Tuesday, May 26, 2020

बाई ग SSSSS ... बाई ग.

बाई ग SSSSS ...
बाई ग.

'रोटी,कपडा,मकान आणि कामवालीबाई' जगण्याच्या मूलभूत गरजा. एक दिवस रात्री आठ वाजता मोदी सर दूरचित्रवाणीवर येतात आणि सांगतात 'उद्यापासून बाई कामावर येणार नाही... लॉक डाऊन. आत्मनिर्भर व्हा'.

साधारण गणपती बसण्याच्या आदल्या रात्री जी हुरहूर असते, रात्री सगळी तयारी करून झोपायला होणारा उशीर, सकाळी जाग येईल का? गजर वाजेल ना? गुरुजी सहा वाजता येणार आहेत, त्या आधी पंचामृत आणि प्रसाद होईल ना? ह्या विचारात जागेपणी गेलेली किंवा घालवलेला रात्र .... अगदी हाच अनुभव त्या रात्री आला. सकाळी घरातली सगळी कामे आणि स्वयंपाक दोन्हीची सर्कस जमेल ना ह्या विचारानेच रात्रीची वाट लागली.

उठल्या उठल्या ज्या गोष्टींची म्हणजेच कामाची सवय असते ते आधी सम्पवून टाकू ह्या विचाराने चहा आणि कुकर एकदमच गॅस वर जाऊन बसले. कणिक मळून एक कोपरा पकडून बसली. भाजीची आणि न्याहारीची तयारी एकदमच होत होती. भाजीची फोडणी आणि इतर सगळी कौतुक होऊन तिने शिजण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला. तेवढ्या वेळात न्याहारीने नम्बर लावला. सगळ्यांच्या ताटल्यांमध्ये जाऊन सजली सुद्धा. सहजच घड्याळाकडे नजर टाकली आणि नऊ च्या काट्याने 'तू मागे पडलीस' म्हणून सांगितले. आता कामाचा वेग खरोखरच वाढवावा लागणार होता. अकराची सीमारेषा काहीही करून गाठायची होती. मनातल्या मनात आकडेमोड केली. भांडी पंधरा मिनिटं, ओटा गॅस पुसायला दहा मिनिटं,केर लादी दहा दहा मिळून वीस मिनिटं, बाथरूम दहा मिनिटं आणि पुसापुशी पंधरा मिनिटं... इन मिन सत्तर मिनिटं लागणार, दहा सव्वा दहा पर्यंत आटोपेल सगळे मग कपड्याचे मशीन लावता येईल. पोळ्या असेही जेवायला बसल्यावरच करायच्या होत्या. वाटले तेवढे काही सगळे काम घरी एकट्याने करणे अवघड नाहीये.

'हर हर महादेव' चा गजर करत भराभर ओटा पुसायचा चौकोनी स्पंज घेतला. बाईचा एका स्पंज मध्ये दोन्ही ओटे आणि एक गॅस पुसून व्हायचा, आपल्याला फार फार तर दोनदा धुवून घ्यावा लागेल ह्या विचाराने लढाई चा बिगुल वाजवला. एक नाही,दोन नाही, तीन नाही, तब्बल चार वेळा तो चौकोनी तुकडा धुवून घ्यावा लागला तेव्हा कुठे ओटा,गॅस आणि मागच्या टाईल्स स्वच्छ झाल्या. दहा मिनिटाच्या कामाला वीस मिनिटे लागली. आता मात्र उरकपट्टा जोरजोरात फिरवायला हवा होता. कामात बदल आणि स्वयंपाकघरातून जरा बाहेर पडावे म्हणून झाडू आणि सुपलीशी मैत्री केली. बाईचे पाच मिनिटात झाडून होते आपल्याला फार फार तर दहा पंधरा मिनिटे लागतील ह्या विचाराने कामाला लागले. दहा मिनिटांनी फक्त दिवाणखाना झाडून झाला होता. बाकीचे घर अजून आ वासून बघत होते. सूड उगवल्यासारखे जिथे जिथे झाडू जाईल तिथून कचरा, धूळ, पेन्सिल, चमचा, रबर, कंगवा, कागद, एखादे छोटे झाकण काय वाट्टेल ते निघत होते. त्या सगळ्यांची मोट बांधता बांधता पूर्ण अर्धा तास कसा निघून गेला कळालेच नाही. आता पुसापुशी मात्र पटापट आवरायची म्हणून पोछा आणि बादली कडे मोर्चा वळवला. गौरी म्हणजे बाईला अर्धी अर्धी बादली दोनदा घ्यावी लागते हे मी बरेचदा बघितले होते. त्या मापाने अर्धा पेक्षा थोडे जास्त पाणी, फिनेल घेतले आणि त्या अर्ध्या बादलीत फक्त एक खोली पुसून झाली. पाण्याने लगेच कृष्णरंग स्वीकारला. पुन्हा पाणी बदला फिनेल टाका , इ सोपस्कार केले , पुन्हा तेच तब्बल चार वेळा त्या पाण्याने सरड्यासारखा परत परत रंग बदलला आणि मला अक्षरशः तोंडावर पाडले.

बादली, पोछा स्वच्छ धुवून मी निःश्वास सोडला आणि मागून भांड्यांनी आवाज दिला. आता मात्र घड्याळाकडे बघायचेच नाही ठरवून दहा मिनिटात ह्या भांड्यांना मार्गी लावून सरळ बाथरूमचा रस्ता धरायचा ठरवून हातघाईच्या लढाईला सुरवात केली. लांबून जरी ती सगळी एकसारखी भांडी दिसत असली तरी त्यांच्यात गट तट फारच. काचेची, दुधाची, पेले-वाट्या, तवा-कढया हे घसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत मोडणारे प्रकार. प्लास्टिक हा अजून एक नखरेल आयटम. सगळ्यांच्या तऱ्हा निराळ्या. प्रत्येकाचा मेकअप करून सगळ्यांना सुकण्यासाठी पंचावर उपडे घालून बेसिन, नळ आणि मागच्या टाईल्स धुवून पुसून , न रहाऊन घड्याळाकडे पहिलेच ... पूर्ण अर्धा तास मोडला होता.

धावत पळत लोकल पकडण्याच्या सवईने बाथरूम चा दरवाजा गाठला. आता काय हारपिक निळा आणि लाल आहेत . जाहिरातीत दाखवतात तसे दोन मिनिटात सगळे चकाचक करून टाकू. झाले हो सगळे चकाचक पण पूर्ण वीस मिनिटं लागले. 'हर हर गंगे' आटोपून बाहेत आले तर 'किती उशीर? बसायचे आहे ना जेवायला?' चा गजर कानी पडला. आरे बापरे, त्या पोळ्या ठेवल्या आहेत ना मागे. स्टेशन वर दादरा चढून उतरावा त्या वेगाने भराभर स्वयंपाकघर गाठून काकडी, कांदा, आमरस, पोळ्या, मागची आवराआवर आटोपून बाहेर पडले तर घड्याळाशी नजरानजर झालीच. काळ वेळेचे गणित पूर्णपणे मोडकळीला आले होते.

आता जरा वेळ शांत बसावे म्हणून सोफ्यावर टेकले आणि पुसापुस राहूनच गेल्याचे लक्षात आले. आता मात्र प्रचंड राग आला. घड्याळाचा, कामाचा की रोज रोज तेच तेच काम करूनही नीट न करणाऱ्या कामवाल्या बाईचा ..काही कळाले नाही. खरच ह्या रोजरोज येतात, तेच तेच काम करतात ... तरीही हवी ती स्वच्छता का होत नसावी?? लहान बाळाला हळुवार हाताने पावडर लावावी तसे वरच्यावर घराला आणि घरातल्या कामाला हळुवारपणे गोंजारून पाळतात बहुदा पुढच्या कामाला. ह्या 'कामवाली' शब्दाची पण एक कमालच आहे. आपल्याकडे काम करणाऱ्यांना जसे 'कामवाली' म्हंटले जाते, तसेच त्या ज्या ज्या घरी काम करतात त्या घरच्या मालकिणीला त्या 'कामवाली' च म्हणतात. म्हणजेच आपल्यासाठी त्या कामवाली आणि त्यांच्यासाठी आपण.

बाकी काहीही असो, घरात बसून जशी त्वचा स्वच्छ होते, तशी घराची आणि बाथरूमची फारशी लख्ख झाली. भांडी नव्याने चमकायला लागली, कपड्यांचे रंग एकमेकांना लागेनासे झाले. घराला एक स्वच्छतेचा वास यायला लागला. आणि 'आता कामवाली आली की तिच्याकडे बघतेच' हा विचार ही मनात घर करू लागला.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 23, 2020

जिंकू किंवा मरू ..

जिंकू किंवा मरू ..

जगात दोन प्रकारचे लोक असतात, कर्ण आणि श्रीकृष्ण प्रवृत्तीचे. दोघांचा जन्म विचित्र वातावरणात झाला. दोघेही जन्मतः मातेपासून दुरावले. दोघांनाही वेळेत शिक्षण नाही मिळाले. राजवंशात जन्म घेऊन सुद्धा एकाला गोपपुत्र आणि एकाला सुतपुत्र म्हणवून घ्यावे लागले.

पण ह्या सर्व परिस्थितीचा दोघांवर झालेला परिणाम मात्र वेगवेगळा होता. 'माझ्यावर अमूक अमुक वेळ आली' अशी एकाने सतत तक्रार केली. तर आलेल्या परिस्थितीशी एकाने हसून मुकाबला केला आणि जी जशी मिळेल त्या संधीचे सोने केले.

आजूबाजूला जरा आजमावले तर ह्या प्रवृत्ती अजूनही सहज बघायला मिळतात. सध्या सगळ्यांच्याच मनावर आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणाव आहे. त्यातही काही लोक मात्र व्यवस्थित मार्ग काढताना दिसतात. एका वृत्तवाहिनीवर दाखवत होते, लाकडी सामानाचे दुकान असणाऱ्या एका गृहस्थांनी सध्या भाजी आणि फळे ह्यांना मिळत असलेला उठाव पाहून त्याच व्यवसायाला सुरवात केली. एकाने दूध विकण्याचे काम करू केले. कितीतरी शहरात रहात असणारे परंतु गावी शेती असणाऱ्या लोकांनी, आपल्या गावच्या लोकांशी संधान बांधून शहरातून भाजी आणि फळांच्या ठोस आगाऊ मागण्या नोंदवून त्याच्या विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केला. कोणी घरगुती मास्क शिवून त्याच्या विक्रीतून पैसे कमावले. कोणी खाद्यपदार्थ, पाठ्यक्रम, कलाकारी, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, विविध भाषा, इ. अनेक विषयांच्या ऑनलाइन शिकवण्या घेतल्या. हे सर्व त्या श्रीकृष्ण वंशावळीचे प्रतिनिधी.

काही लोक मात्र आता कसे होणार आणि काय होणार ह्या चिंतेत मग्न. अडचणीपेक्षा ह्या लोकांचा त्रास अधिक. समाजमाध्यमांवर कविता, लेख, एखादा मेसेज, चित्र, दुसऱ्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया,इ कुठेल्याही प्रकारे व्यक्त होण्याची वेळ आली की ह्यांचा नकारात्मक सूर लागतोच लागतो. विचार करा ह्या लोकांच्या संपर्कात त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. कोरोनाचा संसर्ग झालाच नाही तर बरे हा विचार सुद्धा ह्या लोकांना शिवत नाही. उलट कोरोनाची चाचणी किती महाग, दवाखाने पूर्ण भरलेले, रुग्णवाहिका नाही मिळत, कदाचित मरण सुद्धा येऊ शकते,इ विचारांनीच हैराण. घरात बसावे लागते, काम नाही, कांम बंद तर पैसे नाही, बाहेर पडावे तर कोरोना पकडले, नाही गेलो तर घरात बसावे लागेल हे असे विचारांचे चक्र त्याच त्याच रुळांवर परत परत फिरत रहाते. ह्यातूनच व्यसने, घरातल्यांचा शारीरिक, मानसिक छळ,इ. गोष्टी घडतात. त्याचा दुष्परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो.

प्रसंग आला आहे, त्याला तोंड देणे हा एकच मार्ग आपल्याकडे आहे. अनंत अडचणी आहेत, त्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. कदाचित संसर्ग होईल, कदाचित नाही होणार. पन्नास पन्नास टक्के संधी आहे. लस उपलब्ध नाही पण काळजी काय घ्यायची ह्याची पूर्ण कल्पना आहे. पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत कारण साथीने संपूर्ण जगात उच्छाद मांडला आहे. जाऊन जाणार कुठे? जर लढायचेच आहे तर न रडता मनाची तशी तयारी करूयात. कोरोनाच्या साथीला हरवूयात.

कळावे, लोभ असावा

-Adv स्वाती आवटी दीक्षित

सत्तेचं राजकारण...

सत्तेचं राजकारण...

आई-वडिलांचा घटस्फोट होतो. आईचे दुसरे लग्न होते. आईची इच्छा 'नवीन वडिलांना' मुलांनी आपले म्हणावे. मूळ वडिलांना आता आई 'शत्रू' वाटायला लागली आहे. त्यांना वाटते, मुलांनी माझ्याबरोबर आई आणि नवीन वडिलांवर चिखलफेक करावी. का? वेगळे होताना मुलांना विचारले होतेत का ? मुलांनी तर तुम्हाला एकत्रच निवडले होते. त्यांच्यासाठी आजही तुम्ही एकत्र यावे हीच इच्छा आहे. नको आहेत त्यांना नवीन वडील. तेच जर हवे असते तर त्यांच्याच पोटी जन्म घेतला असता ना. तुमच्या कुटुंबाचा हिस्सा झालोच नसतो. आणि तुम्हाला आई नकोशी झाली, तुम्ही सोडली की तिने जन्मगाठ तोडली आम्हाला घेणे देणे नाही, पण तुमच्या चिखलफेकीचा भाग व्हायला आम्हाला सांगू नका.
उलट एक समंजस, समजूतदार पित्याच्या भूमिकेतून आमच्या पाठीशी उभे रहा.

मान्य आहे की कोर्टाने आमचा ताबा आईकडे दिला आहे. एकटीने मुले सांभाळण्याची तिची ही पहिलीच वेळ. तारेवरची कसरत करताना आणि नवीन कबिल्याशी जमवून घेताना होते आहे आमच्याकडे दुर्लक्ष, होते आहे आमची आबाळ. तर ती कशी चूक आहे, ती कशी कमी पडते, तिचे कसे लक्ष नाही सांगून आमची आबाळ थांबणार आहे का ?? त्यापेक्षा ती जिथे कमी पडते, तिचे जिथे लक्ष नाही, तिच्या जिथे चुका होतात ज्याच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो, तिथे आमच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. एक समांतर प्रणाली राबवा. जेणेकरून तिचा आम्हाला ह्या संकटकाळात उपयोग होईल. ज्याच्या भरवशावर आम्हाला ह्या अडचणीतून वाट काढायला मदत मिळेल. आधीच आम्ही बुडालेलो, त्यात आम्हाला हात देऊन बाहेर काढायचे की हातात फलकाचे ओझे देऊन अजून आत आत रुतवायचे??

आईचेही चुकलेच. तिच्या वडिलांच्या 'इच्छे'खातर तिने आम्हाला वाऱ्यावर सोडले. नव्या कुटुंबाच्या हवाली केले. पण आमची इच्छा काय आहे ? आम्हाला हवाय का नवा बाप? आम्हाला आवडतोय का हा नवा घरोबा ? केला का काही विचार ? तुमच्या ह्या नव्या तडजोडीत आमचे मन मोडलेस बघ तू. झाला असेल ना तुमच्यात वाद. चुकले असाल ना दोघांपैकी एक कोणीतरी. पण इतके टोक गाठलेत की तुमच्या अहंकारापुढे एकालाही आमची आठवण येऊ नाही ?? आणि तुझा तो भाऊ,शकुनीमामा, त्याला तिकडे स्वर्गात पाठवलाय कशाला?? आपल्या भूलोकीचे प्रश्न, मागण्या तिकडे मांडून आपल्यासाठी चांगल्या सोयी सुविधा आणायला ना?? आणि करतोय काय तो मामा, स्वर्गात बसून भूलोकीच्या पंचायती ?? उंटावरून शेळ्या हाकतोय नुसता. त्याचा सगळा जीव इथेच अडकलेला. पाठवला कशाला मग त्याला स्वर्गलोकीला?? कळीचा नारद कुठला... आग भडकली तर विझवायचं त्याच काम होत की अजून तेल ओतायचं?? आपली बहीण राणी व्हावी म्हणून भाचरांचा जीव घेतला त्यानं आणि वरून पोपटपंची चालूच. त्याच्या ह्या कृत्याची कधीही माफी देणार नाही हा भूलोक.

'आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देई ना' अशी अवस्था करून ठेवलीत तुम्ही दोघांनी आमची. तुमच्या भांडणात आम्हाला पडायचं नाही. त्या नव्या घरोब्याशी आमचे काही भांडण नाही पण आम्हाला काही घेणेदेणे पण नाही. आम्हाला त्यांच्याबरोबर नांदायला लावू नका. आणि त्या शकुनीमामाला आवरा. ज्या दिवशी तुम्हाला तुमची चूक उमजेल, परत एका घरात एकोप्याने रहायला लागाल, तेव्हाच आम्ही परत येऊ. तोपर्यंत तुमच्यापैकी एकाचेही तोंड बघायची आणि तुमच्या कोणाच्याही नादी लागायची आमची इच्छा नाही. कदाचित तुमच्या लक्षात येत नाहीये, काडीमोड एक नाही दोन झाले आहेत. एक तुमच्या दोघांमध्ये आणि दुसरा तुमच्या आणि आमच्या मध्ये.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#सेना #शिवसेना #भाजपा #विरोधीपक्ष #सत्ताधारी #राऊत

Friday, May 22, 2020

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥

परवा आईचा फोन आला, तुझे लेखरू(छोटा लेख) वाचले. थोडे रडवलेस, थोडे हसवलेस.

रडायला खरच वेळ आहे सगळ्यांकडे?? कोरोना एक तर बरा होतो नाहीतर फक्त पंधरा (१५) दिवस देतो. ताप येतो आणि उलटी गिनती सुरू होते. कोणी दहा(१०) कोणी पाच(५) कोणी पूर्ण एक(१) पर्यंत पोहोचून मगच निरोप घेतो आणि पितरांच्या भेटीला रवाना होतो. हे जर सगळं माहीत आहे तर जो आहे तो वेळ रडण्यात का वाया घालवावा ?? कदाचित तो आपल्याकडे वळून पहाणारही नाही, कदाचित पुसटसे चाटून जाईल, कदाचित गाढ आलिंगन देईल.... कोण जाणे काय आहे नियतीच्या मनात. कोरोना केवळ निमित्त.

सगळ्यांनीच आयुष्याची लढाई लढली आहे . कोणाची सौम्य, कोणाची कठीण, कोणाची महाकठीण असेल. पण त्याचबरोबर सगळ्यांकडे सुंदर, आनंदी, हसरे क्षण पण असतील. कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त, कोणाकडे प्रचंड साठा. लुटुयात ना ते सगळे आंनदी प्रसंग, करूयात ना यशस्वी क्षणांची लयलूट, सांगूंयात ना हसऱ्या गोष्टी सगळ्या जगाला, देउयात ना सुंदर प्रसंगांची वाणे एकमेकांना, जमवूयात ना गप्पांचा फड पुन्हा एकदा, वाहूदेत ना हास्याचे खळाळते धबधबे, जगुयात बेधुंद आयुष्य आपल्या आपल्या चौकटीत.

शाळेत चोरून खाल्लेल्या चिंचा-बोरे-कैऱ्या-चॉकलेट स्मरणात रहातात की शिक्षकांची बोलणी?? पालकांनी केलेले प्रेम सुख देऊन जाते की केलेली शिक्षा ?? भावंडांबरोबरच्या खट्याळ आठवणी हसवून जातात की लहानपणी केलेली भांडणे?? चांगला शेजार मनात कायम घर करतो की नाठाळ शेजार??

असे जर आहे तर आठवणी आठवताना रडक्या का आठवाव्यात?? प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगले-वाईट अनुभव आणि प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतात. जे जग आजूबाजूला आहे त्या जगातले चांगले बघावे, चांगले शिकावे, त्यांच्याशी चांगलेच वागावे हीच शिकवण दिली जाते ना? मग जे जग सोडून गेले, मागे पडले, आता आपल्याबरोबर नाही त्याची खंत न करता, त्या जगाच्या चांगल्या, मधुर, सुंदर आठवणीत का रमू नये?? आनंदाने त्या जगाची आठवण का काढू नये ?? भूतकाळ हा कायम रडकाच असावा का ??

एरवी असे म्हणत असत, भूतकाळ हातून सुटून गेला, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, उरला फक्त वर्तमानकाळ , तो भरभरून अनुभवून घ्या आणि भविष्याला भिडायला तयार रहा. पण सध्या वर्तमानावरच जर भविष्याची काळी सावली पडली आहे तर कसे जगणार भरभरून ?? केवळ भूतकाळातल्या सुंदर अनुभूतींच्या आधारेच ना ?? तोच एकमात्र आधार आहे प्रत्येकाकडे जगण्यासाठी, हसण्यासाठी, आनंदी होण्यासाठी आणि आठवणी मागे सोडण्यासाठी सुद्धा.

चला तर मग, रोज एक पुरचुंडी बांधुयात एका सुंदर क्षणाची, एका रोमहर्षक आठवणीची, एका सकारात्मक विचाराची, एखाद्य छान जुन्या मैत्रीची, काही निसटलेल्या नात्यांची, काही गवसलेल्या बंधनांची, नव्या-जुन्या खट्या-मिठ्या प्रसंगांची, आपलेपणाची, प्रेमाच्या ओलाव्याची आणि यशाच्या मानाची सुद्धा.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

लोकशाहीचा चौथा स्तंभ ..

लोकशाहीचा चौथा स्तंभ ..

खिळखिळीत झाला आहे का ?? की कुठल्या एखाद्या (अ)राजकीय खिळ्यावर अडकून पडला आहे ?? जगात कोरोना आहे ... मान्य. पण फक्त कोरोनाच आहे असे नाही. बाकी जग पूर्वी होते तसेच आहे, त्यात फक्त कोरोनाची भर पडली आहे. समजतंय का तुम्हाला हे?? की समजत असून पण समजून घ्यायचे नाही असे ठरले आहे ??

कोरोनाच्या बातम्या द्या ना ... जरूर द्या. नव्हे दयायलाच हव्यात. पण किती वेळ आणि किती वेळा ?? तुम्हाला बातम्यांचे एक वेळापत्रक नाही का ठरवता येत ?? दिवसभरातले 2 तास, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, कोरोनासाठी ठेवता येतील. उरलेल्या वेळात जरा उर्वरित विषयांबद्दल बोलता येणार नाही का ?? की धडधाकट लोकांना कोरोनाने नाही पण त्याच्या विचारांनी घाबरवून हृदयविकाराने परलोकी पोहोचवूयात नाहीतर नैराश्याने ग्रासवूयात असा काही विचार आहे तुमचा ?? की विचारशक्ती कुंठित झाली आहे तुमची ?? की क्रय शक्ती संपुष्टात आली आहे ??

'ब्रेकिंग न्यूज' ची पण जमले तर एखादी 'योग्य' व्याख्या बनवा. आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अभ्यास म्हणून मागच्या महिनाभरातल्या सगळ्या 'ब्रेकिंग न्यूज' पुन्हा एकदा बघा. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काय काय खपवले आहे त्याचा जरा खरोखरच आढावा घ्या. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा 'लोक आज घरात अडकले आहेत, तेही थोड्या काळाकरीता, कायमचे नाहीत'. आज त्यांच्याकडे पर्याय नसेल दूरचित्रवाणी बघण्याशिवाय, पण ही परिस्थिती कायम रहाणार नाही आहे. उद्या 'कोणी प्रेक्षक देता का प्रेक्षक' अशी भीक मागायची वेळ तुमच्यावर येऊ शकते ह्याची जाणीव ठेवा.

गरजवंत आणि गरजेला धावून जाणारे सगळ्यांचीच तुम्ही बातमी करतात ना ?? मग त्यांच्या मधला दुवा होण्याचा का नाही प्रयत्न करत?? 'इथे हे नाही आणि तिथे ते नाही' अशी बोंबाबोंब करण्यापेक्षा जिथे ते मिळू शकते किंवा जे ह्या गैरसोयीनसाठी मदतीचा हात बनून पुढे येऊ इच्छितात त्यांच्यापर्यंत ती गैरसोय नेऊन त्या दोन दुव्यांना का नाही जोडायचा प्रयत्न करत ?? जेथे अन्नाची नासाडी होते, तेथे का नाही कमतरता असलेल्या विभागांची माहिती पोहोचवली जात ?? पूर्वी काहीही बातमी कळाली की खातरजमा करण्यासाठी पत्रकारांना किंवा वृत्तपत्र कार्यालयात फोन केला जात असे. आज ती विश्वासार्हता बरकरार राहिली आहे ??

वृत्तवाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक सर्वेक्षण करावे. तुमच्या घरातील, ओळखीतील दहा(१०) आठवी ते बारावी आणि बारावी ते पदवी मध्ये शिकत असलेल्या मुलांना प्रश्न विचारावा की ती मुले तुमची किंवा कोणतीही, कोणत्याही भाषेतील वृत्तवाहिनी बघतात का ?? नाही उत्तर असेल तर 'का' ?? तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल. काय कार्यक्रम आहेत तुमच्याकडे ह्या मुलांसाठी ?? त्याच त्याच (अ)राजकीय बिनडोक चर्चांचा तुम्हाला कंटाळा नाही आला ?? काहीतरी वेगळे करावे असे नाही वाटत तुम्हाला??

बर चला, जरावेळ असे गृहीत धरू की तुमच्या वाहिनीचा एक ठरलेला कार्यक्रम असतो तुम्हाला त्यातच नाचावे लागते. कलाकार आणि विषय तरी बदला ना त्या नाचकामाचे. थोडा दर्जाचा कधीतरी विचार करा. काय हरकत आहे रात्री दहा(१०) ते अकरा(११) वीस(२०) ते तीस(30) वयोगटाच्या तरुणांसाठी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची आखणी करायला?? रात्री नऊ(९) ते दहा(१०) आठवी ते बारावीतल्या मुलांसाठी राखीव ठेवायला?? कार्यक्रमाची आखणी म्हणजे एखादा प्रौढ प्रज्ञावंत बोलावून त्याने मुलांना कारकीर्द, व्यवसाय ,इ विषयांवर बोलून कंटाळा आणणे नव्हे. मुलांना येऊ देत ना समोर, त्यांना बोलू देत त्यांच्या मनातले. मुलांनी मुलांसाठी मुलांचे कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप का असू शकत नाही ?? सतत कंटाळवाण्या लांब चेहेऱ्याच्या लोकानी येऊन अक्कल  शिकवणे म्हणजे चांगला कार्यक्रम ?? ही व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे. नाही बदललात तर ही तरुण पिढी वृत्तवाहिनीला पर्याय शोधायला जराही मागेपुढे पाहणार नाही.

आणि हो, 'सूत्रां'च्या नावाखाली वेड्यात काढण्याचे लाजिरवाणे प्रकार जमले तर थांबवा. खणखणीत खरी बातमी देता येत असेल तर द्या म्हणजे सारखा 'सूत्रां'चा बुरखा पांघरण्याची गरज भासणार नाही. वाहिन्या बदलत असताना चुकून वृत्तवाहिनी दिसली तर अजीर्ण होऊन उलटी होते की काय असे वाटण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमचा प्रवास. 'जब गीदड़ की मौत आती है, तो वो शहर की ओर भागता है' ह्याचा अर्थ असा , जेव्हा एखाद्यावर वाईट वेळ येणार असेल तर ती मुसीबत, ती वाईट वेळ त्याला आपल्याकडे बोलावून घेते. सध्या तुमचे काहीसे असेच झाले आहे.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#पत्रकार #पत्रकारिता #वृत्तवाहिन्या #बातम्या

Tuesday, May 19, 2020

हम पांच

हम पांच

आट पाट नगर होतं. नगरात एक सुंदर वसाहत होती. त्या वसाहतीत एक कुटुंब अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. धुमश्चक्रीचे कारण होते त्या कुटूंबातील पांच पांडव. सगळे प्रकार होते त्या घरात. कलाकार, नकलाकार, चित्रकार, भयंकर चित्रकाढ, गायक, केकाटे, लेखक, न(व)लेखक, नाचरे मोर, वाकड्या अंगणातील लांडोर, अज्ञाधारी, हेकेखोर, सुंदर-सुघड-व्यवस्थित, अजागळ-गबाळे, गुंड, रडुबाई, गडगडाटी हास्य ते मानातल्यामनात हास्य. सगळ्या गुणावगुणांचे एकत्र चित्र. त्यामुळेच त्या घराला बाहेर फारशी मैत्री शोधायची गरज पडली नाही. मुळात घरातील जेष्ठ श्रेष्ठ म्हणजे एक एक विद्यापीठ ... आपोआपच सगळ्या गोष्टींची शिकवण घरातच उपलब्ध. पाच (५) दणदणीत योध्ये न तयार होते तरच नवल. लांबून पाहणाऱ्याला कायम कुतूहल असायचे त्या घराबद्दल. त्या घरात कोणीही कोणालाही काहीही भेटवस्तू दिली तर त्याच्यावर पाचही जणांच्या नावाचे अद्याक्षर लिहिले जाई 'PSTAR'

त्यातला सगळ्यात लहान, दिसायला अतिशय शांत, लांबून बघणाऱ्यांसाठी प्रचंड समजूतदार मुलगा, भाच्यांना उंच कपाटावर उचलून ठेवणारा व्रात्य मामा, भाऊबीजेला मुद्दाम एका विशिष्ट बहिणीला पायाला तेल लावायला लावणारा आणि ते पाय नुकतेच कुठे कुठे जाऊन आले होते ते सांगून रडायला लावणारा नटखट भाऊ, बाबा जिथे जातील तिथे त्यांच्या बरोबर जाणारा आणि आईच्या कारल्याच्या भाजीवर नितांत प्रेम करणारा मुलगा, मित्रांवर स्वतःचा जीव आणि बहिणींनी त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू ओवाळून टाकणारा मित्र, दूरचित्रवाणीवर सतत फक्त प्राण्यांचे  कार्यक्रम पहाणारा, पंजाबी गाणी ऐकणारा, उत्तम गाडी चालवणारा, पोहणारा सहा (६) फूट उंच धाकटा पांडव. पारिजातची लस्सी आठवणीने आणणारा. लहान असताना एकदा रिकामा ग्लास तोंडाला लावून हवा आत ओढायचा उद्योग करता करता तोंडाचा आकार हनुमानासारखा झाला होता, इतके हसले होते सगळे खोखो. खूप चिडवले होते त्याला , आता हे तोंड असेच रहाणार म्हणून. आठवड्यातून एकदा वीज जात असे. TV बघता बघता बंद झाला, त्याने TV च्या मुंग्या बघून मनाने गोष्ट तयार करून सांगायला सुरुवात केली 'एक बाई जा रही थी, उसके कडेपर एक मूल था' पुन्हा घरात सगळे खोखो. शिंगोळे त्याला आणि आर्या ला खूप आवडतात. 'मामासाठी ठेवले आहेत' असे आज्जीने बजावून देखील आर्याने त्याचे शिंगोळे पळवावेत. कधीही बहिणींनी विचारले, काय आणू तुला ? तर ठरलेले उत्तर असते 'काही नाही रे, तुम्ही या फक्त'. मामाची खोली मुलांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. तो पण येऊ देतो, मस्ती करू देतो. त्याने सहज एकदा फणसाची रोपे लावली, दर वर्षी म्हणायचं यंदा फणस येणार पण फणस त्याला काही दाद देत नव्हते. आता मात्र भरपूर फणस लगडतात त्या झाडाला. रुपाचा डिलिव्हरीचा दिवस जवळ जवळ येत चालला होता, तिचा भाऊ भैय्या ही त्याच वयाचा पण तिने ह्याला सांगून ठेवावे 'तुला मला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे, रात्री फोन केला तर लगेच उठशील ना', केवढा विश्वास. त्याच्या गाडीत कायम पंजाबी गाणी लावलेली असतात, घरातले सगळे ओरडतात काहीतरी वेगळे लाव म्हणून. पंजाबी मुलगी पटवली का म्हणून पण चिडवतात. त्याच्या इतके कुशल गाडी चालवणे फार दुर्मिळ. कोणाच्या अध्यात मध्यात नाही. कधी कोणाला नावे ठेवणे नाही, घरात कधी काही कोणाबद्दल बोलताना ऐकले तर म्हणेल 'झाले का तुमचे सुरू'. घरी न सांगता गुपचूप खरेदी करण्यात त्याच आणि बहिणीचे संगनमत. त्यावरून दोघांनी कितीवेळा आईची बोलणी खाल्ली असतील. सगळ्यांमध्ये असून सगळ्यातून अलिप्त नर्म विनोदी सगळ्यांना मदत करणारा 'मुन्ना'.

अत्र तत्र सर्वत्र संचार असणारी, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी बोलणारी, वर्गात असणाऱ्या सगळ्या मुलींशी मैत्री करणारी पण जवळची मैत्रीण तिन्ही काळात आणि साता जन्मात एकच असणारी, सतत कुठेतरी प्रवेश घेऊन काही न काही शिकत राहणारी, वडिलांचा चमचा असलेली, सगळ्यात धाकटी बहीण. लहानपणापासून ''मरतुकडी' शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे आपणच' असे समजणारी. त्यामुळे झिरो फिगर आपोआप मिळालेली, 'तुमच्या मुलीचा हात चांगला आहे' असे चित्रकलेच्या सरांनी आईला सांगितल्यावर त्यावर पण विनोद करून हसणारी, 'तुझ्या पाठीवर भाऊ आहे' म्हंटल्यावर रडत रडत घरी येऊन 'पाठीत बाऊ आSSSSSहे' म्हणून भोकाड पसरणारी. पावडर लावून गोरी झालेली, घरात सगळ्यात जास्त पदव्या मिळवणारी सगळ्यात धाकटी, लाघवी 'बाळ' उर्फ कन्स्ट्रक्शन.

'तीन नंबर ची बहीण आहे तुला?' किंवा 'तुम्हाला अजून एक मुलगी आहे?' असा प्रश्न जीच्याबाबत पडत असे अशी एक अदृश्य बहीण पण आहे त्या घरात . साधारण घरात असताना ती आईच्या पदरापाशी, तिच्या मागे मागे किंवा मुलींच्या खोलीत हातात पुस्तक , डोळ्यावर चष्मा अशा अवस्थेतच सापडू शकते. फक्त शाळा किंवा कॉलेज साठी बाहेर पडणार. घरी आली की परत आत गुडूप, अंगणात देखील दिसणार नाही. बाबांनी कधी बागेत काम करायला सांगितले तर घरापासून बागेपर्यंतचे अंतर अख्खे अंगण ओलांडून पार करावे लागेल ह्याचाच तिला अधिक ताण. आयुष्याशी करार केल्याप्रणाने एकावेळी एकच मैत्रीण. तिथेही फार पसारा नको. ठाम मते, साजूक तुपाचे व्यसन आणि दह्यादुधाचे वावडं असणारी , सुंदर हस्ताक्षर आणि बुद्धीचे वरदान मिळालेली आईची लाडकी 'बबडु'.

दोन नंबर म्हणजे एकदम मुलगी सारखी मुलगी, कोणत्याही पालकांना जशी मुलगी असावी असे वाटते एकदम तशी. मुलगी गोरी असलीच पाहिजे शिवाय नाकी(?) डोळी नीटसं, तर ती आहेच. शिवाय आईला घरात मदत, हो करते.... अभ्यास ? न सांगता. धाकट्या भावंडांना सांभाळणे, घरात पसारा न करणे, आज्ञाधारक, हळू बोलणारी, घाबरट, नीट आवरून सावरून वेळेत शाळेत जाणारी, शाळेतून एकही तक्रार घरी न आणणारी, कॉलनीत कोणाशीही न भांडणारी, घर,क्लास, शाळा,अभ्यास, खेळ सगळं वेळेत आणि मापात. अडचण फक्त एकच चित्रकला आणि नृत्यकला. चौकोनी खांद्याचा आईस्क्रीमवाला आणि पडदा-कोळी डान्स ची जनक, बाबांची लाडकी रडुबाई 'नकटी'.

आता राहिला फक्त एक धटिंगण. साधारण एखाद्या गुंडाला शाप मिळून त्याला मुलगी म्हणून जन्माला यावे लागले तर जे काय समोर येईल तो प्रकार म्हणजे 'दंताळी'. धसमूसळी, वटवटी, अवतार ह्या शब्दाला पूरेपूर न्याय देणारी, गुंडागर्दी, अक्राळविक्राळ हसणारी, सायकल असो की गाडी जोरात पिटाळणारी, मुलगी ह्या व्याख्येत कुठेही न बसणारी अशी दंताळी.

ही झाली फक्त ओळख. जेव्हा हे पाच(५) पांडव एकत्र येत असतील, तेव्हा कल्पना करा त्या घराची काय अवस्था होत असेल. सतत हालत असत ते घर गडगडाटी हास्याने आणि गप्पांच्या फडाने, सोबत असतो स्वयंपाकघरातून येणारा सुग्रास दरवळ. एक सुगंधित आनंदी घर.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 16, 2020

सातशे खिडक्या नऊशे दारं..

सातशे खिडक्या
नऊशे दारं..

किती खिडक्या, खिडकीमय आयुष्य झाले आहे आपले. इथून डोकाव तिथून डोकाव, किती डोकवायचे, किती पहायचे .... बाहेर पहातापहाता एखादवेळी अंतर्मन हरवून जायचे.

खूप आपली अशी पहिली डोळ्यांची खिडकी, नजर किंवा नजरिया दोन्हीही. आपल्याला सगळे कळायला लागले वाटत असतानाच पटकन बाहेरचे वेगळे चित्र बघायला लावणारी. समजता समजता हातून निसटून जाणारी. कुठेतरी ठाम होता होता, तू चुकलीस सांगणारी. सगळे सम्पले वाटत असताना आशेचा किरण दाखवणारी. सगळे जग पिणारी, पण तरीही अलिप्त राहणारी. कोणाच्यातरी नजरेच्या खिडकीत रेंगाळणारी, कोणाचीतरी नजर चोरणारी, कोणाला तरी टाळणारी, कोणाकडे पाहून आग ओकणारी, कोणालातरी सज्जड दम भरणारी, कोणावर तरी नजर रोखणारी, कोणावरची नजर हटू न देणारी, कोणालातरी सतत नजरेच्या टप्प्यात ठेवणारी. खट्याळ-मदमस्त-गूढ पण मनातले सगळं सांगणारी नजरेची खिडकी.

नकळत ओळख झालेली घराची खिडकी, आतले जग आणि बाहेरचे जग आपआपल्या जागी ठेऊन दोघांच्या मधला दुवा होणारी. पूर्वी आतून बाहेर डोकावता यायचे ह्या खिडकीतून. ती पूर्वी आतल्या लोकांसाठीच तर होती. बाहेर वारा वहातोय, चंदा मामा आला आहे, चांदणे पडले आहे की नाही, पाखरे उठलीत की नाही, सुर्यरावांच्या मनाचा कल काय आणि कसा आहे, पावसाची धार , थंडीचा थरकाप, झाडांची सळसळ सगळं सगळं आतल्या लोकांना संगायचा चोंबडेपणा करणारी घराची खिडकी. हल्ली फितूर झाली आहे मात्र. काल पक्ष्यांना बाहेरून आत अडकलेली माणसे दाखवत होती, सूर्याला आतली खरबात कळवत होती, चंद्र आणि चांदण्यांना हळूच आत डोकावू देत होती. आज तर कहर झाला, वाऱ्याला हाताला धरून आत घेऊन आली, यथेच्छ खेळले दोघेही, आणि आली तशी घेऊन पण गेली त्याला. माहीत होते ना तीला, दारातून बाहेर पडून कोणी आता वाऱ्याचा पाठलाग नाही करू शकणार... त्याचाच फायदा घेऊन, घरातून बाहेर डोकावणारी खिडकी आता बाहेरून घरात डोकावू लागली होती.

ठरवून ओळख करून घेतली होती दूरचित्रवाणीच्या खिडकीशी. बाहेरचे वेगळे , माहीत नसलेले जग बिनधास्त दिवाणखान्यात आणले ह्या खिडकीने. बातम्या, मालिका, जाहिराती, इ मधून बघू लागलो मोहात पाडणारे नवीन जग. सगळं कसं नवीन, चकचकीत, सुंदर, हिरवेगार, मखमाली, गोंडस जग होते त्या खिडकी पलीकडचे. त्या सुरेख जगापुढे मग आमचे आजूबाजूचे रोजचेच राखाडी जग अगदी जीर्ण आणि रसहीन वाटू लागले. आई असावी तर जाहिरातीतल्या आई सारखी, मुले असावीत तर मालिकांमधल्या मुलांसारखी, पालक असावे तर सिनेमात दाखवतात तसे आधुनिक, भाऊ असावा तर हिरो सारखा, बायको असावी तर सिनेमातल्या नायिकेसारखी, बहीण तर अगदी गात गात राखी बांधणारी आणि काहीही न मागणारी असावी. त्या सिनेमा, मालिकांसारखे आपले घर सतत आवरलेले असावे, घरात उंची कपडे घालून बसावे, अशा काही अवास्तव कल्पनांना आमच्या घरात आणून सोडले होते त्या खिडकीने. संध्याकाळी सगळं घर एकत्र जमायचं, खिडकी समोर... एकत्र तरीही एकटे. आपापल्या नजरेने खिडकीकडे बघत. बाकी काही नाही पण आमच्या गप्पांचे विषय बदलवले ह्या खिडकीने.

कालांतराने अंगावर अक्षरशः आदळली ती मोहजालाची खिडकी.. वेड लावणारी. आधी उत्सुकता म्हणून नंतर गरज म्हणून आणि आता व्यसन म्हणून अडकून पडलो आहेत त्या बंद खिडकीपुढे. बंदच की, जेव्हा जे जसे हवे ते तेवढेच दाखवते. दूर दूर पर्यंत पाहता येते पण दूरचे दिसणे मात्र कमी करते. सगळं लक्षात असत तिच्या . काहीही विचारा उत्तर तयार, जबरदस्त स्मरणशक्ती आपल्या बुद्धीला मात्र गंज चढतो की काय भीती निर्माण करते. ही जवळ असली की दुसरे कोणी कोणीही नको. गरजच काय मग माणसाला माणसाची. एकदा ह्या खिडकीत डोकं अडकवल की वर्तमानपत्र, पुस्तक, वाचनालय, निसर्ग, जिवंत माणसं कशाचीही गरज नाही. सगळे खिडकीतच भेटतात. जन्मापासून मारणापर्यंतचा प्रवास तिथूनच एकमेकांना दाखवतात. अगदी सणवार, वाढदिवस सुद्धा खिडकीतच साजरे होतात. फक्त गप्पा तेवढ्या कायमच्या हिरावून घेतल्या तिने. ह्या खिडकीचे एक बरे असते तिथल्यातीथे कार्यालयाचे काम, निसर्ग, नातेवाईक, करमणूक, इ सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी. कदाचित... भविष्यात... मरणही.

आणि आयुष्याची खिडकी. खिडकीतच बसून खिडकीतच बघायचे, खिडकीच अनुभवायची आणि सगळे अनुभव परत खिडकीबरोबरच वाटून घ्यायचे. रडायचे, हसायचे, जिंकायचे, हारायचे, चिडवायचे, चिडवून घ्यायचे, प्रेमात पडायचे, विरहात झुरायचे, पुस्तकं वाचता वाचता कधी आयुष्य वाचायचे, नाचायचे, गायचे, बागडायचे, खेळायचे, थंडीत कुडकुडायचे, पावसात भिजवायचे, वाऱ्यावर डोलायचे, उंच उडायचे आणि कधी कधी धपकन आपटायचे.... काहीही होवो पण ह्या खिडकीतच रमायचे.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Sunday, May 10, 2020

मातृदिन ..

मातृदिन ..

एकच असतो का ?? ज्या दिवशी आपण कोणाला 'आई' चा दर्जा देतो, किंवा आपल्याला तो दर्जा प्राप्त होतो तो दिवसही मातृदिनच की. ज्या दिवशी निसर्ग, आपली पृथ्वी आपल्याला आवडू लागते तो दिवस, मातृभूमी बद्दल आतून प्रेम आणि अभिमान वाटू लागतो तो दिवस, मातृभाषेबद्दल मनापासून आदर वाटू लागतो तो दिवस..... असे कितीतरी मातृदिन आयुष्यात येत असतात. मुळात 'मातृत्व' ही संकल्पना एका नात्या पुरती मर्यादित कधीच नव्हती. त्याची व्याप्ती विचारांत, कल्पनेत आणि आवाक्यात येणार नाही इतकी व्यापक.

सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की जगाच्या पाठीवर कुठेही जा, मातृत्वाबद्दलचा विचार एकच. आदर फक्त आदर. असे नाही होत की अमुक देशात मातेला इतके वाईट वागवले जाते, अशी उदाहरणे नक्कीच आहेत, पण ती सगळ्याच देशात थोड्याफार फरकाने अपवादात्मकरीत्या सापडतात. मातृभूमी, मातृभाषा, पृथ्वीमाता म्हणजेच निसर्ग आणि जननी सगळ्यांच्याच बाबतीत कधी न कधी चुकणारी लेकरे सगळ्याच युगात आणि सर्वच देशांत जन्मली. सर्व जगात, सर्व काळात, सर्व देशात, सर्व युगात वाईट वागणारे मातृत्व पण होतेच की. तरीही कधीही मातृत्व आणि चूक/वाईट/दुष्ट ह्यांची सांगड घालायला मन तयार होत नाही. उदात्त, उत्तम, सुंदर, पवित्र ते मातृत्व हा विचार सर्व पिढ्यांत सगळ्याच देशांत स्वीकारला गेला आहे.

जसे भूमी, भाषा आणि निसर्गात मातृत्व शोधले जाते तसेच कितीतरी नात्यांत पण ते परावर्तित होताना भासते. एखादी मावशी, एखादी काकू, बहीण, मैत्रीण, कोणी शेजारी, ओळखीचे आणि कधी कधी अगदी अल्पकाळ निसटत्या ओळखीचे अनोळखी. चोचीत दाणा भरवणारी पाखरे, पिल्लाना सुरक्षित ठिकाणी तोंडात पकडून नेणारी मांजरे, जन्मल्या जन्मल्या लाथ मारून स्वतःच्याच पोटच्या पिल्लाला उठवणारे प्राणी, जन्मतः पिल्लाना किनाऱ्यावर सोडून जाणारे कासव, प्रत्येकाची मातृत्वाची संकल्पना आणि पद्धत वेगळी. हेतू मात्र एकच, पिल्लांना सुसज्ज करणे, समर्थ करणे.

आपल्या समाजात अजून एक मातृत्व आहे. देवी-देवतांत दिसणारे, जाणवणारे मातृत्व. देवी तर देवी पण देवात सुद्धा माऊली दिसू शकते इतकी अध्यात्मिक मातृत्वाची ताकद. एक गोष्ट मात्र सगळीकडेच समान ती म्हणजे विश्वास. मातृभू, मातृभाषा, माता आणि धरणीमाता कधीही विश्वासघात करणार नाहीत, कधीही एकटे सोडणार नाहीत, सदासर्वदा, सर्व प्रसंगात साथ देणार हा विश्वास. ह्या विश्वासाच्या जोरावर तर आयुष्याच्या सगळ्या लढाया लढल्या आणि जिंकल्या जातात. गम्मत म्हणजे कोणीही, कधीही, कितीही शक्तिशाली असो, मातृत्वासमोर मोठा होऊच शकत नाही. हा लहानपणाचा भावच बहुदा मातृत्वाची ओढ कायम ठेवतो. आनंदात, संकटात, दुःखात, अडचणीत, यशात कोणीतरी सहभागी होणारे आहे ही खात्रीच बहुदा मातृत्वाच्या संकल्पनेचे यश आहे. ती लहान असण्याची जाणीवच मातृत्वाच्या नुसत्या उच्चाराने डोळ्याच्या कडा ओलावत असणार.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 9, 2020

आलीया भोगासी असावे सादर

आलीया भोगासी
असावे सादर

काम करायचे काही वाटत नाही पण तेच काम जेव्हा परीक्षा पहाते तेव्हा मात्र 'मै तेरा खून पी जाऊंगी' वगैरे वाटायला लागते. काही कामे कशी बिनबोभाट होतात पण काही कामांचा आवाका आणि फाफटपसाराच इतका की जीव नको नको करतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर ही भांडी 'असून अडचण नसून खोळंबा'. तुम्ही कोणत्याही प्रहरी कोणतेही काम करा भांडे धुवायला निघाले नाही असे होतच नाही. केर काढला, कशाच्यातरी खाली केव्हातरी पडलेले भांडे सापडते. फर्निचर पुसा, कोणाची तरी वाटी, ताटली, कप,चमचा, पेला / ग्लास काही न काही मिळणारच. ओटा आवरला, भांडी निघणारच. स्वयंपाक हे तर भांड्यांचे माहेर घरच. 'तुम फोडणी दो, मै भांडी दुंगा' असच तो स्वयंपाक मनातल्या मनात नक्की म्हणत असणार. साधा चहा करा ना, चार (४) तरी भांडी निघणारच. नाश्त्याची वेगळी, दुपारचे जेवण, चारचा चहा, रात्रीचे जेवण. अष्टोप्रहर भांडी, ओटा, फडके, पाणी ,साबण आणि आपण. व्यवस्थित सगळी भांडी घासून, धुवून, पालथी घालून ओटा,गॅस पुसून आपण हाश्शहुश्श करत बाहेर जाण्याचा विचार करावा तर गॅस च्या मागून गरम भांडी ठेवायच्या तबकड्या, चिमटा/पकड किंवा एखादे छोटेसे भांडे आपल्याकडे बघून चक्क वाकुल्या दाखवत असते. त्याच्याशी लढाई उरकून एकदाचे बाहेर पडावे तर एखाद्या टेबलावर, चौपाईवर, फरशीवर कोणीतरी चुकून विसरलेला, कंटाळा आला म्हणून ठेवलेला किंवा नंतर उचलू म्हणून रेंगाळलेला एखादा कप, पाण्याचं भांड नाहीतर वाटी आपल्याचकडे अतिशय कुत्सित नजरेने बघत असते. असलं डोक्यात जात ना त्या भांड्याच ते बघणं. साला, पूर्वजन्मी किंवा सतयुगात कोणा ललनेने एखाद्या भांड्याची कु-चेष्टा केली होती की काय, जो ह्या कलियुगात तो शाप फेडायला जगातल्या तमाम महिलांच्या मागे ही भांडी हात धुवून लागली आहेत ?? बर ह्या भांड्यांचे कापड्यांसारखे नाही, ह्या लॉट मध्ये नाही लागले तर बादलीत ठेवले आणि पुढच्या वेळेस धुतले . बिलकुल चालणार नाही. तुम्ही त्यांना ठेवाच, रागाने इतकी कडक होतील की घासघासून हात झीजून जातील पण भांडी निघतील तर शपथ.

झाडू- पोछा चे बरे असते, एकदा तुम्ही घर झाडले म्हणजे झाडले. विषय संपला. घर पुसले म्हणजे पुसले. पण हा गुण पसाऱ्याच्या अंगी अजिबात नाही. सगळा पसारा आवरला असा गोड गैरसमज करून आपण दुसरीकडे मोर्चा वळवावा तर लगेच कुठूनतरी टॉवेल, चप्पल, बूट, एखादे भांडे, वर्तमानपत्र, पुस्तक, सुई-दोऱ्याचा डबा, कॅरम च्या सोंगट्या, पत्ते, हातरुमाल, मोजा,पेन, इ काहीही कुठूनही येऊन पडते. ठेवणाऱ्याचा कधीच तपास लागत नाही. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. शेवटी काय पुन्हा पसाऱ्यावरून हात फिरवणे आलेच. धुळीचेही काहीसे असेच. एका खोलीतील धूळ झटक-फटक करून, डेटॉल च्या पाण्याने पुसापूशी करून पुढे जावे तर त्या ओल्या पृष्ठभागावर धुळबाई परत ठाण मांडून बसलेल्याच. आरे खिडकी बंद करा रे , आरे दारे लावा रे, आरे पंखा मोठा करा रे .... 'ए बाई, भीक नको, पण कुत्र आवर, नको तुझी ती पुसापुशी, आम्ही धुळीत एकदम मजेत आहोत' असे म्हणायची वेळ घरच्यांवर येते.

एखादे काम एकदा करून सम्पवून टाकले की बरे वाटते. पण काही कामं चेंगटच असतात. एकदा भिजवा, मग धुवा, परत वाळत टाका, वाळलेले काढून आणा, आणलेले घडी घाला आणि सरतेशेवटी घडी घातलेले कपाटात ठेवा. केवढे ते लांबण. सर्वकाळ चालूच. सकाळी भिजवा ते रात्री कपाटात ठेवा पर्यंत दिवसभर ह्या कपड्याची टूमटुम चालूच. हँगर ला लावायचे वेगळे, सरळ वळत घालायचे वेगेळे, सावलीत वेगळे, उन्हात वेगळे, पांढरे वेगळे, रंगीत वेगळे, निळीत बुडवायचे वेगळे, टिनोपॉल मध्ये वेगळे, स्टार्च करायचे अजूनच वेगळे, नाजूक रेशमी हळूच पिळायचे, लोकरीचे बिलकुल नाही पिळायचे.. किती नाटकं ही.

न्हाणीघर/बाथरूम धुण्याचे अजूनच वेगळे तंत्र. लाल हारपीक, निळे हरपिक, फिनेल, बेसिन धुवायचा ब्रश, बाथरूम धुवायचा ब्रश, कमोडचा वेगळा ब्रश,खालची फरशी पुसायचे फडके, टाईल्स पुसायचे वेगळे, बेसिन चा प्लॅटफॉर्म पुसायचे अजून एक वेगळे.... आरे किती लक्षात ठेवायचे रे. एवढे करून झाले का?.... तर नाही. कोणीतरी म्हणतेच आज डेटॉल नाही टाकले का ? बाथरूम फ्रेशनर सम्पले आहेत का ? डांबराच्या गोळ्यांचा जरा जास्तच वास येतोय,इ. 'बच्चे की जान लोगे क्या?'

आमची आई नेहमी म्हणायची 'हे स्वयंपाकघर सदा व्यायलेलेच असते'. आमचे बाबा समाजकारणात/राजकारणात असल्याने घरी जाणे येणे खूप, त्यामुळे ते स्वाभाविकच होते. पण सध्या तर सगळे आपापल्या घरात स्थानबद्ध आहेत. कोणी कोणाकडे जाऊही शकत नाही. तसेही शहरात विशेष जाणे येणे नसतेच. पण तरीही सध्या ह्या स्वयंपाक घराने नुसता उत आणला आहे. चहा, नाष्टा, मिल्कशेक, लस्सी, दुपारचे जेवण, काहीतरी गोडाचे, चारचा चहा, काहीतरी तोंडात टाकायला चमचमीत वगैरे, रात्रीचे जेवण, इ इ... त्यात आंब्याचा हंगाम, आमरस, आम्रखंड, पन्ह, तात्पुरते लोणचे, गोजे, कैरीची चटणी संपतच नाही यादी. ह्यातून सुटका व्हावी तेवढ्यात कोणीतरी समाजमाध्यमांवर सूप, केक, चीज-चिली टोस्ट, पास्ता पासून जूस , घरगुती वाइन पर्यंत काही न काही चिकटवतात. नेमके तेवढेच मुलांच्या पहाण्यात येते. त्यांच्या अंगात स्वयंपाकी संचारतो आणि ठरवलेला पदार्थ बनवून ते ऐटीत बाहेर पडतात. कौतुकाने स्वयंपाकघरात डोकवावे तर ते अक्षरशः व्यायलेले असते.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, May 8, 2020

गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ

गाढवाचा गोंधळ
व लाथांचा सुकाळ

म्हणजे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ घालवणे. ज्यांचे लॉक डाऊन मूळे नुकसान झाले आहे, ज्यांना प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्याप्रती सहानुभूती आहेच. पण त्याचबरोबर काही प्रश्न ही आहेतच. ज्याची उत्तरे कोणीच देत नाहीत. किंबहुना तसे प्रश्न विचारणे सुद्धा पाप समजले जाण्याचीच शक्यता अधिक.

पालघर मधली घटना अतिशय संतापजनक आणि हृदयद्रावक अशीच आहे परंतु सगळे मोह-माया-पाश सोडलेले संन्यासी अशा कोणत्या मोहापायी सरकारी आदेश झुगारून प्रवासास निघाले होते ? आप्तस्वकीयांच्या अंतिम दर्शनाचा मोह सर्वसामान्यांना होणे स्वाभाविकच पण साधू-संतांकडून ही अपेक्षा नाही.

तान्ही मुले,बायका, म्हातारे कोतारे, बाचकी-बोचकी घेऊन उन्हा-तान्हात ट्रक च्या टपावर बसून प्रवास करणारे मजूर पाहिले की अत्यंत दुःख होते परंतु एक प्रश्नही पडतो, ज्या अर्थी कुटुंब-कबिला बरोबर आहे त्याअर्थी त्या कुटुंबाची शहरात कुठेतरी पत्र्याची का होईना राहण्याची काहीतरी सोय नक्कीच आहे. आधार काढले असेल तर सरकारने खात्यात पैसे वर्ग केलेच असतील. शहरात सामाजिक संस्था, सरकारी संस्था खाण्यापिण्याची सोय करत आहेत. अशा परिस्थितीत अशी कोणती गोष्ट आहे की जिथे जाण्यासाठी आगीतून फुफाट्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा?? रेल्वे रुळावर रात्रीच्या गारठ्यात किडुकमिडुक निघण्याची शक्यता असतानाही ज्यांना इतकी गाढ झोप लागावी की रेल्वेच्या कर्णकर्कश्य शिट्टीचा आवाजही ऐकू येऊ नये. त्यांना एकत्र दहा (१०) बाय बारा (१२) च्या खोलीत राहणे किंवा तात्पुरती सरकारी निवास व्यवस्था किंवा ज्या कारखान्यात काम करत असतील त्या जागेत रहाणे असह्य व्हावे?? पायी पायी घरचा रस्ता जे शोधू शकतात त्यांना पालिका , महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांनी केलेली सोय शोधता येऊ नये ?? गावी काही जीव आपल्यावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी आपला जीव लाखमोलाचा आहे हे अघोरी मार्ग अवलंबण्याआधी लक्षात येऊ नये?? ह्या प्रश्नांची उत्तरं समाजाने, प्रशासनाने, माध्यमांनी शोधायची की 'का ग बाई रोड, (तर म्हणे) गावाची ओढ' म्हणून गप्प बसायचे ??

एरवी सभा, मोर्चा, मागण्या, बंद, वगैरे साठी ह्या आणि अशा मजुरांना पाचशे (५००) रुपये रोजाने ट्रकात भरून नेणारे परप्रांतीय असलेले परंतु आमच्या राज्यात येऊन चणे-फुटाणे विकताविकता करोडपती झालेले नेते आत्ता नेमके लपले आहेत तरी कोणत्या बिळात ?? का नाही ह्या मजुरांसाठी एरवी गळे काढणार्यांनी सध्यपरिप्स्थितीत त्यांची राहण्याची, खाण्याची किंवा प्रवासाची सोय केली??

ज्या भागात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी ह्यांच्यावर हल्ले झाले त्या घटनांचा नुसता निषेध न करता त्या भागाला किंवा त्या विशिष्ट समाजाला सील /बंद करून त्यांच्याशी व्यवहार आणि वैद्यकीय मदत किंवा पोलीस संरक्षण का नाही नाकारले गेले?? का नाही त्यांच्या नेत्यांना माध्यमांनी उभे आडवे कापून काढले ?? का नाही त्या भागाचा किंवा समाजाचा बहिष्कार केला गेला ?? मालेगावात आज कोरोना बळींची संख्या वाढताना दाखवताना का नाही सुरवातीला त्यांनी झुगारून लावलेली बंधने चर्चिली जात ?? का तिथल्या नेत्यांनी सरकारी आदेशाचे पालन करायला सांगणाऱ्या पोलीस कर्मचार्याची केलेली बदली लोकांसमोर आणली जात?? उलट कितीही चुकलात तरी त्यांच्या सणासाठी पहाटे पहाटे दुकाने उघडण्याचा आदेश दिला जातो, ज्याचा कोणीही साधा निषेध करतानाही दिसत नाही.

मागास, अशिक्षित, परप्रांतीय आणि अल्पसंख्यांक विशिष्ट समाज हे कधी चुकूच शकत नाहीत. त्यांना उर्वरित समाजाने फक्त आणि फक्त सहानुभूतीच दाखवायची असा काहीसा कल हल्ली झालेला आहे. कधीच डोळे उघडणार नाही का आपण ?? कधीही योग्य-अयोग्य समजून घेणार नाही का ?? प्रत्येक प्रसंगावर फक्त आणि फक्त डोळ्यातून अश्रू वहायचे, सामाजिक माध्यमांवर चुटपूटायचे, सभा-सम्मेलनातून हळहळायचे, वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने गरळ ओकायची, सरकार आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडायची आणि मागच्या पानावरुन पुढे चालू ठेवायचे पण व्यावहारिक निर्णय मात्र घ्यायचे नाहीत असेच काहीसे ठरवले आहे का आपण ??

जे मजूर महानगरांच्या पुलाखाली किंवा झोपडपट्टीत जन्माला आले त्यांचेही हे आणि असेच हाल आहेत. त्यांनी कोणत्या गावाला जायचे ?? जे निम्नमध्यम वर्गीय आहेत, जे सरकारी मदतीच्या निकषांमध्ये बसत नाहीत, जे चाळीच्या एका खोलीत एका पेक्षा जास्त कुटुंब रहातात, ज्यांची कमाई ज्या त्या महिन्याला पण पुरत नाही, आता तर कमाई पण बंद, जे छोटे उद्योजक आहेत, उद्योगधंदे तर बंद पण जबाबदाऱ्या तर पूर्ण कराव्याच लागतात, कमाई नाही पण देणेदारी काही चुकत नाही , त्यांच्या घरात पण कोरोनाने शिरकाव केला असेल, कोणा आप्तस्वकीयाचा बळी सुद्धा घेतला असेल .... त्यांनी कुठे जायचे ? काय करायचे ? सुसंस्कारित व सहनशील असल्याने कोणाच्या अंगावर धावून पण जाणार नाहीत, मग त्यांनी राग/ द्वेष/ असहाय्यता कोणावर आणि कशी व्यक्त करायची ?? की महामारी चा मारा संपल्यावर समाज, सरकार आणि माध्यमे त्यांचा सत्कार करणार आहेत??

प्रश्न आणि फक्त प्रश्न ... हरवलेल्या, कधीही न मिळणाऱ्या उत्तरांच्या शोधात.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

(ता.क. ज्यांना तुटून पडायचे असेल त्यांनी आधी योग्य उत्तरे शोधावीत. नंतर लाखोली वाहिलीत तरी चालेल.)

Wednesday, May 6, 2020

सरस्वती कॉलनी वॉर्ड न.७

सरस्वती कॉलनी
वॉर्ड न.७

चौदा (१४) बंगल्यांची छोटीशी कॉलनी. सरस्वती नाव असल्यामुळे की काय कॉलनी मध्ये मुलीच मुली होत्या. मुलगे अगदी नावालाच, एका हाताच्या बोटावर मोजले तरी बोटे उरावीत इतके कमी. मुलींच्या मात्र झुंडीच्या झुंडी, एक तुकडी लग्न होऊन बाहेर पडली की दुसरी फलटन तयार असायची. दादागिरी, विट्टी दांडू, सार्वजनिक गणपती ही मुलांची मक्तेदारी असलेले प्रांत पण मुलींच्या ताब्यात.

सार्वजनिक गणपती हा कॉलनी चा जिव्हाळ्याचा विषय. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे, गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी बनवणे, यादीबरहुकूम सामान आणणे, मंडप उभारून त्याची आरास करणे, घरी पताका बनवून चिकटवणे ते गणपती आणण्यापासून गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत नानाविध रंगारंग कार्यक्रम बसवून सादर करणे, विविध स्पर्धा घेणे, रोज वेगळा नैवेद्य एकेका घराच्या गळ्यात मारण्या पर्यंत सगळी कामे बिनबोभाट पद्धतशीरपणे मुलीच पार पाडत. बरेचदा कॉलनीतील मुलामुलींना ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातच आपल्या सुप्त कलागुणांची पहिल्यांदा ओळख होत असे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची (event management) तोंडओळख ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेच झाली. गणपतीबरोबरच माहेरवाशीण गौराई, जेष्ठा आणि कनिष्ठां, चे पण आगमन होत असे. गौरीची आरास आणि प्रत्येकाच्या दारासमोर काढलेली रांगोळी कुठल्याही कलादालनापेक्षा कमी नव्हती.

 महालक्षुम्यांसारखाच चैत्रगौरिला पण 'आरास' चा मान. आमच्या आईची आरास आणि रांगोळी कायमच जगावेगळी आणि उजवी असे. कधी अख्खे एअरपोर्ट तर कधी अगदी खराखुरा दिसणारा मोर आणि बाग... सगळे उद्योग घरातल्या घरात जी उपलब्ध साधने असतील त्यातूनच. टाकाऊ गोष्टींमधून साम्राज्य उभे करण्याची ताकद तिच्यात होती. कॉलनी मधल्या सगळ्या मुली तिच्याकडे कधी न कधी काही न काही शिकायला यायच्याच. त्यामुळे भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककृती, इ अनेक गोष्टींचा क्लास कॉलनी मध्ये कधी कोणाला लावावा लागलाच नाही.

मुलींचा कारभार असल्यामुळे गणपती इतकेच नवरात्रीला पण महत्व. रोज रात्री भोंडला होत असे. भोंडल्याची गाणी सगळ्यांना तोंडी पाठ. कधी,कोणी,कशी शिकवली हे मात्र एकाही मुलीला आठवत नसेल. मातृभाषा शिकावी तसे भोंडल्याची गाणी आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत असत. 'आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला' कानावर पडले की खाऊ ओळखण्याची चढाओढ सुरू होई. नऊ दिवस रोज एका घरचा खाऊ. तो सगळ्यांनी मिळून ओळखायचा. 'आपली मुलगी तिच्या मैत्रिणींना जाऊन सांगेन आणि खाऊ चे गुपित फोडेल' ह्या काळजीने घरातल्या-घरात सगळ्या आया गुपचूप खाऊ बनवून लपवून ठेवत असत. जो ओळखेल त्याला पहिला खाउचा मान. नवरात्रीत अजून एक गंमत असे. अष्टमीच्या दिवशी होणारे कुमारिका पूजन. घरोघरी लहान कुमारिकांना जेवायला बोलावले जाई. गोडाचे जेवण, फ्रॉक साठी कापड, बांगड्या, एक फळ, टीकली, गजरा, वगैरे भरपूर मालामाल केले जाई. शिवाय नऊ दिवसांच्या उपवासांमुळे रोज फराळाच्या नवीन नवीन पदार्थांच्या मेजवान्या म्हणजे सोनेपे सुहागा.

दिवाळीचा फराळ आणि खरेदीची मजा काही औरच. ज्याची खरेदी उरकेलं त्याच्या घरी खरेदी बाघण्यासाठी सगळी टोळधाड धडकत असे. फराळ बनवण्यासाठी 'महाराज' येत. एकाच्या कोणाच्या परसदारी मोठमोठी चुलाण पेटत, केवढाल्या त्या कढया, झारे. सकाळपासून भट्टी पेटे ते पार संध्याकाळपर्यन्त. इतके सगळे पदार्थ करून घेतले तरी काही खास पदार्थ घरच्या चवीचेच. चकली, अनारसा, करंजी चा तो 'घरगुती' चा हक्क. फराळाचे पदार्थ बनत असताना चव घेणे हा तर जन्मसिद्ध अधिकार होताच. तरी सुध्दा दिवाळीच्या तीन दिवसात एकमेकांच्या घरी फराळाला जाण्यात एक अवर्णनीय आनंद होता.

नुसते सणवाराला मजा करून गप्प बसतील तर मुली कसल्या. एखाद्या रविवारी टूम निघे, आज सगळ्यांनी एकत्र पोहे करायचे. सगळ्या मैत्रिणींनी आपापल्या घरातून मूठभर पोहे, दाणे, तेल, मिरच्या, मीठ, साखर, कांदे, इ सगळं समान थोडं थोडं करत जमा करायचं. एका कोणाच्या घरी नाहीतर अंगणात चक्क तीन दगडांची चूल पेटवून पोह्याचा फक्कड कार्यक्रम होत असे. काय चव त्या पोह्यांची. कधी कधी पोह्यांची जागा साबुदाण्याची खिचडी, पावभाजी पण घ्यायचे. पद्धत मात्र एकच... सगळ्यांनी सगळं सामान थोडं थोडं घेऊन यायचे. अंगत-पंगत ची पण एक वेगळीच मजा असते. प्रत्येकाने आपले ताट वाढून आणायचे. मराठे काकूंच्या ओट्यावर सगळे एकत्र जेवणार.मंद मंद वाहणाऱ्या गार वाऱ्याबरोबर एकमेकांच्या ताटातला एकेका घासाचा आनंद घेता घेता ती पंचपक्वान्न पोटाची, रसनेची आणि मनाची तृप्ती करत.

सगळं कसं खूप गोड आणि छान वातावरण आणि किती प्रचंड वळणदार मुली वगैरे वाटून घेऊ नका. युध्दावर निघावं तशा कॉलनीतून सगळ्या मुली सायकल घेऊन धाड-धाड निघत तेव्हा कुठल्या सैन्याच्या तुकडीपेक्षा कमी भासत नसत. हेच सैन्य रात्री गुपचूप कोणाच्या कैऱ्या तोड, कोणाचे पेरू पळव, कोणाच्या चिंचा लंपास कर असेही उद्योग करण्यात एकदम माहिर. सगळ्यांच्याच दारात जवळपास सगळीच झाडे होती. पण चोरीच्या मालाला जी चव लागे त्याची सर घरगुती मेव्याला कुठली. बाहेर खाणे, सिनेमा ह्या गोष्टीना आमच्या विश्वात कधीच स्थान नव्हते पण एकत्र अभ्यास कर, मेंदी लाव, एकत्र बागेत खाऊ घेऊन जा, आमच्या शेतावर डबे घेऊन जा, एकत्र सर्कस बघायला जा, श्रावणात केशव गोविंदाला बनात जा असे प्रकार मात्र खूप केले.

हळू हळू कॉलनीला बहुदा आमच्या द्वाडपणाचा कंटाळा आला. एक एक करत सगळ्या मुली सासुरवाशिणी झाल्या आणि लेकींची जागा नवीन आलेल्या सुनांनी घेतली.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, May 5, 2020

जगात भारी सख्खे शेजारी

जगात भारी
सख्खे शेजारी

भारत-पाकिस्तान नाहीत हो. पण नात जरास तसच आहे, एकाने चावावे आणि दुसर्याने धीराने घ्यावे. चवणार्याला कधी कोणी काही सांगत नाहीत. नको चावूस, हळू चव वगैरे वगैरे पण धीराने घेणाऱ्याला मात्र सदा संयमाचे धडे. आपलेच चावणारे दात आणि त्याची सख्खी शेजारीण धीरोदात्त जीभ.

धारदार आणि चावऱ्या दातांची मराठी भाषेला सुद्धा दहशत आहे. वाक्प्रचार आणि म्हणींचा विषय निघाल्यावर भाषेने पण चावऱ्या दातांच्या बाबतीत हात आखडते घेतले. 'आपलेच दात आणि आपलेच ओठ', 'दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत', 'दात खाणे', इ एका हाताच्या बोटांवर मोजून पण बोटे उरतील इतकेच वाक्प्रचार. जिभेचे तसे नाही. उदरभरणाच्या काळजीने जिभेने खाण्यास मदत करावी तर आरोप होतो 'जीभ खाये, पडजिभ वाट पाहे'. जिभेला पाय तरी आहेत का तरीही तिच्या मागे बोलतात 'जीभ चुरू चुरू चालते'. बोलणार्यांना जिभेच्या फटकाऱ्याने गारद करायचा विचार जरी तिच्या मनात आला तरी 'जिभेवर ताबा नाही' म्हणून हिणवले जाते. कडक पदार्थ तोडणार दात आणि आरोप मात्र जिभेवर 'जिभेला चांगलीच धार आहे'. नुसती पडून राहाते म्हणून म्हणायचे 'जिभेला काही हाडच नाही' सदानकदा लोळलेलीच. आला कंटाळा गेली जरा शेजारी पाजारी तर लगेचच 'जिभेला वळवळच फार' म्हणून कुजबुज सुरू. चांगली 'जीभ हासडावी' बोलणाऱ्याची असा विचार करते आणि 'उचलली जीभ लावली टाळ्याला'....  इतक्यात नाक जवळपास सुग्रास दरवळ असल्याची वर्दी देते मग 'सुटते जिभेला पाणी'. 'जिभल्या चाटत' हात कधी 'जिभेचे चोचले पुरवतात' ह्याची वाट पाहू लागते. हाताकडून येणाऱ्या आणि दातांच्या तावडीतून सुटलेल्या पदार्थांची मग जिभेवर चव कितीतरी वेळ रेंगाळत राहते. जिभेला स्वतःचाच कधी कधी खूप राग येतो. अंतसमयी जेव्हा 'जीभ बाहेर येते', जीव गुदमरतो तिचा.

पण खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे , सगळ्या अवयवांचे डॉक्टर आहेत, जिभेचे कधी कुठे दिसत नाहीत, जीभ दुखते असे कधी कोणी म्हणत नाही, माझ्या जिभेचे हल्ली फार वजन वाढले आहे अशीही कधी कोणाची तक्रार नसते, शिवाय जिभेच्या फटकाऱ्याने भले भले गारद होतात ते वेगळेच. इतक्या चांगल्या जिभेकडे कधी लक्षच जात नाही आपलं. त्याच्या उलट दातांची तऱ्हा. जन्मापासूनच जे हे दात त्रास द्यायला सुरुवात करतात ते बचळी पर्यंत. दात येताना त्रास, दात जातानाही त्रास. बर ह्यांच एकदा जाऊन समाधान होत नाही, दोनदोनदा जातात. येण्याच्या जाण्याच्या प्रवासात दात पुढे असणे पिन लाव, किडणे सिमेंट भर, पडणे नवीन दात लाव, दातांचा रंग काळवंडला किंवा पीळवंडला तकाकी देऊन उजळून घे, भरीस भर ती हिरडी मधेच आजारी पडणे. मधूनच टोपी घाल, पूल बांध असले प्रकार पण चालूच असतात. दिवसातून दोन वेळा ह्यांना घासा, त्याच्यासाठी मंजन, दातुन, गुळण्या करायची औषध , दातांच्या फटींची जळमटे काढायचे दोरे, लाकडी नाहीतर प्लास्टिक च्या काड्या किती हा जामानिमा. लहान मुलांच्या दातांचे डॉक्टर वेगळे, मोठ्यांचे वेगळे. त्यातही परत वैविध्य. किरकोळ आजार हा शब्दच नाही ह्या दातांच्या शब्दकोशात. एरवी किरकोळ आजारपणात कसे घरगुती औषध, मेडिकल दुकान किंवा फार फार तर डॉक्टरांना फोन करून वेळ निभावता येते. इथे तसा काही पर्यायच नाही. जबडा 'आ' वासून छळवाद सहन करण्याला पर्याय नाही. हल्ली माझा थोडा थोडा दात दुखतो किंवा दात दुखी पहिल्या टप्प्यावर आहे असे कधीही ऐकायला येत नाही. कायम शेवटचेच टोक 'भयंकर, प्रचंड, अतिप्रचंड दातदुखी'. 'मरणप्राय वेदना' मारताना पण होत नसतील, तो अनुभव फक्त दातानेच द्यावा. तरीही संयमाचा सल्ला मात्र जिभेलाच.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

( म्हणी आणि वाक्प्रचारांचा पुरवठा : डॉ प्राची जावडेकर आणि मंजुषा अमीन)

Monday, May 4, 2020

मुलगी शिकली प्रगती झाली ..

मुलगी शिकली
प्रगती झाली ..

हल्ली सगळ्याच व्यवसायांच्या सर्वच क्षेत्रात विशेषज्ञ असतात. प्रत्येक अवयवांसाठी वेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या करप्रणालीसाठी त्या विषयांचे तज्ञ लेखापाल तसेच प्रत्येक वेगळ्या भांडणासाठी वेगळे न्यायालय आणि वेगळा वकील. असे जरी असले तरी बरेचदा भलत्याच विषयावर सल्ला मागायला येणाऱ्यांची वकिली क्षेत्रात तरी वानवा नाही. कुटुंब खटल्यांमध्ये माझे काम नसतानाही बरेचदा कोणाच्यातरी ओळखीतून लोक शोधत येतात आणि एक एक महाभयंकर गोष्टी आणि अनुभूव उलगडले जातात.

एका मुलीने इच्छे विरुद्ध लग्नाला होकार दिला. लग्न झाले, दिवस राहिले, 'मी मूल सांभाळणार नाही, तुला हवे असेल तर त्याचे सगळे तूच करायचे' सांगून मोकळी, पालकांच्या मदतीने त्याने ते शिवधनुष्य पेलले पण एक दिवस त्याला कळाले की ती ऑफिस मधून परस्पर तिच्या पूर्वाश्रमीच्या मित्राला भेटायला जाते. त्याच्याबरोबर ऑफिस चे काम आहे सांगून अनेक दिवस फिरायला जाते... काय करावे त्या मुलाने ?? पदरी छोटा मुलगा आणि बायकोची ही तऱ्हा.

दुसऱ्या एका खटल्यात लग्न चांगले गाजत वाजत झाले. देव-देवी-हनिमून झाला. मुलगा परत ऑफिक मध्ये जाऊ लागला. एक दिवस घरी येऊन बघतो तर मुलगी पैसे आणि दागिने घेऊन लंपास. आधीचे काही प्रकरण होते म्हणे.

बघण्याचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर घराची म्हणजे आई-वडील आणि अविवाहित बहिणीची जबाबदारी आहे हे आधीच सांगितले. तेव्हा सर्व मान्य करून होकार आला. जसे लग्न झाले मुलीचे रूप पालटले. आई-वडील-बहीण ह्यांना भेटायचे नाही, त्यांच्या घरी जायचे नाही, त्यांना आपल्या घरी बोलवायचे नाही, त्यांना साधा फोन पण करायचा नाही की त्यांनीही आपल्याला फोन करता कामा नये.

नात्यातून स्थळ आलं, मुलाचे काका आणि मुलीचे वडील ओळखीचे. उंची, कुळ, घराण सगळं चांगले जुळले, लग्न ठरले. मुलीला स्वयंपाक, घरकामात काही गती नव्हती, नोकरी कर म्हणावे तर तिथेही सगळा उत्साहच. आल्यापासून एकच भुणभुण 'इथेच वेगळे राहू नाहीतरी माझ्या माहेरी जाऊ'. शेवटी लेकरांना उचलले आणि निघून गेली. तीन (३)/ चार (४) वर्ष वाट पाहिली, नांदायला यायला दावा दाखल केला, न्यायालयाच्या चकरा मारून मारून दमला. शेवटी मुलांच्या ओढीने गेला तो पण तिच्या मागे.

ही सर्व बघून, ठरवून, रीतसर चहा-पोहे कार्यक्रम करून ठरलेली लग्न. सगळ्या मुली चांगल्या शिकलेल्या. हल्ली हे चित्र कुटुंब न्यायालयात सर्रास बघायला मिळते. मूलाकडचे एकवेळ तडजोडीला तयार होतील पण मुलगी आणि तिची आई बिलकुल तयार होणार नाहीत. मुलाकडून मुलगा आणि त्याचा वकील लढत असतो तर मुलीकडून मुलगी, तिची आई आणि मध्ये बोलू दिले तर तिचा वकील. मुलाचे आरोप हे त्या दोघांसंदर्भात असतात, मुलीचे तसे नसते. एकतर सगळे आरोप मुलीची आई ठरवणार, ठरवताना मुलीचे अनुभव अधिक त्या बाईंच्या आयुष्यात त्यांना भोगावा लागलेला त्रास आणि इकडून तिकडून ऐकलेल्या सुरस कहाण्या असे संमिश्र प्रकरण असते. मागण्या तरी काय ? आमची मुलगी शिकली ती पोळ्या करणार नाही, सारखे सारखे पाहुणे नको, रात्री पार्टी ला जाऊ द्यावे लागेल, सुट्टीच्या दिवशी बाहेर नेले पाहिजे, महिन्यातून दोनदा माहेरी जाऊ दिले पाहिजे, तिचा पगार हा फक्त तिचाच असेल त्यातून ती घरात काहीही देणार नाही,दिवाळी व्यतिरीक्त ती सासरी येणार नाही, सासू सासऱ्यांबरोबर एकत्र राहणार नाही, इ.

असे अजिबात नाही की मुलींवर अन्याय होतच नाहीत किंवा खरे ,प्रामाणिक खटले नसतातच. पण ह्या अशा नाटकी खटल्यांचे प्रकार हल्ली फार वाढले आहेत. केवळ आमची मुलगी कमावते, तिला कोणाची गरज नाही, ती तिच्या पायावर उभी राहू शकते हा फाजील विश्वास. कमावण्याचा आणि सहजीवनाचा सम्बन्धच काय?? लग्न करून पायावर नाही का उभे राहता येत ?? वरील सर्व उदाहरणांमध्ये सगळ्या मुलींना मुले झाली आहेत. मग मूल होईपर्यंत तुम्हाला अंदाज येत नाही का सासरच्या लोकांचा ?? की मूल झाल्यावर गरज सम्पून जाते सहजीवनाची??

वरील सर्व प्रकरणांमध्ये तर आपण काही करू शकत नाही. पण आपली मुलगी तिच्या सासरी असे वागणार नाही ह्याची जरी प्रत्येक आईने काळजी घेतली तर भविष्यात आपल्या घरी येणारी सून आपल्यावर ही वेळ आणणार नाही.

कळावे, लोभ असावा.

-  ॲड. स्वाती आवटी दीक्षित

मेरा भारत महान !!

मेरा भारत महान !!

"जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा ।"
इथे 'सोनेकीं चिडीया' ही उपमा वेगळ्या अर्थाने जरी वापरली गेली असली तरी सध्या सोन्याच्या नाहीत पण खरोखरच बाहेर चिमण्यांचेच राज्य आहे , मनुष्य घरात अडकून पडल्याने पृथ्वी, प्राणी आणि पक्षी सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतला. नाण्याला तीन (३) बाजू असतात हे कोरोनाने मनोमन पटवून दिले. पहिली आपली बाजू , खूप आपली ... अगदी वैयक्तिक आणि खाजगी. सध्या आपण स्वतःच्या , स्वतःच्या परिवाराच्या, संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या अधिक जवळ आलो आहोत असे नाही वाटत ? दुसरी निसर्गाची बाजू. मोकळा श्वास नव्याने घेणारी धरा आणि तिची लेकरे. स्वच्छ झालेले नदी-नाले-ओहोळ-तलाव, मुक्त संचार करणारे पाळीव आणि जंगली प्राणी, सकाळी चिवचिवाट करून उठवणारे आणि विजेचे खांब किंवा तारांऐवजी रस्त्याच्या मध्यभागी शाळा भरवणारे पक्षी आणि प्रदूषणमुक्त झालेली शुद्ध हवा. खूप महत्त्वाची अशी तिसरी बाजू , अभिमानाची आणि प्रतिष्ठेची 'आपले प्रधानमंत्री आणि पर्यायाने आपल्या देशाला मिळत असलेला इतर देशांचा सन्मान आणि विश्वास'.

आपल्या देशात महामारी च्या लढाईत 'वेळेत आणि अचूक' निर्णय घेतले गेले त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे फार नुकसान झाले नाही शिवाय परिस्थिती नियंत्रणात ठेवणे तुलनेने सोप्पे गेले. मान्य ... सगळे श्रेय भारताच्या नेतृत्वाला देणे आणि त्यांचा सन्मान करणे पण मान्य. त्याचबरोबर जसे अतुल म्हणतो, आपले संस्कार, आपली संस्कृती आणि बचत करण्याची पिढ्यानपिढ्या असलेली सवय ही सुद्धा कारणे आहेतच की. नेमके काय बदल झाले गेल्या दीड महिन्यात? एकतर नागरिकांनी घरातच थांबावे म्हणजेच कुटुंबाबरोबर उत्तम प्रकारे वेळ घालवावा, दुसरे कामावर जाऊ नये पर्यायाने उत्पन्न बंद. सर्व जगात ह्या दोनच सूचना तर दिल्या गेल्या होत्या. मग भारताने वेगळे असे काय केले? अमेरिकेचेच उदाहरण घेऊयात. घरात बसणे, सतत फक्त कुटुंबाबरोबर वेळ घालवणे वैयक्तिक मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या बहुसंख्य अमेरिकन नागरिकांना कठीण जाऊ लागले आणि नागरिक लॉक डाऊन च्या विरोधात रस्त्यावर उतरले. उलटपक्षी भारतीय मानसिकता ही कुटुंबवत्सल विचारधारेची असल्याने आणि सांगितले गेलेले ऐकण्याची आणि आचरणात आणण्याची सवय आणि तयारी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. दुसरा एक महत्वाचा विषय होता आर्थिक अडचणींचा. भारतीय संस्कार असे सांगतो की 'जो एकटा कमावतो, एकटाच खातो, तो चोर असतो'. अशा पद्धतीच्या शिकवणीमुळे साहजिकच भारतीय मनाला उत्पन्नाचा एक हिस्सा राखून ठेवण्याची सवय लागलेली आहे. ह्याच शिल्लक पुंजीने कठीण काळात साथ दिली. जेव्हा की अमेरिकेत मात्र दर पंधरा दिवसांनी पगार होत असल्याने, व्यक्तिसापेक्ष अमेरिकन नागरिक स्वतःवर आणि स्वतःच्या इच्छेनुसार वेळोवेळी सगळे पैसे सम्पवून टाकत होते. वेळप्रसंगी वापरता येईल अशी बचत फार कमी प्रमाणात उपलब्ध होती. त्याचाच परिणाम स्वरूप लॉक डाऊन ला विरोध होऊ लागला. अध्यात्माचे अनुष्ठान असलेले भारतीय लोक मुळातच सहनशील. धर्म संस्कार , एकीचे बळ, कुटुंबाच्या प्रेमाची ताकद, निसर्गाचे पूजन, 'स्व' व्यतिरिक्त इतरांचा विचार करण्याचा संस्कार, बचतीचे महत्व आणि समाज मनाचा प्राधान्याने विचार ह्या वैशिष्ट्यांचा महामारीच्या लढाईत निश्चितच उपयोग झाला. पाश्चात्य संस्कृतीत 'मी आणि माझे' अश्या विचारप्रवाहात वाढलेल्या विज्ञानवादी पिढीला भारतीय 'वसुधैव कुटुम्बकम्' संस्काराने मात दिली.

आमचे संस्कार, आमची योगासने, आमचा आयुर्वेद, आमच्या धर्मग्रंथांची शिकवण, आमचा नमस्कार, आमची कुटुंब पद्धती, विनाकारण खर्च न करता बचत करण्याची प्रवृत्ती हे सगळे खूप जुनाट आणि बुरसटलेले म्हणून मागे टाकून ज्या पाश्चात्य संस्कृतीच्या मृगजळामागे धावत होतो, आज त्या गुणांचीच कोरोनाच्या लढाईत वाहवा झाली. योग्य नेतृत्व, योग्य निर्णय, योग्य शिकवण, योग्य संस्कार आणि योग्य सवयींनी आज भारत देश जगाच्या नकाशावर उठून दिसतो आहे. कोरोनाच्या निमित्ताने उघडले गेलेले डोळे आणि आपल्या संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या जवळ गेलेले भारतीय मन पुन्हा विचलित तर होणार नाही ना ??

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

असतील शिते तर जमतील भुते

असतील शिते
तर जमतील भुते

पैसा, सोन, सत्ता आणि स्थावर भल्याभल्यांना मोहात टाकते. आई-वडिलांना मुलगा दिसत नाही, भावाला भाऊ समजत नाही, मित्राला मैत्रीची पोच रहात नाही की नातेवाईकांना नात्याची ऊब जाणवत नाही. एका गृहस्थांची गोष्ट कानावर आली. चार भावात सगळ्यात उनाड आणि कमी शिकलेला , घरातून हाकलून दिलेला मुलगा जिद्दीने उभा राहातो. व्यवसाय , घर, गाडी , ऑफिस, इ सुबत्ता मिळवतो आणि आईला पान्हा फुटतो, भावांना उमाळा येतो, मित्रांना मैत्री आठवते, नातेवाईकांचा तर पाऊस पडू लागतो. कधी नव्हे ते आपल्याला उभे ही न करणारे इतके जिवलग अचानक मिळाल्याने तो मुलगाही भारावून जातो आणि त्या बेगडी प्रेमाच्या महापुरात वाहून जातो.

'मगरमच्छ के आंसू' चा विजय होतो. त्या मुलाला अक्षरशः पिळून घेतले जाते. कोणी म्हणते घर नाही घर दे, कोणी म्हणते दागिने घडवं, कोणी परदेशी फिरावं, कोणी गाडीचे हप्ते दे म्हणत तर कोणी कर्जदाराचे पैसे फेड सांगत. हळू हळू त्या घराला, घरातल्या लोकांना, स्वार्थी मित्रपरिवाराला आणि लोचट नातलगांना आयत्या मिळणाऱ्या सुखसोयींची इतकी सवय होते की ते आपसातच त्या मुलाच्या हक्कासाठी लढू लागतात. प्रत्येकाचा हे दाखवण्याचा प्रयत्न की 'मीच कसा तुझ्या जवळचा, तुझे हित पाहणारा'. वास्तव मात्र अगदी ह्याच्या उलट. सगळं सुरळीत चालू होतं, व्यवस्थित लुटालूट सुरू होती आणि विनाशकाले विपरीत बुद्धी होऊन त्या कोंड्याळ्याने त्या मुलाच्या लग्नाचा घाट घातला आणि घात झाला.

सुमडीत चाललेली वाटमारी नवीन आलेल्या मुलीच्या लक्षात आली. तिची चूक हीच की तिच्या लक्षात आल्याचे तिने मुलाच्या आणि दरोडेखोरांच्या टोळीच्या लक्षात आणून दिले. झालं... आपसात लढणारे चोर एकत्र आले. महाटोळधाड आघाडीची स्थापना झाली. ती मुलगीच कशी चूक आहे हे वारंवार त्या मुलाच्या कानावर घातले जाऊ लागले. पुनःपुन्हा तिच्या चुकांचे खोटे दाखले दिले जाऊ लागले. तिच्यामुळे आम्ही कसे दुःखात आहोत अशी रडगाणी गायली जाऊ लागली. ती आणि तिचे नातलग कसे आमचा पाणउतारा करतात ह्याच्या खोट्या कथा रचल्या जाऊ लागल्या. मुलगा संसारात रमणार नाही ह्याची व्यवस्थित जाणीवपूर्वक काळजी घेतली जाऊ लागली. मुलाला लूट लूट लुटायचे पण त्याच्या कोणत्याही आनंदात समाधान मानायचे नाही की त्याच्या अडचणीत आधार द्यायचा नाही. वर 'त्या  मुलीला आवडत नाही ना बाबा, म्हणून आम्ही काळ-वेळेला तुझ्या पाठीशी उभे रहात नाही' च्या खोट्या सबबींचा पाढा आहेच. होता होता जमा-खर्चाचा ताळमेळ सुटला आणि एके दिवशी अचानक टोळीच्या दुर्दैवाने मुलाला सगळी संपत्ती सोडून द्यावी लागली. 'कफल्लक मुलाची ही अवस्था त्या मुलीमुळेच झाली' असा शेरा मारून ती टोळधाड आल्या पावली त्या मुलाला वाऱ्यावर सोडून निघून गेली. आज ते गृहस्थ आपली हारलेली लढाई लढतायेत, एकटे .... त्या मुलीच्या साक्षीने.

एखादा पक्ष असो, एखादे कुटुंब नाहीतर एखादी संस्था हे असे अनुभव थोड्याफार फरकाने अनेकजण घेत असतात. आपणही बरेचदा ह्या अनुभवांचे साक्षीदार असतो .. फक्त साक्षीदार. काहीही करू न शकण्याच्या अत्यंत असहाय्य परिस्थितीतले साक्षीदार. का लोक इतके स्वार्थी होत असतील ?? का लोक कोणाच्या इतके आहारी जात असतील?? का लोकांना खरं आणि खोट्यातला फरक समजत नसेल ?? का एखाद्याच्या आयुष्यावर टोकाचा परमार्थ हावी होत असेल ?? का त्या मुलाच्या अंधभक्तीची शिक्षा त्या मुलीने भोगायची ?? का कोणा एकालाही त्या मुलाला समजावून सांगावेसे वाटले नसेल ?? का ती मुलगी खोट्या आरोपांची शिकार व्हावी ?? का समाजाला मध्ये पडून खोटे बुरखे फाडावेसे वाटले नसतील ?? कोणतेच आणि कशाचेही उत्तर नाही. असे म्हणतात 'काळ सर्व प्रश्नांची उत्तरे देतो', 'काळासारखे औषध नाही' वगैरे वगैरे. तोपर्यंतचा प्रवास मात्र ह्या सर्व प्रश्नांसह करायचा... दोघांनी... एकेकट्याने.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 2, 2020

लोकल .. की ग्लोबल ??

लोकल ..
की ग्लोबल ??

गेले दीड महिने सगळा देश एकोप्याने आलेल्या संकटाचा सामना करतो आहे. स्वातंत्र्य संग्रामानंतर येवढा एकोपा पूर्वी अभावानेच अनुभवला असेल. शहर, गाव, सोसायट्यांमध्ये तू तू मै मै जाऊन कुटुंबाचा सलोखा आणि जिव्हाळ्याचा सगळे अनुभव घेत आहेत. कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार तर घरातला एक सदस्यच वाटू लागला आहे. 'मेडिकल दुकानदार' चे 'मेडिकल काका' झाले आहेत आणि भाजीवाल्याला पाहून 'तुझमे रब दिखता है...' वाटायला लागले आहे. हा सगळा बदल होत असताना, एक गोष्ट मात्र गायब आहे ...... 'आपले जिवाभावाचे ब्रँड्स'.

कुठे आहेत मॅक डोनाल्डस, पिझ्झा हट, डोमिनोझ, के इफ सी ने लावलेले लंघर ?? कुठे आहेत त्या विदेशी कम्पन्या ज्यांचे खिसे भरून आपले आणि पर्यायाने आपल्या देशाचे दिवाळे निघाले ?? देशासाठी मदत करण्याची वेळ आली तर टाटा , अंबानी, बिर्ला आणि मूर्तीच आले ?? मॉल मध्ये मोठ मोठे पोस्टर लावून खोटा मोठेपणा मिरवणारे ते सगळे विदेशी ब्रँड्स गेले तरी कुठे ?? किमान जेवढा व्यवसाय आमच्या देशात केलात त्या नफ्याच्या एखादं टक्का तरी खर्च करायचा होतात ह्या प्रसंगी. 'खायला आधी आणि कामाला कधीमधी' असे कसे चालेल ??

जर माझ्या वाईट प्रसंगात माझे कुटुंबच धावून येणार असेल तर माझ्या सुखात, आनंदात, यशात आणि सणवारात सामील होण्याचा पहिला मान त्यांचाच. 'स्वदेशी चळवळ' तशी जुनीच पण विस्मरणात गेलेली. कुंभाराच्या मातीच्या पणत्यांपेक्षा चिनी चमचमणारे दिवे भारी वाटू लागले, खादी-कॉटन च्या देशी कापड्यांपेक्षा 'मेड इन अमेरिका/इंग्लंड/कोरिया/जर्मनी' आपली शान वाढवू लागले. चप्पल , बूट, पावडर, साबण, ब्रश, पेस्ट पासून घरातल्या गादया, पडदे, सोफे,काटे-चमचे-ताटल्या ते गाडी, aap, दूरचित्रवाणी सगळाच पैसा बाहेरच्या कंपन्यांच्या खिशात जाऊ लागला. हातगाडी आणि छोट्या दुकानातले पोहे,उपमा,शीरा, बर्गर,पिझ्झा आणि पास्ता समोर अगदी गरीब भासू लागले. बऱ्याचशा विदेशी कंपन्यांनी काडी पासून माडी पर्यंत सगळ्या गोष्टी 'सर्व्हिस/सेवा' च्या नावाखाली आम्हाला घरपोच आणून आमच्या आळशीपणात आणि आमच्या देशाच्या गरिबीत भर घातली. त्या सेवेची भारी किंमत आपण आणि आपला देश मोजत होता. 'देरे हरी खाटल्यावरी' प्रवृत्तीने आमची घराजवळच्या, चौकातल्या, गावातल्या दुकानांशी नाळ तुटली आणि आम्ही 'ब्रँड/ सर्विस(सेवा)/ स्टेटस' च्या व्यसनात गुरफटत गेलो. आम्ही केलेल्या चूकांची लागण नकळत पुढच्या पिढीला झाली. आम्हाला निदान देशी-विदेशी मधला फरक तरी माहीत होता. पुढची पिढी 'ब्रँड्स' मधेच वाढली आणि त्यांना ते आपलेच, आपल्या मातीतलेच वाटायला लागले. आम्ही विसरूनच गेलो त्यांची आपल्या मातीशी ओळख करून द्यायला. विदेशी कंपन्यांना तेच तर हवे होते. अजूनही आम्ही कसे इंग्रजांनी आखून दिलेले शिक्षणच घेतो अशी नाके मुरडत असताना शिक्षणाबरोबरच त्या पिढीचे आयुष्यच आम्ही विदेशी करून टाकले. 'आमच्या देशाने आमच्यासाठी काय करावे' अशी तावातावाने चर्चा करत असताना 'मी माझ्या देशासाठी काय करतो' हा विचार मागे पडू लागला.

कोरोना महामारीने झणझणीत अंजन डोळ्यात घातले आहे. डोळे उघडण्याची आणि शहाणे होण्याची वेळ आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये, गावात, शहरात आपल्या जवळच्या दुकानातच रोजचे गरजेचे जिन्नस खरेदी करूयात. किमान ज्या गोष्टी माझ्या शहरात/ देशात तयार होतात त्या तरी मी भारतीय कंपनीच्याच वापरेल असा दृढ निश्चय करूयात. जिथे पर्यायच नाही तिथे शक्यतो माझ्या देशाच्या मित्र राष्ट्रांचाच मी विचार करेल असे मनोमन ठरवूयात. मी खरेदी करतो/ते म्हणजेच मी माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतो/ते आणि माझ्यावाटची देशसेवा करतो/ते असा विचार समाजमनात रुजवूयात. परदेशी वस्तू विकत घेणे आणि वापरणे हा माझ्या देशाशी देशद्रोह आहे हे पुढच्या पिढीला शिकवूयात. जे हातून निसटून गेले त्यातुन धडा शिकून पुढच्या पिढीचे तरी भविष्य सावरूयात. चला.... आपण आपल्या देशसेवेचा खारीचा वाटा उचलूयात. माझ्या देशाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे माझे परम कर्तव्य आहे आणि ते मी जबाबदारीने पार पाडणार अशी प्रतिज्ञा करूयात.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित