि परीक्षा दिसत होती. प्रत्येक विषयाचा शेवट परिक्षेवर येऊन थांबत होता. दर वेळेस लेकीच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह तकलीफ देत होते.  उत्तर नसलेले प्रश्न आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते , त्यांची सवय नव्हती असे नाही परंतु ह्या वेळी लेकीच्या भविष्याचा धागा पकडून आले होते.


आज एक ट्विट आले 'दहावीची परीक्षा रहीत- मा. शिक्षणमंत्री' .... मणामणाचे ओझे उतरणे म्हणजे काय, हा अनुभव घेतला. मन पिसासारखे हलके होणे, मन नाचायला लागणे, वगैरे वगैरे सगळे वाक्प्रचार एकदम आठवले. शेवटी एक गोष्ट पक्की कळाली, शिक्षण घेणे जरुरी आहे पण त्याहीपेक्षा आपली मुलं, त्यांचे आरोग्य (मानसिक आणि  भावनिकही), आणि त्यांचा आनंद जास्त महत्वाचा आहे. 'सर सलामत तो पगडी पचास' ह्या म्हणीचा अर्थ पुरेपूर समजला.


ह्या निर्णयाच्या मागे असलेला सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक संघटना, पालक संघटना, आणि मंत्रीमहोदयांचे मनःपूर्वक आभार !!!


- एक दहावीच्या विद्यार्थिनीची आई


#BoardExams2021 #इयत्तादहावी #शिक्षणमंत्री #maharashtra #parentteacher #media

Tuesday, April 6, 2021

लोकसत्ताच्या बातमीचा निषेध

 कालचा लोकसत्ता ..


लोकसत्ता प्रतिनिधीला समजत नाहीये की समजून घ्यायचे नाही आहे?


प्रश्न परीक्षा सोप्पी घेण्याचा नाही आहे. प्रश्न न शिकवल्या गेलेल्या अभ्यासक्रमाचा आहे, मुलांच्या तब्येतीचा आहे. 


मुळात जवळ जवळ संपूर्ण एक वर्ष सगळ्या प्रदूषणापासून लांब, घरातल्या सुरक्षित वातावरणात मुले होती. अशा वेळी प्रतिकारशक्ती नाजूक झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुलांच्या बाबतीत पालकांचे मन असेही हळवे असते. साधा सर्दी ताप असेल तरी पालक सहजच म्हणतात, काय व्हायचे असेल ते आपल्याला होवो, मुलांना काही व्हायला नको. 

अशात हा जीवघेणा कोरोना , पालकांचे धाबे दणाणणारच.


त्यात संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला गेलेला नाही. गणित, संस्कृत सारखे विषय ऑनलाईन शिकवून सगळ्यांनाच समजतील अशातला भाग नाही. एकदा २५% अभ्यासक्रम वगळला जातो, एकदा प्रश्नसूची मध्ये परत टाकला जातो. सहामाही आणि चाचणी परीक्षा ऑनलाईन झाल्या. त्यामुळे मुलांनी संगणकावर वेळेत पेपर लिहिण्याचा सराव सुरू केला. तर आता मूळ परीक्षा ऑफलाईन घेणार ची सूचना आली. वर्षभर लिखाण सुटलेले, लिखनाचा वेग कमी झालेला, परत लिखाणाचा सराव सुरू केला. ह्या सगळ्या गोंधळाचा मुलांच्या मनावर किती आणि काय परिणाम होत असेल ह्याची कल्पना आहे का लोकसत्ता प्रतिनिधीला?? केवळ पंधरा (१५) वर्षे वयाची मुले आहेत ही, ह्या वयात नैराश्य, रक्तदाब कमी जास्त होणे ह्या समस्यांना तोंड देत आहेत. गम्मत वाटते का तुम्हाला सगळी? 


प्रतिनिधी लिहितात आणि संपादक छापतात? त्यांनाही ४/५ मुलांशी बोलून वस्तुस्थिती काय आहे हे माहीत करून घ्यावेसे वाटत नाही? 


'अभ्यासपूर्ण पत्रकारिता' नावाचा एक प्रकार असतो. माहिती करून घ्या जरा त्याची. तुम्हाला अभ्यास न करता बातम्या छापायची सवय झाली आहे म्हणजे सगळ्यांनाच त्याची लागण झाली असेल असे समजता की काय तुम्ही? सुदैवाने विद्यार्थी अजूनही अभ्यास करूनच परीक्षा देतात. त्यामुळे असेल कदाचित त्यांच्या समस्येची नाळ तुम्हाला समजली नसावी.


लोकसत्ता वर्तमानपत्र, त्याचे प्रतिनिधी आणि संपादकांचा निषेध !!!


#लोकसत्ता #वर्तमानपत्र #बातमी

गोंधळात गोंधळ ...

 काल MPSC परीक्षेला ३०% अनुपस्थिती, ५०% परीक्षार्थींनी PPE किट घालून परीक्षा दिली.

-offline परीक्षा पद्धती नापास झाल्याचे ढळढळीत उदाहरण


फक्त एक दिवस परीक्षा तर ही अवस्था. 

दहावी/ बारावी चे परीक्षार्थी ६/८ पेपर देणार ....


*दर पेपरला टेस्टिंग होणार का?

*अँटीबॉडीज असतील तर PPE किट शाळा देणार का?की पालकांनी आणायचे?

*प्रत्येक पेपर वेगळे किट मिळणार की पहिल्या पेपर चे सांभाळून ,धुवून, परत परत वापरायचे?

*ज्या खेड्या पाड्यात संगणक आणि नेट सुविधा नाहीत, तेथील शाळांना आणि पालकांना PPE किट परवडणार आहे का? 

*मुळात PPE किट उपलब्ध करून देण्याची त्यांची तयारी आहे का की प्रशासन त्यांना किट उपलब्ध करू  देणार? 

*त्या संदर्भात शाळांना शिक्षण मंत्रालयाकडून काही सूचना जारी झाल्या आहेत का? 

*PPE किट ची सुविधा नसेल तर मुलांना सोवळ्यात बसवणार का? 

*तसे झाले तर पेपर वर जो अनुक्रमांक टाकला जातो तो पुढे मागे होणार, परत पेपर ची जुळवाजुळवी करताना शिक्षकांना हॅन्डग्लोव्ह्ज घालण्याचे आदेश दिले आहेत का ? 

*ते ग्लोव्हज कोण देणार ? शाळा, प्रशासन की शिक्षकांनी स्वतःचे स्वतः आणायचे? 

*शिक्षकांनी स्वतः गोव्हज आणायचे असतील तर त्याच्या किमती एवढे पैसे किती दिवसात त्यांच्या खात्यात वर्ग होणार? 

*शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे का? 

*एवढे करूनही जर एखादा परीक्षार्थी , शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाचा बळी झाला तर त्यांच्या उपचाराचा भार प्रशासन घेणार का? 

*असेल तर तसे आदेश परीक्षा केंद्राजवळील कोरोना केंद्राला देण्यात आले आहेत का? 

*ह्या सुविधेचा माहिती शाळांना देण्यात आली आहे का?

*अर्धी परिक्षा झाल्या नंतर जर एखादा परीक्षार्थी कोरोनाचा बळी गेला तर उरलेल्या परीक्षेत त्याला आपोआप उत्तीर्ण केले जाणार आहे का ? 

*तसे नसेल तर परीक्षा केंद्रावर बोलावून, कोरोनाची लागण त्या विद्यार्थ्याला भेट दिल्या बद्दल प्रशासनाला जबादार धरता येईल का? 

*त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाता येईल का? 

*त्यासाठी न्यायालयाचे कोणते कार्यक्षेत्र ठरवण्यात आले आहे? *त्या संदर्भात छापील सूचना प्रश्नपत्रिकेवर उपलब्ध असणार आहेत का ? 

*मुलांच्या आरोग्याशी खेळ, शैक्षणिक वर्षाशी खेळ केल्याबद्दल प्रशासन मुलांना कशास्वरूपाची नुकसान भरपाई देणार आहे?


एक इंटरनेट आणि संगणकाची सुविधा उपलब्ध करून देऊ न शकणारे शिक्षण मंत्रालय ह्या सर्व प्रश्नांची (कमीत कमी)उत्तरे (तरी) देणार का? ... अर्थातच , असतील तर.


#शिक्षणमंत्रीमहाराष्ट्र #BoardExams2021 #CMOMaharashtra #शिक्षणमंत्री #school #exams2021 #cmmaharashtra #educationministermaharashtra

 होळी रे होळी

पुरणाची पोळी 


होळी ची सुरवात कशी झाली किंवा होळी का पेटवली जाते , धुळवड का खेळली जाते ह्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. कधी काही गोष्टी पटतात ,काही पटत नाहीत.


मला नेहमीच असे वाटत आले आहे की ज्या अर्थी हिवाळा पूर्ण संपल्यावर आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर होळी सण येतो म्हणजेच जे वाळलेले लाकूड आहे ते सर्व जमा करून जाळून नष्ट करण्याचा त्या मागे विचार असावा. सुकलेल्या लाकडाला तीव्र उन्हाळ्यात आग लागून वणवा पेटण्याची शक्यता असल्यामुळे ते नष्ट करण्याकडे पूर्वीच्या लोकांचा कल असावा. मनुष्य जंगलाच्या जवळ रहात असल्याने असा वणवा मोठ्या प्रमाणात विध्वंस करत असणार. त्यापासून वाचण्याचा हा प्रयत्न असेल कदाचित.


  उन्हाळ्यात हवेतील तापमानाने अन्न पदार्थ खराब होण्याचे प्रमाण देखील जास्त असते. त्या मानाने पुरणपोळी उन्हाळ्यात देखील खराब न होता एका पेक्षा जास्त दिवस टिकून रहात असल्याने होळी आणि पुरणपोळीची जोडी जमवली गेली असावी. 


पूर्वी विविध आजारांवर उपाय म्हणून जंगलातील वेगवेगळ्या वनस्पतींवर मनुष्यप्राणी अवलंबून असत. त्यामुळे असेल कदाचित त्या सर्व झाडांच्या सुकलेल्या राखेत औषधी गुण असावेत ह्या विचाराने धुळवड खेळण्याची परंपरा सुरू झाली असावी. 


 रंगपंचमीच्या रंगांचे कारण मात्र काही लक्षात येत नाही. पूर्वी निसर्गातील विविध घटकांपासून नैसर्गिक रंग तयार केले जात असत. तीव्र उन्हात फळे, फुले, पाने, इ वाळवून रंग तयार केले जात. नवीन रंग बनवण्याआधी साठवणीतील रंग संपवण्याकडे कदाचित कल असावा. हल्ली देखील आपण बघतोच ना, जुने रंग हवा तसा परिणाम देऊ शकत नाहीत, मग 'रंग जुने झालेले दिसतात' असे सहजच उद्गार निघून जातात. त्या काळात तर पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून काही संरक्षक रसायने देखील नसावीत. त्यामुळे फार जुने पदार्थ, रंग, वगैरे न वापरण्याकडे लोकांचा कल असावा. त्यातूनच रंग खेळून जुने रंग संपवून टाकण्याची पद्धत सुरू झाली असावी. कालांतराने ह्या सगळ्याच पद्धतींना धार्मिक अधिष्ठान देण्यात आले असावे. जेणेकरून ह्या पद्धतींची पिढ्यानपिढ्या अंमलबजावणी व्हावी. कालानुरूप त्या नष्ट होऊ नयेत. 


विचार काहीही असो, चांगल्या अंतःकरणाने केलेली प्रत्येक कृती समाजात समाधान आणि सकारात्मकता निर्माण करण्यास हातभार लावत असते. फक्त आता नवीन पिढीला प्रत्येक सणामागचा विचार समजावून सांगणे आणि पटवून देणे मात्र आव्हानात्मक होत आहे.


#होळी #धुळवड #रंगपंचमी  #holi #rangpanchami

मिशन १० वी,१२वी ... (काळजी आणि गोंधळ)

 मिशन १० वी,१२वी ...

(काळजी आणि गोंधळ)


पूर्वी- इयत्ता दहावीला चांगले गुण मिळाले की शास्त्र शाखेला प्रवेश मिळत असे. 

हल्ली- हे सगळे संदर्भ मोडकळीस आलेले आहेत.


शहरी भागात- इयत्ता दहावीला चांगले गुण मिळाले की चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. 

उर्वरित महाराष्ट्रात- शास्त्र, वाणिज्य, कला शाखेचे एक-एकच महाविद्यालय असते. त्यामुळे प्रवेश मिळणे महत्वाचे. चांगले वाईट भविष्य आपापल्या मेहेनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते.


थोडक्यात इयत्ता दहावी (१०वी) च्या बोर्डाच्या परीक्षेचे महत्व काय राहिले तर शून्य ... केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर सारख्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या शहरांच्या समस्येपायी अख्खा महाराष्ट्र वेठीस धराल? 


पूर्वी- इयत्ता बारावी च्या गुणांवर डॉक्टर इंजिनियर होता येत असे.

हल्ली- प्रवेश परिक्षेतील उत्तम कामगिरी शिवाय कुठेही प्रवेश मिळत नाही. बोर्डाच्या मार्कांनी विशेष फरक पडत नाही.


असे असतानाही दहावी, बारावीची (ऑफलाईन) परीक्षा घेण्याचा अट्टाहास का? कधी आपण काळाची पावले ओळखणार? 


गेल्या वर्षभरात शिवाजी विद्यापीठाने तीन वेळा काही परीक्षा रहीत केल्या. एवढे मोठे विद्यापीठ , इतके जुने .... तरीही ऑनलाईन परीक्षांचा पर्याय सोडून परीक्षा रहीत करते? जर विद्यापीठेच काळाच्या मागे असतील, तर ते काय मुलांना आजच्या काळातले शिक्षण देणार?? आणि ह्या अशा विद्यापीठातून शिक्षण घेतलेली मुले काय जगाच्या नकाशावर आपले कर्तृत्व सिद्ध करणार ? 


तरी सुद्धा विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकत आहेत, म्हणजे त्यांना पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर शिक्षण पद्धतींचा आधार घ्यावा लागत असणार. ह्याचाच अर्थ आपली शिक्षण पद्धती अपयशी ठरते. अशा अपयशी शिक्षण पद्धती साठी आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांना परीक्षेला बसवावे का? 


की दहावी आणि बारावी च्या अर्थशून्य परीक्षांचे ओझे झुगारून त्यांना निरोगी आयुष्याचा आशीर्वाद देऊन आयुष्याची परीक्षा द्यायला जगाच्या शाळेत पाठवावे?? 


- एक दहावीच्या विद्यार्थिनीची गोंधळलेली आई 


#इयत्तादहावी #इयत्ताबारावी #शिक्षणमंत्री #CMOMaharashtra

Wednesday, March 17, 2021

कोणी उत्तर देता का उत्तर.. ह्या भरकटलेल्या बोर्डाच्या परिक्षार्थींच्या पालकांना ???

कोणी उत्तर देता का उत्तर..

ह्या भरकटलेल्या बोर्डाच्या परिक्षार्थींच्या पालकांना ???


केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्या जातात तसे १०वी , १२वी च्या बोर्ड परीक्षांचे स्वरूप का असू नये? 

असे जर झाले, तर ऑनलाईन परीक्षा घेणे अवघड जाणार नाही.


 गावागावात इंटरनेट सेवा पोहोचवल्याचा दावा करणारे सरकारच आज ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आहे. काय हा विरोधाभास? गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संगणक आणि नेट दोन्ही असते, त्याचा वापर करावा असे का शिक्षकांना वाटत नाही? शिक्षकांच्या हातात स्मार्ट(?) फोन असतो, त्याचाही वापर करता येऊ शकतो, असा विचार करताना शिक्षक संघटना का दिसत नाहीत? 


जग बदलते आहे, जगबरोबर आपण बदलले पाहिजे वगैरे चर्चा करत असताना बदलाची संधी आपण का नाकारतो आहोत? कधी बदलणार आपण? काही राखीव मुहूर्त आहे का ह्या बदलांसाठी ? ही नवी पिढी आपल्या पिढीला हसते आहे. 'कसले तुम्ही लोक , साधे साधे निर्णय तुम्हाला पटापट घेता येत नाहीत?' 'तुम्हाला यंत्रणा राबवता येत नाही?' असे प्रश्न विचारते आहे. आपल्याकडे देण्यासाठी काय उत्तरे आहेत? 


शिक्षण ऑनलाईन दिले जाईल, दूरदर्शन चा वापर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केला जाईल, इ गप्पा मारणारे सरकार परीक्षेच्या बाबत मात्र 'ऑनलाईन चा पर्याय सर्वसमावेशक नाही' असे म्हणते आहे. ह्याचा अर्थ असा की ऑनलाईन शिक्षण पण शक्य झालेले नाही.  ऑफलाईन शिक्षण तर बंदच होते. म्हणजेच तुम्ही मुलांना वर्षभर शिकवलेच नाहीत. जिथे शिक्षणच नाही, तिथे परीक्षा कशाची घेणार? मुलांना तुम्ही काही दिलेच नाहीत तर घेणार कसे काय? की सगळी मुले 'एकलव्य'आहेत असा काही समज झाला आहे तुमचा??


काल अजून एक हास्यास्पद बातमी आली 'सरकार तर्फे मुलांना प्रश्न संच दिले जातील'. ह्याचा अर्थ काय की 'मुलांनी तेवढेच प्रश्न पाठ करून यावे' किंवा 'मुलांना सर्व समावेश अभ्यास करावा लागू नये म्हणून थोडक्यात परीक्षेत येणारेच प्रश्न दिले आहेत, तेवढेच करा आणि मार्क मिळवा' पण परीक्षा द्या. घोकंपट्टी करणारे परीक्षार्थी बनवण्याचा कारखाना काढला आहे का आपण?


तुमच्या ज्ञानात भर पडो न पडो, तुम्ही परीक्षा द्यायचीच. तुम्हाला कोरोनाची लागण झाली तरी चालेल पण तुम्ही सगळ्यांनी गठ्याणे परीक्षा केंद्रावर यायचे आणि परीक्षा द्यायचीच. लग्नाला पन्नास (५०), मरणाला वीस (२०) बाकी इतर कारणाला शून्य (०) लोकांची उपस्थिती मंजूर करताना ज्या शाळेत पन्नास (५०) पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे, त्या परीक्षा केंद्रावर पन्नास (५०) पन्नास (५०) च्या तुकड्यात परीक्षा घेतली जाणार आहे का ? की शिक्षणमंत्री मा.मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन पन्नास(५०) पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांची गर्दी परीक्षा केंद्रावर करणार ? शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर अजून मोजले देखील नाही आहेत. 


पाड्यांवर राहणाऱ्या मुलांना  वर्षानुवर्षं शाळेत जाण्यासाठी कित्येक मैल कच्या रस्त्याने चालत जावे लागत असे, काही ठिकाणी आजही चालावे लागत असेल, तेव्हा नाही सरकारला 'असुविधांची' आठवण होत? सुविधा असोत नसोत, परीक्षा केंद्रावर मुले आणली जात होतीच ना? मग आताच ऑनलाईन परीक्षेसाठी 'सुविधांचा' विचार आला कुठून? का नाही ऑनलाईन परिक्षेकडे संधी म्हणून पाहिले जात? का नाही त्या निमित्ताने खेड्या पाड्यात संगणक आणि त्यासंबंधी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार होत? की मागची 'री' ओढण्यातच धन्यता आहे?


कोणीही विचारात न घेणारे सर्वसामान्य पालकांचे मत आणि काही प्रश्न -

*'ऑफलाईन परीक्षा' हा शिक्षक, शिक्षणसंस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी ह्यांच्या आरोग्याशी केलेला एक खेळ असणार आहे. 

*न दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात 'प्रश्न संच' देण्याची सुपीक कल्पना हास्यास्पद आहे. 

*शिक्षण जर ऑनलाईन दिले जाऊ शकते तर परीक्षा का नाही ? 

* विद्यार्थी (परीक्षार्थी), शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ह्यांना आरोग्याचा प्रश्नच नाही आहे , असे सरकार ला वाटते आहे का? 

*मुलांना आयता बोर्डाचा पेपर (थोडक्यात उघडपणे कॉपी करायची अधिकृत परवानगी) देऊन , न दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात परीक्षा घेण्याच्या निर्णयात पालकांना समाविष्ट करून घेतले होते का? पालकांची ह्या चमत्कारिक निर्णयाला मान्यता होती का ? असेल तर त्या संबंधी माहिती कुठे उपलब्ध होऊ शकेल?

*मुलांना शिकवणे पालकांची जबाबदारी असेल तर शाळेची फी कोणत्या कारणाने भरून घेतलीत?

*मुलांची घरी तयारी करून घेण्याचे पालकांना काही औपचारिक शिक्षण दिले गेले होते का? 

*जर बोर्डाची प्रश्नपत्रिका 'प्रश्नसंच' नावाने उघडपणे सरकार आधीच देणार असेल तर परीक्षा केंद्रावर जाण्याच्या नाटकाची गरज काय? पेपर घरीच सोडवून परीक्षा केंद्राला मेल किंवा पोस्ट द्वारे का पाठवू शकत नाही ?

*जर पालक अभ्यास घेऊ शकतात तर परीक्षा का नाही?

*सरकार सांगते, 'घराबाहेर पडू नका, घरून काम करा'.. मान्य.

पण मग हा नियम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लागू नाही का?

*की आमचे मा.मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे आणि मा. शिक्षण मंत्री वेगळ्या पक्षाचे असल्याने परस्पर विरोधी निर्णय घेतले जात आहेत ? पण बळी आमच्या मुलांचा जाणार आहे.


(काहीतरी तरी) कळावे, लोभ (?) असावा


- ऍड स्वाती दीक्षित


#boardexams2021 #exams2021 #शिक्षणमंत्री #parentteacher #school #EducationMinister #CMOMaharashtra #cmmaharashtra #parentteacher