Wednesday, April 29, 2020

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...

पराधीन आहे जगती
पुत्र मानवाचा...

निमित्त: इरफान खान.
वर्तमानपत्र उघडले की रोज दोन(२) ते तीन (३) तरी बातम्या अकाली मृत्यूच्या वाचनात येतात. मध्ये एका आशिलाचा फोन होता,पंधरा (१५) दिवसानंतरची तारीख घ्या, सुनेचे बाळंतपण करून घ्यावे लागले, बाळ गेल.

कोणाचे लहान मुलं, कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाचा तरुण मुलगा, कोणाची कोवळी मुलगी तर कोणाचा लहान भाऊ. का? जगात जगण्याचे ओझे झालेले कित्येक वृद्ध आहेत, त्यांना पूर्णविराम द्यायची मनापासून इच्छा आहे .पण प्रदीर्घ आयुष्याचा शाप त्यांची सुटका होऊ देत नाही. आणि ज्यांनी अजून स्वप्न अनुभवली, उपभोगली, साकारली नाहीत, कित्येकांना तर स्वप्नांचा , आयुष्याचा अर्थही नीटसा उमगला नाही त्यांनी मात्र परतीच्या प्रवासाला मार्गस्थ व्हावे?? आणि मागे राहिलेल्यांचे काय ?? अश्वथाम्याच्या कपाळावरच्या जखमेसारखे भळभळणारे आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करत धडपडायचे...... आयुष्यभर??

अशा प्रसंगी प्रतिक्रिया देण्याचा कोण उत्साह असतो लोकांना. जाण्याऱ्याने कशी घाई केली ज्याण्याची त्याच्या जास्त घाई आम्ही करणार त्याला श्रद्धांजली वाहण्याची... आणि  ह्या अशा प्रेमाने ओथंबलेल्या बिनडोक लोकांच्या मूर्ख प्रतिक्रियांनी समाजमाध्यम वाहू लागतात. हाही विचार नसतो की जाणार्याचे नातेसंबंध दूर परदेशी असतील, त्यांना माहीत तरी आहे का गुदरलेला प्रसंग? त्यांच्याकडे दिवस आहे की रात्र? अशा पद्धतीने समाजमाध्यमांवर आपल्या कोण्या सख्ख्याला अचानक श्रद्धांजली वाहिलेली पाहून तिच्यावर काय प्रसंग ओढवू शकतो? कोणीतरी ऑफिस ला निघालेली व्यक्ती सिग्नल ला गाडी थांबली म्हणून फोन कडे नजर टाकेल आणि आपल्याच कोणाच्या आयुष्याशी झालेला खेळ तिला भर रस्त्यात कळेल तर तिची काय अवस्था होईल??

नातेसंबंध तर अशा वेळी फाशीच्या फंदा सारखी असतात. कोणाला मागे सुटलेल्या स्थावर जंगमचा मोह तर कोणाला मागे उरलेल्यांच्या जबाबदारीच ओझं. जाणारा कसा माझ्याच जवळचा होता हे सांगण्याची कुठे चढाओढ, तर कुठे 'अमच्याशिवाय आता ह्यांचे कोण' चा अहंभाव. सल्ला-मसलतींना तर इतका जोर आलेला असतो की मागे रहाणाऱ्यांचे मन 'आपणही का सुटलो नाही' चा आक्रोश करत रहाते. कोणी म्हणत 'मागच्या जन्माचे भोग' , कोणी कर्माचा सिद्धांत मांडते. नऊ महिने पोटात वाढणाऱ्या त्या अर्भकाचे, तीन (3) महिन्यांच्या त्या इवल्याशा जिवाच्या कर्माचे कोडे मात्र सुटता सुटत नाही. काय दोष त्या निरागस देवदूतांचा? प्रश्नाला उत्तर मिळत नाही. कोणा-कोणाच्या मागच्या जन्माचे भोग? जाणार्याच्या, त्याच्या पोटी जन्माला आलेल्यांच्या, त्याच्या जोडीदाराच्या, त्याला प्रसावलेल्यांच्या की त्याच्या सहोदरांच्या??? असे तर नाही की परमेश्वर 'भोग' भोगणाऱ्यांचे गठ्ठे करून एकत्रच ह्या जन्मी जन्माला घालत?? आणि सांगतो 'भोगा आता एकत्रच सगळी फळ'. न्यायचेच होते तर गर्भाशयाच्या अंधार कोठडीची नऊ महिन्याची शिक्षा का ?? त्या मातेच्या भांवनांशी खेळ का ?? हिरावूनच न्यायचे होते पितृसुख तर जन्म देण्याची घाई का ?? नंद पुत्र म्हणून वाढणार होता कान्हा तर वसुदेवाच्या पोटी जन्म का ??

दुःख विसरता येत नाही पण आयुष्याचा जोडीदार गेला ना तर पुढच्या वळणावर पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा उ:शाप तरी आहे. पण ज्यांनी जन्म दिला , ज्या भांवंडात तो जीव वाढला त्यांनी कुठे जायचे?? कुठे शोधायचा तो हरवलेला कोन?? कसे संधायचे ते निखलेले दुवे?? ना फाटलेले आकाश जगू देत ना आजूबाजूचा समाज. 'लवकर सावरलात त्या मानाने तुम्ही' 'बर झालं बाहेर पडलीस'. काय प्रतिक्रिया द्यायची ह्या आणि अशा अनेक उदगारांना. अहो तुम्हाला दिसतेय ना ती फक्त खपली आहे, आत अश्वथामा ठसठसतोय हो तसाच.... तहेहयात.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

तू सुखकर्ता तू दु:खहर्ता ..

तू सुखकर्ता
तू दु:खहर्ता ..

'सामाजिक विलगिकरणाचे भान सांभाळण्यासाठी सर्व मंदिरे बंद'.
माझ्यावर कोणतेही, कितीही भयावह संकट आले तरी माझ्या पालकांच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कधीच बंद होणार नाहीत. मग तो तर जगाचा कैवारी. 'दर्शन बंद' मान्य. पण मदत ... ती का बंद ?? वर्षानुवर्षे ज्या भक्तांनी तुझ्या चरणी भोग चढवला, आज ते संकटात असताना त्यांना मदतीची गरज असताना, त्यांनीच भरलेल्या भांडारातून उलटे दान देण्याची तू का नाही तुझ्या चौकीदारांना बुद्धी देत ??

वृत्तवाहिन्यांनाही का नाही हे कळू की आपण चूक-बातमी देत आहोत. दरवाजे बंद चे काय ते भूषण ? ज्या मंदिरांनी आजूबाजूच्या परिसरातील कामगार, शेतकरी, कामकरी, बेरोजगार, वयस्क, आजारी लोकांची जबाबदारी घेतली त्यांची बातमी जरूर करावी. काहीही न करता तोंड लपवण्याची काय ती बातमी? गुरुद्वाराने अमुक केले, तमुक केले ... किती वर्षे फक्त हेच सांगणार ? अहो , वर्षानुवर्षे प्रत्येक प्रसंगात फक्त गुरुद्वारेच आपले दरवाजे उघडे ठेवतात. त्यांचा आपण कधी आदर्श घेणार ?? "देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे". विंदांची ही कविता काय फक्त शाळेत शिकवण्यापूरतीच ??

'अमुक मंदिरात इतक्या करोड चे दान, तमुक मध्ये तितक्या करोड चे' ह्या बातम्या जेव्हा तुम्ही दाखवतात तेव्हा त्या मंदिर न्यासाचे ताबेदारच तुम्हाला आमंत्रित करून आकडेवारी देतात ना ? मग अशा कसोटीच्यावेळी त्या न्यासाच्या सभासदांना तुम्ही का नाही विचारत 'किती, काय आणि कोणाला मदत केली ' म्हणून ?? तेव्हा का फक्त 'दरवाजे बंद' सांगून समाधानी ?? परवा पुण्याची एक बातमी होती 'गणपती बाप्पा ला दरवर्षी लाखो आंब्यांची आरास असते मात्र ह्या वर्षी फक्त 101 आंबे अर्पण केले'.... का?? जेव्हा की ह्याच वर्षी आंब्याला उठाव नाही शेतकरी मरतो आहे , अशावेळी लाखो नाही करोडो आंब्यांची खरेदी करून त्याचा प्रसाद लोकांना का नाही वाटला ?? का कोणत्याही संस्थान ला शेतकऱ्यांकडचे टरबूज, खरबूज, आंबे, कांदे, टोमॅटो, काकडी, कोबी, गहू, डाळ, इ गोष्टी विकत घ्याव्याशा वाटल्या ?? बर ह्यांच्याकडे साठवणीला जागा नाही असेही नाही. का नाही भुकेल्या पोटाचा , रिकाम्या हातांचा, वावरातल्या पिकाचा तारणहार झालात ?? 'एरवी प्रासादालयात इतके भाविक जेवले, तितके अन्न शिजले' बातम्या प्रसवणारे तुम्ही का नाही आज तितकेच अन्न तुमच्याकडे शिजताना दिसत?? का नाही गरजू तुमच्याकडे पोटाची खळगी भरताना दिसत ?? का पोलिसांच्या मदतीला तुमच्या संस्थान मध्ये सेवा देणारे हात धावत?? का दवाखान्यातल्या अपुऱ्या सोयी सुविधांसाठी तुमची ओंजळ रीती होत ?? का नाही संकटकाळी तुमचा आधार वाटत ?? का पिकाबरोबर शेतकरी मरतो ?? का कामकरी तुमच्या आश्रयाला न येता, मजल दरमजल करत त्याच्या गावी जातो ?? का दवाखान्यात अपुऱ्या सुविधांमुळे कोणाचा जीव जातो ??

 तुमच्याकडे 'अर्थ' आहे का?  हो मुबलक, जागा आहे का? हो कित्येक एकर, तुमच्याकडे सेवेकरी आहेत का ? तर हो शेकडोंनी आहेत .... मग जीवनमरणाच्या ह्या लढाईत तुम्ही कुठे आहात?? कुठे आहेत ती दानपात्रे, त्या मोठमोठ्या मंदिराच्या आणि प्रासादालयाच्या इमारती , त्या जेवणावळी ??
 लांबून लांबून प्रवास करून तुमच्यावर विश्वास आहे म्हणून भाविक येतात. किंबहुना येत होते असे म्हणू, आता नाही शक्यता वाटत. कारण आमची वेळ सांभाळायला आमच्या देवघरातला देवच सोबतीला आला. त्याच्या समोर ठेवलेल्या दानपात्रानेच आमच्या अर्थकारणाला टेकू दिला, तुम्ही बसलात दारे लावून. का ? .... आम्ही आजारी आहोत म्हणून ? आम्ही अडचणीत आहोत म्हणून ? की आमच्यामुळे तुम्हाला विटाळ होइल म्हणून ?

आम्ही आमच्या देवघराच्या साथीने आमची लढाई लढू आणि जिंकू सुद्धा. आणि परत तुमचे दानपात्र भरायला येऊ. मूर्तीला सोन्याचा मुलामा, मंदिराला चांदीचा गिलावा करू. आम्ही आहोत तुमच्यासाठी, तुमची हौसमौज भागवण्यासाठी. आमची वेळ साजरी करायला तुम्ही नाही आलात तरी चालेल, पण आम्ही येणार, ह्या गैरसमजातून आता बाहेर पडायची वेळ आली आहे.
आता बहुदा आमच्या देवाच्या आणि देवत्वाच्या व्याख्याच बदलतील. कदाचित आम्ही माणसात देव पाहू, माणुसकीची संस्थाने उभी करू ... जगलो वाचलो तर.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

(ता.क. मी संघाच्या मुशीत आणि हिंदुत्वाच्या संस्कारात वाढले. मी डाव्या विचारांचा पुरस्कार करणारी व्यक्ती नाही. कोणाच्याही भावना दुखवण्याचा ह्या लेखाचा हेतू नाही. तक्रार देवाबद्दल नाही तर देवस्थानांबद्दल आहे हे लक्षात घ्यावे. 'आपलीच श्रद्धास्थाने का आठवतात, इतरेजनांबद्दल का बोलत नाही?' असे प्रश्न विचारणाऱ्यांना आधीच सांगते 'वेळ प्रसंगी आपण आपल्या आई वडिलांकडे जातो , शेजाऱ्यांकडे नाही' आणि माझ्या श्रध्दास्थानांबद्दल इतरांनी बोललेले जर मला रुचणार नसेल तर मीही इतरांबद्दल न बोलण्याची काळजी घेतलीच पाहिजे. तसेही दान धर्म करायला मी माझ्याच शक्तीपीठांकडे जाते तर वेळ प्रसंगी त्यांच्याकडूनच अपेक्षा करणार. उगाच त्यावरून वाद घालू नये.)

Tuesday, April 28, 2020

ती मोठी झाली... माझ्यापेक्षाही ??

ती मोठी झाली...
माझ्यापेक्षाही ??

अचानक शाळेतून फोन येतो 'परीक्षा तात्पुरत्या रद्द झाल्या आहेत, मुलीला घरी घेऊन जा' आणि सुरु होतो तीच्या आणि माझ्या मैत्रीचा प्रवास. तसे आम्ही एकमेकींना गेली 14 वर्षे ओळखतो पण इतके दिवस एकाने सांगायचे म्हणजे मी आणि एकाने ऐकायचे(?) म्हणजे तीने. एकाने वळण लावायचे आणि एकाने वळणावळणाने त्या वळणाला कल्टी मारायची, एकाने पसारा अवरायचा एकाने जमेल तितका अजून पसरवायचा, एकाने अभ्यास घ्यायचा एकाने पूर्णपणे दुर्लक्ष करायचे, एकाने गरम गरम ताट वाढावे एकाने गारगोट्या करून मगच संपवावे. एकाने रागवावे एकाने फारसे मनावर न घेता सुळकन सुटून जावे.

अनेकवर्षं शत्रुराष्ट्रात छोट्या मोठ्या चकमकींच्या फैरी नित्याचीच बाब. एकाला वाटे 'जाहिरातीतल्या सारखी आई हवी' एकीला वाटे 'मुलगी आहे की भूत?'. सततचा (वि)संवाद , वादविवाद , प्रतिवाद, धावा, बचाव आलटून पालटून चालूच. तसा अधून मधून सुसंवादाच्या तुषारांचा थंड शिडकावा होत असे, निमित्त खरेदी, चित्रपट, मॉल, दुर्गा चे लिंबू सरबत, सालसा क्लास, पाणीपुरी, हापूस, श्रीरामपुर आज्जी, दादा, इ. चौदा(१४) वर्षे भागीले ही सगळी निमित्त गुणिले चौदा/पंधरा (14/15) = - शून्य(-०). एकमेकांकडे सतत संशयाने बघायचे आणि कोण आधी वार करतो किंवा कोण कोणापासून काय आणि कसे लपवतो किंवा लपवावे चा विचार फक्त, शांतता करार केलेल्या शत्रूराष्ट्रांसारखे चालायचे.

सुट्टी मिळाली , मुख्य म्हणजे दोघींनाही. एरवी तीचा वेळ स्वतःसाठी, त्यानंतर उरलेल्या वेळेच्या नव्वद टक्के (९०%) दादा साठी, थोडाफार (वसुलीपुरता) बाबा साठी आणि मारून मुटकून कसाबसा दोन टक्के (२%) CSR द्यावा तसा माझ्यासाठी अशी वाटणी असायची. त्या दोन टक्क्यात (२%) जसे आणि जितके जमेल तसे संस्कार-शिबीर आणि स्वाध्यायमाला घेण्याकडे माझा कल, मैत्रीचे बीज कुठे रुजणार आणि कसे अंकुरणार ??
ही सुट्टी मात्र ह्या सर्व टक्केवारीला अपवाद ठरली. अचानक सुट्टी जाहीर झाल्याने दादा त्याच्या हॉस्टेलहून घरी परत येऊ शकला नाही. बाहेरच्या जगाला पण सुट्टी असल्याने वसुली काय आणि कशाची करणार ?? स्वतःला वेळ द्यावा तर मैत्रिणींना पण कुलूप लागलेले. सगळ्यांचेच पाय घरात बांधले गेले. दोन (२) दिवस रागरंग पाहून 'नाईलाज को क्या इलाज' म्हणत शेवटच्या एकमेव उरल्या सुरल्या पर्यायाशिवाय मार्गच राहीला नाही असे लक्षात आल्यावर दोन्ही आघाड्यांनी शस्त्रास्त्रे म्यान केली...... आणि न भूतो न भविष्यती 'नव्या आघाडीचा' उदय झाला.

अगदीच नाही तरी सुरुवातीला कधी खुरपी काढ, कधी वाघनखे उगाच बाहेर काढून दाखव, तलवारीला धार करून ठेव, पिस्तुलीत बार असल्याचे जाहीर कर अशी सर्व नाटकं करून झाल्यावर सरतेशेवटी दात आणि नख पण काढून ठेवली गेली. त्यातच ऑनलाइन शाळा सुरू झाली. सकाळ पासून जे लॉगिन घाई सुरू होई ती दिवसभर चाले. शाळे नंतर व्यक्तिमत्व विकास आणि वैदिक गणित एक बाजू अडकवून ठेवत असत. त्यात घरचा-अभ्यासाची भर पडली. एकमेकांच्या मदती शिवाय गाडी पुढे हलेना. अभ्यास, शाळा,इ मधून बदल म्हणून घरातील छोटी छोटी कामे, स्वयंपाकघरात लुडबुड वाढली. ह्या सगळ्या पळापळीत एकमेकांना टाळी देऊन खोखो, खिखी, ह्याह्या, हुहू कधी सुरू झालं कळालंच नाही. तसे गणित/मराठी सारखे एका पक्षाचे मित्र आणि दुसऱ्या पक्षाचे शत्रू दोन्ही पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करायचे पण आता दोघीही कोणाला दाद देणार नव्हत्या. दोन्हीही पक्ष समसमान पातळीवर आले होते. तीने लिहावे, हिला वाचून दाखवावे. हिने चित्र काढावे , तीला दाखवावे, एकत्र दूरचित्रवाणी वर चित्रपट पहावे, एखाद्या दृश्यावर एकमेकांकडे फक्त कटाक्ष टाकून कारंजी आणि/किंवा धबधब्यांची बरसात व्हावी. आता बोलण्याची पण गरज राहिली नव्हती. आँखो ही आंखोंमे गुजगोष्टी होऊ लागल्या. खेळीमेळीचा अर्थ वागण्यातून समजला आणि समजावला जात होता. अशाच एका बेसावध क्षणी हिने तीला 'स्टँड-अप कॉमेडी' बघायला आमंत्रित केले. ती बावरली 'अंग हे काय बघतेस, त्यातले विनोद कसले असतात?' ... ती, ' chill bro, this show is non age restricted (ह्या शो ला वयाचा काही निर्बंध नाही) ... तू बघू शकतेस'.
ती गार  ......

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Sunday, April 26, 2020

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंथ

एक काळ होता, घर आणि घरातल्या जबाबदार्यांची सहज विभागणी होत असे. घर आणि संबंधित कामे फक्त स्त्री ची कधीच नव्हती. उलटपक्षी घरातला प्रत्येक सदस्य घरकामात हातभार लावत असे. त्यामुळे 'घर व्यवस्थापन' पर्यायाने 'कुटुंब व्यवस्थापन' सहज आणि नैसर्गिक होत असे. अगदी साध उदाहरण द्यायचे तर उंच फळीवर ठेवलेला डबा काढण्यासाठी सहजच कोणालातरी हाक मारून डबा काढून घेतला जाई, बागेला पाणी घालणे, बाजारहाट करणे, देवपूजेला फुले तोडून आणणे, विशेष प्रसंगी उंचावर ठेवलेली जास्तीची भांडी काढून देणे, घराची सजावट, पै पाहुण्यांना एसटी स्टँड वरून आणणे , नेऊन सोडणे, साधं चहा- नाष्टा भरून ट्रे दिवाणखान्यात नेला तर पटकन कोणी घरातल्या स्त्री च्या हातून तो ट्रे घेऊन सगळ्यांना चहा-नाष्टा देऊन ट्रे आत नेऊन ठेवत असे. एकमेकांच्या घरी जाणे-येणे, एकमेकांना मदत करणे हा सहजीवनाचा रुळलेला मार्ग होता.

कशी कुठे माशी शिंकली आणि घर व घरासंबंधी सर्व जबाबदार्या एकट्या स्त्री च्या वाटी आल्या. चोवीस तास पुरेनात मग त्या जगन्मातेला. त्यातून जन्म झाला मानसिक आणि शारीरिक ताण तणावांचा. चिडचिड करणे तिचा स्थायीभाव झाला. एकदा घरखर्च दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मानणारा पुरुषवर्ग उदयास आला. घरातल्या जबाबदाऱ्यांतून मोकळा झालेला पुरुषवर्ग त्यांचे रिकामपण एखादा व्यासंग,  सामाजिक-राजकीय कार्य, वाचन, व्याख्याने किंवा व्यसनात व्यतीत करू लागला. घराबरोबरच मुलांशीही त्यांनी नाळ कापून घेतली, पर्यायाने मुलांची जबाबदारी पण सहजच त्या माऊलीच्या खांद्यावर स्थिरावली.  घरातल्या स्त्री ची होणारी ससेहोलपट वाढणारी पिढी बघत होती. ठरवून नाही पण आपोआपच 'आपण स्वतःला ह्या रामरगाड्यात अडकवून घ्यायचे नाही' असे मनोमन चिंतत होती. स्वावलंबी होणे हा एकमेव पर्याय होता स्वतःचे आयुष्य स्वतः सावरण्याचा. स्वावलंबनाचा मार्ग होता नोकरी आणि नोकरीची मागणी होती शिक्षण. सुशिक्षित पिढीने ठरवल्याप्रमाणे केले. घरकामासाठी मोलकरणी ठेवल्या. कालांतराने होताहोता, कामवाल्या हातांची सवय कधी व्यसनात परावर्तित झाली कळालेच नाही. जसे घराला एक दिवाणखाना, झोपायची खोली, स्वयंपाकघर असावे लागते तशीच एक कामवाली पण हवीच ही मानसिकता झाली.

'मावशी उद्या येणार नाहीत' ही ब्रेकिंग न्यूज झाली. अशा समर प्रसंगी कोणी कोणती आघाडी सांभाळायची हे समजेनासे होऊन घरात तुंबळ युद्धे होऊ लागली. 'कामाला बाई सांभाळणे ही एक कला आहे' अशा आशयाच्या चर्चा किटी पार्टीत रंगू लागल्या. 'पैसे घे पण ये' अशी अगतिकता व्यक्त होऊ लागली. त्यातच संपूर्ण आयुष्य घर आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यतीत झाल्यामुळे मागची पिढी पुढच्या पिढीला मोकळेपणाने मदत करायला का-कू करू लागली. संसार तर मांडला, संसारवेलीवर फुले ही फुलली आणि नोकरी पण करायची . घरातील स्त्रीने अष्टभुजेचा अवतार घेउनही चोवीस तासाचे नियोजन सतत बिघडू लागले. परिणामी ती 'कामवाल्या मावशी/काकू/ताई' च्या पूर्ण आहारी गेली.
सुरवात घरातल्या संपूर्ण कामाची जबाबदारी तिऱ्हाईत व्यक्तीवर सोपावण्यापासून झाली. त्यासाठी पैसे मोजले. पूर्वी एक साबण पावडर महिनाभर चाले ती बाईंच्या राज्यात पंधरा दिवसात संपू लागली. साधारण सगळ्याच सामानाच्या बाबतीत ह्याचीच पुनरावृत्ती होत होती. घराचा अर्थसंकल्प सतत तोंडावर पडत होता. 'बाई आहेत' म्हंटल्यावर सुट्टीच्या दिवशी घरी बसून काय करायचे , कोणाच्या घरी जाण्यापेक्षा बाहेर फिरण्याकडे कल वाढू लागला. मग बाहेरच जेवण, आलोच आहोत तर थोडी खरेदी ... पुन्हा खर्च. ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता 'अजून जास्त पैसे कमावणे'. पैसे कमवायचे-गमवायचे , कमवायचे-गमवायचे असे होता होता जीवनातला आनंद, शांतता, सुख आणि आरोग्य मात्र हरवून गेले.

हे दुष्टचक्र अजून किती दिवस फिरत राहिले असते माहीत नाही. निसर्गाला हा सर्व पोरखेळ बघवला नाही बहुदा, त्याने जबरदस्ती सर्व कुटुंबियांना घरी थांबायला लावले. कुठलीही मदत मिळणार नाही. तुम्हीच एकमेकांचे 'मदतीचे हात' व्हायचे. उपलब्ध सोयी सुविधांमध्ये घरात नंदनवन फुलवायचे. सुरवात थोडी धडपड, थोडी कुरकुर, थोडी नाराजगी, थोड्या ओढाताणीने झाली खरी. पण घर आता एकमेकांना ओळखू लागले आहे. घराच्या आणि घरातल्यांच्या गरजा समजू लागल्या आहेत. 'इतकेही काही अवघड नव्हते घराचे व्यवस्थापन' हे समजू लागले आहे. ज्या साठी उर फुटेपर्यंत पळत होतो तो 'खर्चाचा राक्षस' आपोआप आटोक्यात आला. घर बोलू लागल, खेळू लागलं, एकमेकांच्या हातात हात घालून काम करू लागल. खोडकर घर, पसारा घर, सुगरण घर, अभ्यासू घर, प्रेमळ घर ते रम्य घर हा प्रवास बहुतेक घरांना साधला आहे. हास्याचे कारंजे, कधी कधी धबधबे सुदधा, गप्पांचे अड्डे, कविसम्मेलन, गाण्याच्या मैफिली, कथाकथन, नाच-गाणे, नानाविध खेळ घर घरातच घरासाठी घरातल्यांबरोबरच आनंदाने उपभोगू लागले आहे. बाहेरच्या जगावर अवलंबून असलेले घर आता एकमेकांचा आधार झाले आहे. घर एक झाले आहे.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Saturday, April 25, 2020

गाडगेबाबांचा एकच मंत्र स्वच्छतेचे जाणा तंत्र

गाडगेबाबांचा एकच मंत्र
स्वच्छतेचे जाणा तंत्र

'सध्याच्या परिस्थितीत एकतर सगळे काम घरी त्यात हल्ली ह्या भाज्या आणि फळे पण धुवावी लागतात, कटकट नुसती' ह्या बोलण्याने उडालेच. म्हणजे एरवी धुत नाहीत? तसेच धूळ, धूर, घाणीसह फ्रीज मध्ये ?? असते तरी कितिकशी भाजी, दोन (२) पिशव्या?? मॉलचा अपवाद वगळता, साधारणपणे भाजी किंवा फळे ही रस्त्याच्या कडेला किंवा भाजी मंडईत उघड्यावर विक्रीस ठेवलेली असतात. गाड्यांचा कार्बन, रस्त्यावरची धूळ, लोकांनी जागोजागी टाकलेली पिंक, तिचे उडालेले कण, कोणी नाक साफ केले असते त्याचे शिंतोडे काय काय नाही बरोबर घेऊन येत तुमची भाजी आणि फळे. त्यांना न धुता तसेच फ्रीज मध्ये बाहेरची सगळी घाण आतल्या सगळ्या सदस्यांना वाटायला पाठवायचे??? आणि मग काय 'पडू आजारी, मौज हीच वाटे भारी'.

आमच्याकडे भाजी घरी येणे हा एक सोहळा असतो. प्रत्येकच शेतकऱ्याच्या घरी, जो वस्तीवर न राहता शेतापासून जरा लांब गावात रहातो, त्यांच्याकडे साधारण सारखच चित्र असत. वस्तीवर राहणार्यांना भाजीपाला आणणे असले काही प्रकरण नसते. कढई ठेवली आणि तेल तापेपर्यंत भाजी खुडली तरी भागत. शेतावरून भाजी आली, हे वाक्य वाचताना डोळ्यासमोर दोन(२) लहान पोती आणावीत, आपल्या शहरासारख्या पिशव्या नाहीत. १०/१२ कवठ, ढीगभर चिंचा, २५/३० चिक्कू, ७/८ मोठे टरबूज, ५/६ लहान टरबूज, ५/६ खरबूज, ५/६ रामफळ, १०/१२ सीताफळ, २५/३० कैऱ्या, १५/१६ काकड्या, २५/३० लिंब, ७/८ पेर ऊस, केळाचा अख्खा घड अशी सर्वसाधारण फळ असतात. सध्याचा हंगाम लक्षात घेता ह्या फळांची नावे लिहिली. भाज्यांमध्ये ३/४ किलो वांगी, ३/४ किलो टोमॅटो, २/३ किलो मिरच्या, ३-३ जुड्या प्रत्येकी पालक, मेथी, कांद्याची पात, कोथिंबीर, करडई, आळू, २/४ गड्डे कोबी, फ्लॉवर, इ प्रकार. कांद्याचे १० किलो चे पोते वेगळे, लसणाची 3/4 किलोची पिशवी वेगळी. हे सगळं दोन (२) पोत्यातून घरी येत. एकदा हा जामानिमा घरी आला की आई त्याचे वाटे करणार आणि तेव्हा जे कोणी घरी असेल त्याने कॉलनी मध्ये सगळ्या घरी वाटप करून यायची जबाबदारी पार पाडायची असा दंडक असे. जे घरासाठी म्हणून वेगळे काढून ठेवले असेल ते लावणे हे एक दिव्य असते. मिरच्यांची देठ खुडून, धुवून, सुकवून एखाद्या रिकाम्या चॉकलेट च्या किंवा मिठाईच्या डब्यात खाली पेपर घालून मिरच्याना बंदिस्त करून फ्रीज मध्ये पाठवले जाते. सगळ्या पालेभाज्या नीट स्वच्छ करून, निवडून पेपर मध्ये गुंडाळून विराजमान होत. कांद्याची-लसणाची पात, आळू (भाजीचा)नीट कापून, वडीचा दुमडून डब्यात स्थानापन्न होई. लिंबू, कोथिंबीर, आलं त्यांच्या त्यांच्या डब्यात स्वच्छ होऊन, सुकवून जाऊन बसत. साधारण हे आणि असेच सर्व भाज्या आणि फळांना नियमात बसवून मगच फ्रीज चा मान मिळत असे. फळांची अजूनच तऱ्हा निराळी. पिकलेली खाण्यास तयार फळे आणि कच्ची फळे वेगळी काढायची. कच्च्या फळांना आढीचा मान. पिकलेल्यांना धुवून नीट फळांच्या ट्रे मध्ये हारीने लावून ठेवायचे. ज्यांना दत्तक द्यायचे आहे त्यांच्या पिशव्या वेगळ्या भरायच्या. कॉलनी मध्ये वाटप करून यायचे. इतके सगळे झाले म्हणजे सम्पले का ? तर नाही . नेमके शिकवणी किंवा शाळेच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावर कोणीतरी ओळखीचे रहात असते, आमच्याच शाळेत आईची एखादी मैत्रीण शिक्षिका असे, तिने आवर्जून 'अमुक एक गोष्ट नक्की पाठवशील' असे सांगितलेले असते. मग दुसऱ्या दिवशी तो सगळा 'वानवळा' घेऊन शाळेच्या दप्तराची कसरत करत इप्सित व्यक्तीपर्यंत पोहोचवला जायचा. नेमके रस्त्याने कोणी भेटे किंवा शाळेतील कोणी दुसरी शिक्षिका हे बघे आणि 'वाहिनीना उद्या माझ्यासाठी पण पाठवायला सांगशील' असा हक्काचा वटहुकूम घेऊन हुजरे संध्याकाळी घरी येत आणि निरोप सांगायचा साफ विसरून जात. आईची आणि ह्या व्यक्तींची गाठ पडून आईचा ओरडा पडेपर्यंत परत दोन(२) पोते भाजी आणि फळे घराचा उंबरा ओलांडत.

'खेडेगावात काय लोक असतात हाताशी कामाला', असेही कोणी म्हणू शकते. असतात ना... पण ह्या कामाला नाही. हे घरातल्यानीच पार पाडायचे सोपस्कार आहेत. आणि शहरात तुलनेने कितीकशी भाजी येते, तीही आठ (८) दिवसातून एकदा. तिला साफ करायला वेळ तो काय लागणार ?? आणि भाजी स्वच्छ करणे हे फक्त गृहिणीचेच काम आहे असा काही ह्या कामावर शिक्का पण नाही. घरातील कोणीही अगदी कळत्या वयातील मुले, आशीर्वाद देणारे हात किंवा पुरुष मंडळींची सुध्दा ह्या कामात मदत होऊ शकते.

'हल्ली हात-पाय धुतल्याशिवाय मी घरात कोणाला येऊच देत नाही'  हे एक असेच चमत्कारिक वाक्य. हल्ली ?? जसे समजायला लागले तसे आठवते, पायावर पाणी न घेता घरात किंवा स्वयंपाकघरात पाय ठेवताच तोफखाना लगेच सुरू होत असे. जसे काही आम्ही खून करून तलवारीला रक्त तसेच ठेवून घरात शिरलोय इतका गहजब माताश्री करायच्या. ह्या कटकारस्थानात आजी-आजोबा आणि बाबा सगळे तीला सामील. हे तर जाऊच देत. घरातल्या घरात स्वच्छ पायाने वावरणारे घरातील बिचारे बालकलाकार जबरदस्तीने परवचा आणि पाढे म्हणण्याच्या शिक्षेच्या आधी पुन्हा हात-पाय धुवायला पाठवले जात. कडाक्याच्या हिवाळ्यात सुदधा. नंतर परवचा म्हणताना शेकोटीचा/ शेगडी चा मान मिळे ही गोष्ट अलाहिदा. ठेवणीतले तिखट, मसाले, हळद, पापड-कुरडया, लोणच्याची बरणी ह्या सगळ्यांना हात लावण्या आधी हा धुवाधुवीचा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जात असे.

शेवटी प्रश्न आरोग्याचा आहे. काळजी घ्यावी, नाहीतर आमच्या रेवाताई ची लाडकी कविता आहेच 'पडू आजारी, मौज हीच वाटे भारी'

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, April 24, 2020

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी..

देव देव्हाऱ्यात नाही,
देव नाही देवालयी..

सध्या अनोळखी साथीने थैमान घातले आणि कुठलाही उपाय न सापडल्याने आपण सरळ शरण गेलो 'डॉक्टरांना'. तूच त्राता, तूच कैवारी म्हणायची वेळ आणली ह्या महामारीने. असे नाही की डॉक्टर आपल्या आयुष्यात नव्हतेच कधी. होते पण आपण खूप हिशोबी. बिल देत होतो ना मग उपकार कसले. आता जेव्हा बिल पण काम करेना तेव्हा त्यांचे योगदान, वगैरे ची आठवण झाली. 

कोरोना केवळ निमित्त, गेल्या अनेक वर्षात काही महत्वाच्या प्रसंगात देवदूत बनून आलेल्या डॉक्टरांची धावती आठवण. आमच्या ठाण्याचे डॉ. विवेक बिर्ला , 'शस्त्रक्रिया यशस्वी होणार, काही काळजी करू नका' असे स्वच्छ मराठीत आधार देऊन बरोबर कोणी आहे का ? मुलाला कुठे ठेवणार ,इ आपुलकीने चौकशी करणारे निष्णात युरोलॉजिस्ट डॉ विवेक बिर्ला.

कोणतीही ओळख नसताना रविवार असून 'मुलाला घेऊन या' म्हणणारे डॉ सुयश पाटणकर. नाशिक हुन आम्ही ठाण्यात त्यांच्या हॉस्पिटल समोर पोहोचलो पण मुलगा, हॉस्पिटलच्या आधीच्या अनुभवाने, गाडीतून उतरायलाच तयार नव्हता, सर त्याच्याशी काय बोलले माहीत नाही पण जादू व्हावी तसा तो आत यायला तयार झाला. त्यांनतर ह्या जादूचा प्रत्यंतर सतत महिनाभर येत राहिला. माझा मुलगा परत दोन्ही पायावर उभा राहिला, चालू लागला, पळू लागला, फुटबॉल खेळू लागला. आणि सर आमचे कायमचेच 'फ्रेंड डॉक्टर काका' झाले. मुलीच्या हातावर काच पडो, घरात कोणाचा अपघात होवो, मुलाच्या हाताचे हाड स्केटिंग करताना तुटो आमचे हक्काचे ठिकाण 'फ्रेंड डॉ. काका'. सरांमुळे आम्ही सगळे पडझड, मोडतोड तांबापितळ झालो होतो. खात्री होती, काहीही झाले तरी सर आहेत. अतिशय शांत, सुस्वभावी सरांना एकदा जाम चिडलेले पण पाहिले आहे. निमित्त माझा लोकल ट्रेन मधून पडून झालेला अपघात. त्यांच्याकडे जाईपर्यंत अपघाताचे गांभीर्य मलाच नव्हते आले तर घरातल्यांना कुठून येणार. अपघात इतका जोरात झाला होता की त्या माऱ्याने रक्तप्रवाह थांबून पायाच्या संवेदना बधिर झाल्या होत्या त्यामुळे मला काहीही वेदना होत नव्हत्या. परंतु सरांनी जेव्हा पाय बघितला, लाल-जांभळा रंगाचा फुटबॉल सारखा दिसणारा गुडघा बघून त्यांचा दिवसभरातल्या सगळ्या शास्त्रक्रियांचा शिण रागाच्या रुपात बाहेर पडला.... कारण पण तसेच होते. अपघात झाल्यावर पूर्ण सात(७) तासांनी त्या तशा पायाने मी चालत त्यांच्याकडे गेले होते.

ह्याच अपघातामुळे अजून एका देवदूताशी ओळख झाली. ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पायाची शस्त्रक्रिया झाल्यावर फिजीओथेरपी साठी डॉ मॅथ्यू ह्यांच्याकडे पाठवले गेले. आज मी जे पायाला कुठल्याही प्रकारचा पट्टा अथवा आधार न घेता तुटक्या गुढग्यानिशी ताठ चालू शकते, चार मजले जिन्याने चढू-उतरू शकते, शास्त्रीय नृत्य करू शकते ते केवळ आणि केवळ डॉ मॅथ्यू सरांमुळे. खूप खूप धन्यवाद सर.

डॉ महाजन काका , होमिओपॅथी चे डॉक्टर. साधारण जुन्या ठाण्यात सगळ्यांना माहीत असलेले. काहीही झाले नसेल, फक्त कशाचे तरी वाईट वाटते आहे, काही गोष्टी मनाला लागल्या आहेत, कोणाशीतरी बोलावेसे वाटते आहे अशा कोणत्याही कारणाने काकांचा दरवाजा ठोठवावा. त्यांच्याकडे रुग्णांची तोबा गर्दी असे. पण 'काय माझा उगाच वेळ घेतेस' असे ते कधी म्हणाले नाहीत. उलट घरातल्या ज्येष्ठ व्यक्तीसारखे समजून घेत आणि समजावून सांगत.

अजून एक काका ... नवरंगे काका. ज्यांना रूढार्थाने डॉक्टर नाही म्हणता येणार पण माझ्यासारख्या अनेकांसाठी मनापासून ते शरीरापर्यंत सगळ्या व्याधींसाठी रामबाण उपाय म्हणजे आमचे नवरंगे काका. काका ऍक्युप्रेशर चे तज्ञ. मला तर काकांनी पाठीत नुसता धपाटा जरी दिला तरी सगळे आजार पळून जात असत. सगळ्यांनाच खूप आधार वाटायचा त्यांचा.

डॉ विनोद इंगळहल्लीकर, खूप मोठे नाव. पण आमच्यासाठी 'काका'. पाय  मोडो नाहीतर मन मोडो काकांना त्रास दयायचाच. काकांच्या घरी टेबल वर बसून काकूंच्या हातचा चहा आणि गप्पा अविस्मरणीय क्षण. 'गाणे शिकायला येते' असे नुसताच 'बोलाचाच भात आणि बोलचीच कढि' स्वरूपाचा वादा प्रत्येकवेळी करावा आणि काकांनी 'तू कसली येतेस' म्हणावे. एखादा महोत्सव असो नाहीतर एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरवात काकांच्या कानावर घालणे हा रिवाजच झाला होता. कवी, गायक, संगीतकार काका डॉक्टर पण आहेत हे ज्युपिटर मध्ये गेलो की आठवायचे.

पुन्हा डॉ इंगळहल्लीकर, पण इथे काका नाहीत तर काकू, डॉ शरयू इंगळहल्लीकर. मी भेटले तोपर्यंत काकूंनी प्रॅक्टिस सोडली होती. त्यामुळे त्या डॉक्टर कमी आणि काकू म्हणूनच जास्त अनुभवल्या. काकूंशी बोलताना एक विश्वास असायचा की माझे बोलणे दुसरीकडे कुठे जाणार नाही, अगदी काकांपर्यंत सुद्धा नाही. उत्तम चित्रकार, व्यासंगी वाचक, उत्तम श्रोता आणि खूप चांगली मैत्रीण म्हणजे डॉ शरयू इंगळहल्लीकर काकू.

अजून एक व्यक्तिमत्व डॉ. इंगळहल्लीकर कुटुंबातलेच. डॉ अनघा इंगळहल्लीकर वझे, मानसोपचारतज्ञ. नाजूक चणीची, ठाम विचारांची, भक्कम आधार वाटावा अशी व्यक्ती. कधी मैत्रीण व्हायचे आणि कधी डॉक्टर च्या भूमिकेत शिरायचे ह्याची उत्तम समज असलेली, शेतीत रमणारी, फोटोग्राफी आजमावणारी, सुंदर आणि सुशील डॉक्टर. कधीतरी आयुष्यात एक वेळ अशी येते की काहीही न सुचून मेंदू काम करायचे थांबतो. अशावेळी तुमच्यासाठी कोणीतरी ठाम निर्णय घेऊन मार्ग प्रवाही करावा लागतो. ती डॉ अनघा वझे.

एक मैत्रीण आठवली की लगेच दुसरी मैत्रीण मनाच्या कोपऱ्यातून हळूच बाहेर येऊन खुणावते, डॉ प्राची जावडेकर. आधी ओळख होते ती एक स्वयंसेवक म्हणून. हळू हळू गप्पा (ऑनलाइन) होताहोता अचानक कळते ही कवितेसारखी नाजूक बोलणारी, हळूच हसणारी, सुंदरी चक्क डॉक्टर आहे, ते ही डेंटिस्ट ज्याची सगळ्यांना भीती वाटते. पण आधीच्या तमाम डेंटिस्ट्स च्या अनुभवावर पाणी फिरवून विश्वासाने कुटुंबकबिल्यासहित सगळ्यांचे दात आणि जबडा विश्वासाने जिच्या हाती द्यावा अशी हळुवार डॉक्टर. लोकांकडून अक्कल दाढ काढण्याचे एक एक किस्से ऐकले की आपण आपली अक्कलदाढ प्राचीच्या हातात दिली ह्याचे एकदम हायसे वाटते. नंतर तिने ती हळूच काढून माझ्या हातात कधी दिली कळाले पण नाही. सोनेपे सुहागा म्हणजे दुसर्या दिवशी माझा हनुमान न होता मी कोर्टात जाऊ शकले हे विशेष.  एक नाटककार, लेखक, कवियत्री आणि उत्तम समीक्षक म्हणजे डॉ प्राची जावडेकर.

डॉ प्रतिभा गुप्ते. लोकांसाठी गायनोकॉलॉजिस्ट माझ्यासाठी मैत्रीण. गरज पडली तरच तिला डॉक्टर च्या मखरात बसवले जाते नाहीतर एरवी फक्त मैत्रीण. एकदा एक सोनिग्राफी करायची होती. तिला माझ्या स्वभावाची इतकी खात्री होती सोनिग्राफी ची वेळ घेणे, त्या वेळेला स्वतःची गाडी घेऊन मला घेऊन जाणे, पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत तिथे थांबून रिपोर्ट बघून औषध लिहून देऊन, औषध कंपनीच्या मुलाला घरपोच औषध द्यायला सांगून, अधून मधून गोळ्या घेतेस ना चा डोस आणि शेवटी आता तरी मला बरे वाटते आहे का हे विचारण्याचा फोन ही तीच करते. जसे माझे बरे होणे ही तिचीच जबाबदारी. एक मुलींची काळजी करणारी आई, एक समाजसेविका, सगळ्यांना धरून ठेवणारी, शक्यतो कोणाला न दुखवणारी, सरळ-स्वच्छ मनाची डॉ प्रतिभा गुप्ते.

आमचे डॉकटर काका....डॉ दिलीप पटवर्धन, मानाचे पान. आम्ही ब्राह्मण सोसायटी मध्ये राहायला गेलो आणि डॉ पटवर्धन काकांशी ओळख झाली. काका शिक्षणाने MS. पण शेजार असल्यामुळे आम्ही काकांना फॅमिली डॉक्टर ते मानसोपचार तज्ञ सगळ्याच भूमिका पार पाडायला लावायचो. सर्दी-ताप ते डोक्याला शॉट काहीही होवो. काकांना फोन आणि भेट ठरलेलीच. हल्लीच काकांनी कोरोनाच्या काळात ते २४ X ७ उपलब्ध असल्याचा मेसेज पाठवला. मी खोखो हसले. आमच्यासाठी तर नेहमीच तुम्ही २४ X ७ उपलब्ध असतात. लोक घंटाळीला देवी दर्शनासाठी जातात, आम्ही काकांच्या दर्शनासाठी जातो. काकांना कधीही राग येत नाही. कितीही वेळ कितीही कटकट केली तरी मध्ये एक शब्द ही न बोलता ते शांतपणे सगळी भुणभुण ऐकून घेतात. तिथेच सगळा आजार पळून जातो, नंतर च्या औषध देण्याचा सोपस्कार केवळ मेडिकल चे दुकान चालवण्यासाठी. काकांकडून फक्त औषध घेणे मान्यच नाही, काकांची बाईक, काकांची गच्ची, काकांचा संगणक सगळे नावावर करून मगच तिकीट काढा असे फर्मान असते. (गैरसमज नसावा: तिकीट अमेरिकेचे, काकांची मुलगी अमेरिकेमध्ये असते आणि आता काकूंही तिकडेच गेल्या: हा संदर्भ.) गम्मत म्हणजे जसे ते माझे काका तसेच मुलांचेही काकाच. एक आधारवड म्हणजे डॉ दिलीप पटवर्धन काका.

कोणाचेही आभार न मानता तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात राहण्याचा हक्क अबाधित ठेवते.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

गाढव मेल ओझ्यान अन शिंगरू हेलपाट्यान ..

गाढव मेल ओझ्यान
अन शिंगरू हेलपाट्यान ..

    'कोणासाठी करतोय ते सगळं? 'तुमच्या' साठीच ना?' साधारण हे वाक्य पुरुषांच्या तोंडून बरेचदा ऐकायला येते . इथे 'तुमच्या' च्या व्याख्येत येतात ते फक्त 'बायको आणि मुले'. अपवाद वगळता स्त्रिया अशी प्रतिक्रिया देताना फारशा दिसत नाहीत. ज्यांच्यावर कुटुंब प्रमुख म्हणून उभे राहण्याचा प्रसंग आला आहे, अशा स्त्रिया देखील 'कुटुंबासाठी उभे राहणे माझी जबाबदारी आहे, ते माझे कर्तव्य आहे, मी नाही तर कोण करणार?' अशी संयत प्रतिक्रिया देताना आढळतात.

 सध्या निसर्गाने धक्का मारून 'तुमच्या' म्हणजे आपल्या कुटुंबाच्या सहवासात रमण्याची संधी दिली असताना हे तमाम कुटुंबप्रमुख पोलिसांचा मार खायला घर सोडून सारखे बाहेर का पळत असतात? सगळ्या वृत्तवाहिन्या आणि त्यांचे 'सूत्र' ह्यांचा हवाला देऊन हा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. नव्यान्नव (९९) टक्के पुरुष आणि एक (१) टक्का महिला मुशाफिरी करताना दिसतात. त्या एक (१) टक्क्यात पण एकतर घरातले कोणीच बाहेर जाऊन समान आणू शकत नसेल किंवा एकट्या रहात असतील किंवा आपल्या वर उल्लेखिलेल्या 'अपवाद' मध्ये मोडणाऱ्याच महिला असतील.

अंदाजे 20/25 मुली बघून एकीची निवड करण्याचा चोखंदळपणा दाखवून किंवा आकंठ प्रेमात पडून चंद्र-सूर्य तोडून आणण्याची तयारी दाखवून जिच्याशी आयुष्याची गाठ बांधली, नवस-सायास करून किंवा नियोजन करून ज्या सुकुमार(री) ला ह्या भूतलावर आमंत्रित केले, 'कोणी घर देता का घर' अशी मनोमन प्रार्थना करून, बँकेच्या लोन साठी स्वतःला झिजवून जो सर्व सुखसोयीनी युक्त महाल उभा केला, ज्याला स्वतःच्या कल्पनांचा सडा शिंपून सजवले ते सर्व केवळ एका 'रस्त्यावर फेरफटका' मारण्यापुढे नगण्य ठरावे?

आमची आई नेहमी म्हणते 'स्वतःच्या घराचा काय तो कंटाळा?'. हे जर खरे असेल तर ती बायको, मुले, घर, इ सगळे स्वतःचे न वाटता रस्ता, शुकशुकाट आणि पोलिसांचा बांबू जवळचा वाटायला लागला की काय?? अनाहूतपणे एक संधी चालून आली आहे, संधीचे कारण खूपच वाईट आहे, पण ती काही आमंत्रित संधी नाही, सर्वार्थाने 'चालून आलेली' संधी आहे, मग त्या संधीचे सोने का करू नये?? नात्यांचा, रिकामपणाचा आणि घराचा उपभोग का घेऊ नये ?? हवे तेवढावेळ मुलांबरोबर खेळता येते, बायकोबरोबर गप्पा मारता येतात, कितीही वेळ वाचन करता येते, मित्रांना / नातेवाईकांना फोन वर भेटता येते, कौतुकाने घेतलेल्या सोफ्यावर निवांत पाय पसरून बसता येते, सकाळी बेड वर कितीही वेळ लोळता येते, मनात आले की स्वयंपाकघरात जाऊन काही बाही तोंडात टाकता येते, कॅरम,पत्ते, सापशिडी शी परत मैत्री करता येते .... 'सध्या मी खऱ्या अर्थाने आयुष्य उपभोगतो आहे' हे एकदा मनाला समजावून सांगा. कदाचित घरात कंटाळा येणार नाही. त्यातूनही अगदीच रिकामपण ग्रासत असेल तर घरात चिक्कार कामांचे ढीग आहेत , ते उपसायला अर्धांगिनी ला मदत करा, घराचे नंदनवन होईल ह्याची शंभर टक्के (१००%) हमी.

गृहिणी, पोलीस, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी, सफाईकामगार, बातमीदार, ट्रक चालक, दुकानात काम करणारे कामगार, बँक कर्मचारी, सरकारी नोकर, प्रशासकीय अधिकारी, काही नेते मंडळी, समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते जे सध्या नेहमीपेक्षा दुप्पट काम करत आहेत त्यांनी म्हंटले असते  'थोडा बदल हवा, जाम कंटाळा आला' तर समजू शकतो. काहीही न करता, बसल्याजागी कंटाळा येणाऱ्या जमातीला 'शिंगरू' नाहीतर काय म्हणावे ??
अडचणी आहेत ना, भविष्याचे प्रश्नही आहेत, 'किती दिवस आणि पुढे काय' अशी अनिश्चितता देखील आहेच. परंतु बाहेर पडल्याने प्रश्न संपणार आहेत का? बाहेर त्या प्रश्नांची उत्तरे तुमची वाट पहात उभी आहेत का? बाहेर आहे फक्त इतरेजनांना अजून अडचणीत टाकू शकणारी एक 'संधी'.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Thursday, April 23, 2020

वाचाल तर वाचाल नाहीतर ... 'वाचाळ'

वाचाल तर वाचाल
नाहीतर ... 'वाचाळ'

जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करताना एका लेखक मित्राला सहजच विचारले 'सध्या काय वाचतोस?' उत्तर आले 'जगणं'. किती समर्पक ... स्वतःचे मन,आजूबाजूचे लोक, लेखक असल्यामुळे लिखाणातील पात्रे कितीतरी वाचन उपलब्ध आहे आणि आपण सर्वसामान्य लोक मात्र लोकडाऊन मुळे पेपर नि पुस्तक मिळत नाही म्हणून रडतो. हा लेखक-वाचक प्रकारचं वेगळा,  आपण त्यांचे साहित्य वाचतो आणि ते कधी कुठेही न बघितलेले ,न ऐकलेले पुस्तक धुंडाळून फडशा पाडताना दिसतात.

वाचकांचे प्रकार आणि तऱ्हा तरी किती ... सगळ्यात गम्मतशीर प्रकार 'दिखाऊ वाचक'. त्यांच्या दिवाणखान्यात सगळ्यांना दिसेल अशी विक्रीचा उच्चांक मोडणारी पुस्तके रांगेत ठेवलेली असतात. वाचण्याची जबाबदारी तुमची, त्यांचा काही सम्बन्ध नाही. हे म्हणजे किशोरीताई, जगजितसिंग ह्यांचे हल्लीच 'नव-चाहते' जन्माला आले आहेत त्यांचेच नातेवाईक.
दुसरे असतात 'पद्धतशीर वाचक'. एका एका लेखकाची त्यांच्याकडे असलेली सगळी पुस्तके ओळीने लावलेली असतात, त्यांना छान वेष्टन घातलेले,पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, पुस्तक विकत घेतले ती तारीख सगळे तपशीलवार सुवाच्य अक्षरात लिहिलेले असते. कोणत्याही पुस्तकाबद्दल किंवा लेखकाबद्दल तुम्ही फक्त बोलायचा प्रयत्न करा, त्यांचे सगळे संदर्भ मुखोद्गत. हे खरेखुरे वाचक. आणि तो तसा त्यांना स्वाभाविक अभिमानही असतो. तुम्ही थोडे बोलायला किंवा संदर्भ द्यायला चूक कराच, वाद घालून तुमचा पार फडशा पाडतील.
तिसरा प्रकार 'शोषक वाचक'. जे वाचतील ते सर्व मनात, बुद्धीत, आचार-विचारात आणि  व्यक्तिमत्वात शोषून घेतात. ह्यांच्या समोर एखादे वाक्य जरी चुकीचे बोलले गेले तर कोणतीही प्रतिक्रिया न देता , स्वतःच्या पांडित्याचे प्रदर्शन न मांडता, ते फक्त ओठातल्या ओठात मंद हसतील. समजणारा समजून जातो, कानाखाली बसली आहे. समाजात ह्या वाचकांना आणि जेव्हा कधी त्यांच्यातला लेखक जागा होतो त्या लेखकाला फार मान असतो. अर्थातच तो त्यांनी त्यांच्या पांडित्याने मिळवलेला असतो. त्यांना 'मानाचा मुजरा'. 
चौथा प्रकार 'वाळवीच्या किडा'. एका पेक्षा जास्त ग्रंथसंग्रहालयात ह्यांची उठबस. वृत्तपत्रे (जवळ जवळ सगळीच),कथा, कादंबरी,आत्मचरित्र, प्रवास-वर्णने, किल्ले, जंगल, पक्षी-प्राणी, आकाश, भविष्य , चित्र-शिल्प-नृत्यकला, लेणी, खाणी, डोंगर राजे- रजवाडे, संग्रह, युद्ध, जमीन-पाणी सगळे विषय ह्यांचे चावून पचवून झालेले. शिवाय मासिकांसाठी वेगळे ग्रंथसंग्रहालय असतेच. ही जमात पुस्तक फारसे विकत घेण्याच्या फंदात पडत नाही. चुकून कधी एखाद्या विषयावर लिहिण्यास सांगितले तरी खाल्लेले कधीच पचून गेले म्हणत हात वर. पण जुन्या-नव्या सगळ्या लेखकांची नावे मात्र ह्यांच्या जीभेवर. बोलताना लेखक- कवींचा उल्लेख फक्कड एकेरी , बालमित्र असल्यासारखा. पण एखाद्या पुस्तकावर किंवा लेखकावर बोला सांगितले की ह्यांची दांडी गुल.
अजून एक फारच मजेशीर वाचक प्रकार असतो. 'आवडी निवडी काय?' असे विचारले की हमखास सांगणार 'वाचन'. काय काय वाचले आहे विचारले तर अभ्यासक्रमातली सगळी पुस्तके पण वाचलेली नसतात. सकाळचे वर्तमानपत्र रोज वाचायचे ठरवतात पण मुहूर्त काही सापडत नाही. ह्यांच्या पेक्षा पुस्तकांचा आणि पर्यायाने वाचनाचा तिटकारा करणारे लोक परवडले. सरळ सरळ तोंडावर खून करणार वाचनाचा 'कसला वेळ खाऊ प्रकार, एका ठिकाणी बसून बुड दुखु लागते आणि वेळ किती 'वाया' जातो, कशाला वाचायचे, बरे चालले आहे ना आपले'. मस्तच ... समोरासमोर एक घाव दोन तुकडे.
'म्हणजे वाचतो तसा मी, हल्लीच काही जमले नाही पुस्तक हातात धरायला' ही सगळ्यात फसवी जात. हे असल काहीतरी ते समजायला लागल्यापासून सांगत असतात. त्यांच्या बोलण्यावर त्यांचाही विश्वास नाही हे त्यांचा चेहेराच सांगत असतो. हातापायाची काहीतरी चमत्कारिक हालचाल करत, एरंड तेल घेतल्यासारखा चेहरा करून ते हे अख्ख वाक्य प्रचंड दबावाखाली एकदाचे बोलुन टाकतात आणि सुटकेचा श्वास सोडतात.
आपण कोणत्या प्रकारात मोडतो बरे ??
एका नवीन प्रकारात : ' खूप इच्छा असते , पण हल्ली 'वेळच' होत नाही. इतकी पुस्तक टेबलावर वाट बघतायेत पण काय करू, नाहीच जमत'. सगळ्यात वात्रट, डँबीस, बदमाश, खोटारडी जमात. वेळेचा प्रश्नच नसतो फक्त तो पुस्तकाला द्यायला जमवता येत नसत. किंवा पूर्वी इतकं वाचलं आहे आणि आपल्याला ओळखणाऱ्या सगळ्यांना माहीतच आहे की आपण वाचतो ते. मग काय घेतला थोडा 'टाइम प्लिज' तर कुठे बिघडले? बँकेत एकदा पैसे टाकायचे आणि व्याजावर आयुष्य काढायचे असा काहीसा प्रकार.

पण खऱ्या खुऱ्या वाचकांचे व्यक्तिमत्वच वेगळे असते. त्यांचे विचार मांडणे, साध्या गप्पा, एखादा विषय उकलुन दाखवणे, समोरच्याचे बोलणे कान देऊन ऐकणे, त्यावर सुंदर टिप्पणी देणे, भाषण करणे सगळंच सुंदर आणि मनाला भावणार. त्यांचा समाजातला वावर खूप आश्वासक आणि सुखकारक असतो. त्यांचे बोलणे म्हणजे खरे बोलणे बाकी आपली सगळी वाचाळगिरी.

कळावे, लोभ असावा

-  ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Wednesday, April 22, 2020

काय ही हल्लीची थेरं
आमच्यावेळी नव्हतं असं...

पिढ्या बदलतात तशा प्रथा, आवडीनिवडी, सवयी, वागणे पण बदलते. आणि सुरू होतो 'अमच्यावेळी नव्हतं असं' चा प्रवास. अंगभर नेसली जाणारी नऊवारी सहावारीला नाक मुरडणार तर सहावारी सलवार कमीजला, सलवार कमीज जीन्सपँट-शर्ट ला आणि अंगभर जीन्सपँट-शर्ट शॉर्ट म्हणजे तोडक्या कपड्यांना.
थोडक्यात प्रत्येक पुढची पिढी ही चूकच असते आणि मागची बरोबर.

दोन(२) वेळेला भाकरी थापणाऱ्या पिढीला पोळ्यांची नाटके समजत नाहीत आणि पोळी-भाजी, वरण-भात असा साग्रसंगीत चारीठाव स्वयंपाक करणारी पिढी शीरा-उपमा-पोहेचे चोचले पचवू शकत नाही आणि पाहुण्यांना चहा-पोहे करणाऱ्या पिढीला पिझ्झा-पास्ता-बर्गरचा विकतचा पाहुणचार पटत नाही. काहीही करोत, आनंदाने पोट भरतायेत ना, असा विचार कोणतीच पिढी करताना दिसत नाही.

बैलं जोरात पळवली म्हणून मुलाच्या हातुन बैलाचा कासरा काढून घेतला जातो तर सायकल जोरात पिटाळली म्हणून सायकलची चावी काढून घेतली जाते, मोटरसायकल चा कान जोरात पिरगाळून झिंगाट गाडी उडवली म्हणून गाडीची चावी लपवली जाते आणि चारचाकीत मित्र भरून वेगात गाडी चालवतात म्हणून चारचाकी बंद केली जाते. पुढच्या पिढीला बहुदा 'जमिनीवर चालणारी गाडी ने, उडणारी गाडी न्यायला तुला परवानगी नाही' असे काहीतरी म्हणावे लागणार.... ते काहीही म्हणोत पण "अमच्यावेळी नव्हते बाई असे, आमची मूल गुपचूप रस्त्यावरूनच गाडी चालवायची.... काय ही हल्लीची थेरं"

हे सगळं बहुदा आमच्या पिढी पर्यंतच असावं. मागच्या आणि पूढच्या दोन्ही पिढीना 'चुकीची' वाटणारी आणि दोन्ही पिढीच्या धाकात राहणारी आमची एकमेवाद्वितीय पिढी. मागच्या पिढीला वाटते आम्ही मुलांना धाकात ठेवायला, त्यांना वळण लावायला कमी पडलो. अती लाड करतात मुलांचे. त्याच बरोबर असेही वाटते की 'त्यांच्या' म्हणजे 'मागच्या पिढीला' समजून घ्यायलाही आम्हाला काही जमलेच नाही. ह्याच्या नेमके उलट प्रतिक्रिया येते पुढच्या पिढीकडू "तू सारखी काय मोठ्यांच्या पुढे पुढे करत असते ग? तू काय नोकर आहेस का त्यांची?बाबाचे आणि आता लग्नानंतर तुझेपण पालक आहेत ना ते, मग घेतील की समजून, नसेल समजून घ्यायचे तर सांग त्यांना येऊ नका आमच्या घरी. तुम्हाला ना तुमचे आयुष्य तुमच्या पद्धतीने जगताच आले नाही कधी"  .... हे एक टोक आणि दुसरे "ठीक आहे, आहेत ते घरातले मोठे, मग काय? आयुष्य आमचे आहे, कोणासाठी आम्ही का तडजोड करायची?....आणि कृपया हे प्रकार आमच्यावर लादू नका "
दोन्ही कडून आमचीच ढोलकी वाजतेय. मागच्या पिढीला काही बोलायची ताकद नाही आणि पुढच्या पिढीला अक्कल शिकवायची हिम्मत नाही.
तुमच्या वेळेला नसेल ना असं काही?? .. ही हल्लीचीच थेरं.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, April 21, 2020

महानगरे आणि इतर...

प्रत्येक भागाचे एक वैशिष्ट्य असते, तसेच त्या त्या भागाची एक प्रवृत्ती असते. भाषा बदलतात, पदार्थ बदलतात, पेहराव बदलतो, सणवार बदलता. काही बाबतीत मात्र सर्वत्र काही गोष्टी समान असतात. पण त्यातही दोन प्रकार 1. महानगरे, 2. उर्वरीत महाराष्ट्र.

मी ग्रामीण भागातून असल्याने मी उर्वरित महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करते. आमच्याकडे शाळा संपली की 'हव्या त्या 'शाखेत' प्रवेश मिळाला का ?' विचारतात. तेच महानगरांमध्ये 'हव्या त्या 'महाविद्यालयात' प्रवेश मिळाला का?' असे विचारले जाते. आमच्याकडे मुलांवर इतका विश्वास असतो की महाविद्यालय कोणतं का असेना मुलगा मारून नेईल म्हणजे यशस्वी होईल हा विश्वास असतो. तेच महानगरांमध्ये 'चांगले महाविद्यालय मिळाले तर मुलाचे भविष्य मार्गी लागेल' असा विचार असतो. आपल्या मुलापेक्षा महाविद्यालयावर विश्वास अधिक. मेस ( खानावळ) चेही तसेच. आमच्याकडे विचारतात 'वेळेत पोटभर जेवायला मिळतं ना?' तिखट आहे, गार आहे, गरम आहे बाकी काहीही नाही. महानगरात मात्र रडारड 'फार खाण्याचे हाल होतायेत , घरच्यासारखे नाही मिळत, वगैरे'. जसे तुमचे मूल तिकडे शिकायला नाही तर जेवायलाच गेले आहे. थोडे लांब जावे लागत असेल तर आमच्याकडे फक्त जायची यायची सोय आहे ना एवढेच बघतील. फार फार तर फर्मान सोडतील 'जरा लवकर उठून 10 मिनिटे आधीच निघत जा म्हणजे गाडी हुकणार नाही'. महानगरात मात्र 'फार लांब जावे लागते हो, विनाकारण सकाळी लवकर उठायला लागत'. लवकर उठावे लागण इतकं वाईट असत? उलट चांगले आहे ना तुमचे मूल जे तुम्हाला दाद देत नव्हतं, ते आपोआप लवकर उठायला लागले आहे, स्वतःची जबाबदारी स्वतः घेते आहे. अभीमान वाटायला हवा की वाईट ??? शाळा-महाविद्यालयात पुस्तके नाही मिळाली तर 'घ्यावं एखाद्या मित्राचं, रात्रभर जागून लिहून घेतलं की अडचण नाही' असा आमच्याकडचा विचार. आणि महानगरात 'पुस्तक पाहीजे म्हणजे पाहीजे' चा आग्रह. माझे शिक्षण ही माझी जबाबदारी आहे हे आम्हाला माहीत असते. परंतु महानगरात 'पाल्यांचे शिक्षण ही पालकांची जबाबदारी' असल्यासारखे वातावरण. नोकरी/ व्यावसायाचेही तसेच, आमच्याकडे 'काम मिळाले का' विचारतात. 'जास्त वेळ थांबून काम वेळच्यावेळी संपवत जा' असा प्रेमळ दम ही देतात. महानगरात मात्र वेगळीच तऱ्हा 'फार काम असते, जास्त वेळ थांबावे लागते' म्हणून कुरकुर. उरलेल्या वेळेत ह्यांची मुले जशी देशसेवा करायला जाणार असतात. एक असाच चमत्कारिक प्रश्न विचारला जातो 'तुला स्वयंपाक येतो?' आमच्याकडे सगळ्यांनाच येतो प्रश्न फक्त 'सुगरण की नाही' इतकाच. अभ्यासामुळे स्वयंपाक शिकणे झाले नाही ही नाटके महानगरातली. पण एक गम्मत आहे , अभ्यासामुळे चित्रपट, नाटके, मॉल, खरेदी, हिंडणे-फिरणे, गप्पा, ब्युटी पार्लर, लग्नकार्य राहिली असे कधीच होत नाही. जो स्वतःसाठी पण अतिशय गरजेचा आहे तो स्वयंपाकच कसा राहून जातो??

अजून एक गमतीशीर चर्चासत्र सगळ्या वाहिन्यांवर आळीपाळीने चालू असते. 'मराठी भाषा संपून चालली आहे'. चर्चेत सहभागी मान्यवर अर्थात शहरात राहणारे. त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकणारी. मराठी भाषेची काळजी त्यांना वाटणे स्वाभावीकच आहे. पण ती चर्चा तुम्ही तुमच्या सारख्या लोकांमध्येच करा ना राव. ह्या चर्चाबाज लोकांना माझं एक सांगणं आहे, 'उर्वरीत महाराष्ट्राला फक्त आणि फक्त मराठीच येत'. इंग्रजी तर जाऊच देत, आमचे हिंदी ऐकाल ना तर जागीच भोवळ येऊन पडाल. 'एक बाई जा रही थी। उसके कडेपर एक मूल था।' असं तर आमचं हिंदी. मराठी भाषा संपुन चालली तर मग आम्ही कोणत्या भाषेत बोलायचे?
ह्या मुंबई महानगरात एका मिनिटात 200 अहिराणी बोलणारे लोक जमा होऊ शकतात, तर खान्देशात किती असतील. कोकणात कोकणी न बोलणारा शोधून दाखवावा. अहो, मराठीच्या पोटभाषा जेथे अजून व्यवस्थित धडधाकट आहेत, तीथे मराठी कशी मरून चालली ? कधी आमच्या भागात या, पगडी बांधलेला सरदार अस्खलीत मराठी भाषेत बोलताना दिसेल. अस्खलीत म्हणजे आमच्या भागातली मराठी, तुमची पुणेरी मराठी नाही. आमच्याकडे नाव सांगितल्या शिवाय नुसत्या बोलण्यावरून कोणाचाही धर्म समजणार नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे तर नाहीच पण परप्रांतीय वगैरे प्रकार पण नाहीत. पंजाबी असो, सिंधी असो, मारवाडी-गुजराथी असोत, उत्तर-दक्षिण भारतीय नाहीतर नेपाळी असो.. मराठीतच बोलणार. कारण ती आमची व्यवहार भाषा आहे. दुकानात जा , सरकारी कचेरीत जा, बँकेत जा, कोर्टात जा, यष्टीनं (ST बस) प्रवास करा नाहीतर गाडी(रेल्वे) न, आम्ही मराठीतच मांड ठोकून गप्पांचा फड जमवणार. आणि तीच भाषा जर मेली तर आम्ही काय मुक्यानी जगायचे?? मराठी शाळात मग काय मंगलकार्यालय बांधायचे का ?? मराठी शाळेला प्रवेश घेणारा बहुसंख्य समाज आमच्याकडे अजूनही आहे. जोपर्यंत मुलं तिथे शिकत आहेत, तोपर्यंत मराठी मरेलच कशी ? उलटपक्षी राज्यसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पास झाली की आम्हाला इंग्रजीचा प्रश्न भेडसावू लागतो.

त्यामुळे आजाबात मराठीची चिंता करू नका. शहरात फारच गुदमरायला लागलं तर गावाकडं पाय मोकळे करून या, भरपूर मराठीत श्वास घ्या आणि तेवढं चर्चा बंद करायचं मनावर घ्या.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Monday, April 20, 2020

दोन डोळे शेजारी
भेट नाही संसारी..

आईला सोडून धाकटा भाऊ वेगळा निघाला. मोठ्या भावाला अक्षरशः लुबाडून, जाता जाता त्याचे मानसिक, आर्थिक, सामाजीक खच्चीकरण करून. मोठाच तो ... शांतपणे पितामह सांगतील तसे वागला, पैसे दिले, जमीन दिली, प्रत्येक मागणी पूर्ण केली. इतकी की मोठ्याच्या घरातले वैतागले, कंटाळले ह्या मोठेपणाला..... उद्रेक उद्रेक फक्त उद्रेक.

येवढ्यावरच संपणार नव्हतं हे प्रकरण. आयत मिळतंय म्हंटल्यावर धाकट्याची भूक वाढू लागली. अजून जमीन हवी... मोठ्याचे नाक कापायचे होते त्याला, त्याचा मान हिरावून घ्यायचा होता. धाकट्याला सगळीकडे मी, मी आणि मीच दिसत होता. शेजारी-पाजारी, नातेवाईक, मोठ्याचे मित्र आणि शत्रूही सगळ्यांजवळ मोठ्याच्या कागाळ्या करून झाल्या. शत्रूशी मैत्री करून झाली. स्वतःच्या मुलांच्या मनातही मोठ्या बद्दल विष कालवले गेले. त्यांची मोठ्याच्या विरुद्ध लढायला फौज तयार केली गेली. मोठा हे सगळं सहन करत होता.... त्याच्या आईसाठी. असेही होते कोण त्याची बाजू समजून घेणारे, त्याच ऐकणारे, त्याची बाजू मांडणारे. त्याच्या घरातल्यांची घालमेल होत होती. गरिबीच्या लाचारीची चीड येत होती. एकेकाळी ऐश्वर्य भोगलेल्या त्या कुटुंबाला दारिद्र्याचे चटके सहन होत नव्हते. त्याहीपेक्षा आपल्या जीवावर उड्या मारणारा आणि परत परत लचके तोडण्याचा प्रयत्न करणारा तो धकट्याचा शेजार असह्य होत होता.

मोठ्याचे मन तरी किती मोठे असावे? इतके होऊनही धकट्याचे जे नातेवाईक त्याच्याबरोबर गेले नाहीत, त्यांच्या पाठीशी मोठा उभा राहीला. घरातल्यांनी आक्रोश केला , सपाटून विरोध केला, पितामहनचे प्राण हिरावून घेतले गेले पण मोठा ठाम राहिला. पितृशोक सहन करून तो धाकट्याच्या जुमल्याचे करतच राहिला. धाकटा विकृत, त्याने त्याच्या मागे सुटलेल्या कबिल्याच्या मदतीने मोठ्याच्या घरात घुसून त्रास द्यायला सुरुवात केली. मोठ्याची कित्येक लेकरं ह्या दगाबाजीत कामी आली. सततचा उपहास आणि निंदा, त्यात दारिद्र ... मोठ्याच्या घराने निर्णय क्षमताच गमावली होती. काहीही झाले की धकट्याचे नातेवाईक फुसफुसायला लागायचे 'आमचा अपमान झाला' , रडारड सुरू व्हायची 'आमच्याकडे कोणी लक्षच देत नाही', तक्रारींचा पाढा सुरू व्हायचा 'आम्हाला हे फुकट द्या, ते फुकट द्या' 'आमचे नियम वेगळे, तुमचे वेगळे, तुमच्या नियमात आम्ही बसणार नाही'. भांडणे, मारामाऱ्या, नुकसान तर पाचवीलाच पुजलेले. मोठ्याचे कुटुंब आपल्याच घरात पाहुणे झाले. घाबरून राहू लागले. समाजात बोलताना, वावरताना धाकट्याच्या नातेसंबंधांना भिऊन राहू लागले. हा बोटचेपेपणा इतका वाढला की मोठ्याचीच काही लेकरे कातडी बचाव धोरणं अंगीकारून धाकट्याच्या कबिल्यासाठी नक्राश्रु गाळू लागली, त्यांच्या बाजूने बोलून आपल्याच बांधवांना शापू लागली.

आणि एक दिवस पाळणा हलला ' राम जन्मला ग सखे राम जन्माला'. सगळीकडे आनंदी आनंद झाला. धाकटा घाबरला, कुठे जाऊ, काय करू, कसे लपू काही समजेनासे झाले. जाऊ तिथे रामाचा जयजयकार. पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही. धकट्याचे कोणी ऐकेना. सगळे फटकारू लागले. आणि एक दिवस रामाची वानरसेना ह्या गोंधळलेल्या धाकट्याला अजून बुचकळ्यात टाकून त्याच्या शामियान्याचे कळस कापून घेऊन आली. धाकटा चवताळला, चरफडला, हताश झाला. आमच्याकडे कळस नव्हतेच सांगून स्वतःचे हसू करून घेऊ लागला. इतके होऊनही धाकट्याची खोडकी मोडली नव्हती. मी घाबरलो नाही आहे, हे दाखवण्यासाठी बहुदा , अधून मधून कुरापती काढतच होता.

पण आज मोठ्याच्या कुटुंबाने बाळसे धरले आहे. पाठीचा कणा सरळ झाला आहे. मान ताठ झाली आहे. समाजात इभ्रत वाढली आहे. धाकट्याने आणि त्याच्या कबिल्याने आता जरा सबुरीने घ्यावे.... नाहीतर रामाची वानरसेना आता अख्खा शामियानाच घरी घेऊन येतील.
जय श्रीराम !!

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

( ता.क. हा फक्त आणि फक्त दोन भावांच्या भांडणाबद्दल लिहिलेला लेख आहे, भावांच्या जागी बहिणी असेही वाचू शकतात पण देश नाही)

Saturday, April 18, 2020

वाटेन माहेराच्या, उडत मन जातं
गुलाब,जाई-जुई, मोगरा फुलवीत ..

'माहेर' किती मऊसूत शब्द. फक्त तीन अक्षरं, पण अक्ख ब्रह्माण्ड सामावलेलं. क्वचितच कोणी असेल जीला माहेरी करमत नसेल. काय नाही तिथे? सगळ्याच मुलींचे कुलदैवत म्हणजे आई-वडील. वडिलांचे धाकात ठेवणे, आईचे पाठीशी घालणे, वडिलांनी शिकवलेला व्यवहार तर आईने लावलेले वळण, आईच्या हातचे पदार्थ,  तीचे शिवण, तीचे  विणकाम, तीचे वाचन, तीचे कामात बुडून जाणे, तीचा आश्वासक वावर.

लहान-थोर भावंडे,त्यांच्यासोबत केलेली मस्ती, केलेले उपदव्याप,मारामारी,झडावर चढणे,पत्ते खेळणे, लाड करून घेणे, लाड पुरवणे, लाईट गेल्यावर भिंतीवर केलेला सावल्यांचा खेळ, पाढे- श्लोक-अभ्यास, खूप दंगा आणि खळखळून हसणे.

घर,बाग,रामफळ,सीताफळ,चिक्कू,पेरू,बोर,चिंचा,जांभळं,कैऱ्या तोडणं [चोरून],गुलाब ,मोगरा, कुंदा, गुड्डीची मधुमालती, मुन्नाने लावलेला फणस, लिंब ,गच्ची, वाळवण, मागचे- पुढचे अंगण, सडा-रांगोळी, शेजारी-पाहुणेरावळे आणि एक हक्काचा निवारा. 

सवंगडी, ते ही किती प्रकारचे. कॉलनीतले,शाळेतले, शिकवणीमधले,ओळखीच्यांच्या घरातले, शेजारच्यांच्या नात्यातले, मैत्रिणिंच्या बहिणी, मित्रांच्या वाहिनी, यादी संपतच नाही. त्यांच्याबरोबर शाळेत जाणे, रस्त्याने मारलेल्या गप्पा, फाटकापाशी केलेला गप्पांचा समारोप, अंगतपंगत, सायकल च्या शर्यती, रामनवमीतली धमाल, पाककलेची कमाल, कानगोष्टी, गणपतीचा उत्सव, मेंदी, एकत्र पाहिलेली सर्कस, चित्रपट, कितीतरी....

शाळा, शाळेची इमारत, शाळेचे पटांगण, कबड्डी च्या स्पर्धा,गणित, वार्षिक स्नेहसंम्मेलन, एन.सी.सी.,साठे सर, बासरी, आणि बरेच काही ..

महाविद्यालय, मोकळा श्वास आणि मोकळा वावर, महाविद्यालयाचे भव्य पटांगण, व्हॉलीबॉल , स्पर्धा , वाचनालयाची इमारत, स्नेहसंमेलन आणि पिकनिक, वादविवाद, दादागिरी, लिखाण, एन.एस.एस., रेल्वेची पटरी आणि सायकल बरोबर विचाराना आलेला वेग,सगळंच भन्नाट ...

गाव, राममंदिर, मेन रोड ,शिवाजी रोड, नटराज, रामनवमी, रहाटगाडगे, साखर कारखाने,मळीचा वास, उसाचा रस, गणेश प्रिंटिंग प्रेस, शेत, बेलापूरच बन, बुवा ची गुडीशेव,फरसाण आणि पेढा, वैद्य काकांचा बटाटा वडा, खुले नाट्यगृह, अर्चना-अशोक-किशोर, गुरवाडा भैय्या, प्रभात आणि ...... माहेरवाशिणींचा गुंतलेला जीव.

सगळं कसं सुंदर, मनोहारी, आश्वासक, एखाद्या स्वप्नासारखं....
अचानक एक दिवस कानी स्वर पडतात... 

 तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥

आणि आपल्याच घरी आपण पाहुणे होतो.

 कळावे, लोभ असावा

-  स्वाती आवटी दीक्षित

    

Thursday, April 16, 2020

कोणी नातेवाईक देता
का नातेवाईक...

मैत्रिणीचा फोन आला,'काय ग फोन करत नाहीस, सगळ्या मित्र-मैत्रिणींशी दोन दोनदा बोलून झाले, एकटी तू सापडत नाहीस' 'अग, लेकीची online शाळा आणि क्लास मध्येच फोन व्यस्त असतो, रोज एका नातेवाईकांना फोन करू ठरवले होते पण तेही होत नाही, नशीबवान आहेस तू, दोन दोन वेळा फोन होतो' .... 'तू नीट ऐकले नाहीस, मित्र-मैत्रिणी म्हणाले मी, नातेवाईक नाही. नातेवाईक शब्दाचाच तिटकारा आहे मला, नशीबवान तुम्ही, तुम्हाला फोन करायला चांगले नातेवाईक तरी आहेत' ... कुठल्यातरी जखमेची चुकून सालपटे निघाली होती. 'तू' चा 'तुम्ही' झाला होता. आता निचरा होऊ देणेच भाग होते.

गोष्ट वाहू लागली 'आई-वडिलांनी खूप केले नातेवाईकांचे, उलट्या काळजाचे निघाले सगळे, आई फार माहेरी जात नसे, त्यामुळे गळ्यात पडावे इतके लगट कधी मामाशी नाहीच. चांगले आहेत ते पण आमचेच जाणे नाही त्यामुळे लंकेत सोन्याच्या विटा. लग्न झाल्यावर पण माळरानच नशिबी, मुलांना मग काय येऊन जाऊन मामा आणि मावशी, तेही दूरदेशी त्यामुळे दोन(२) वर्षातून दर्शन. शेवटी ठरवले जे नाही त्याच्याकडे पाठ फिरवायची. इथेच तुम्हा सगळ्यांमध्ये मग नाती शोधली. असे नाही की प्रयत्न नाही केला. पण माळरानावर फुले फुललीच नाहीत. शेवटी ठरवून नांगर फिरवला. मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रम, अनाथाश्रम पालथे घातले, तिथल्या व्यवस्थापनाला आमच्यापेक्षा बरोबर काय आणले आहे त्याच्यातच रस, सगळे आश्रम नसतील ही तसे, पण आमच्या नशिबाने आमच्या गाठी अशाच ठिकाणी मारल्या. आता कशाचे काहीच वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा तोपर्यंतच त्रास होतो जोपर्यंत तुम्ही ती स्वीकारत नाही. मला का नाही? हा प्रश्न पडेनासा झाला की मग सगळं कसं स्वच्छ आणि निर्मळ. असेच नाही की बिलकुलच काही वाटत नाही. आत्ताच बघ ना, तू नातेवाईक म्हणालीस तर झालच ना थोडे जळायला पण ते तेवढ्यापुरतेच. पुढच्या क्षणाला परत येरे माझ्या मागल्या म्हणून मोकळे'.

मध्ये एक शब्दही न बोलता फक्त ऐकत होते... आकाश मोकळे होत असताना अनुभवत होते.
'अग, सुटका करून घेण्याचा मार्ग तरी होता, कितीतरी घरात बघते, इच्छा मारून 'आ बैल मुझे मार' म्हणावे लागते. नको नको होतं असताना मन मारून हसून साजरे करावे लागते. जाऊदेत, आता मुलांना चांगले जोडीदार मिळाले म्हणजे झाले. त्यांची कुटुंबेच आमचे नातेवाईक. आणि तुम्ही सगळे आहातच की काका-काकू, आत्या-मामा, मित्र-मैत्रीण सगळे तुम्हीच'.

पाऊस थांबला होता, गडगडाट संपला होता, धबधब्याचे शांत वाहणाऱ्या नदीत रूपांतर झाले होते, सुंदर इंद्रधनुष्य मन:पटलावर उमटलेले जाणवत होते, त्या चित्रातच मैत्रिणीला सोडून काहीही न बोलता फोन ठेवला.

असे नाही होऊ शकत का, नातेवाईकांचे एक ग्रंथालय म्हणजे नातेवाईकालय उभे राहू शकत? नाना-नानी पार्क मध्ये किंवा  निरुद्देशीय कट्ट्यांवर? त्यांचेही रिकामपण भरून येईल आणि माझ्या मैत्रिणी सारख्यांना कुठल्याही औपचारीकते शिवाय नातेवाईक पण मिळतील. सगळ्यांचाच आनंद. मनाचे मांडे मनातच खावे.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Wednesday, April 15, 2020

बुरी नजर वाले
तेरा मुंह काला

बघतोस काय रागान गाठलंय तुला वाघान, मै चली मै चली, आई-आण्णांचा आशीर्वाद, हॉर्न ओके प्लिज, काळूबाई च्या नावानं चांगभल, थांब लक्ष्मी कुंकू लावते असे अनेक उच्च दर्जाचे साहित्यिक वाक्य-प्रकार शुद्धलेखनाच्या नियमांना तिलांजली देत मिरवणारे ट्रक आणि त्याचे चालक हा एक वेगळ्याच विश्वातून आलेला प्रकार. आमचे श्रीरामपूरचे लोक ट्रक, टेम्पो, बैलगाडी असा भेदभाव मानत नाहीत. सगळ्यासाठी आमच्याकडे एकच शब्द 'उसाची गाडी'. चारी वेषींवर चार साखर कारखाने मिरवत असल्याचाच बहुदा परिणाम. काजळे काकांनी टेम्पो घेतला आणि पुढे जाऊन ट्रक ड्रायव्हर व्हायचे निश्चित झाले. पुढे काकांच्या टेम्पो बरोबर हे स्वप्नही हरवून गेले.

त्यानंतर ह्या जमातीशी सम्बन्ध आला तो लग्न झाल्यावर ठाणे-नाशिक चकरा सुरू झाल्यावर तेही शक्यतो कसारा घाट ओलांडताना. पूर्वी ठाणे-नाशिक, ठाणे-पुणे चार (४) ते आठ (८) कितीही तास वेळ लागत असे. अशा वेळी सोबत होती ती ह्या ट्रक ची आणि त्यांच्या केबिन मध्ये लावलेल्या गाण्यांची. काही काही ट्रक चालक अतिशय रसिक असत. मस्त शेरोशायरी लावून ठेवलेली असे , मग मात्र तुंबलेले ट्राफिक कॅसेट संपेपर्यंत निघूच नये असे वाटे. हल्ली सारखे पूर्वी चालकाचे केबिन वातानुकूलीत नव्हते, त्यामुळे ही मेजवानी आपोआपच मिळत असे. त्यांचे एक बरं असत ट्रक चालवला तर चालवला, कंटाळा आला रस्त्याच्या कडेला थांबले, शिदोरी सोडली, मडक्यात काहीतरी शिजवले आणि मस्त वन भोजनाचा बेत केला. लहान अद्वैत ला नेहमीच त्यांच्याबरोबर जेवणाची इच्छा असे.

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सगळे जग बंद असताना त्या बंदीवासातल्या जगाचे पोट भरण्यासाठी हे ट्रक आणि टेम्पो चालक अहोरात्र पळतायेत. डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार ह्यांचे कष्ट दिसून येतात. त्यांना श्रेय देताना अजून दोन (२) लोकांना विसरले जाते आहे का? एक(1) औषधे, भाजी आणि किराणासामान घेऊन येणारे ट्रक-टेम्पो चालक आणि दुसरे ती औषधे, भाजी व वाण सामान आपल्यापर्यंत पोहोचवणारा दुकानातील कामगार वर्ग. आज खिडकीतून नाशिक हायवे वर पळणारे ट्रक पाहताना विचार आला, ह्या चालकांना काही कवचकुंडले मिळाली आहेत का ? त्यांना लागण होऊ शकत नाही ? त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नसेल ? अश्या कठीण प्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर रहावेसे वाटत नसेल ? आम जगापासून तुटलेल्या ह्या जमातीबद्दल तसेही सर्वसामान्य जनतेला विशेष माहिती नसते. हे सर्व चालक कुठे रहातात, कुठून येतात काहीच तपास नसतो. पूर्वी शक्यतो सरदारजी ट्रक चालक असायचे. उंचच्या उंच, दाढी-मिशी वाले, रुबाबदार... थोडे भीतीदायक. ढाबा ह्या प्रकारावर खरा हक्क तो ह्या सरदार चालकांचाच. हल्ली हा नियम बदलल्या सारखा वाटतोय, इतर लोकांना पण ट्रक चालवण्याचा परवाना देत असावेत. एक क्षण मनात विचार आला, साथीच्या भीतीने ह्या चालकांनी, मेडिकल आणि किराणा भाजी दुकानातल्या कामगारांनी काम करायला नकार दिला असता तर? कोरोना राहिला दूर पण औषधावीना आणि भुकेनेच अर्ध्या जनतेचा बळी गेला असता. धन्यवाद देवदूतांनो !!

कळावे, लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित
माय मरो
मावशी उरो...

इथे 'माय' म्हणजे आपल्या नेहमीच्या सवयी आणि 'मावशी' म्हणजे सध्या आपल्याकडे परदेशातून पाहुणी आली आहे ना ती 'साथ'. जीच्यासाठी आपण सुट्ट्या घेऊन घरी बसलो आहोत ना तीच ती. स्वाभाविकच आहे ते, 'अतिथी देवो भाव' हा तर आपला स्थायीभाव आहे. त्यात ही परदेशातून आलेली मावशी. हल्ली सगळ्यांनाच परदेशस्थ नातेवाईक असतात. आमच्या पिढीसाठी ही गोष्ट नवी, आमच्या पिढीची भावंडे असतात बाहेर, तेही हल्ली पण मावशी, काका, आत्या,इ प्रकार अभावानेच. एखाद्याच घरातला एखादा सतीश दादा अमेरिकेत असायचा, बाकी कॉलनी 'आमच्या जावेच्या नातीच्या भावाच्या मित्राचे साडू पण असतात परदेशात' सांगण्यात सुख मानणारी.

काही लोकांना घरी पाहुणे आले की किती खर्च होणार किंवा झाला ह्याची चिंता असते. तशीच ती सध्या आमच्या अर्थतज्ञाना लागली आहे. त्याच्यावरून बऱ्याच चर्चा, लेख सारखे येऊन आदळत असतात. पण त्या कशातही एका प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही. जेव्हा खरेदी, प्रवास, बाहेर खाणे-पिणे, चित्रपट-नाटक पाहणे, बँकेत पैसे टाकणे-काढणे, इ. अनेक गोष्टी स्वतःच्या सोयीसाठी किंवा आनंदासाठी करत होतो तेव्हा कोणी सुद्धा आभार व्यक्त करून देशाचा आर्थिक दर्जा राखल्याबद्दल धन्यवाद म्हणाले नाही. उलट आयकराच्या ओझ्याखाली दाबून अगदी हीन-दिन-लिन बनवून टाकत होते. मावशी मुळे ह्या गोष्टी लक्षात तरी आल्या. आज फक्त पंधरा (१५) दिवस सगळ्या गोष्टी करणे काय थांबवले, लगेच आर्थिक आणीबाणी आली?? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सगळेच लोक करत होते, तेव्हाच आणीबाणी मध्ये उपयोगी पडेल म्हणून बचत का नाही केली ?? म्हणून म्हणते 'मावशी' उरो. त्या निमित्ताने तरी खर्च न करता बचत करण्याची सवय लागेल.

काही लोकांची अजूनच वेगळी तऱ्हा असते. त्यांना त्यांच्या सवयी इतक्या प्रिय असतात की कोणी घरी आलेलेच चालत नाही. 'मै और मेरी तनहाई म्हणजे सवयी' . कोणी आले की दाखवायला तरी बरे वागावे लागते, स्वच्छ रहावे लागते, इ चांगल्या सवयींचा त्रास. सध्या ही हेच तर होतेय, थुंकलात? भरा दंड, सामाजिक माध्यमांवर गडबड केलीत? दंड, उगाच बाहेर भटकलात? दंड, इ इ. बरेच आहे ना. मावशीच्या निमित्ताने रस्ते, गल्ल्या, गावच्या गाव, समाज माध्यम सगळंच स्वच्छ होते आहे. कळाले का मावशी का उरो ते? कायमचच स्वच्छ वातावरणात, स्वच्छ रस्त्यांवर, तुरळक गर्दीत, खरेदी न करता नुसतच बागडायला कोणाला नाही आवडणार ??

ही स्वच्छतेची टूम आपोआपच घरापर्यंत आली. कामवाली नसल्याने घराला स्वतःचे घर समजायला मदत झाली. घर विकत घेतले तेव्हा दिसली होती अगदी तश्शी आणि तेवढीच घराची आणि न्हाणीघराची फरशी परत एकदा लख्ख झाली. कपाटांची ओझी उतरली, घराच्या जळमटांबरोबरच काहींच्या मनाचे कोपरेही स्वच्छ झाले. पुस्तकांना वाचक मिळाले, कित्येक नवीन लेखक, चित्रकार, कलाकार जन्माला आले. नवीन पिढीला घरकामाचे हात नव्याने उगवले. तेच मसाले ,तीच भाजी, तीच कणिक आणि तीच रांधणारी गृहलक्ष्मी पण स्वयंपाकाचा दरवळ पोट आणि मन तृप्त करू लागला. घरच्या अन्नाने आजारपण पळवून लावले. वेळ नाही च्या सबबी हरवून गेल्या. आजी-आजोबांना नातवंडे, मुलांना आई-वडील, भावाला बहीण आणि शेजाऱ्याला शेजार मनसोक्त अनुभवता आला. दूरध्वनी घ्यायला वेळ नसणारे, आठवण करून शब्दांची देवाणघेवाण करून तुंबलेली मने मोकळी करू लागले.
मावशी ... धन्यवाद ग. आम्हाला आमच्याशी, आमच्या वेळेशी, आमच्या घराशी, घरातल्या माणसांशी, माणसांच्या नात्याशी आणि अंगच्या गुणांशी भेट करून दिल्याबद्दल.

'घराला गच्ची नको, ती आत घेऊ आणि घर मोठे करू' असा विचार करणारे घराला एक अंगण, एक परसदार हवे असा विचार करू लागले. 'खेडेगावात कोण जातेय' अशी का-कू करणारे वर्षातून एकदातरी गावी चक्कर टाकणार असा निश्चय करू लागले. गावची शुद्ध हवा, घरचे निर्मळ जेवण, मित्रमैत्रिणी बरोबरच घरातले सद्स्य आणि महत्वाचा म्हणजे स्वतःचा वेळ ह्यांचे महत्व कळून चुकले.
पण बघ ना मावशी तुला 'अजून दोन दिवस रहा' असे म्हणूही शकत नाही. 'पुन्हा परत ये' असा आग्रहही करता येत नाही. तुझ्या गळ्यात पडून तुला मनसोक्त भेटूही शकत नाही. विलगीकरणाचा कायदा आह ना, पोलीस मामा आत टाकेल की ग. पण एक वायदा मात्र नक्की करू शकतो, 'ही तन-मन-धन, समाज आणि गावाची स्वच्छता मात्र तू गेल्यावरही कायम सांभाळू'.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, April 14, 2020

टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात...

सकाळी सकाळी पितामह भीष्माचार्य दूरचित्रवाणी वर आले आणि सुट्टी तीन(३) तारखेपर्यंत वाढवल्याचे सांगितले. का माहीत नाही पण एकदम मस्त वाटले. धावपळ सुरू व्हायला अजून थोडे दिवस आहेत तर. अजून थोडा वेळ स्वतःसाठी मिळणार. अजून थोडे मुलीबरोबर राहायला मिळणार. कालच नविन ब्लॉग
नोंदवला, त्यात भर टाकायची होती, ते ही काम मार्गी लागणार. अजून काहीतरी नवीन शिकता येईल असेही वाटले.
मैत्रिणींशी बोलताना शिल्पा म्हणाली ती ऑनलाइन कोर्स करते आहे. लगेच ठरवले करूयात.

थोडावेळच, मग आठवले सतत नवीन काहीतरी शिकत रहायचे आणि आधी शिकलेले मागे टाकायचे असेच चालू आहे गेले कित्येक वर्ष. आता हातचे सोडून पळत्या पाठी नाही धावायचे.
आठवता आठवता लक्षात येत गेले, हे इतके कमी दिवस कसे पुरतील सगळ्या सुटलेल्या गोष्टी संधायला ?? इजा-बिजा-तिजा करून झाले, पण काही ठरेना की नेमके कोणाला एकाला न्याय द्यायचा ते ?? शेवटी चित्रकलेचे कागद आणि DSLR कॅमेरा बाहेर काढला. छापा-काटा केला, कॅमेऱ्याचा पहिला नंबर लागला. आधी कॅमेऱ्याला सगळ्या बाजूने पाहिले, प्रेमाने अंजारले गोंजारले, बॅटरी चार्ज केली, थोडा वेळकाढूपणा केला पण काही केल्या ती बटणं ओळखीची वाटेनात. लेन्स बदलून झाल्या, एक दोनदा निशाणा लावून झाला. फोटो पण काढून बघितला, छ्या....  काही जमेना. पहिल्यासारखा काही ह्या कॅमेऱ्याला फोटो काढता येत नाही आता की कॅनन वाल्यांनी पहिल्या नंबर चे प्रमाणपत्र चुकून दिले होते आपल्याला, काही कळेना. कंटाळून कॅमेऱ्याला परत बॅग चा रस्ता दाखवला. पण अशी हार नाही मानायची. परत शिल्पाशी बोलू आणि डिजिटल फोटोग्राफीचा ऑनलाइन वर्ग करू असे ठरवून एक विषय सम्पवला.

कागद पूर्ण गम्मत बघतच होते. त्यांनी वाकुल्या दाखवल्याचा भास झाला. मग ठरलेच ... वाकुल्या दाखवणाऱ्यांचेच तोंड काळे करायचे. HB पेन्सिल चे हत्यार उगारले आणि तावातावाने त्यांच्या अंगावर अक्षरशः धावून गेले. चित्रकला काय माझ्या डाव्या हाताच्या मळ, कधीही करू शकते मी... दांडगा विश्वास. कागदाला डावीकडून पाहिले, उजवीकडून पाहिले, वरून पाहिले, खालून पाहिले, उलट केला सुलट केला ... काय आणि कुठून सुरू करावे काही लक्षात येईना. पेन्सिल ला दोनदा टोक केलं, खोडरबराला उगाच कपड्यावर घासून स्वच्छ केलं. मग थोडे आठवायचा प्रयत्न केला पूर्वी पेन्सिल हातात घेतली की नेमके काय व्हायचे, चित्र कोणते काढायचे, कसे काढायचे, कुठे काढायचे कोण ठरवायचे हे सगळे?? मग लक्षात आले, हल्लीच्या पेन्सिलच चांगल्या नाहीत. पूर्वीचे कागद-पेन्सिल किती चांगल्या दर्जाचे होते. नुसते एका नजरेत चित्र सुचायचे आणि पूर्ण पण व्हायचे. पेन्सिली आणि कागदाचा दर्जा सुधारे पर्यंत काही ह्या फंदात पडायचे नाही.

शेवटी मदतीला धावून आली नृत्यकला. हिपहॉप करायचे काही आता वय नाही, कथक ला घरी गुरू कोण मिळणार ? त्यापेक्षा एकदा सुरू करून सोडून दिलेले सालसा च करून बघू. यु ट्यूब आणि आर्या आहेतच मदतीला. इथे काही घोळ होण्याची शक्यता नव्हती. हुश्श .... ठरले एकदाचे. लेकीने नमनालाच बंद पुकारला. 'नाही ग आई, मी नाही करणार तुझ्याबरोबर. सालसाला दोन(२) पार्टनर म्हणजे एक(१) मुलगा आणि एक(१) मुलगी लागते. दोन(२) मुली नाहीत' , 'अग , मी होते मुलगा, तू मुलगी' मी परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला. सगळ्या वकिलीने झक मारली पण मुलगी काही तयार झाली नाही.

हळू हळू गाडी सॉफ्ट टॉय मेकिंग, भरतकाम, विणकाम, शिवणकाम करत करत  वाचनाकडे वळली. बरीच पुस्तकं कधीपासून वाचायची राहिली होतीच, तीच संपवूयात आधी. एकदम हायसे वाटले, एका ठिकाणी बसायचे आणि नुसती पाने उलटायची.. वाटले बसून, वाटले टेकून, वाटले चालून, वाटले उभ्याने कसेही वाचता येईल. शिवाय फार पसारा ही होणार नाही. बुकमार्क शोधून काढले आता फक्त पुस्तक हातात घ्यायचा काय तो अवकाश आणि आठवले ......... पुस्तकांची कपाटे तर ऑफिस मध्ये नेऊन ठेवली आहेत आणि बाहेर तर पडायचे नाही.... आता?
चोर नजरेने बघून घेतले चित्रकलेचे कागद आणि पेन्सिल आपल्याकडे बघत तर नाहीत? हळूच बुकमार्क खणात सरकवले.

ह्या सगळ्या रामायणात अख्खा दिवस वाया गेला. उद्या परत मैत्रिणींना शरण जाऊन निर्णय घेऊ असे ठरवून म्हणजे पक्के ठरवूनच सगळा पसारा आवरता घेतला.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित
'ती आली'
हळू बोल...

पूर्वी पाळी आली की जवळ जवळ कानात कुजबुजल्या सारखे सांगत असत. त्याचा इतका परिणाम काही पिढ्यांवर झाला आहे की हल्ली मुलीने मोठ्या आवाजात सांगितले की प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे सहज निघून जाते 'हळू बोल'.

एका मैत्रिणीने मुलाला सांगताना ऐकले 'आज तिच्या वाटी जाऊ नकोस, तिची पाळी आली आहे, उगाच चिडचिड होईल अजून तिची' ... मैत्रीण गार, ' आग तुझ्या मुलाशी हे काय बोलते आहेस?' .. का नाही ? ह्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हते पण 'ही बाई फारच वाह्यात दिसतेय' असे ठरवून ती मैत्रीण अजूनही 'सोशल डिस्टन्स' सांभाळून आहे.

ह्या न बोलण्यामुळे काय काय मजेशीर नांवे ठेवली जात होती. कावळा शिवला ते मैत्रीण आली पर्यंत किती प्रकारे सांगितले जात होते. सगळ्यात धमाल होती ती 'सॅनिटरी नॅपकिन' च्या नावाची. 'तुझ्याकडे 'ससा' आहे, माझी मैत्रीण आली आहे'.ज्याला काहीच माहीत नाही त्याने जर ऐकले तर .... 'मैत्रिण आली की तीला ससा कोणत्या संस्कृतीत देतात' विचार करून भोवळ यायची ऐकणाऱ्याला.

बरं ती कधी कोणाच्या आड येत नसे. शाळा , कॉलेज, व्हॉलीबॉल, कथक, सायकल,NCC, नाटकाच्या तालमी सगळंच सुरू असायचं. पण अत्र तत्र सर्वत्र चराचरात सामावलेला एखादा परमेश्वरी अवतार घरी प्रकट होणार असेल तर मात्र 'सामाजीक विलगीकरण'. तेव्हा खूप राग यायचा , काय वेडेपणा आहे असे वाटायचे. सासरी गेल्यावर मात्र 'आता कामातून सुटका' खूपच आनंद व्हायचा. हल्ली मात्र बरेचदा वाटायचे, स्त्रियांना ह्या काळात हक्काची दोन(२) दिवसांची सुट्टी मिळायला हवी. 'पूर्वीच्या स्त्रियांचे बरं होतं' विचार येऊन त्यांचा हेवा वाटायला लागला होता. शिवाशीव, विटाळ सोडले तर दोन(२) दिवसांच्या विश्रांतीची कल्पना पटायला लागली होती. काही घरात आजही हे विलगीकरण पाळले जाते पण ते त्या स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून नाही तर धार्मिक कारणांसाठी, ते कुठेतरी खटकते.

तिची येण्याची तऱ्हा पण प्रत्येकीच्या बाबतीत वेगळी, कोणाला येणार काय, आली काय, गेली काय काही फरकच पडत नसतो. काहींच्या चेहेऱ्यावर दोन (२) दिवसापासूनच बारा वाजलेले दिसतात, एकदा धरणाची दारे उघडली की त्या सुटल्या. काही दर महिन्याला हार्ट अटॅक आल्यासारखे पूर्ण घर डोक्यावर घेणार. गरम पाण्याची पिशवी, वेदनाशामक गोळ्या, मळमळ, चिडचिड, रडारड.... घराचे नुसते रणांगण. दोन(२) दिवसांनी वेदना कमी झाल्या की घर परत जागेवर.

सखे, पुष्कळ वेळा येऊन झाले तुझे. आता जायची वेळ आली. पण परिणाम ऐकले की पोटात गोळा येतो. हे असं सगळं होणार असेल तर नकोच जाऊस. आनंदाने एकत्र नांदू आपण. हवे तर ससा ससा खेळू.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Monday, April 13, 2020

आजची पत्रकारीता
 नारायण नारायण ...

तसे सध्या कोरोनाच्या सावलीत आपले पत्रकार मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यापर्यंत बातम्या आणत असताना आज त्यांच्याबद्दल कडू-गोड लिहीणे बरे नाही .... पण

एक वृत्तवाहिनीवर लॉकडाऊन मूळे कसा दूध उदयोगाला फटका बसला आहे हे सांगत असताना त्या पत्रकार मित्राने सहज सुरात म्हंटले 'ह्या ज्या सर्व 'गाया' तुम्हाला इथे ....... वगैरे'.
गाया ? बर पात्रकार मित्र शहरी पण नव्हता. शाळेत गुरुजींनी 'एक गाय, अनेक गाई' घोकून घेतले की नाही ???
अजून एक पत्रकार मैत्रीण एका अभिनेत्याला 'तू खरच खूप 'गो थ्रू' केलेस म्हणाली' म्हणजे नेमके काय केले असावे अजूनही लक्षात येत नाहीये. लॉक डाऊन मध्ये नेमके काय गो थ्रू आणि कसे ??मायबोलीत सांगितले तर फार बरे होईल आमच्या सारख्या बापड्यांना. नाहीतर आमची वृत्तवाहिनी 'मिंगलीश' आहे असे तरी जाहीर करा.

अजून एक फार गम्मत असते ह्या वाहिन्यांची, मा. पंतप्रधान किंवा मा. मुख्यमंत्री दूरचित्रवाणी वर दर्शन देऊन गेले की निवेदक किंवा निवेदीका एखाद्या दुउऊऊउऊऊऊर असलेल्या त्यांच्या पत्रकार मित्राला किंवा मैत्रिणीला 'बोल सदाशिव, आताच माननीय ..... यांनी जनतेला उद्देशून जे संभाषण केले त्याबद्दल तुझे काय मत आहे?' ... आपण उत्सुकतेने कान टवकरतो 'कोणीतरी अभ्यासू सदाशीवराव काहीतरी छान बोलणार, तर गेल्या कित्येक दिवसात व्हाट्स अँप ची पाने वगळता एकही पुस्तकाचे पान न उलटलेला, स्पष्ट शब्दोच्चारही न करणारा, पुरेसा शब्दसंग्रह नसलेला कोणी एक दिनवाणा सदाशीव आपल्याला आताच मा. ......... काय म्हणाले हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न करतांना आपल्या तोंडावर फेकून मारला जातो. समोर ऐकणारे दर्शक अतिशय मठ्ठ असतात असा काही गोड गैरसमज आहे का रे ह्या वृत्तवाहिन्यांचा ??

एक ह्यांचे बरे असते, जगात काहीही घडो ह्या वृत्तवाहिन्यांचे काही ठराविक लोकांशी 'वार्षिक करार' असल्याप्रमाणे तीच तीच डोकी परत परत जगातल्या सर्व विषयावर 'तावातावाने' बोलायला धरून आणतात. त्यांचे काम एकच पहिला वक्ता जर 'हो' म्हणाला तर दुसर्याने 'नाही' म्हणायचे , तिसर्याने 'नरो वा कुंजरो वा' असा ठेका धरायचा, आणि चौथ्याने विषयाला सोडून बोलायचे. निवेदक अधून मधून तुमच्या सगळ्यांपेक्षा मलाच कशी जास्त अक्कल आहे हे दाखवत रहातो, त्याला सगळ्यांच्या अंगावर ओरडण्याचा अधिकार पण असतो . स्वाभावीकच आहे, तो वाहिनीकडून आहे.... ज्याची बॅट,त्याची बॅटिंग.

पूर्वी वृत्तपत्रातील बातम्या छपाई च्या आधी 'प्रूफरीडर' च्या चाणाक्ष नजरेखालून जात असत. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की 'कॉस्ट कटिंग'/ 'काटकसर' च्या नावाखाली ह्या प्रूफ रीडर ला बहुदा डिच्यु दिलेला दिसतोय. ती गरिबी मग वृत्तपत्राच्या ओळीओळीतून डोकावते आणि त्या लक्त्ररातून आम्ही जगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो. कसे सुधारणार आम्ही ??

एक पोटतिडकीची विनंती आहे ... दोनदाच बातम्या सांगा, पण सुयोग्य व्यक्तीला नियुक्त करा. एक वाचनालय तुमच्या वाहिनीत उभे करा. दिवसभरात कमीत कमी दहा (10) पाने तुमच्या पत्रकारांना वाचायला लावा. ज्या विषयावर बिलायचे आहे , त्याचा आधी अभ्यास करा. बातम्या सांगण्याआधी एकदा नजरेखालून घाला. तुमची त त प प बघायला नाही लावली जात तुमची वाहिनी. तुमचे कपडे , तूमची रंगरंगोटी काहीही फरक पाडत नाही, फरक पडतो तो फक्त तुमची शब्दांवर असलेली पकड आणि तुमचे वाचन ह्यांनी.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Sunday, April 12, 2020

सुंदर मी होणार ..

पण कोणते सुंदर ????? चेहेऱ्याने सुंदर की रंगाने सुंदर की व्यक्तित्वाने सुंदर की विचाराने सुंदर की माणुसकीने सुंदर की मैत्रीने सुंदर की नात्याने सुंदर की कपड्याने सुंदर की पैशाने सुंदर की रंगरंगोटीने ने सुंदर ???

ह्या व्यतिरिक्तही कितीतरी विविध प्रकारचे सुंदर लोक समाजात अचानक धडकून जातात. रूढार्थाने ते सुंदर नसतीलही पण त्यांचे अस्तित्व इतरांसाठी सौंदर्य निर्माण करून जाते. कधी एखाद्या ओळखीच्या काकू , कधी मैत्रीण, कधी शेजारी, कधी नातेवाईक, कधी डॉक्टर, कधी सहाध्यायी, कधी एखादे शहर , कधी प्रसंग, कधी एखादी धून, कधी गाणे , एखादा निरोप, एखादा दूरध्वनी, एखादी मालिका, एखादे नाटक, पुस्तक, चित्रपट.... आपले क्षण सुंदर करून जातात. चांदनासारखे स्वतःचा सुगंध नकळत दुसऱ्याला देऊन जातात.... असा सुगंधित सुंदर दरवळ बनू का ??

जेव्हा आपण म्हणतो, मला एखादी सुंदर मैत्रीण हवी तेव्हा 'सुंदर' चा काय अर्थ अपेक्षित असतो ? सुंदर शेजार मिळावा , मुलीला सुंदर सासर मिळावे, मुलाला सुंदर जोडीदार मिळावा, मुलांना सुंदर शाळा मिळावी, एखादे सुंदर घर घ्यावे, गाडी सुंदर चालवावी, गाणे सुंदर म्हंटले, वाद्य सुंदर वाजवले, बाग सुंदर फुलली, रस्ता सुंदर बांधला, प्रवास सुंदर झाला, खेळ सुंदर रंगला, कपडे सुंदर घेतले वा घातले, झोका सुंदर दिला, आकाश सुंदर दिसले, चंद्रकोर सुंदर सजली, वारा सुंदर सुटला, पदार्थ सुंदर झाला, गंध सुंदर दरवळला, सुंदर चित्र काढले, फोटो फारच सुंदर आला.... प्रत्येक वेळी सौंदर्याचा अर्थ निराळा. कधी चांगला, कधी सुरेल, कधी वळणदार, कधी योग्य, कधी बहारदार, कधी रंगीत, कधी झोकात तर कधी दरवळ... नेमके काय व्हायचे आहे मी ??

झाला गोंधळ.. नेमके कोणते सौंदर्य अपेक्षित असते, जेव्हा लोक म्हणतात , 'अशी का रहातेस, जरा सुंदर रहात जा'. म्हणजे नेमके काय राहायचे ?? ... सुंदर मैत्री करायची,सुंदर गप्पा मारायच्या,  सुंदर नाती निर्माण करायची , सुंदर पदार्थ करून खाऊ घालायचे की नुसतच सुंदर कपडे घालून, नटून थटून मिरवायचे. असे राहणे ही काही वाईट नाही, जमतेही काही लोकांना. पण सगळ्यांनाच जमेल असे नाही ना. असतात काही आपल्या सह्याद्री च्या रांगांसारखे रांगडे , काटक , ओबडधोबड. तरीही गिर्यारोहकांना दिसतोच की तो विंध्यकडा सुंदर ... डौलदार.
... असा डौल आणू का व्यक्तिमत्वात?

सुंदर शास्त्र, सुंदर अस्त्र, सुंदर आरोग्य, सुंदर समाज, सुंदर रीती-रिवाज, सुंदर चांदणे, सुंदर लिखाण ,सुंदर खेळ, सुंदर हास्य, सुंदर बोलणे, सुंदर चालणे, सुंदर देखावे, सुंदर काम, सुंदर दाम, सुंदर नाती, सुंदर मैत्री, सुंदर प्रेम आणि सुंदर राहणीमान .... सगळा सौंदर्याचाच खेळ .... नेमके काय जमेल बरे ह्यातले ??

कठीण आहे 'सौंदर्य' ... कळायला आणि वळायलाही. 'पी हळद आणि हो गोरी' इतके काही सोप्पे नाही. जमेल असे काही वाटत नाही.
"वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन,
उसे एक 'खूबसुरत' मोड देकर छोडना अच्छा"
खूबसुरत म्हणजे सुंदर :)

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Saturday, April 11, 2020

सांग सांग भोलानाथ,
शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का?

बऱ्याच जणांना शाळा मनापासून आवडते तर काहींना अगदी मनापासून कंटाळा असतो. कारण काहीच नाही ... किंवा कहीही चालते. शाळा सकाळी असते, लवकर उठावे लागते पासून अभ्यास झाला नाही, पोट दुखते, डोके दुखते, उशीर झाला काहीही. शाळा न अवडण्याचे कारण एखादा विषय असू शकते असे जर म्हंटले तर विश्वास बसेल ??

भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गायन हे ते तीन शत्रू शाळेच्या आणि बालमनाच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये भिंत निर्माण करतात. अंदाजे अर्ध आयुष्य संपल्यावर पण ह्या तीनही विषयांचा कुठेही इतकासाही उपयोग झाल्याचे काही स्मरत नाही. ज्या विषयांवाचून पुढे काहीही अडणार नाही ते विषय शिकवून किंवा शिकायला लावून कोणाचे काय भले होत असते ? शास्त्राच्या आणि गायनाच्या शिक्षकांना नोकरी मिळावी म्हणून आमच्यावर अन्याय का ??

मुलांना आवडतील असे विषय शिकवावेत ना... भाषा विषय ३ काय ४ ठेवा, गणित(गरजेचेच आहे) त्यातही सोप्पे (मूलभूत) आणि अवघड (प्रगत)असे २ प्रकार करता येतील, भूगोल( हिंडाफिरायला कामास येतो) आणि प्रकल्प ( जरा अवघड शब्द आहे ,आपण सोपे करून प्रोजेक्ट म्हणू) करायला दिले तर मुले आनंदाने करतील , इतिहास (गोष्टी रूपाने फक्त) तो ही आपला खरा खुरा इतिहास, मुघल आणि इंग्रजांपासूनचा नाही. राज्यसेवा परीक्षा देणाऱ्यांव्यतिरिक्त चौल घराणे किती लोकांना माहीत आहे ?  वेद किती शाळेत शिकवले / ऐकवले जातात? आपण कसे हरलो आणि मुघल आणि इंग्रजांनी कसे आपल्याला नागवले किती वर्षे हा पराभवाचा इतिहास शिकणार ? आणि काय मजा येणार आहे ते शिकण्यात? त्या आधीचा संपन्न , समृद्ध इतिहास कळू देत ना विद्यार्थ्यांना , त्यांनाही मजा येईल ऐकायला. मुघल आणि इंग्रज आल्यावर त्यांना आपल्या ज्या ज्या राजांनी आणि नेत्यांनी नामोहरम केले तेवढाच भाग येऊ देत ना धड्यात. विजयाचा इतिहास शिकून लढवैय्ये नागरिक घडू देत की. ऐकायलाही मज्जा येईल आणि परीक्षा द्यायची नाही म्हंटल्यावर लक्षात पण चांगले राहील. रशियन राज्यक्रांती मी का घोकावी? इंग्लंड ला पहिला दुसरा तिसरा कितीही विल्स नाहीतर विल्यम होऊ देत, मी का त्याची टिपणे ठेऊ ??
तीच गम्मत नागरिक शास्त्राची, जे पुढे जाऊन पावलोपावली वापरावे लागते त्याला फक्त २० गुण, कसे चांगले नागरिक तयार होणार?? नागरिक शास्त्र आणि कायद्याची समज असणारा विद्यार्थीच पुढे जाऊन आदर्श नागरिक बनू शकतो. पण जर हे नागरिकशास्त्र माहितीरुपात शिकवले गेले तरच मुलं न कंटाळता ऐकतील आणि लक्षात ठेवतील. २ तासात संपूर्ण नागरिक शास्त्र गुंडाळल्यावर काय मज्जा येणार हो ते शिकण्याची आणि समजण्याची. नाही समजले की टाक ऑप्शन ला( पर्यायी प्रश्न).
वनस्पती शास्त्राची मात्र मज्जा असते ,खूप सगळी फुले ,पाने ,प्राणी असल्याने आणि भरपूर गुण आकृतीला मिळत असल्याने त्याला विद्यार्थी मान्यता आपोआपच मिळते. एकतर बरीच फुले, पाने , प्राणी आपल्या आयुष्याचा भाग असतात आणि आवडतही असतात त्यामुळे बहुदा वनस्पती शास्त्राचा तास आणि अभ्यास आवडीने केला जातो. पण ते रसायन आणि भौतिक शास्त्राचे तास आणि त्या आंबट वासाच्या प्रयोग शाळांमध्ये जायचे म्हणजे फाशीचा कैदी जसा वध स्तंभाकडे जाईल तशी पावले जड होत असतात. कित्येक हुशार मुलांना केवळ हे २ शत्रू विषय येत नाही म्हणून 'ढ' ठरवले जाते. एवढी सर्कस करून पुढे त्याचा उपयोग काय तर त्याच विषयाचा शिक्षक नाहीतर अभियंता होता येते. त्याचे प्रमाण फक्त २%, त्या इनमिन २ टक्क्यांसाठी सगळ्यांचा बळी का?

खेळ , शारीरिक कसरती रोज दोन तास घ्या ना , आम्ही न रडता न कंटाळता शाळेत येऊ. पण त्याला पूर्ण आठवड्यात फक्त २ तास. सगळ्यात कहर असतो तो संगीत विषयाचा. कोणतीही कला ही दैवी देणगी असते, ती जन्मजात यावी लागते , वगैरे वाक्य शाळेच्या पाठ्यक्रमात संगीत घुसवताना कुठे हरवतात ?? कोण कुठला राग, कसला आरोह कोणत्या अवरोहाबरोबर खायचा काही तपास लागत नाही, सारेगमप सरळ न म्हणता मध्ये काही स्वर का खायचे , त्यांना उगाच वर खाली करून वेगळा 'राग' असे नामकरण का करायचे ? आवाज बरा असो , नसो अख्ख्या वर्गाने भसाड्या आवाजात समूह गीत गावे तसे ते राग आळवायचे. 'देवी भजो दुर्गा भवानी....' काय सुख असते हे असे जबरदस्ती गाणे एखाद्याच्या नरड्यात ओतण्यात? वरून 'गाणे गातात, कविता म्हणतात, तू गाणे म्हणते आहेस, गात नाही आहेस,हे कळतंय का तुला' असा शेरा. आहो माझे काही म्हणणे नाही, गा नाहीतर म्हणा पण मला सोडा असे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटले तर त्यात त्याची काय चूक ?

कला मग ती कोणतीही असो चित्रकला, नृत्यकला, हस्तकला, गायन, वादन हे ऐच्छिकच असले पाहिजे. ४ भाषा, एखादी कला, गणित, गोष्टीरूपी इतिहास, प्रोजेक्ट साठी भूगोल ( घरून करून आणायला सांगायचा नाही), शारीरिक शिक्षण आणि खेळ, आणि ३ पैकी एकच कोणतेतरी विज्ञान तेही ऐच्छिक आणि हल्ली संगणक ( भाषा म्हणून नाही तर व्यावहारिक वापरासाठी)  असे विषय असतील तर कोण कशाला शाळा बुडवेल ?? ढ , हुशार, बुद्धिमान अशी वर्गवारी पण होणार नाही. विषय आवडीचे असल्यामुळे सगळेच हुशार मग नापास होण्याचा ताण नाही आणि शाळा बुडवण्याची गरज पण नाही.
एखादा कौशल्याचाही विषय टाकायला हरकत नाही. सुतारकाम, माती काम(मडके,दिवे बनवणे), इ मजा येईल शिकायला.
अजून एक...  घोडदौड आणि लष्कराचे शिक्षण जर अनिवार्य केले तर ... मी स्वप्न तर बघत नाही ना???

मुलगी दहावीला आहे,ती उत्तीर्ण झाली की माझा सर्वार्थाने शाळेशी सम्बन्ध संपणार.... सुटलो एकदाचे.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

मै चली मै चली, देखो प्यार की गली ...

मै चली मै चली,
देखो प्यार की गली ...

काही लोक आयुष्यात एकदाच प्रेमात पडतात, काही एकदाही नाही, काही मनातल्या मनात अनेकदा तर काही सरेआम खुल्लमखुल्ल वारंवार. त्यांनाच बहुदा 'मोठ्या मनाचे लोक' वगैरे म्हणत असावेत. मी ह्या 'मोठ्या मनाच्या' पंगतीत मोडते. 'एक से मेरा क्या होगा कालिया' हे आमचे ब्रीदवाक्य. बर प्रकार तरी किती , एकाचा दुसऱ्याला पायपोस नाही. एक प्रेम उत्तर तर एक दक्षिण. नानाविध प्रकारांचे , आकारांचे , रंगांचे इंद्रधनुष्यचं.

पाहिले प्रेम अर्थात 'सायकल'. आपल्याला आतून काहीतरी प्रचंड आवडू शकते हे सायकल ने पहिल्यांदा अनुभव करून दिले. एकदा हात धरला ते आयुष्यभरासाठीच. वाटले आता बस , अजून कोणीच नाही ,फक्त मी आणि माझी सायकल.

पण नाही, दोघात तिसरा यायचा होताच. आमच मजेत चालल होत आणि .... आपल्याला अजून कशानेतरी आतून उकळ्या फुटतात हे कळाले. 'चित्रकला' बरी आहे हे चौथीला बक्षीस मिळाले तेव्हाच कळाले होते. फक्त कळाले होते, ओळख नुसती. पण आई ने मराठे सरांकडे जपानला चित्र पाठवायचे आहे त्याच्या सरावासाठी पाठवले आणि घात झाला. सर तेव्हा जे काही बोलले, जे काही शिकवले त्याने चित्रकला हृदयाच्या आरपार गेली .... ती कायमचीच.

आता तरी थांबावे ना ...पण नाही. त्याला ही मी जबाबदार नाही. सरस्वती कॉलनी च्या गणपतीच्या स्नेहसम्मेलनात 'नृत्य' बसवताना सुनीता म्हणाली की ही छान करते, हीचे बघून करा .... आणि काटा रुतला. कार्यक्रम झाल्यावर आई ला पण असेच वाटले की बरी नाचते. झाले ... खुंटी हलवून घट्ट झाली. नितीन कुलकर्णी सरांच्या कथक शिकवण्याने नृत्य प्रेमाला मखरात नेऊन बसवले आणि नृत्याने पट्टराणी बनून मनावर कायमचे राज्य केले.

संपूर्ण आयुष्य नृत्य करायचे आणि चित्रकलेत पदवी घ्यायची हे ठरले.... ठरले म्हणजे ठरले, त्यात काही बदल नाही. आता कोणालाही तिसर्याला हृदयात प्रवेश द्यायचा नाही. हम दो ( मी आणि सायकल, हमारे दो (चित्र आणि नृत्य) बास. राजे ... घात झाला. ठाकूर मॅडम च्या शिकवणीच्या निमित्ताने पुन्हा ' आंखे चार हो गई'. मॅडम ची नजर चोरून 'गणित' हळूच आत पाझरले. शिकवणीचे निमित्त , आमच्या रोज गाठीभेटी होऊ लागल्या, हळू हळू आमच्यातील अंतर इतके कमी झाले की नुसत्या एका नजरेत उत्तर जन्माला येऊ लागले. मनाचा ठाव घेणे म्हणजे काय ह्याचा अनुभव गणिताने दिला.

त्यामुळेच बहुदा अकरावी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विज्ञाना बरोबर मराठी आणि इंग्रजी भाषा पण असायच्या , भाषा म्हणजे निबंध आलाच. आला तसा लिहिला. मराठी शिकवणाऱ्या शिक्षिका (BA) कला शाखेला शिकवायच्या. निबंध त्यांना इतका आवडला की त्यांनी कला शाखेच्या मुलांना वर्गात वाचायला तर दिलाच शिवाय मला भेटायला ही बोलावले ... दगा दगा दगा . तिथून जे पेन आणि कागद मनाच्या कोपऱ्यात हळूच सरकून बसले ते बसलेच.

ह्या सर्व प्रकारामुळेच की काय ,बारावी नंतर विज्ञानाला राम राम ठोकून कला शाखेला जवळ केले. NSS च्या निमित्ताने सरांना काय साक्षात्कार झाला असेल माहीत नाही, तू चांगले बोलतेस, हिंदी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्याचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन करशील...... आणि वाघाच्या तोंडाला रक्त लागले. एका नवीन प्रकाराची ओळख झाली. तोपर्यंत बोलणे म्हणजे फक्त बडबड आणि गप्पा. त्याला एक वळण लागले. त्या वळणाचे एक टोक सरळ हृदयाच्या आत जाऊन कायमचेच रुतून बसले.

ह्या सर्व गुंत्यात गुंतले असताना एक दिवस शिल्पा ने लुना हातात दिली. चालव ... सोप्पी आहे. लुना चालवायला फक्त सोपीच नाही तर कसली धम्माल आहे हे कळाले. सायकल कडे कानाडोळा करून लुनावर भटकणे वाढले. नगरला गेले असता शशांकने मोटारसायकलशी ओळख करून दिली आणि पुन्हा स्नेहबंधनात अडकायला झाले. गाडी चालवायला कधी जमलीच नाही, ती उडवायलाच मजा यायची. एकदाही आमच्यात भांडण, रुसवा फुगवा होऊन तिने कधी तोंडावर आपटले नाही. गुण्या गोविंदाने आम्ही एकमेकांच्या साथीने अक्षरशः बागडलो.

मोठं मोठं म्हणजे किती मोठ मन असावे? .... इथपर्यंत सगळं ठीक होते, दुचाकीमुळे सायकल वर थोडा अन्याय झाला पण तरीही सगळे हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदत होतो. कुठून तरी टूम निघाली, चार चाकी शिकूयात...... शिकण्याचे फक्त निमित्त.  तिने कधी संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतला कळलेच नाही. ओळख बनून गेली माझी. आता आता तर लोक 'तू दिसली होतीस' न म्हणता 'तुझी गाडी दिसली होती' असेच म्हणतात. सगळे माहीत असते तिला. कधी कोणी वाईट नजरेने पाहिले , खास करून दुचाकीने , की ही त्याला सरळ आपल्या अंगावर घेते आणि मला वाचवते. किती जखमा, किती झीज झाली असेल तिची ह्या नात्यात पण कधी कुरकुर करून बंद पडणे नाही. कधी राग राग करून कोणाला ठोकणे नाही. कितीही लांब न्या, विनातक्रार सोबतीला तयार ही जिवनसंगिनी.

ह्या सगळ्या प्रेम प्रकरणांना एकटी मी कारणीभूत नाहीये. हे सगळे नानाविध प्रकार दिले आहेत पालकांनी आणि फुंकर घालून अग्नी भडकवला आहे शिक्षकांनी. मनाच्या 'मोठ्ठेपणात' त्यांचा सिंहाचा वाटा आहे.... काय पाठीमागे नावं ठेवायची असतील ते सगळ्यांना मिळून ठेवावीत.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
मै चली मै चली,
देखो प्यार की गली ...

काही लोक आयुष्यात एकदाच प्रेमात पडतात, काही एकदाही नाही, काही मनातल्या मनात अनेकदा तर काही सरेआम खुल्लमखुल्ल वारंवार. त्यांनाच बहुदा 'मोठ्या मनाचे लोक' वगैरे म्हणत असावेत. मी ह्या 'मोठ्या मनाच्या' पंगतीत मोडते. 'एक से मेरा क्या होगा कालिया' हे आमचे ब्रीदवाक्य. बर प्रकार तरी किती , एकाचा दुसऱ्याला पायपोस नाही. एक प्रेम उत्तर तर एक दक्षिण. नानाविध प्रकारांचे , आकारांचे , रंगांचे इंद्रधनुष्यचं.

पाहिले प्रेम अर्थात 'सायकल'. आपल्याला आतून काहीतरी प्रचंड आवडू शकते हे सायकल ने पहिल्यांदा अनुभव करून दिले. एकदा हात धरला ते आयुष्यभरासाठीच. वाटले आता बस , अजून कोणीच नाही ,फक्त मी आणि माझी सायकल.

पण नाही, दोघात तिसरा यायचा होताच. आमच मजेत चालल होत आणि .... आपल्याला अजून कशानेतरी आतून उकळ्या फुटतात हे कळाले. 'चित्रकला' बरी आहे हे चौथीला बक्षीस मिळाले तेव्हाच कळाले होते. फक्त कळाले होते, ओळख नुसती. पण आई ने मराठे सरांकडे जपानला चित्र पाठवायचे आहे त्याच्या सरावासाठी पाठवले आणि घात झाला. सर तेव्हा जे काही बोलले, जे काही शिकवले त्याने चित्रकला हृदयाच्या आरपार गेली .... ती कायमचीच.

आता तरी थांबावे ना ...पण नाही. त्याला ही मी जबाबदार नाही. सरस्वती कॉलनी च्या गणपतीच्या स्नेहसम्मेलनात 'नृत्य' बसवताना सुनीता म्हणाली की ही छान करते, हीचे बघून करा .... आणि काटा रुतला. कार्यक्रम झाल्यावर आई ला पण असेच वाटले की बरी नाचते. झाले ... खुंटी हलवून घट्ट झाली. नितीन कुलकर्णी सरांच्या कथक शिकवण्याने नृत्य प्रेमाला मखरात नेऊन बसवले आणि नृत्याने पट्टराणी बनून मनावर कायमचे राज्य केले.

संपूर्ण आयुष्य नृत्य करायचे आणि चित्रकलेत पदवी घ्यायची हे ठरले.... ठरले म्हणजे ठरले, त्यात काही बदल नाही. आता कोणालाही तिसर्याला हृदयात प्रवेश द्यायचा नाही. हम दो ( मी आणि सायकल, हमारे दो (चित्र आणि नृत्य) बास. राजे ... घात झाला. ठाकूर मॅडम च्या शिकवणीच्या निमित्ताने पुन्हा ' आंखे चार हो गई'. मॅडम ची नजर चोरून 'गणित' हळूच आत पाझरले. शिकवणीचे निमित्त , आमच्या रोज गाठीभेटी होऊ लागल्या, हळू हळू आमच्यातील अंतर इतके कमी झाले की नुसत्या एका नजरेत उत्तर जन्माला येऊ लागले. मनाचा ठाव घेणे म्हणजे काय ह्याचा अनुभव गणिताने दिला.

त्यामुळेच बहुदा अकरावी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. विज्ञाना बरोबर मराठी आणि इंग्रजी भाषा पण असायच्या , भाषा म्हणजे निबंध आलाच. आला तसा लिहिला. मराठी शिकवणाऱ्या शिक्षिका (BA) कला शाखेला शिकवायच्या. निबंध त्यांना इतका आवडला की त्यांनी कला शाखेच्या मुलांना वर्गात वाचायला तर दिलाच शिवाय मला भेटायला ही बोलावले ... दगा दगा दगा . तिथून जे पेन आणि कागद मनाच्या कोपऱ्यात हळूच सरकून बसले ते बसलेच.

ह्या सर्व प्रकारामुळेच की काय ,बारावी नंतर विज्ञानाला राम राम ठोकून कला शाखेला जवळ केले. NSS च्या निमित्ताने सरांना काय साक्षात्कार झाला असेल माहीत नाही, तू चांगले बोलतेस, हिंदी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आहे त्याचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन करशील...... आणि वाघाच्या तोंडाला रक्त लागले. एका नवीन प्रकाराची ओळख झाली. तोपर्यंत बोलणे म्हणजे फक्त बडबड आणि गप्पा. त्याला एक वळण लागले. त्या वळणाचे एक टोक सरळ हृदयाच्या आत जाऊन कायमचेच रुतून बसले.

ह्या सर्व गुंत्यात गुंतले असताना एक दिवस शिल्पा ने लुना हातात दिली. चालव ... सोप्पी आहे. लुना चालवायला फक्त सोपीच नाही तर कसली धम्माल आहे हे कळाले. सायकल कडे कानाडोळा करून लुनावर भटकणे वाढले. नगरला गेले असता शशांकने मोटारसायकलशी ओळख करून दिली आणि पुन्हा स्नेहबंधनात अडकायला झाले. गाडी चालवायला कधी जमलीच नाही, ती उडवायलाच मजा यायची. एकदाही आमच्यात भांडण, रुसवा फुगवा होऊन तिने कधी तोंडावर आपटले नाही. गुण्या गोविंदाने आम्ही एकमेकांच्या साथीने अक्षरशः बागडलो.

मोठं मोठं म्हणजे किती मोठ मन असावे? .... इथपर्यंत सगळं ठीक होते, दुचाकीमुळे सायकल वर थोडा अन्याय झाला पण तरीही सगळे हातात हात घालून गुण्या गोविंदाने नांदत होतो. कुठून तरी टूम निघाली, चार चाकी शिकूयात...... शिकण्याचे फक्त निमित्त.  तिने कधी संपूर्ण आयुष्याचा ताबा घेतला कळलेच नाही. ओळख बनून गेली माझी. आता आता तर लोक 'तू दिसली होतीस' न म्हणता 'तुझी गाडी दिसली होती' असेच म्हणतात. सगळे माहीत असते तिला. कधी कोणी वाईट नजरेने पाहिले , खास करून दुचाकीने , की ही त्याला सरळ आपल्या अंगावर घेते आणि मला वाचवते. किती जखमा, किती झीज झाली असेल तिची ह्या नात्यात पण कधी कुरकुर करून बंद पडणे नाही. कधी राग राग करून कोणाला ठोकणे नाही. कितीही लांब न्या, विनातक्रार सोबतीला तयार ही जिवनसंगिनी.

ह्या सगळ्या प्रेम प्रकरणांना एकटी मी कारणीभूत नाहीये. हे सगळे नानाविध प्रकार दिले आहेत पालकांनी आणि फुंकर घालून अग्नी भडकवला आहे शिक्षकांनी. मनाच्या 'मोठ्ठेपणात' त्यांचा सिंहाचा वाटा आहे.... काय पाठीमागे नावं ठेवायची असतील ते सगळ्यांना मिळून ठेवावीत.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, April 10, 2020

चक चक चक चक चालते अशी,
जणू वाऱ्यावर उडते सायकल ही...

माझ्या पिढीतल्या अनेकांच्या 'मर्मबंधातली ठेव' किंवा 'पहील प्रेम' सायकल. सायकल शिकण्यासाठी ती आपल्या घरी असायलाच हवी असा काही नियम नव्हता. कोण कधी कशी सायकल शिकवून टाकत असे ते शिकणाऱ्या आणि शिकवणार्याच्या पण लक्षात रहात नसे. शिकण्यासाठी लेडीज सायकलच हवी असाही काही नियम नव्हता. पण एकदा सायकल यायला लागली की मात्र घरी येणाऱ्या प्रत्येकाची सायकल उडवली जायची. निघतांना त्यांना शोधाशोध करून सायकल परत मिळवावी लागे.

एकदा असाच दुकान चा माणूस घरी लेडीज सायकल घेऊन आला. रोज तो जेन्ट्स सायकल आणायचा तरीही ती पळवली जायचीच. आज आला तर सायकल देईना , सरळ घरात गेला , आईशी काहीतरी बोलला आणि कळाले ती सायकल आता कायम घरी रहाणार. तेव्हा जी सायकल आयुष्यात आली ती कायमचीच.
तिने माझी शाळा, कॉलेज, मैत्रिणींची घरे, श्रीरामपूरचे सगळे रस्ते, भाजी मंडई, फळवाला, बुवा हलवाई ते कोर्ट सगळे माझ्याबरोबर फिरून पाहिले. माझी धाकटी बहीण ते माझ्या आज्जी पर्यंत सगळ्यांना डबल सीट फिरवून आणले. सायकल चालवण्यापेक्षा पळवलीच खूप. कित्येकदा त्यावरून बोलणी पण खाल्ली. पण घोड्यावर बसण्याचा जो कैफ असेल ना तो सायकल जिंगाट पळवण्यात असतो. लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत आम्ही बरोबरच दौडत होतो.

त्यानंतर सायकल शी परत भेट झाली ती मुलाच्या निमित्ताने. समोर राहणाऱ्या अनिकेत ने हाक मारली म्हणून खाली गेले तर 4 वर्षाचा अद्वैत मस्त सायकल चालवत होता. त्याने शेजारच्यांच्या सायकल वर त्यांच्याच मदतीने परस्पर सायकल शिकण्याची परंपरा चालु ठेवली होती. कालांतराने तो सायकल  मॅरेथॉन साठी मुंबईत जाऊ लागला. प्रत्येक गोष्टीसाठी मुंबई का , ठाण्यात का नको ? ह्या विचाराने ठाणे महानगरपालिका गाठली आणि सायकल शर्यतींचा ठाण्यात श्रीगणेशा झाला, त्यातून पुढे सायकल असोसिएशन आणि सायकल संमेलन पर्यंतचा प्रवास घडला.

आमच्या वेळेस सगळ्यांकडेच काळीं सायकल असायची ... एकसारखी. धाकट्या बहिणीची सायकल घ्यायची वेळ येईपर्यंत लाल , नाजूक जरा देखण्या सायकली यायला लागल्या होत्या. त्यातल्या त्यात पाहिलेली ती पहिलीच आधुनिक सायकल. मुलगा सायकल घ्यायला लागल्यावर 'सायकल मधल मला सगळं कळत' वाला माज धप्पकन उतरला. रस्त्यावर चालवायची सायकल वेगळी आणि डोंगरावर चालवायची वेगळी हे तेव्हा पहिल्यांदा कळाले. सायकल चे गियर , गियर बॉक्स आणि इतर आधुनिक उपकरणांची माहिती झाली. फक्त माहिती, ओळख नाही. हो, अजूनही मला साधी सायकलच चालवता येते, गियर माहीत करून घेण्याचे कित्येकदा ठरवले आहे ...मनातल्या मनात.

सायकल येणे आणि सायकल शिकवता येणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आसतात ह्याचा साक्षात्कार मुलीला सायकल शिकवताना झाला. बालवाडी ते ७ वि चार (४) सायकल आणून दान करून झाल्या पण सायकल चालवण्यात काही प्रगती होईना. सोनाराने कान फुंकावे ह्या उक्तीला जागून शेवटी तिला 'मै चलाउंगी' ह्या महिलांना सायकल शिकवण्याच्या एका सामाजिक चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले ........ आणि गंगेत घोडे न्हाले.

आता ती माझी गुरू होणार आहे. 'जीएंगे तो और भी लढेंगे' च्या धर्तीवर कोरोनाच्या तावडीतून सुटलो की गियर माहित करून परत भरपूर सायकल वर हुंदाडायचे बेत ठरले आहेत. बघुयात ... तिला तरी सायकल गुरू होता येते का ती पण माझीच गादी चालवते ?

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित
लवकर निजे, लवकर उठे,
त्यास आयु-आरोग्य लाभे !

मान्य ... पण हे वचन आम्ही मोठे झाल्यावर सगळेच सोयीस्करपणे का विसरतात ? लहानपणी कानी कपाळी ओरडून सांगितलेल्या गोष्टी साधारणपणे थोडे मोठे व्हायला लागलो, म्हणजे आई वडिलांना मोठे झाल्याची खात्री वाटायला लागली की गळून का पडतात ? परीक्षा आली आता जरा रात्री पण अभ्यासाला बसत जा पासून सकाळी लवकर उठून अभ्यास करावा पर्यंत उपदेशाचे डोस सुरू होतात. त्या काळी रात्री अभ्यास म्हणजे १० पर्यंत , पट्टीचे जागणारे ,जे चहा पीत असत , ते ११/११:३० पर्यंत जागत. (हल्लीच्या मुलांनी हसायची भोत नच्छ) आणि सकाळी उठून अभ्यास म्हणजे ५ वाजता. ११ ते ५ मध्ये कुठे ८ तासांची झोप पूर्ण होते? त्या काळात आमच्या आरोग्यावर किती विपरीत परिणाम झाला असेल ह्याचा काही विचार ??

इथून जे जगरणाला सुरवात होते ती रात्री कोणी येणार आहे त्यांना दार उघडायला जागे रहा , मुले झाल्यावर त्यांच्या वेळा सांभाळायच्या  म्हणून जागे रहा आणि परत त्यांचीच वेळ सांभाळायची म्हणून लवकर उठा. मग सुरू होते शाळा , डबा बनवायचा , त्यांना तयार करायचे म्हणून उठा. रविवारी पाहुणे येणार , गावी जायचे , जास्तीची साफसफाई, राहिलेले ऑफिस चे काम , मुलांचा गृहपाठ , नवीन पदार्थ बनवायचा ते सगळे सणवार कुठलेही कारण पुरते सकाळी निवांत न झोपायला.
अशावेळेस आपले पालक कुठे हरवतात. की आपणच पालक झाल्यामुळे आपल्या झोपेला वाऱ्यावर सोडून देतात ?

हे जे झोपेचे सत्यवचन आहे हे फक्त मुलींच्याच पालकांना का माहीत असते ? मुलांच्या पालकांना का शिकवले जात नाही?? तसे झाले असते तर कोणाच्या तरी सासरी कधीतरी कोणीतरी सुनेच्या झोपेची थोडीतरी काळजी घेतली असती. रात्री नुकताच डोळा लागला असताना 'पाहुणे आले , उठा स्वयंपाकाची सर्कस करा' असा तीला हुकूम निघाला नसता, सकाळीच दरवाजे धाडधाड वाजले नसते. 'झोप जरा आम्ही आमचे करून घेतो' असे कोणीतरी तीला म्हंटले असते. ह्यामुळेच असेल पण अनेक स्त्रियांना मुलांच्या निमित्ताने पटकन डुलकी घेण्याची सवय असते. त्याला पण 'हल्ली च्या मुलींची नाटके' असे नाव दिले गेले नसते.

देव भले करो त्या चपट्या नाकाच्या शत्रूचे, त्याच्यामुळे कित्येक वर्षे हरवलेल्या जिवाभावाच्या सखीला मनमुराद भेटता येइल असे वाटले. किती वाजता झोपायचे किती वाजता उठायचे काह्ही बंधन नाही. ८ +१ तास झोपलो तरी कोणाचा डबा रहाणार नाही , कुठली गाडी हुकणार नाही, ऑफिस मधून फोन येणार नाही, कुठल्या मीटिंगची वेळ पकडायची नाही. एक पोटोबा सांभाळला आणि घरातली २/४ कामे झाली की सगळा वेळ आपला आणि आपल्या सखीचा. ह्यालाच मागच्या जन्मीचे पुण्य म्हणत असावेत.

पण .....
इतके दिवस दुर्लक्ष केल्यामुळे सखी रुसलीये बहुदा. कितीही अंजारा गोंजारा जाम दाद देत नाही. दुपारी येतेस का ग भेटायला विचारावे तर वळून पण बघत नाही. रात्री भेटुयात का म्हणावे तर माझी १२ ची वेळ आहे सांगून मोकळी. जागणारा माणूस काय करणार शेवटी ... पुस्तक , समाजमाध्यमे संपली की दूरचित्रवाणी कडे वळणार. पण ते ही जगू देत नाहीत शांतपणे. कितीही वाहिन्या बदला कोणी न कोणी सांगत असते 'भरपूर पाणी प्या, गरजेपुरतेच खा, व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या :(

कळावे, लोभ असावा.

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Thursday, April 9, 2020

छडी लागे छम छम,
विद्या येई घम घम ..


काल खरेदी केलेले कांदे, बटाटे आणि लसूण विलगीकरणाची शिक्षा देऊन बाहेर गच्चीत ठेवले होते. आज आत आणताना एक विचार आला, आपल्या शिक्षकांना विलगीकरणाचे महत्व फार पूर्वीच कळाले होते. म्हणूनच तर काहीही चूक करा वर्गा बाहेर उभे रहाण्याची शिक्षा देत असत . बाहेर उभे राहून विद्यार्थी स्वच्छ , शुद्ध झाला की परत वर्गात सन्मानाने प्रवेश मिळत असे. शाळेत जायला उशीर झाला की तर शाळेच्या बाहेर मैदानात ३ किंवा ५ फेऱ्या पळत पळत माराव्या लागायच्या. ही विलगिकरणाची पुढची पायरी असावी.

फक्त शाळेतच नाही तर रोजच्या व्यवहारात देखील हा विलगिकरणाचा नियम पाळला जात होता. साधी आंब्याची आढी लावायची असेल तरी कच्चे , पाडाला लागलेले , पिकायला आलेले अशी वेगवेगळी आढी लावली जायची.

पण हल्लीच्या शुचिर्भूत शिक्षण व्यवस्थेला हा नियम मान्य नसावा. त्यांच्या मते सडलेले, कमी पिकलेले, पूर्ण कच्चे , पिकलेले सगळेच आंबे एकाच आढीत ठेवायचे. वर त्यांना तू पिकलेला आहेत , तू अजून पिकायचा आहेस , तू खराब झालास ,इ काहीही म्हणायचे नाही. आढी कशी मधून मधून तपासून पहावी लागते ,कोण पिकले कोण कच्चे राहिले ,कोण खराब झाले बघावे लागते. तसेही काही करायचे नाही. परीक्षाच घ्यायची नाही म्हणजे काळायलाच नको कोण सध्या कुठवर पोहोचला आहे ते? शेवटी जेव्हा कळायची वेळ येते तेव्हा सांगायचे 'तू कौशल्य विकास' बरका. खराब आंबे एका डागात ओळखता यायचे , असे आंबे पहिल्या डागालाच बांधावर नेऊन पुरले जायचे. त्यातून नवीन झाडे पुढच्या पिढीसाठी उगवून तयार असायची. आम्ही मात्र पूर्ण आंबा न पिकण्याची वाट पाहतो, आणि शेवटी सांगतो 'तू कौशल्य विकास'.

का? त्या बाळाला 7 वि लाच जर कळाले की त्याला ह्या पुस्तकी अभ्यासात काही रस नाही तर 8 वि पासूनच तो त्याला जिथे गती आहे त्या विषयात / कौशल्यात प्रवेश घेऊ शकेल. 3 वर्ष वाया जाण्यापासून वाचणार नाहीत का त्याची?

अजून एक नवीन प्रकार ' मुलांना शिक्षा करायची नाही'. अघोरी शिक्षा नकोतच. पण मी जर चुकलो तर त्याचे दुष्परिणाम मलाच भोगावे लागणार आहेत हे त्या बाळाला कोण शिकवणार ??

मूल चुकले, बोलावं पालकांना. मुलाला हळू हळू माहीत होते , मी चुकलो तर मला कोणीच रागावणार नाही, होऊन होऊन काय होईल , पालकांना बोलणी बसतील. 'बोलणी' हा शब्द अक्षरशः खरा आहे. मुलांच्या उद्योगांनी कावलेल्या मास्तरणी पालकांना अक्षरशः धारेवर धरतात. मुलगा चुकला, घरचा अभ्यास नाही केला, मुलांनी वर्गात गोंगाट केला, वर्ग चालू असताना बडबड केली, हल्ली अजून एक प्रकार 'प्रोजेक्ट' नावाचे लचांड घरून करून नाही आणले, धर पालकांना. त्यांना तरी काय दोष द्या?

सध्या कोरोनाच्या कृपेने आपण सगळे घरी आहोत. एका तरी पालकाने सांगावे की मी माझ्या मुलाला/मुलांना एकदाही रागावले(लो) किंवा शिक्षा केली नाही. आपलीच मुले/ मूल , 1 किंवा 2 किंवा अपवादाने 3 झेपत नाहीत आपल्याला . मग विचार करा ती एक शिक्षिका आपली माकडछाप मुले न रागावता न शिक्षा करता कशी हाताळत असेल ? बर नुसते सांभाळायची असतात का ती मुले तर नाही. त्या गोळ्यांना घडवायचे पण असते.

हो पण घडवताना , आकार देताना त्या गोळ्याला जरा सुद्धा हात लावायचा नाही. कोणीतरी कुंभाराला सांगा हो, मडके बनवताना मातीला जोरात तिंबायचे नाही, मातीच्या गोळ्याला हाताने चापट्या मारायच्या नाहीत, त्याला स्वतःला जो आकार घ्यायच असेल तो घेऊ द्यायचा, त्याला आकार घेण्याची दिशा दाखवायची नाही. बनवू शकेल का हो तो कुंभार तुम्हाला आम्हाला हवे तसे भांडे , मडके, दिवे ??

हात पाय बांधून म्हणायचे 'हल्ली चांगले शिक्षक तयारच होत नाहीत'. हे म्हणजे पोलिसांसारखे झाले, बंदूक द्यायची पण चालवायची परवानगी नाही. वर म्हणायचे , पोलिसांचा काही धाकच राहिला नाही समाजाला.

'सब घोडे बारा टक्के' नियम कसा चालेल? कायद्यात तरी सगळ्या गुन्ह्यांना सारखी शिक्षा आहे का ? गुन्हा तो गुन्हाच मग तो कोणताही असो, एकच शिक्षा. चालेल ? साधी घरात पोळी किंवा भाकरी केली जाते तेव्हा कणिक मळताना आणि भाकरीचे पीठ भिजवताना पद्धत , प्रमाण सारखे असते का ? उद्या भाकरी म्हणाली, 'कणकेला कसे मळणे म्हणतात तसेच मला पण म्हणा ,मला भिजवायचे नाही. आणि कणके इतकेच मळायचे', टम्म फुगेल का हो भाकरी ? स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला देतो ना आपण तो निर्णय घेण्याचा अधिकार, कशात तिखट ,मीठ ,गुळ , साखर , तेल, तूप घालायचे , काय वाटायचे ,काय मळायचे ,काय आणि किती भाजायचे ... तेव्हा कुठे सुग्रास भोजन आपल्या ताटात वाढले जाते. हा निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षकांना नको द्यायला ??

आपण आपल्या मुलांना वाढवतो, मोठे करतो, वळण लावतो ते त्यांच्या शिक्षकांच्या मदतीनेच. आपल्याच मुलांच्या कितीतरी गोष्टी त्यांचे शिक्षक आपल्या लक्षात आणून देत असतात. मुलांच्या जडणघडणीत, विचारसरणी मध्ये पालकांइतकाच शिक्षकांचाही हात असतो हे तरी मान्य करूयात.

कळावे, लोभ असावा.

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, April 7, 2020

लेक लाडकी या घरची,
होणार सून मी त्या घरची.

दूरदर्शन च्या वाहिन्या बदलता बदलता अचानक अभिनेत्री अलका कुबल दिसल्या. विचार आला हल्ली कौटुंबिक अत्याचाराचे सिनेमे निघत नाहीत का ? की बाहेर समाजात होणाऱ्या अत्याचारावर लिहिता लिहिता लेखक घरगुती अत्याचार हा विषयच विसरले ?
की घरगुती अत्याचार हा प्रकार सपंला असे वाटते आहे की काय लोकांना?

'बेटी बचाव , बेटी पढाव' म्हणताना नेमके कोणती बेटी बचाव अभिप्रेत आहे ? जन्माला येऊ घातलेली की जन्मलेली?
चला हाच मुद्दा पकडून आपणच एका चित्रपटा साठी कथा लिहुयात.
साधारण नायक सुरवातीची नावे वगैरे संपेपर्यंत मोठा होतो आणि चित्रपट सुरू होतो. ह्याच धर्तीवर आपण आपली 'बेटी' लग्न होऊन सासरी आलेलीच दाखवु.

लग्न होऊन नवरा नवरी दारात उभे आहेत , घरात सगळी पाहुणे मंडळी दिसतात, घरातले कोणीच नाही, मोठी जाऊ दमली म्हणून कार्यालयातून सरळ माहेरी गेलेली असते आणि सासूबाई दमून गोळी घेऊन झोपलेल्या असतात हे नंतर कळते. घरात जावे की नाही, दारात माप ठेवलेले नाही ,मग ओलांडणार कसे? बरे आपली 'बेटी' शिकलेली तिला चालले असते मापाशिवाय आता गेलेले पण ह्या लोकांना नाही चालले तर,उद्या काही बोलले तर ? दोघेही 15 मिनीट झाले बाहेरच उभे. मामे नणदेने अडचण ओळखली आणि पटकन एका भांड्यात मिळेल ते धान्य घेऊन माप तयार करून उंबर्यावर ठेवले आणि नवदाम्पत्याची सुटका केली.

स्वागतच असे तर पुढे काय आणि कसे ?? मजा येतेय लिहायला.

आपल्या बेटी च्या लग्नाच्या दोनच दिवसांनी तिच्या चुलत भावाचे लग्न असते , पूजा झाली नाही ह्या कारणाने तिला पाठवले जात नाही. पहिल्यांदा माहेरी जाऊन येते तर आल्या आल्या एक एक धक्का तिची वाट पाहत असतो. ज्या लग्नासाठी तिला घाई घाई बोलावले जाते त्या लग्नातला रुखवत म्हणजे तिचाच सगळा रुखवत मांडलेला असतो. लग्नाहून घरी जातात तो नवऱ्याच्या नावाचे समन्स तिच्या हातात पडते. पुढच्या आठ दिवसात नवरा मुलगा व्यसनाधीन असल्याचेही लक्षात येते. नुसता व्यसनाधीन नाही तर भांडकूदळ आणि आई च्या ताटाखालचे मांजर पण निघतो.
ह्या नवऱ्या मुलालाच आपल्या गोष्टीचा खलनायक करूयात का?
जोडीला त्याची आई, भाऊ आणि वहिनी ... झाली खलनायकाची टोळी तयार.

गोष्टीत मालमसाला पण हवाच ना, आपल्या 'लेकी' ला दिवस जातात, ते मूल ठेवण्या न ठेवण्यावरून घरात चर्चासत्रे झडतात. दिवस गेले असताना खालून पाणी आणणे, घरातली सगळी कामे, मशीन असतानाही हाताने कपडे धुणे, जाऊ तेव्हा पॅड न वापरता कापड वापरत असे, तो घाणेरडा कपडा सगळ्या कपड्यात भिजवून धुवायला लावणे सारखे तिचे हाल आपण दाखवू शकतो. बर आपल्या बेटीला हे सगळे त्या नवऱ्या मुलाला सांगायची चोरी. कारण ते बाळ लगेच सगळ्या गोष्टी आई ला सांगणार आणि आई भावाला. मग रात्री व्यसनाधीन नवऱ्याचे तमाशे. त्यापेक्षा न सांगितलेले बरे असा ती विचार करते. अजून तडका हवा असेल तर तिच्या नाष्ट्याच्या ताटलीत पाणी टाकणे, तिचे वाढलेले ताट कामवाल्या बाईला नेऊन देणे ,इ प्रकार दाखवता येतील.

भावनिक नाट्य काहीतरी हवे इथे ...
ह्या सगळ्या ताणतणावाने असेल पोटातले बाळ खाली सरकते. डॉक्टर म्हणतात टाके घालावे लागतील. सासूबाई आपल्या लाडक्या लेकरास फर्मान सोडतात, पाहिले बाळंतपण माहेरी असते, तिकडे नेऊन सोड.
परमेश्वराचे अस्तित्व दाखवणे पण जरुरी आहे हो ..
त्या परमेश्वराच्या कृपेने नवऱ्या मुलाचीच कसली तरी शस्त्रक्रिया करावी लागते. सगळी धावपळ आपली बेटी करते. मोठा भाऊ (जेठ) आपल्या 'बेटी' ला सांगतो , तुझ्या नवऱ्याची समस्या काही बरी होणारी नाही,तू त्याला कायमचे सोडून निघून जाऊ शकतेस.
आरे... काय घोळ झाला? आपण तर भावाला खलनायकाच्या टोळीत टाकले होते मग तो आपल्या बेटीच्या चिंतेत तिच्या बाजूने कसे बोलला बरे? गोष्ट चुकली की काय ? की दाल मे कुछ काला है ??
बरोब्बर .. अख्खी डाळच काळीं निघाली. धाकट्या भावाचा पैसा आपल्याला मिळावा , त्याने त्याच्या संसारात रमू नये म्हणून मोठ्या भावाने खेळलेली ती चाल असते. (ढयानतड्यांग - संगीत)

नवऱ्या मुलाची प्रगती झपाट्याने होतेय. ते पाहून सासूबाई, भाऊ आणि वहिनी एकदम नाराज , शत्रूपक्षात चलबिचल ... काय करावे ? ही प्रगती आपल्याकडे कशी ओढून घेता येईल ? जोरात खलबते चालू. नवऱ्या मुलाच्या कानात बेटी विरुद्ध शिसे ओतणे, बेटीच्या सतत तक्रारी करणे आणि नवऱ्या मुलाचे घर कसे भांडत राहील ह्याची काळजी घेणे सुरूच.

आपण खलनायकाची टोळी तर तयार केली पण आपल्या लेकीची तिला पाठराखण करणारी कोणी माणसे असतीलच ना!
'ह्या लोकांना चांगला धडा शिकवं , बिलकुल हार मानू नकोस , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' असे काहीही न सांगणारी उलट 'हे ही दिवस जातील' असे समजावणारी सोज्वळ आई , बेटीच्या प्रत्येक प्रसंगात तिच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारी बहीण, काही मैत्रिणी अशी टीम इकडे तयार करू.

चित्रपटाला थोडा वेग हवा नाहीतर मजा येत नाही...
आता सुरू होते संकटांची मालिका .. मुलाचा अपघात , त्यातून त्याचे वाचणे , तिची त्याला उभे करतानाची फरफट, नवऱ्याची मदत न करण्याची अडेलतट्टू भूमिका , सासू आणि जावेच्या चुगल्या , व्यसनाच्या अमलाखाली होणारी रोजचीच भांडणे आणि कटकटीं. हे सगळे सहन न होऊन आपली बेटी घराबाहेर पडायचे ठरवते. परत शिक्षण सुरू करते. त्यात ती यशस्वी होताना दाखवुयात, तिचे शिक्षण पूर्ण होऊ नये म्हणून निर्माण केलेले अडथळे,इ मसाला टाकता येईल. आपली बेटी त्यातूनही मार्ग काढून शिक्षण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते आणि ऐन परीक्षेच्या वेळी कळते तीला दिवस गेले आहेत. परीक्षा देता येणार नाही.

मध्यंतर...
लोकांना थोडे चहा ,समोसे खाऊन येऊ देत. पुढे उसासे सोडायला ताकद हवी.

मध्यंतरानंतर चित्रपटाने जरा वेग घेणे अपेक्षित...
मुलीचा जन्म , बाळाने श्वास न घेणे , त्यातून त्याचे वाचणे आणि सुरू होते तारेवरची कसरत. लहान मुलगा त्याचे जग ,नवीन बाळ त्याची काळजी , घरातले वातावरण तसेच कटकटीनी भरलेले, स्वतःचे शिक्षण आणि पायावर उभे राहणे . ही सगळी सर्कस चालू असतानाच आपल्या बेटीचाच अपघात होतो. शत्रक्रिया करावी लागते पण नवरा मुलगा मित्रांबरोबर परदेशी पिकनिकला निघून जातो. मागे उरतात लेक , छोटा मुलगा, लहान बाळ , बहीण आणि मैत्रीण सगळे सोपस्कार करायला.
इथे अडचणींची मालिका सुरू करूयात ...
अपघात, शस्त्रक्रिया , डेंग्यू आणि हृदयविकार एकामागे एक हात धुवून आपल्या बेटी च्या मागे लागतात. प्रत्येक वेळी होणारी ससेहोलपट, आई व बहिणीची घ्यावी लागणारी मदत , त्यांचा सासरदारी होणारा अपमान,इ गोष्टी फोडणीला हव्याच.

इथे खरे म्हणजे 'बेटी बचाव' म्हणणे जरुरी आहे.... असो.

आपली बेटी लढवैय्यी , ती वाट पहात नाही कोणीतरी मला वाचवेल ह्याची. लढते आणि  स्वतःला ,मुलाला ,मुलीला उभे करते. हे सगळे चालू असताना आपली खलनायकाची टोळी काही गप्प नाही बसली बर का...त्यांचे त्रास देणे चालूच आहे . त्यांच्या टोळीतील एक सदस्य, नवरा मुलगा, आहेच ना त्यांच्या संगण्याप्रमाणे त्रास द्यायला इकडे. पण आपली बेटी त्यांनाही पुरून उरते. मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने व्यवसायात , सामाजिक कार्यात यशस्वी होते. नाव कमावते , मुलांच्या पाठीमागे ठाम उभी राहते आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते.

इथे थांबूयात..... अडीच तासात किती दाखवणार ?
उरलेली गोष्ट भाग-2 साठी.
क्रमशः

कळावे, लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित