Friday, September 25, 2020

पडू आजारी मौज हीच वाटे भारी..

 पडू आजारी

मौज हीच वाटे भारी..

पूर्वी फारसे कधी कोणी आजारी पडत नसत आणि कधी कोणाला काही झालेच तर भेटायला येणारा मित्र परिवार, संत्री-सफरचंद-बिस्किटांची भेट मज्जाच असे सगळी. त्यामुळे आजारीपणाचे जाम कौतुक वाटे. मी तशी आडदांड भक्कम दगड प्रकारात मोडत असल्याने माझी आणि आजारपणाची फारशी गाठभेट पडत नसे. त्यात जरा जरी अगदीच किरकोळ नुसतं सर्दीपडस जरी झालं की लगेच मी दवंडी पिटायला मोकळी 'चव्हाण काकू, मला बर नाही'. आई ने ह्यावर टोमणा मारावा 'काय हीला आजारपणाचा सोस'.

चव्हाण काकूंनी जोशी काकू शाळेतून आल्या आल्या वर्दी द्यावी 'दीप्ती ची आई, स्वातीला बर नाही'... जोशी काकू 'असं का, पायावर पाणी घेऊन जाऊन येते' म्हणावं. 'काय हो काकू, स्वातीला बर नाही म्हणे' इति जोशी काकू. 'काही नाही, सर्दी झालीये, तुम्हाला चव्हाण काकू बोलल्या वाटते', आईचा त्रासिक स्वर. 'अग बाई, काय पण ही स्वाती आणि काय त्या चव्हाण काकू', जोशी काकू.

तेवढ्या वेळात कामवाली का आली नाही म्हणून बघायला गेलेल्या चव्हाण काकू माझ्या आजारपणाची वार्ता रजू काकूंच्या कानावर पोहोचवतात. 'रजुताई, कळाले का, स्वातीला बरे नाही'. 'नाही हो, पोरी काही बोलल्या नाहीत'.'राणी ए राणी ... पोरी त्यांच्याच नादात, त्यांना कुठले भान' इती रजू काकू.

 तेवढ्यात चव्हाण काकूंना सविता मागच्या अंगणात दिसते 'सवी,अंग तुझी मैत्रीण आजारी आहे ना,गेली नाहीस का भेटायला?' पुकारा होतो. 'नाही हो काकू, जाते संध्याकाळी', सवी.

हातातलं काम सोडून रजू काकू बाहेरच्या रस्त्याने मागे आमच्या घराच्या कंपाउंडपाशी येऊन 'काय ग पुष्पा, काही बोलली नाहीस, स्वातीला बर नाही ते'. पुष्पा माझी आई. 'अंग, नुसती सर्दी आहे, तू पण काय ग रजू. पण तुझ्या पर्यंत बातमी आली कशी?' 'काय ग बाई, पोरी पण ना' म्हणत रजूकाकूंनी आईला हसून टाळी द्यावी.

जरा वेळाने वरूनच आंबेकर काकूंनी विचारावे, 'पुष्पा, कसे आहे ग स्वातीचे आता? रजू सांगत होती, बर नाही म्हणून'. 'तू काय ऐकते त्या रजू चे, सर्दी आहे नुसती.' पुष्पा उर्फ आई.

रजू काकू गेल्यावर पाठक काकू विचारणार ,'रजू काकू आल्यासारख्या वाटल्या , काय काम काढलं सकाळी सकाळी?' 'अहो कसलं काय, ह्या स्वातीला काही काम नाही' म्हणत आईने सगळी गोष्ट पाठक काकुना सांगावी. 'काय ग बाई' म्हणत काकूंनी खूप हसावे. 

तेवढ्यात जोशी काकांच्या हातून काकू काहीतरी पाठवणार, तोंडाला चव येईल, स्वातीला द्या. मग संध्याकाळी सविता भेटायला येताना काहीतरी घेऊन येणार ' म्हंटल भेटायला जायचंय तर घेऊन जावं. खाइल तरी गरम गरम', सविता.

वर्षानूवर्षं हे सगळे संवाद असेच बर का, काहीही बदल नाही. 

 चव्हाण काकू माझं हक्काचं ठिकाण. संध्याकाळी काकू हातातले काम संपवून मीठ-मोहऱ्या घेऊन माझी दृश्य काढायला घरी येणार त्या त्यांच्या ओट्यावर गप्पा मारायला आलेल्या द्रविड काकूंना घेऊनच 'चल, आवटी काकूंच्या इथे बसू, स्वातीची दृष्ट काढायचीये, तिला बर नाही'. आल्या आल्या आईला ऑर्डर सोडणार 'मुन्ना ची आई , गॅस वर तवा/कढई ठेवा स्वातीची दृष्ट काढते'. कॉलनीतल्या आणि ओळखीतल्या सगळ्यांचा उद्धार करत न लागलेली दृष्ट उतरवली जायची. तव्यावर तडतड नाचत कडवट वास घरभर फिरवून ती दृष्ट माझ लाडक आजारपण बरोबर घेऊनच जायची.

ठाण्याला आल्या आल्या पहिला मुक्काम ओमशिव सोसायटीत. कौतुक करणाऱ्यांची इथेही काही कमी नाही. म्हात्रे काका यायचे, पेपर वाचत वाचता लहान अद्वैतला खेळवायचे आणि 'तुला बर नाही ना, जेवून घे औषध घे तोवर मी आहे बाळा जवळ' प्रेमळ ऑर्डर सोडायचे. कामवाल्या मावशींकडून आजारपणाचे कळाले की तेजल च्या आजी पहिल्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर यायच्या, लिफ्ट चे दार उघडे ठेवूनच 'बाळाला दे माझ्याकडे, मी घेऊन जाते, 2 कपडे घाल पिशवीत' म्हणून घाई घाई अद्वैत बाळाला घेऊन जायच्या. तो खालीच जेवेल सांगता सांगता मला जेवण औषध आणि विश्रांती घ्यायचा कडक दम भरून जायच्या.

खाली मुलं खेळताना दिसली की 'किशोर, दीक्षित आंटी ला बर नाही, बाबू ला संध्याकाळी खाली फिरवायला तुझ्या बहिणींना सांग' निरोप परस्पर दिला जायचा. संध्याकाळी गुप्ता आंटीच्यामुली अद्वैत ला घेऊन वर यायच्या त्याला फ्रेश करून दिले की आंटीनि दिलेला डबा देऊन 'खा लेना' अद्वैत हमारे घर पे खायेगा, उसके लिये सिम्पल खिचडी दीदी बना रही है!' म्हणून जे घेऊन जायच्या ते त्याचे खाली खेळणे, खाणे उरकून डोळे मिटायला लागलेकीच परत घेऊन यायच्या. दुसऱ्या दिवशी खाली गेले की मानकर काका-काकू , राव आंटी, अनु , सेठी आंटी, सोनिया सगळ्यांनी तब्येतीची चौकशी करावी.

ब्राह्मण सोसायटीत तर माधुरीने खूपच काळजी घ्यावी, मुली शाळेतून आल्या की 'आधी भरभर खा आणि बाळाला सांभाळायला जा, मावशीला बर नाही'. सांगून मुलींना माझ्याकडे पिटाळावे, येताना हातात काहीतरी वाटीभर पाठवणारच, तोंडाची चव गेली असेल, खाऊन घे च्या प्रेमळ आग्रहासह. इथे 'बाळ' आर्या साठी. अद्वैत दादा तोपर्यंत मोठा झाला होता. दारातूनच कानडे काकूंनी विचारावे 'काय ग, माधुरी म्हणाली तुला बर नाही'. 'काय तुम्हा आजकालच्या मुलींना म्हणावं, संध्याकाळी खाली चालायला जात जा, काही आजारपण येत नाही' असा सज्जड दम भरत 'स्वयंपाकवाल्या बाई आल्या होत्या ना, की काही करायचे आहे' अशी प्रेमळ चौकशी पण करून जायच्या. जोशी काकांना कुणकुण लागली की 'दीक्षित बाई, काय झालं? आजारी पडलात?' विचारत यायचे. 2 कप दूध पीत जा रोज असा सल्लाही बरोबर असायचाच.

संध्याकाळी ममताचा फोन यायचा 'काय ग, अद्वैत बोलला आत्ता, बर नाही म्हणून, फोन तर करायचास, काही पाठवलं असत, दुपारी जेवलीस का,औषध घेतले का,काकांकडे जाऊन आलीस का' चौकशीचा पाऊस पडायचा. (काका म्हणजे डॉक्टर काका) 'अद्वैत आता इथेच रोहन-रोहित बरोबर जेवेल, तुला काही पाठवायचे आहे का?' च्या प्रेमळ विचारपुसीनेच फोन बंद व्हायचा.

रहेजा मध्ये असताना डेंग्यूला माझा पत्ता सापडला. आई मावशी 15 दिवस राहून परत जाणार होत्या हे ज्योती कोटक ला माहीत होते. बरोबर आर्या शाळेतून यायच्या वेळेस तिने डबा घेऊन यावे. 'मुझे पता है ये आर्या का स्कुल से आने का टाइम है! आज आंटी भी जानेवाले थे तो आर्या के लिये नूडल्स बनाके लाई हू!' इतक्यात आर्या आलीच , तिला हातपाय धुवायला लावून डबा खाऊन घे सांगून 'स्वाती, कुछ भी हेल्प लगे तो फोन करना' चा मनमोकळा आग्रह करूनच ती घरी गेली.  ह्या दरम्यानच माझ्या आयुष्यात माझी लाईफ लाईन आली. माझ्या खूप छान दृष्ट लागाव्या अशा मैत्रिणी 'हेमा, मंजू, प्राची आणि शिल्पा'. शारीरिक ,मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबीक सगळ्या प्रकारची आजारपणं ह्या चौघीनी अक्षरशः झेलून धरली. एकाही प्रसंगात 'तुझे तू बघ' किंवा 'काय हीच नेहमीचंच' असा सूर नाही. कधी प्रेमळ समजूत तर कधी सज्जड दम भरत माझी गाडी कधी ट्रॅक वरून उतरू दिली नाही. 

काय नाते आहे माझे ह्या सगळ्यांशी ?? बर, मी काही खूप प्रेमळ, सहज फोन करून चौकशी करणारी किंवा आठवण आली म्हणून गप्पा मारायला जाणारी व्यक्ती नाही. तुरटी तरी जरा बरी इतकी मी तुरट. माझ्याच व्यापात मग्न, कोणाच्या वेळेला धावून जाइल, त्यांचेही प्रसंग साजरे करेल असे काही नाही. तरीही ह्या सगळ्यांनी माझ्यावर अथांग प्रेम केले. ह्यातील काही नावे त्यांच्या शेवटच्या प्रवासाला मार्गस्थ झाली आहेत पण जाण्यापूर्वी माझी अनुभवांची ओटी पुरेपूर भरूनच. कधी प्रसंग नाही आला किंवा अगत्याने त्यांच्या प्रेमाचा उल्लेख करावा असे न वाटल्याने असेल किंवा आपल्या जवळची लोकंही कधी जाऊ शकतील असा विचार मनाला शिवातच नसतो त्यामुळेही असेल बऱ्याच जणांशी बोलायचे राहूनच गेले. 

आहो, धन्यवाद म्हणायचे काय सुचवताय, हे सगळे माझी फक्त आजारपणातच काळजी घेतात. एरवी मला बुकलून काढण्याचा पुरेपूर हक्क आहे त्यांना. वर गेलेले देखील खाली येतील परत हक्काने रागवायला. असो.. हे सगळं आज आठवण्याचे कारण काल एक एका ओळीचा मेसेज पाठवला होता 'उद्या ऑफिसला येणार नाही, तब्येत बरी नाही'. सकाळीच वैद्य सरांचा फोन, 'राहुल ला पाठवतो आहे, आई ने डबा दिला आहे'. ह्या वैद्य काकू आणि कुटुंबीय म्हणजे मला लागलेली बम्पर लॉटरीच.

कळावे, लोभ असावा.

ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, September 22, 2020

भित्या पाठी, ब्राह्मराक्षस...

 भित्या पाठी

ब्राह्मराक्षस...


लहर दहलीज़ पर आई है जब से

समुंदर ख़ौफ़ खाने लग गया है- पूनम यादव


भीती ते भक्ती सगळ्याच भावना निव्वळ कल्पना.

जसा देव कोणी पहिला नाही तसे भूत तरी कुठे पाहिले आहे? जसे काहींना देवाचे अस्तित्व जाणवते, तसेच नानाविध भुते डोक्यावर बसलेली किंवा नाचलेली अनेकांनी अनुभवली मात्र नक्कीच असतील. मोह, माया, मत्सर, ईर्षा, महत्वाकांक्षा, आनंद, दुःख, राग, काम(कार्य:बोली भाषेत work),इ भुताची कितीतरी रूपे. कोणत्या रुपात ती तुमच्या मनाचा ताबा घेतील काही सांगता येत नाही. भूत कोणतेही असो, भीती त्याचा पाठलाग करत मागेमागे येतेच. 


बरेचदा प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे आपण वेळोवेळीं वेगवेगळ्या भावनांना व्यक्त होत असतो. त्यात खरेपणा किती आणि सवयीचा परिणाम किती समजून सुद्धा येत नाही. एखाद्याचे 'कर्तृत्व', 'यश' ऐकताना सहजच 'आरे व्वा, अभिनंदन' असे उद्गार सहजच निघून जातात. कदाचित त्यावेळी मन आक्रांदत असेल 'अरेरे, हे तर  मला मिळायला हवे होते' किंवा 'माझ्या प्रयत्नांना हे यश का नाही मिळाले', इ. ह्या व्यक्त होण्यात खरेपणा असेल. पण तसे होताना दिसत मात्र नाही. फक्त एखाद्याच्या दुःखात आनंदी होणारे मात्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी बघायला मिळतात.


अभिनय किंवा शास्त्रीय नृत्य शिकत असताना अगदी सुरवातीलाच एक पायरी हमखास ओलांडावी लागते, 'रस' चे प्रकार किती आणि कोणते? श्रृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, अद्भुत, वीभत्स, भयानक, शांत, वात्सल्य, भक्ती आणि भय रस. एकेका विद्यार्थ्याला एकेक प्रकार करून दाखवावा लागतोच लागतो. नशिबाचा भाग की निव्वळ योगायोग परंतु एखाद्या निडर मनोवृत्तीच्या व्यक्तीला 'भय रस' करून दाखवावा लागणे आणि तेही प्रत्येक वेळी... हा निव्वळ योगायोग की भविष्या बद्दल काही सूचक संकेत? एखादा प्रसंग व्यक्तीच्या मनात भीतीचे घर बांधतो आणि त्या निडर व्यक्तीच्या मनाचे बुरुज धाड धाड कोसळू लागतात.

इक ख़ौफ़ सा दरख़्तों पे तारी था रात-भर 

पत्ते लरज़ रहे थे हवा के बग़ैर भी - फ़ुज़ैल जाफ़री

आणि मग मनाची अशी काहीशी अवस्था लहानसहान प्रसंगात देखील  होऊ लागते. चवीला 'तुरट' असणारी ही भीती मग अधून मधून निमित्ता निमित्ताने डोके वर काढायला लागते.


भावनेलाही चव असू शकते ?? का नाही, आनंदाची-प्रेमाची चव गोड, दुःख कायमच कडू, ईर्षा बहुदा आंबट आणि खारटपणा राग किंवा द्वेषाच्या नशिबी असावा. सगळ्याच भावना त्या त्या वेळी जगून सोडून देता आल्या पाहिजे होत्या. त्यांच्या बरोबर आयुष्याचा प्रवास करू नये. म्हणजे प्रत्येकवेळी नव्या अनुभूतीची मजा नव्याने चाखता आली असती. पण असे होत नाही. एक विचार मांडणे, वाचणे, चर्चा करणे नेहमीच सोप्पे ... त्या प्रमाणे जगणे मात्र अशक्यप्राय. ह्यातूच 'कळत पण वळत नाही' ही म्हण जन्माला आली असावी.


आग कितनी ही ख़ौफ़नाक सही

उस की लपटों की उम्र थोड़ी है- वसीम बरेलवी

हे ही अगदी बरोबर... सुख कायमस्वरूपी मुक्कामी येत नाही तसे दुःखही नाही. आनंदाचे क्षण येतात आणि जातात. तसेच दुःखाचे, अडचणींचे, अपयशाचे आणि भीतीचेही जातीलच की. 'बदल' ही एकमेव गोष्ट 'चिरंतन' आहे. मग ह्या बदलांची सवय का होत नसावी? सगळं सगळं कळतं फक्त वळायची वेळ काही अजून येत नाही.


कळावे, लोभ असावा.


 ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, September 4, 2020

ग कोणीतरी येणार येणार ग , कोरोना घरी येणार येणार ग

 ग कोणीतरी येणार येणार ग

कोरोना घरी येणार येणार ग


येणार ?? बहुदा आला सुद्धा .... धडकी भरण्याइतका मनातून विचारात उतरला पण. 


आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ जवळ ४ महिन्यांनी मुंबई कोर्टात जाण्याचा योग आला. मास्क लावून तळमजला ते तिसरा मजला पळापळीत जाम दमछाक झाली पण काम करण्याची मज्जा काही औरच. जाता येताना ओळखीचे ट्राफिक, खड्डे, टॅक्सी आणि मधेच घुसणारे रिक्षावाले भेटले. ओला-उबेर मात्र पटलावर गैरहजर असाव्यात. आयुष्य पूर्वपदावर आल्याचा भास झाला.


परंतु घर जसजसे जवळ यायला लागले, कोर्टात बिनामास्क फिरणारे, मास्क खाली करून बोलणारे,इ सर्व चेहेऱ्यांनी मनात फेर धरून भीतीचा भोंडला खेळायला सुरवात केली. त्याक्षणी काम बाजूला ठेवून त्या लोकांना आपण का नाही हटकले, असा पश्चात्ताप मन खाऊ लागला. आणि अचानक आपल्या अंगाखांद्यावर कोरोनाची बाळे मनसोक्त बागडतायेत असे भास होऊ लागले.


घरी पोहोचल्यावर इमारतीच्या दारातच सुरक्षा रक्षकाने 'मॅडम, तुमचे सामान आले आहे' चा पुकारा केला. 'रेहेने दो, मेरे हाथ मे बोहोत कोरोना है, बादमे लेके जाती हूं'. आपण काय बोललो आहे हे त्याच्या चेहेऱ्यावर वाचल्यावर हळूच तिथून निसटले. घरात पाय , दारात पाय लेकीला ओरडून सांगितले 'खूप कोरोना आला आहे, पटकन गिझर चालू कर'. 'लांब रहा, लांब रहा .. कोरोना आला आहे भरपूर'. 'सामान UV लाईट मध्ये ठेव, कोरोना घरात फिरेल'... वेड्या व्यक्तीकडे पाहावे तशी नजर माझ्याकडे टाकून तिने पूर्णपणे दुर्लक्ष करून परत पुस्तकात डोके खुपसले.


कोरोनाच्या मुलाबाळांचा समूळ नायनाट करून झाल्यावर घशाला जाम कोरड पडल्याचा साक्षात्कार झाला पण 'कोरोना दातात असेल तर' विचाराने पाण्यावरची वासनाच उडवली. ब्रश, पेस्ट आणि दात ह्यांची लढाई संपवून पाण्याच्या पेल्याकडे आधाशा सारखे धावले आणि 'कोरोना घशात असेल तर' ... फटाफट मोठ्या गॅस वर पाणी उकळवले, घसा आणि नाकातले कोरोना मारण्यासाठी भरपूर वाफाऱ्याचा फवारा मारला आणि पाण्याकडे मोर्चा वळवला. पण पाणी पिताना कोरोनाची बाळे माझ्या पोटात घसरगुंडी खेळतायेत असे वाटू लागले,  जेवताना प्रत्येक घासाला दाताखाली खड्यांच्या ऐवजी कोरोना येऊ लागला. श्वास घेताना कोरोना पळत पळत धाव घेतोय असा भास होऊ लागला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कोरोना दिसू लागला. 


माझ्या अवस्थेवर देवघरातले आघाडी सरकार खोखो हसू लागले. हो, आमच्या देवघरात उत्तरेतील वैष्णवदेवी ते दक्षिणेतील बालाजी व्हाया महाराष्ट्रातील सर्व कुलदैवते, संत , महंत आनंदाने आणि एकोप्याने आघाडीचे राज्य चालवतात. त्यांच्याकडे श्रीयुत बाळासाहेब थोरातांसारखा नेता नसल्यामूळे असेल, 'आमच्यावर अन्याय झाला, आमच्याकडे दुर्लक्ष झाले, वगैरे' अशी काही तक्रार आमच्या कधी कानावर आली नाही. (माफ करा बाळासाहेब पण माझे आजोळ संगमनेरचे असल्याने तुम्हाला मामा बनवण्याचा मला जन्मतः हक्क आहे.)


'कोरोनाला तू बघितले आहेस?, कोरोना डोळ्यांनी दिसतो?' देवांचा प्रश्न. 'मग काय फक्त आभासी भीतीने येवढी धावाधाव करवलीस?'

'मग आमच्या बाबतीत तुमच्या पूर्वजांनी तरी दुसरे काय केले होते?' कोणी वाईट वागू नये, चांगलेच वागावे म्हणून 'देव बघतोय' चा धाक निर्माण केला. जसा तो धाक कमी झाला तशी वाईट प्रवृत्ती बळावली. आता त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले तर कोणी देवदूत पुन्हा जन्म घेईल आणि वाईट प्रवृत्तींचा नायनाट करेल अशी स्वप्न तुम्हाला पडू लागली. आता हेच बघ ना, सध्या जगात दोन (२) प्रकारचे लोक आहेत. 'काही होत नाही कोरोना'म्हणणारे आणि कोरोनाच्या भीतीने संपूर्ण काळजी घेणारे. काळजी घेणारे आस्तिक आहेत असे जरा वेळ मानुयात. ह्या लोकांमुळे समाजाचे आरोग्य थोडक्यात मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांमुळे अनारोग्य, गुन्हेगारी, इ दुष्टप्रवृत्तीना खतपाणी मिळते. मग कोणती प्रवृत्ती चांगली ?? विश्वास ठेवणारी आणि समाजाला सुदृढ करणारी की अविश्वासाने समाजात असंतोष पसरवणारी??..... उत्तर ज्याचे त्याचे. 


चला, कोरोनाला तेल लावायची वेळ झाली, आता थांबले पाहिजे.

माफ करा, 'डोक्याला' असे म्हणायचे होते.


कळावे, लोभ असावा


- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, August 8, 2020

सर सलामत... तो पगड़ी पचास

 सर सलामत...

तो पगड़ी पचास


"पहिल्या टप्प्यात दहावी (१०वी), बारावी (१२वी) चे वर्ग सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारांनी अंतिम निर्णय घ्यायचा आहे"- वर्तमानपत्र.


१०वी आणि १२वी ची मुलं काय गिनीपिग आहेत का?? शाळा सुरू केल्यावर न मरता किंवा मरण्याचे प्रमाण कमी असेल तर इतर मुलांचे पण बळी द्यायला हरकत नाही किंवा त्याबद्दल विचार करू वगैरे असा काही विचार आहे का शासनाचा?? असे ऐकले आहे की सध्या कोरोना महामारीच्या भीतीने मंत्रालय पूर्ण क्षमतेने काम करत नाही. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर तर शुकशुकाटच असतो. नेते जर जनतेच्या काळजीपोटी सावध पवित्र घेत असतील तर शाळकरी मुलांचा बळी देण्याची इतकी घाई का?? 


खरे तर मंत्रालय, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, न्यायव्यवस्था पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे नागरीक हवालदील झाले आहेत. सामान्य नागरिकांचे अनेकविध प्रश्न आणि समस्या अनुत्तरित राहून महत्वाचे विषय अडकून पडले आहेत. असे असतानाही केवळ सावधगिरीच्या उपाययोजना अंतर्गत वरील सर्व कार्यालयांसाठी नियम-नियमावली बनवली जाते. त्यात सरकारी नोकर आणि नागरिक सर्वांच्याच आरोग्याचा विचार केला जातो. मग तोच नियम आमच्या मुलांसाठी का नाही?? 


खरे तर शाळा दिवाळी पर्यंत सुरू झाल्याच नाहीत तरीही काहीही बिघडणार नाही. जो आणि जितका अभ्यासक्रम मुलांना शिकवला जातो तो केवळ तीन (३) महिन्यात पूर्ण शिकवून होऊ शकतो. पुण्यात SSY च्या शाळेत जाऊन खात्री करून घ्यावी हवे तर. एरवी इतर अभ्यासेतर उपक्रम, खेळ, सहल, नानावीध सुट्या ह्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो यंदा न देता शेवटचे तीन महिने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेता येऊ शकते आणि शैक्षणिक वर्ष वाचवले जाऊ शकते. खरे तर मुलांचे आरोग्य आणि जीवन त्यांच्या एका (१) शैक्षणिक वर्षापेक्षा नक्कीच जास्त महत्वाचे आहे.


*असे असताना दहावी(१०वी)-बारावी(१२वी)च्या मुलांचे बळी का?*


आधी मंत्रालय, सगळी शासकीय-निम शासकीय कार्यालये, न्यायालय, पोस्ट, इ सर्व नागरिकांना सेवा, सुविधा व न्याय देणाऱ्या व्यवस्था, दुकाने, व्यवसाय, व्यापार पूर्ण क्षमतेने सुरू करा. त्यातून जगलो वाचलो तर मुलांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता येईल.


कळावे, लोभ असावा.


- ॲड. स्वाती आवटी दीक्षित


#शिक्षणमंत्रालय #शिवसेना #भाजपा #राष्ट्रवादी #काँग्रेस

कोरोनाची लेखरं..

 कोरोनाची लेखरं..


1. मुलीची मैत्रीण अचानक भेटली, 'शाळा नाही तर मज्जा आहे ना?' विचारले तशी नाराज होऊन उत्तरली 'नाही ना काकू, पूर्वी बाबा ऑफिस ला जायचे तर आई आणि आम्ही भावंडं खूप मज्जा करायचो.आता बाबा सारखेच घरी, चार महिने झाले अम्ही हासलोच नाही'.


2. नेहमीच्या कारपेंटर चा फोन आला 'मै वापस आ गया हू, कोई काम हो तो बताना'. आणि मन विचारते झाले, 'लॉक डाऊन सुरू झाल्यावर साधारण पहिल्या चवदा (१४) पंधरा (१५) दिवसातच काम नाही हाल होतात म्हणत महाराष्ट्राच्या नावाने बोटे मोडत सरकारच्या आणि सोनू च्या मेहेरबानिवर फुकट गावी गेलेले लोक, चार (४) महिने हाताला काम नसताना परत येणाऱ्या गाडीचे तिकीट स्वतः काढून कसे परतले? ते ही दुष्ट महाराष्ट्रात??'


3. मोदी सर म्हणाले, लॉक डाऊन मध्ये कोणाला कामावरून काढू नका, त्यांना पगार न कापता पोहोचता करा. सगळ्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. एक दिवस मैत्रिणीचा फोन आला ' ती तुझ्याकडे काम करणारी मुलगी आहे ना, तिने आमच्या सोसायटी समोर भाजीची गाडी टाकली आहे. धो धो चालते. चिक्कार गर्दी असते तिच्याकडे. घर कामापेक्षा ह्याच्यात जास्त पैसे आहेत सांगत होती, आता हेच काम करेल म्हणाली' ... 'काय सांगतेस?, कालच खूप रडत होती, फार हाल आहेत म्हणाली म्हणून पुढच्या दोन (२) महिन्यांच्या पण पगार आगाऊ देऊन टाकला मी तिला'.


4.'आरे दादा, तू तुझ्या ड्रायव्हर ला काढून टाकलेस का?' 'नाही रे, अशावेळेस कोण काढेल रे, घरात एकटा कामावणारा तो, बरोब्बर एक (१) तारखेला सगळा पगार देतो त्याला. घरात थोडी काटकसर करतो पण कामवाल्यांचा पगार आधी द्यायचा असे आम्ही दोघांनी ठरवलं आहे.'

'आरे, पण त्याने माझ्या कुरिअर कंपनीशी एक(१) वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पूर्वीची नोकरी सोडली, असे सांगितले. आज त्याचा दुसरा पगार झाला'.


- स्वाती आवटी दीक्षित

शाळाश्रम ते निवृत्ताश्रम व्हाया गृहस्थाश्रम ..

शाळाश्रम ते निवृत्ताश्रम

व्हाया गृहस्थाश्रम ..


 जन्म घेऊन ह्या भूतलाला पहिला पदस्पर्श केला जातो तो शिवाजी राजे, लोकमान्य टिळक, वीर सावरकर .. कमीत कमीत देशाचा पंतप्रधान तरी व्हावे असें ठरवूनच. परंतु ...
परंतु अनेकविध आश्रमाच्या योनीतुन मार्गक्रमण करता करता सगळे विचार, सगळी स्वप्ने, सगळे मनोधैर्य मार्गात कुठे हरवून जाते कळतच नाही. पालक नावाच्या शिस्तप्रिय जेलर च्या ताब्यात देऊन देव अंतर्धान पावतात. मग तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी पुढे जात असतो. शाळाश्रम किती योग्य संज्ञा आहे 'शाळा + श्रम = शाळाश्रम'

शाळाश्रमातून सुटका होते आणि कॉलेजाश्रमात पावले अलगद पडायला लागतात. हळूच दोन पंख फुटतात. चहूकडे हिरवळ फुलते, झाडे-पाने-फुले-रस्ते सगळे अचानक देखणे दिसू लागतात, गाऊ लागतात, बागडू लागतात. आता कुठल्याही क्षणी पंख पसरवून उडायचे ...बस्स. आणि जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. मनाला हवे ते आणि तसेच वागायचे. स्वच्छंदी आयुष्य जगायचे. सगळी स्वप्न पूर्ण करायची पण....
पण पालक , कॉलेजाश्रमातला शिक्षक वर्ग आणि अभ्यास तुमच्या पायांना घट्ट जमिनीत रोवून ठेवतात. कितीही पंख पसरा, उडता येतच नाही. पुन्हा घर, कॉलेज, अभ्यास आणि तुम्ही ... जीवन चक्र चालूच आहे.

कॉलेजाश्रमातले रंगीत जग मागे टाकून तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करतात आणि .......  
दुःखात सुख, वाळवंटात 'मृगजळ' मिळावे तसे तुम्हाला तुमची वाटणारी मुलं मिळतात. आणि थोडकाळ 'आपले कोणीतरी आहे' चा आनंद देऊन जातात. वाळवंटातला साथी उंट. एरवी उंटाशी कोण मैत्री करे? पण संसार रुपी वाळवंटात साथीदार रुपी उंट आणि मृगजलासम आपली भासणारी मुलं ह्यांच्या सोबतीने गृहस्थाश्रमाचा भवसागर मजल दर मजल करीत पार करावाच लागतो. 

सगळ्या जबाबदाऱ्या, विवंचना, कष्ट, ताण, विचार आणि धावपळ सगळे सगळे मागे सोडून मोरपिशी मनाने आणि मोकळ्या विचारांनी पाहिले पाऊल पडते 'निवृत्ताश्रमा'मध्ये. आता बास खूप झाले , खूप केले, आता धावपळ बंद. आता फक्त स्वतःसाठी जगायचे, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे. आवडी-नावडी, छंद , आनंद आणि हक्काची विश्रांती. आणि ....
हळूच मृगजळ हातून निसटून जाते. नव्हे ते तेथे नसतेच , असतो तो फक्त अस्तित्वाचा, अपलेपणाचा भास... जाता जाता ओंजळीत सोडून जातात वाळवंटातले दोन वाळूचे कण. तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून कायमची सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी  आयुष्य पुढे जात रहाते. निवृत्ताश्रम किती योग्य संज्ञा आहे 'निवृत्ती + श्रम = निवृत्ताश्रम'

कळावे, लोभ असावा.

- स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, July 14, 2020

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, रामराम !!

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब,
रामराम !!

तुमच्या तीन अंकी प्रदीर्घ मुलुखती कडून महाराष्ट्राच्या नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या.अनेक वर्षे राजकारण कोळून पिल्यावर देखील तुम्हाला अजूनही पक्षांतर्गत आणि अंतरपक्षीय राजकारणातच रस आहे हे बघून निराशा झाली. तुमच्या राजकीय कारकीर्दीच्या अर्ध्या वयाची कारकीर्द असलेल्या नेत्यांवर हिरीरीने बोलण्याचा उत्साह न समजण्यासारखा.
मुलाखतकाराने मुलाखत जरी राजकीय हेतूने घेतली असली तरी  ऐकणारे श्रोते राजकीय नेते वा राजकीय पक्षांव्यतिरिक्त सामान्य जनता ही होती. सध्या सर्वसामान्य नागरिक ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्यासाठी 'तुमचे राजकारण गेले चुलीत', 'आग लावा त्या राजकीय पक्षांना' म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना महामारीने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य संकटात अडकलेल्या जनतेशी तुम्ही संवाद साधाल,  त्यांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालाल, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर काही तोडगा सुचवाल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.
उद्धव साहेब कुठे चुकले आणि देवेंद्रजीनी काय चुका केल्या, तुम्ही कसे गनिमी काव्याने पाठिंबा दिला आणि काढला ह्याने आमच्या कोरोना काळातल्या कोणत्या समस्यांचे समाधान होणार आहे?
तुम्ही पाच वर्षे सरकार चालवा नाहीतर पाच दिवस , त्यात आमच्या जगण्याची , जिवंत राहण्याची शाश्वती कुठे आहे??
साहेब, गेले अनेक वर्षे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात ते सेनेच्या किंवा काँग्रेस च्या जीवावर नाही तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांवर आणि प्रेमावर. सेना तर तुमची पारंपरिक शत्रू, काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिलीत ती त्यांच्यावरच्या प्रेमापोटी तर निश्चितच नाही. अतिशय खेद वाटतो सांगायला पण तरीही आज जनताजनार्दना पेक्षा तुम्हाला ते पक्ष अधिक महत्त्वाचे वाटले.... असे तुमच्या मुलाखतीतून तरी जाणवले.
कोण कसा चूक, कोण कुठे कमी पडतो, कोण लबाड्या करतोय ते आम्ही बघतोच आहोत. त्याची फळ आम्ही २०१४ च्या मतदानात पदरी टाकणारच आहोत. आत्ता आम्हाला अपेक्षित होते, अनुभवसम्पन्न असे एक राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा अशा महामारीच्या काळात नडलेल्या जनते समोर येते, तेव्हा त्यांच्या अनुभवाच्या, अभ्यासाच्या आणि दूरदृष्टीच्या पेटार्यातून काहीतरी ठोस आणि लोकहिताच्या उपायोगी पडणारे असे काही निर्णय, काही उपाययोजना,काही संकल्प बाहेर पडतील. कमीत कमी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांसह ह्या महामारीच्या काळात कुठे कुठे आणि कसे जनतेसाठी काम करणार आहात वा काम होणार आहे, एखादा हेल्पलाईन नंबर, कुठल्या उद्योगक्षेत्रात कामे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात किंवा देणार आहात ह्या बद्दल जरी बोलला असतात तरी खूप दिलासा मिळाला असता. पण दुर्दैवाने असे झाले नाही.
मोदोजींचे गुरू कोण, ते यशस्वी झाले की नाही ह्याच्यापेक्षा आमच्या लेकरांच्या यशापयशाचे काय, त्यांच्या गुरूंचा पगार आम्ही द्यायचा की गुरुकुल ने ह्या प्रश्नांनीच आम्ही सध्या त्रस्त आहोत. तुमच्या पर्यंत आमचे प्रश्न पोहोचत नाहीत की तुम्हाला आमच्या प्रश्नांमध्ये रस राहिला नाही ?? ऊध्ववजी एका मोठ्या, आर्थिक विवंचना नसलेल्या घरात जन्माला आले. पण तुम्ही तर आमचे आयुष्य अनुभवले आहे ना ?? आमच्या विवंचना कधीकाळी तुमच्या आयुष्याचा पण एक भाग होत्या ना?? की आता गतकाळाचे विस्मरण झाले??
पोपटपंची ला तर आम्ही महाराष्ट्रावरून ओवाळूनच टाकले आहे. त्यामुळे ना काही अपेक्षा ना काही खंत. पण तुम्ही आमची घोर निराशा केलीत. दुसऱ्याची रेघ खोडुन लहान करण्याच्या नादात आपली रेघ मोठी करायची विसरून गेलात बहुदा.

कळावे, लोभ असावा(?)

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

ता.क.: पुढील काही दिवसात सम्पर्क न झाल्यास मा.बंटीभाऊंच्या टोळधाडेने उचलून नेले असणार हे समजून घेणे.

Friday, July 10, 2020

निमित्त गुरुपौर्णिमा ...

निमित्त
गुरुपौर्णिमा ...

दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या नानावीध शुभेच्छांचा पाऊस पडला. निसर्ग, प्राणी, पक्षी, मित्र-मैत्रिणी, माता-पिता जे जे आजुबाजूला दिसते, वावरते त्या सगळ्यांना गुरू मानून श्रेय देण्याचा अट्टाहास सगळ्या शुभेच्छांमधून अक्षरशः ठिबकत होता. एरवी रोजच्या जगण्यात मदत करणाऱ्या, पाठीशी उभे राहणाऱ्या, योग्य सल्ला देणाऱ्यास त्याचे श्रेय देण्याचा कंटाळा करणारे, मी स्वतःच स्वतःला घडवले सांगणारे सुद्धा ह्या शुभेच्छांच्या लाटेत वहात होते.

सगळ्या जगाला गुरू मानून श्रेय देणारे स्वतःला श्रेय द्यायला मात्र साफ विसरले होते. आपणही आपले गुरू असतोच की. तसे नसते तर अगदी लहान मूल देखील दुसऱ्याच्या संगण्याला नकार वा होकार न देते. ज्या क्षणी तो छोटा जीव आपल्या आईला , आजूबाजूच्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी नकार अथवा होकार भरत असतो, त्या क्षणी तो स्वतः स्वतःशी संवाद साधत असतो. एका अर्थी स्वतःला शिकवत असतो. त्याच्या शिकवण्याच्या , विचाराच्या आड आजूबाजूच्या जगाचे सांगणे असेल तर तो ते ऐकण्यास तयार होत नाही. तिथूनच आपण स्वतःच स्वतःचे गुरू व्हायल सुरवात होते. कधीही न संपणारी , तहेहयात चालणारी प्रक्रिया सुरू होते. कालांतराने आजाणतेपणे तिचाच विसर पडतो.

जसे जसे मूल मोठे होत जाते, ते आजूबाजूच्या वातावरणातून अनेक गोष्टी केवळ निरीक्षणातून आत्मसात करत असते. पण काय आत्मसात करावे आणि काय सोडावे ते शिकवणारे तर त्याचे स्वतःचे मनच असते. असे म्हणतात ज्यांचा स्वमनाशी सुसंवाद असतो त्यांचे निर्णय बहुदा चुकत नाहीत. ह्या विचाराचे मूळ बहुदा त्या मनाच्या शिकवणीतच असावे. तसे नसते तर जन्मापासून व्यवस्थित समज यायला लागेपर्यंत ज्या आई वर ते मूल अवलंबून असते, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी त्या बछड्याने नकार वा होकार दिला नसता. ज्याला स्वतःचे स्वतः काही करता येत नाही त्याला 'नाही' अथवा 'हो' म्हणायचे कसे कळते ??

मोठे झाल्यावर मात्र इतर काय बोलतात, काय सांगतात, काय सुचवतात ह्यातच मन अधिक अडकून पडते, त्यांनतर बहुदा तो मनाचा स्वतःशी चाललेला संवाद हळू हळू कमी कमी होत असावा. किंवा तो संवाद झाला तरी ऐकू येणे, समजणे, त्याबरहुकूम वागणे कमी होत असावे. आणि म्हणूनच हे उदगार वारंवार ऐकू येऊ लागतात 'माझ्या मनात एकदा विचार आला होता ....' , 'आधी मला वाटले होते ..... ', वगैरे. वेळीच त्या अंतर्मनाचा, त्या आपल्यातल्या आपल्या गुरूचा आवाज जर ऐकू शकू, तर जास्तीत जास्त निर्णय योग्य घेतले जाण्याची शक्यता वाढेल. दुर्लक्ष केले तर मात्र त्याचे विपरीत फलीतही आपल्यालाच भोगायचे आहे.

कोणीतरी काहीतरी सांगते, भरवते, ठासवते, बिंबवते म्हणून आपण ते आपलेच म्हणणे असल्यासारखे जेव्हा स्वीकारतो, त्याक्षणी आपली आपल्या मनाशी जोडलेली नाळ तोडून टाकतो. नाळेचे काहीच नुकसान नाही, झालेच तर फक्त आणि फक्त आपले नुकसान होते. त्यामुळे ह्या क्षणापासून 'मीच माझा गुरू. माझे मन, माझे विचार, माझे म्हणणे हेच माझे मार्गदर्शक. मी त्यांनी सुचवलेल्या मार्गावरच जाणार, आणि माझ्या मनासारखा, माझ्या विचारासारखा विचार असणारे सहृदय फक्त माझ्या आजूबाजूला असतील'...असा निग्रह करूयात.

पुढच्या गुरुपौर्णिमेला अहंकाराचा दर्प नसलेल्या, स्वस्तुतीची वाळवी न लागलेल्या परंतु स्वतःमधील गुरुची स्तुती करणाऱ्या शुभेच्छा येतील अशी अपेक्षा करूयात.

कळावे, लोभ असावा.

-स्वाती आवटी दीक्षित

साबून की शकलं मे तू तो निकला झाSSSSग ...

साबून की शकलं मे
तू तो निकला झाSSSSग ...

लहानपणी साबण ही वैयक्तिक गोष्ट असते ह्याची माझ्या पिढीच्या कोणालाच कल्पना नव्हती. किराणा सामानात जो साबण येत असे तो त्या महिन्याचा साबण. तो अंघोळीव्यतिरिक्त इतर काही काम करत होता की नाही माहीत नाही, जसे 'सुंदर मनमोहक खुशबू'  किंवा 'मेरी त्वचा तरुण हो गई' किवा 'तंदुरुस्ती की रक्षा' किंवा 'ज्यादा झाग देता है' वगैरे. आमची पण त्याच्याकडून अशी काही अपेक्षा नसायची. खरेतर साबणाकडून अपेक्षा करतात हेच माहीत नव्हतं.

दूरदर्शन चे युग बहुदा हे खुळ घराघरात घेऊन आले. आमच्या घरी पहिला 'स्वतःचा साबण' आणला तो माझ्या भावाने 'लाईफ बॉय'. त्याला आम्ही लाल रंगाचा दगड म्हणून चिडवायचो. पण तो मात्र त्या लाल दगडाच्या प्रेमात होता. अतिशय उग्रट वास आणि हातात न मावणारा आकार त्यामुळे तर त्याला कायम 'नावडत्या' श्रेणीत बसावे लागले. योगायोगाने नेमके त्याच काळात वर्तमानपत्रात एक लेख आला होता, त्यात हा लाल दगड लाईफबॉय परदेशात प्राण्यांना अंघोळ घालायला वापरतात असे लिहिले होते. झालं माकडाच्या हातात कोलीत मिळालं, मग तर आम्ही आमच्या भावाला त्या लाल उग्रट जाडजूड दगड छाप साबणावरून इतकं चिडवलं असेल.

त्यानंतर एका वेगळ्याच साबणाचे घरंगळत आमच्या घरात प्रवेश केला. निमित्त झाले माझ्या बहिणीचे परदेशी जाणे. तोपर्यंत बाटलीत फक्त शाम्पू नावाचा शिकेकाईला पर्याय मार्केट मध्ये आला होता. साबण मात्र साबणासारखाच वडीच्या रुपातच येत असे. बहिणीने परदेशातून परत येताना बाटलीतील द्रवरूपी साबण पहिल्यांदा आमच्या घरी आणला.  कितीतरी दिवस शाम्पू आणि साबणाच्या वेगवेगळ्या बाटल्या ओळखण्यातच वेळ गेला. त्याची सवय होते ना होते ... माझ्या घरात एक परी मोठी होत होती.

एक दिवस शिल्पा कडे आम्ही दोघी गेलो होतो तर तिच्या लेकीने सुंदर सुंदर नानाविध रंगांचे , आकाराचे, वासाचे साबण बनवले होते. एक एक करताकरता दहा / बारा साबणाचे प्रकार आणि आकारही त्या दिवशी आमच्या घरात पर्यायाने आयुष्यात आले आणि चौकोनी साबणाच्या आकाराला तडे गेले. तरीही एक गोष्ट कायम होती, केसांसाठी शाम्पू आणि अंघोळीला साबण, त्यात फारसा बदल झाला नव्हता. शिकेकाईची जागा शाम्पू ने घेतली होती आणि साबणाची द्रवरूप किंवा अनेकविध आकाराउकारातल्या साबणाने इतकाच काय तो बदल.

परी मोठी होत होती तसे तिचे भावविश्व आणि साबण विश्व देखील विस्तारत होते. चेहेऱ्याची वेगळी बाटली, नखांना वेगळी, अंघोळीची वेगळी त्यात भर intimate wash ची. लेकीच्या निमित्ताने साबणाच्या जाहिराती विशेष लक्ष वेधायला लागल्या. मग लक्षात आले हल्ली प्रत्येक गोष्टी साठी वेगळा साबण असतो. हँड वॉश वेगळा, मेनीक्युअर पेडिक्युअर साठी वेगळा, चेहेऱ्याचा वेगळा, अंघोळीसाठी सुद्धा कितीतरी तऱ्हा सॉफ्टफिल (मऊ सुत), स्क्रबर (साबणात रवा टाकल्यासारखा), आयुर्वेदिक त्यातही लिंबोणीचा पाला आणि कोरफड ला जास्त मान... प्रत्येक साबणाला पाच मिनिटं द्यायची म्हंटली तरी साधारण रोज अर्धा तास तरी वाया जाणार. एवढं करूनही परत महिन्याच्या महिन्याला ब्युटी पार्लर ची नेमाने वारी करणारे असंख्य जीव आजूबाजूला आहेतच की. मग इतके नानाविध साबणाचे प्रकार आणून, वापरून काय फायदा ??
साबून की शकलं मे झाक नुसता ... हुउऊऊऊ आमच्या वेळी नव्हतं अस काही.
बहुदा त्यामुळेच शाळेत आणि क्लास ला आपण वेळेत जाऊ शकत होतो. आपल्या शिक्षणात साबणाचा इतका हात ( फेस व्हॅल्यू) असेल असे वाटले नव्हते.

कळावे, लोभ असावा

- स्वाती आवटी दीक्षित

चोराच्या मनात पोलीस स्टेशन ...

चोराच्या मनात
पोलीस स्टेशन ...

एखादा गुंड अपघातात गेला काय किंवा मारला गेला काय, त्याच्याबद्दल जाहीर पुळका व्यक्त करताना 'आपल्याला ओळखणारे लोक ऐकतायेत, घरातली मंडळी ऐकतायेत, ते आपल्याबद्दल काय मत करून घेतील' ... असा काही विचार मनात येत नसेल का ?? की 'कंबरेच सोडून मुंडास्याला बांधून' मोकळे झालेत??

एखादवेळी समाजातले गुंड संपतील पण.
मुंबईमध्ये कुठे आहे आता गुंडाराज, पण मनातल्या गुंडाडपणाचे काय?? पुळका गॅंग ने एक मिनिटभर विचार करावा की 'त्या गुंडाने तुमच्या कानशिलाला घोडा टेकवला' किंवा 'त्याने तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याशी मैत्री केली'... सरसरून काटा आला ना अंगावर.

 गुंड, अतिरेकी, सगळ्याच वाईट प्रवृतींबद्दल गेल्या 10/12 वर्षात अचानक सहानुभूतीची ही लाट आली कुठून ?? 'गुंड असला म्हणून काय झाले, तो पण एक माणूस आहे' असा एक (बे)सूर लागलेला हल्ली बरेचदा ऐकू येतो. आरे , जसा तो माणूस आहे तसा पोलिस पण माणूसच आहे... हे हेतुपुरस्सरपणे विसरायला होते का आपल्याला?? 'पोलीस कायद्याचे रक्षक आहेत, त्यांनी कायदा मोडता कामा नये' ... मान्य , पण कायदे मोडणाऱ्यांना जर पोलिसांनी मोडले ते तरी चालेल ना ?? की बंदुकीच्या ऐवजी मेणबत्त्या द्यायच्या त्यांच्या हातात??

तसे तर सीमेवर लढणारे जवान पण फारच क्रूर, अतिरेक्यांबद्दल बिलकुल दयामाया नाही. दुसऱ्या देशाचा सैनिक बिचारा चुकून आपल्याकडे येतो , आपल्या जमिनीवर झोपडी बांधायचा प्रयत्न करतो तर 'अतिथी देवो भव' ला बट्टा लावत खुशाल गोळी घालतात त्याला. काय बिघडले थोडी थोडी थोडी करत बरीचशी जमीन त्यांना दिली तर ?? येऊ देत त्यांना आपल्याकडे, मारू देत त्यांना आपले सिमेवर रहाणारे रहिवासी, नाहीतरी लोकसंख्येचा प्रश्न किती बिकट झाला आहे आपल्याकडे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवायला ते आपल्याला हातभारच तर लावत आहेत ना. बिलकुल वळण नाही आपल्या सेनेला, चांगले संस्कारच झाले नाहीत त्यांच्यावर. दोन(२)-चार(४) मेणबत्त्या त्यांनाही पाठवून द्या.

पोलिसभरतीच्या वेळेस पण ह्या पुळकावीराना भरतीसाठी आलेल्या तरुणांबद्दल प्रचंड माया, प्रेम, भूतदया वाटत असते.
ज्या पोलीसाला उन्हातान्हा, पावसात, जंगलात कुठेही जिथे ड्युटी लागेल तिथे बारा(१२)- बारा(१२) तास काम करावे लागते. कधी उदरभरणाचा योग असतो तर कधी फाके. ह्या अशा कामासाठी निवड चाचणी A/C खोलीत, पंखे, दिवे, कार्पेट सगळ्या सोयीनी युक्त कॉर्पोरेट ऑफिस मध्ये करायला हवी की काय?? मग पुन्हा 'ह्या नव्या पोलीसांच लईच नाजूक काम' म्हणून नाव ठेवायला पुळका गॅंग मोकळी.

आणि हो तेवढं त्या महिला पोलिसांना साडी नसू द्या , महिलेला साडीचा अधिकार नाकारणं म्हणजे काय? मंगळसूत्र तर सौभाग्याचे लक्षण, ते तर ती घालणारच... मग मंगळसूत्राला मॅचिंग कानातले नकोत का?? आणि साखरपुड्याची अंगठी, ती तर काढतच नसतात, अवलक्षण होत म्हणतात. सौभाग्यवती बाई आणि कुंकू नाही लावणार का?? लिस्टिक, पावडर, पायातले, श्रावणात हिरव्या बांगड्या तर परंपराच आहे आमची, ती कशी मोडणार?? ह्या सगळ्या जामानिम्यातून जमलंच तर त्या एखादं दुसरा चोर पकडतीलच की.... काय करणार महिला पोलीस असली म्हणून काय झालं बाईमाणूस आहे ना ती, तिलाही मन आहेच की.

सीमेवरच्या जवानांचे पण ट्रेनिंग च्या नावाखाली जे हाल आहेत. रोज सकाळी उठायचे काय, धावायचे काय, व्यायाम काय, कधी बंदूक चालावं, कधी तोफ चालवं, परेड तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. तारेखालन कोण सरपटत जात हो, साप आहोत का आपण सरपटायला? रोज एकच कपडे ,त्यांचं नसलं का मन होत 'पिवळी विजार आणि भगवा शर्ट घालायला. सैन्यात असली म्हणून काय झालं 'माणसचं आहेत हो ती' 'त्यांनाही मन असत'. ..इति पुळका गॅंग.

IAS / IPS ऑफिसर साठी UPSC/ MPSC चा अभ्यासक्रम पण थोडा सोप्पा करायला हवा. फार हाल होतात त्यांचे अभ्यास करून. आम्हाला 'ढ' अधिकारी चालतील पण ते तेवढं अभ्यासक्रमाच बघा जरा. आणि हो वर्गातल्या मागुन पहिल्या येणाऱ्या मुलांना पण डॉक्टर व्हावस वाटतच की, त्यांचंबी मन मोडू नका राव.... हवं तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना ते फुकटात तपासतील. त्यांची आजारपणातून एकदम कायमची 'सुटकाच' करून टाकतील. हाय काय अन नाय काय.

क्वालिटी क्वालिटी म्हणून कोण बोंबलला रे, कानाखाली जाळ काढू का??

डोसक्यात इचार चालुये 'चार(४)-पाच (५) अतिरेकी आणि तेवढेच गुंड, चोर, दरोडेखोर धाडावे का पाहुणचाराला पुळका गॅंग कडे??'
'पुळका गॅंग असली म्हणून काय झालं, माणसंच हायेत ती बी'

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#निर्लज्जपणाचाकळस

Thursday, July 2, 2020

सोय पहातो तो सोयरा ..

सोय पहातो
तो सोयरा ..

आज बोलता बोलता अचानक एका गृहस्थांची गाडी घसरली 'काँग्रेस चे सरकार असते तर इतका गोंधळ झालाच नसता'. काँग्रेसचेच सरकार आहे, सरकार मध्ये सेना, राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस पण आहे हे जेव्हा लक्षात आणून दिले तेव्हा सारवासारवी करताना गाडी अचानक 'ही सगळी मोदींची चूक आहे' म्हणून केंद्रावर घसरली.

माझे अपयश झाकायला मी दुसऱ्याकडे बोट दाखवले की झाले, असे काहीसे झाले आहे सध्या लोकांचे. लोकांचे सोडाच पण सेनेच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पण असेच काहीसे झाले आहे. इतके वर्ष भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची इतकी सवय झाली होती आणि आता भाजपा त्यांच्या बरोबर नाहीये तर 'भाजपा वाले काही करत नाहीत' म्हणून चिडचिड करतात. त्यांच्या लक्षतच येत नाहीये की आता त्यांच्या बरोबर भाजपा नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असायला हवी आहे. ते दोन्ही मित्रपक्ष काही करत नाहीत, नुसते मजा पहातात ह्याचा राग विरोधी पक्षावर कसा काय काढता येईल??

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तर लक्षातच राहिले नाहीये बहुदा की आपण आता सत्तेत आहोत, विरोधी बाकावर नाही. ह्या इतक्या कठीण परिस्थितीत सेनेबरोबर पर्यायाने जनतेबरोबर उभे राहणे आपले नैतिक कर्तव्य आहे ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. ते दोघे अजूनही सेना विरोधात असल्यासारखे वागत आहेत. राष्ट्रवादीचे ठाण्यात एक आणि काँग्रेस चे संगमनेर मध्ये एक नेते सोडले तर बाकीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते अचानक कुठे गायब झाले आहेत काही कळत नाही.

शक्यतो सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या नेत्यांची मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत. काहींची वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटल ही आहेत. शिवाय हे दोन्ही पक्ष सम्पन्न आहेत. कोव्हिड सेंटर, धान्य वाटप केंद्र उभे करणे दोन्ही पक्षांनाही अवघड नाही. पण असे कुठे झालेले दिसत नाही. केंद्रात भाजपा ची तुम्ही मजा पहिली तर समजू शकतो पण राज्यात ?? इथे तर तुम्हीच सरकार आहात ना?? मग का नाही तुमचे नेते आणि कार्यकर्ते सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून लढताना दिसत?? मान्य, की सेने ला एकट्याला राज्यकारभाराचा अनुभव नाही. पण तुमच्याकडे तर एकापेक्षा एक धुरंधर धुरीण नेते आहेत, ज्यांचा प्रशासकीय अनुभव आणि हतोटी सर्वदूर प्रसिद्ध आहे. का नाही सेनेच्या बरोबरीने तुम्ही लढताना, निर्णय घेताना, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेताना, घेतलेले निर्णय राबवताना दिसत??

मोदी सरकार कसे वाईट आहे, सेनेच्या नेत्यांनी कशी नीट कामे केली नाहीत हे सगळे बोलायला 2024 च्या निवडणूक रॅली मध्ये संधी मिळणार आहेच की. पण तेव्हा निवडणुकीत उभे राहायला नेते, त्यांच्या मागे फिरायला कार्यकर्ते आणि मत द्यायला मतदार जिवंत तर राहायला हवेत ना. 'कोरोना' आपली गमंत बघेल त्या आधी जबाबदारी ओळखा आणि उचला. अन्यथा जे काही जिवंत राहिलेले मतदार असतील ते 2019 पेक्षा वाईट मतांनी पृथ्वीवरील तुमचे अस्तित्व सम्पवतील. भविष्यात 'जिवंतपणी मरण म्हणजे काय' ह्याचे उदाहरण म्हणून तुमची मिसाल दिली जाईल.

सेनेचे 'सोयरे' आहात तर त्यांची 'सोय' पहा.. आयुष्यभर ज्यांच्या जीवावर राज्य केलेत त्या जनतेची वेळ सांभाळा. पेराल ते उगवते म्हणतात.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Sunday, June 21, 2020

रणसंग्राम

रणसंग्राम.. 

आज सकाळी सकाळी एक मेसेज आला.
If, one day....
We all are allowed to put our troubles on a table and exchange them.
I m sure that....
After few moments, everyone would silently take back their Own.
प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशी माझी प्रतिक्रिया आली ' मी नाही घेणार, मुळीच नाही घेणार'.

आणि बावीस (२२) वर्षांचा आयुष्याचा संघर्षमय झगडा डोळ्यासमोर ठाण मांडून बसला. जानेवारी 98 मध्ये लग्न झाले आणि मे 98 ला कळाले की जोडीदाराची एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसे तर आपण व्यसनाधीनतेच्या आणि हेकेखोरपणाच्या गर्तेत अडकलेल्या एका प्रवासाचे सोबती झालो आहोत हे पहिल्या महिन्यातच कळाले होते. पण नकळत प्राप्त झालेल्या गर्भधारणेने वेगळा निर्णय घेण्याची शक्यता धूसर झाली होती. त्यात ही शस्त्रक्रिया. त्याच्या घरात सगळे डॉक्टर असल्यामुळे त्यांना ह्या शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम माहीत होते. त्याच्या मोठ्या भावाने 'तुझे संपूर्ण आयुष्य तुझ्या पुढे आहे, तुला घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर हरकत नाही' असे सुचवलेपण होते. क्षणभर मोह झालाही, परंतु एखाद्याला अडचणीत टाकून हात वर करून निघून जाण्याची न माझी तयारी होती ना माझ्या घरच्यांची मानसिकता होती. शिवाय एक गर्भ माझ्या भरवशावर वाढत होता. शस्त्रक्रिया झाली की होईल सगळे नीट असा स्कारात्मक विचार करून परिस्थितीला तोंड द्यायचे ठरवले. एक, दोन, तीन शास्त्रक्रिया कराव्या लागल्या तेव्हा कुठे यश आले. त्यात पहिली तीन चार वर्ष निघून गेली. प्रचंड कटकटी, आरडाओरडा, सासरच्यांची संसारातली लुडबुड, भांडणे आणि मनस्ताप इतकेच फलित त्या चार वर्षांचे. अशा वातावरणात मुलगा मोठा होत होता. घरातल्या वातावरणाने की काय की जन्मतःच तो खूप समजूतदार. कधी हट्ट नाही, कुरकुर नाही, परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती त्याच्या अंगवळणी पडत होती.

एक वर्ष त्यातल्या त्यात निवांत गेले आणि मुलाचा अपघात झाला. कंबरेपर्यंत भाजला होता. डॉक्टरांनी बारा तासांची मुदत दिली, संसर्ग झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाणार होती. बारा (१२) तासांनी त्यातून बाहेर पडलो आणि रक्ताची कमी निर्माण झाली. संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितले रक्त द्यावे लागेल. त्यांच्या कुटुंबात सगळ्यांचाच रक्तगट माझ्या मुलाच्या रक्तगटाशी जुळणारा पण कोणीच रक्त द्यायला तयार होईना, मावसभावाच्या बायकोच्या वाहिनीच्या वाहिनीने शेवटी रक्त दिले. सुजाता ताईने रात्रीतून तिच्या लॅब मध्ये प्रक्रिया करून प्लेटलेट्स उपलब्ध करून दिल्या आणि पुढचे संपूर्ण वर्ष मुलाला परत त्याच्या पायावर उभे करणे , पुन्हा पाउल टाकायला शिकवणे ह्यातच गेले. पाटणकर डॉक्टर, आई, मावशी, गुडडी सगळ्यांनी खूप मेहेनत घेतली. लहान रचना साठी हा अपघात म्हणजे मोठा मानसिक धक्का होता. तिने घर सांभाळले नसते तर आई माझ्याजवळ राहू शकली नसती. बबलू पासून सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या कारण ती लांब परदेशात होती. कळाल्यावर त्याच्यासाठी उपयुक्त कितीतरी गोष्टी घेऊन ती भारतात येऊन गेली. त्यानंतर सतत त्याच्यासाठी काय काय पाठवत राहिली. ह्या संपूर्ण काळात त्याच्या घरचे आमच्याकडे कोणीही आले नाही, आम्हाला कसलीही आमंत्रणे नाहीत. आम्ही कसे जगतो आहोत कोणालाही विचारावेसे वाटले नाही. त्याच्या घरात सगळे डॉक्टर असून, एकालाही मुलाला देत असलेल्या उपचारांची चौकशी करावीशी वाटली नाही. उलटपक्षी मी हल्ली कशी त्यांना फोन करत नाही, त्यांची चौकशी करत नाही, वगैरे अनेक खोटी नाटी कारणे सांगून त्याचे कान भरणे आणि डोके भडकवण्याचे काम मात्र उत्तम केले. त्याची घरात तर काही मदत नव्हतीच, मुलाच्या उपचारांचा एक भाग होणे त्याला जमले नाहीच उलट 'माझ्या घरच्यांना तू फोन करत नाहीस, त्यांच्याशी बोलत नाही, इ' विषयांवरून रोज रोज घरात तमाशे होऊ लागले. सगळ्या गोष्टींचा इतका कंटाळा आला होता. कधी कधी वाटे मुलाला घेऊन पळून जावे कुठे तरी. नाहीतर जीवाचे बरे वाईट करून घ्यावे. घटस्फोट घ्यावा असे हल्ली ठाम होत होते. पण बाबा म्हणाले 'मुलगा आत्ताच इतक्या मोठ्या शारीरिक व्याधीतून बरा झाला आहे, असा काही निर्णय घेतला तर मानसिक व्याधींचा बळी होऊ शकतो. त्यापेक्षा तू तुझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित कर'. आई देखील लग्न झाल्यापासून मागे होतीच, स्वतःच्या पायावर उभी राहा म्हणून.  पण पाच वर्षात आत्मविश्वास थोडा हलला होता. म्हणून नव्याने काहीतरी शिकून मग व्यवसाय किंवा नोकरी करायची असे ठरले. शिवणकाम, विणकाम, भरतकाम येत असल्याने फॅशन डीझाइनिंग ला प्रवेश घेतला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पुढे अजून शकावे असे ठरले. नशिबाने वरळीला सासमीरा सारख्या उत्तम विद्यालयात PGDam ला प्रवेश मिळाला. लोकल ची सवय करून घेण्यापासून माझा आणि मुलाचा नित्यक्रम ह्याचा जम बसवताना दमछाक होत होती. पण शिकण्याची इच्छा आणि व्यवसायाची ओढ सगळी सर्कस करायला भाग पाडत होती. सकाळी चार वाजता दिवस सुरू होत असे. सकाळचा नाश्ता, आमचे दोघांचे डबे, त्याचे जेवण सगळे बनवून, मुलाचा गणवेश आणि दप्तर तयार करून ६:१० ची लोकल पकडून सकाळचा 7:30 चा पहिला तास पकडायचा... दिवसभर कॉलेज करून 6 वाजता घरी पोहोचायचे, मुलाला घ्यायला जायचे, त्यानंतर त्याचा खेळ, बाग, अभ्यास, जेवण सगळे संपवून दहा वाजता त्याला झोपवून रात्री आपला अभ्यास करून झोपायला बारा वाजायचे. परत सकाळी चार चा गजर आहेच. हे सगळे इतके इत्यंभूत मांडायचे कारण, पुढे फिस्कटलेल्या शिक्षणाची तीव्रता समजावी इतकेच. सगळ्या धावपळीत परीक्षेचे वेळापत्रक आले. बरोबर त्याच दिवसातले सिंगापूर,मलेशिया, थायलंड चे बुकिंग करण्यात आले. आई म्हणाली मुलाला इतक्या लांब परदेशी व्यसनी वडिलांबरोबर एकटे सोडायचे नाहीस. परीक्षा बुडवावी लागली. दुर्दैव मागे लागले की कसे हात धुवून लागते. दुसऱ्या टर्म मध्ये कळाले की मुलाला एक भावंड येऊ घातले आहे. पाहिले चार माहिने कोणाला काही कळूच दिले नाही. कॉलेज ला जात राहिले. पण देवधर मॅडमनी घरच्यांना बोलावं सांगितल्याने नाईलाज झाला आणि गोष्टी कानोपकांनी झाल्या. शिक्षण थांबले. खूप अडचणीचे होते ते दिवस. गर्भधारणेवर प्रश्नचिन्ह, बाळाचे वजन वाढेना, डॉक्टर म्हणाले 'बाळाची योग्य वाढ होत नाही, मेंदूवर परिणाम झालेले बाळ जन्माला येईल, त्यापेक्षा विचार करा' .. काहीही सुचेना. पण अचानक वाटले 'कसेही असो, माझ्या जीवावर कोणीतरी जग पाहण्याचा प्रयत्न करतेय, जसे असेल तसे, येऊ देत त्याला ह्या जगात' असा विचार आला आणि लेबर रूम च्या टेबल वरून खाली उतरले. महिनाभरातच बाळ जन्माला आले, मुलगी झाली. लांब च्या लांब मुलगी बहुदा छोटे आयुष्य घेऊन आली. आईच्या लक्षात आले 'बाळाला श्वास घेता येत नाहीये'. बाळाला अक्षरशः हातात घेऊन पळत पळत आई, मावशी आणि परिचारिका रस्त्याच्या पलीकडे वाकडे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या. दहा दिवसांनी बाळ बहुदा जगेल अशी शक्यता निर्माण झाली. सव्वा किलोचा एवढासा गोळा नूसता हाताळायचा तरी भीती वाटत होती, वाढवणार कसा. आठ वर्षाचा एक राजकुमार आणि 15 दिवसाची अपुऱ्या दिवसाची अपुऱ्या वजनाची एक राजकुमारी मागे सोडून आई श्रीरामपुर ला परत गेली. कारण सासूबाई येऊन राहणार होत्या. आता खरी सर्कशीला सुरवात होणार होती. दिवसभराच्या बाईंना घेऊन त्या बाहेर हॉल मध्ये मोठ्या आवाजात दूरदर्शन बघण्यात मग्न असत. बाई असून सकाळचा मुलाचा डबा, माझा नाश्ता, जेवण, बाळाचे कपडे, दुपारचा चहा सगळीच जबाबदारी सोळाव्या दिवसापासून अंगावर पडली. त्यात गणपती आले, सासूबाई म्हणाल्या , तुमची पद्धत मला माहीत नाही, तुझे तू बघ. बाळंतपणाला महिनाही न झालेली मी हातात फडके बादली घेऊन साफसफाईला लागले. घर आवरणे, मंदिर सजवणे, घराची सजावट सगळं एकटीने केले. सासूबाई आणि त्यांच्या मुलाने माझी गम्मत बघितली. असो

अशा वातावरणात दोन सुंदर मुलांची जबाबदारी आणि स्वतःचे करियर ह्याचा विचार चालू असताना, त्याने एक नवीन आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केली. त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. चार वर्षे मी, मुले आणि शाळा अशी कसरत चालू असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्याला सांगितले की त्या बाईना पुढचा आणि मागचा जन्म बघता येतो आणि त्यांना हे ही कळाले की मी त्याच्यासाठी कमनशिबी ठरणार आहे वगैरे. दुसऱ्याच दिवशी मला शाळेत न जाण्याविषयी फर्मान निघाले. पुन्हा प्रश्न , आता काय ?
ह्याच विचारांच्या गुंत्यात अडकले असताना लोकल ट्रेन मधून पडून अपघात झाला आणि एक गुढगा गमावला. पूर्ण वर्ष फिजिओथेरपी , मी, व्यायाम आणि पायाचे ऑपरेशन ह्यात गेले. ऑपरेशन च्या वेळेस डॉक्टर घरातले कोणी बरोबर असल्याशिवाय भूल देईनात, तो तर लंडन ला गेलेला,मराठी चित्रपटाच्या अवॉर्ड शो साठी. ऑफिस मधल्या संतोष ला भाऊ म्हणून उभे केले, भीतीपोटी त्याने रचनाला कळवले. तिची धावपळ झाली. ह्या सगळ्यातून बाहेर पडता पडता डेंग्यू ला माझा पत्ता मिळाला.आता बहुदा मरणार वाटत असतानाच जिवंत झाले आणि सासरच्या लोकांना दुःखाच्या खाईत लोटले. नंतर वर्षभर वारंवार ताप येत राहिला. बरोबर वर्षभराने मुलाला पण डेंग्यू ने गाठले, त्याच्या पुढच्या वर्षी मुलीला. सलग तीन वर्षे 15 ऑगस्ट च्या दरम्यान आम्ही आळीपाळीने ज्युपिटर मध्ये जाऊन, राहून आलो. मुलीला मात्र डेंग्यू ने फार त्रास दिला. ICU मध्ये हलवावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातून ते बाळ सहीसलामत बाहेर तर पडले पण त्या औषधोपचाराने बारीक काकडीचे टरबूज झाले. ह्या लढाया चालू असताना जाणवत होते की त्याच्या व्यवसायाची आर्थिक गणित बिघडत चालली आहेत. पण आता तिथे मला अस्तित्व नव्हते. त्याचे सल्लागार मंडळ बदलले होते. सगळे काही समजत असूनही काही करता येत नव्हते. न रहावून कित्येकदा 'समोर दरी आहे, खाईत पडशील' सांगून पाहिले. त्यावर प्रतिक्रिया आली 'त्याने खाईत पडावे अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे असे सांगते' त्यानंतर तोंडाला कुलुप घातले. वकिलीच्या व्यवसायात स्थिरस्थावर होत होते. त्या व्यापात बुडवून घेतले. काही सामाजिक , सांस्कृतिक चळवळींमध्येही थोडी लुडबुड केली. मुलगा पुण्याला शिकायला गेल्यामुळे मी आणि मुलगी दोघीच राहीलो, त्यामुळे अवांतर सामाजिक कार्यासाठी थोडा वेळ मिळत होता. मी आणि माझे शेपूट नेहमी बरोबरच असायचो. ह्या काळात मुलाचे दोन्ही बोर्डाचे मैलाचे दगड पार करून झाले. असे वाटले आता होईल आयुष्य सुरळीत. पण माझ्या भावाला माझे आनंदी होणे मान्य नव्हते. खूप मोठी शिक्षा देऊन एक कायमचे प्रश्नचिन्ह उभे करून ठेवले. आम्ही अजून सावरलो नव्हतो त्यातून आणि एक दिवस मुलाने सांगितले 'माझा मार्ग चुकला, मला पूर्वपदावर यायचे आहे'. पुन्हा लढाई , पुन्हा जिंकणे. किंवा जिंकल्यासारखे वाटणे. एक विषय संपत नाही तर दुसरा प्रश्न तयार असतो. त्याने एक दिवस जाहीर केले 'आर्थिक जबाबदाऱ्या मला निभणार नाहीत, सगळे विकावे लागेलं'. मूर्खासारखे व्यवहार करून एका दिवशी सगळे कुटुंब घेऊन अक्षरशः रस्त्यावर उभे केले. मुलं फार गुणी, समजूतदार ... संपूर्ण एक महिना घर नाही, वेगवेगळ्या हॉटेल मध्ये राहून काढावा लागला पण तक्रार केली नाही. भाड्याने एक घर मिळाले, सामान लागतच होते तर लेकीच्या पोटात खूप दुखू लागले, कळाले अपेंडिक्स आहे, ओपरेशन करावे लागेल. आधीच आमची शाळा बंद करावी लागली, त्याचा तिच्या शाळेत तिला खूप त्रास झाला, बरेच ऐकावे लागले होते, त्यात घर विकले तेव्हाही सोसायटीत तिला बऱ्याच प्रश्नांचा सामना करावा लागला होता. आपल्याकडे ही फार घाणेरडी पद्धत आहे, मोठ्यांना जे विचारता येत नाही , ते घरातल्या लहान मुलांना विचारायचे. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल काहीही विचार करायचा नाही. मनाने खचलेले ते बाळ आता ऑपरेशन साठी तयार करायचे होते. आम्ही दवाखाण्याची लढाई लढत असताना तो मात्र चारचाकी घेण्यात मश्गुल होता.

हा न सम्पणारा प्रवास आहे. आयुष्य नव्हे जणू समरांगण. परंतु प्रत्येक लढाईत ह्या शहराने खूप साथ दिली. चांगले सोबती दिले, मार्गदर्शक दिले, मैत्री दिली. आई आणि बहिणींची कायम मदत झाली. खूप काही शिकायला मिळाले. माणसं वाचता येऊ लागली. माणसांचे अनेक नमुने बघितले. जिवंतपणी मेलेल्या मनाने वावरणारे आत्मे अनुभवले. आता अजून फक्त पाच वर्षे, मुलांचे शिक्षण आणि व्यावसायिक आयुष्य मार्गी लागले की मग मात्र अर्जुनासारखी आयुधे एखाद्या शमीच्या ढोलीत लपवून ठेवणार आहे .... कायमच्या अज्ञातवासासाठी.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, June 5, 2020

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील
काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

परराज्यातील मजूर आणि मराठी उद्योजक-
परराज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी ट्रकच्या प्रवासासाठी दरडोई रेल्वे AC च्या तिकीटापेक्षा जास्त पैसे मोजावे लागले ( वृत्तवाहिन्यांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती).
कुटुंबात कमीत कमी चार लोक असतील. इतके पैसे घालवून जाण्याचा आटापिटा का?? ते ही फक्त पंधरा दिवसांसाठी. पंधरा दिवसात लॉक डाऊन शिथिल करण्यात आला. तेवढ्या पैशात आणि सरकारी मदतीत इथे ते सुरक्षित राहू शकले असते शिवाय गावागावातुन कोरोना वाढलाही नसता. आता परत आल्यावर नवीन रोजगार मिळवण्यापासून सुरवात करावी लागेल. जाण्यासाठी खर्च करायला पैसे होते, येण्यासाठी पुन्हा खर्च करून येणार मग राहण्यासाठी पैसे का नसावेत बरे??
पूर्वी जे मराठी तरुण नोकरी नको, काहीतरी स्वतःचा कामधंदा करावा असा विचार करत असत त्यांच्या घरातल्यांपासून ओळखीतले सगळे एखादा असाध्य रोग झाल्यासारखे त्या तरुणाकडे बघत , त्याला समजावून सांगत, त्याचे मन नोकरीकडे वळवण्याचा प्रचंड आटापिटा करत असत.  परंतु सध्या समाजमाध्यम 'मराठी तरुणांनो उद्योजक व्हा, पदवीधारकांनो न लाजता शेतकाम आणि शेतमाल संबंधी कामे करा, मॅट्रिक-नॉनमॅट्रिक मुलांनो मजुरी करायला लाजू नका, इ' संदेशांनी अक्षरशः ओसंडून वहात आहेत. महाराष्ट्र बदलतोय की काय? (वस्तुस्थिती)
- काय हे , किती हे फक्त स्वतःच्या राज्याच्या प्रेमात असणे? 'मला पहा, आणि फुले वहा' प्रवृत्तीचा निषेध असो. थोडा तरी पर प्रांतीयांचा विचार, थोडी सहानुभूती ... काय हे स्वतःच्या लोकांबद्दल विचार करणे फक्त... शिव शिव.(आदर्शवाद)

मुंबई डबेवाले आणि कुल्फीवाले-
मजुरांच्या प्रश्नांत सगळे इतके अडकून पडले की आपल्या मातीतील मराठी डबेवाल्यांची आठवणच राहिली नाही. तेही तर मुंबईत उपरेच की. कुठल्या कुठल्या खेडेगावातून आलेली मंडळी ही. त्यांनी काय केले असेल. ऑफिस बंद म्हणजे डबे बंद म्हणजे कमाई बंद. त्यांनी कशी गुजराण केली असेल? गावी गेले असतील की इथेच राहिले असतील? त्यांच्या गावी जाण्याची काही सोय होती का? सध्या त्यांच्या उपजीवीकेचे साधन काय?
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवर्जून दिसणारे कुल्फीवाले. फक्त 3 महिन्यांसाठी मुंबईत येतात. सहा/ सात जण मिळून एका खोलीत रहातात. तीन महिने कुल्फी विकून पैसे कमावून पहिल्या पावसानंतर शेताची कामे करायला गावी जातात. त्यांचा पूर्णपणे हा हंगाम हातातून गेला. त्यांनी काय केले असेल? काय करत असतील? काय करतील? शेताच्या कामासाठी आता पैसे असतील का त्यांच्याकडे? कुल्फी च्या विक्रीतून जर ते मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवत असतील तर यंदा ते कसे निभावून नेतील??
-किती कुपमंडुक प्रवृत्ती ही, फक्त स्वतःच्या पायापाशी बघणे. मराठी माणसाचाच काय तो विचार ?? घेतील की ते सांभाळून... नव्हे घेतलेच पाहिजे. त्यांचा कोणी आणि का विचार करावा??

घरकाम आणि कार्यालयीन कामकाज-
काल, तारीख 5 जुन, 2020, ऑफिस चा पहिला दिवस. अर्धा दिवसच ऑफिस मध्ये काम केले पण घरी आल्यावर जे जाम झोप यायला लागली आणि जाणीव झाली, आपला मेंदू थोड्याश्या कामाने शीणला आहे. बरोबर आहे. पूर्ण दोन अडीच महिने सुट्टी घेतली , घरकामात, समाजमाध्यमांवर, दुरचित्रवाहिनी पाहताना, रेडिओ ऐकताना,वाचनात काही तुम्ही खूप लक्ष दिले पाहिजे असे गरजेचे नसते. झाले दुर्लक्ष तरी चालते. त्यामुळे मेंदूला काम करण्याची आवश्यकताच राहिली नव्हती. आता जेव्हा परत लक्षपूर्वक काम करावे लागले तर दांडी उडाली बेट्याची.
पूर्वी सर्व लोक सकाळी फारच लवकर उठत. त्यामुळे सगळी कामे सकाळी सकाळी करण्याची प्रथा पडली असावी. शिवाय सूर्यास्त झाल्यावर अंधारात काम करताना धडपडण्याची शक्यताच जास्त. त्यातूनच संध्याकाळी घरी झाडू नये हा नियम आला असणार. बरोबरच आहे, अंधारात घरातील छोट्या छोट्या मौल्यवान वस्तू कचऱ्यात गेल्या तर दिसणार नाहीत आणि नुकसान होईल हा विचार असणारच. त्या काळी लोकांकडे हिरे, माणके असायची म्हणे. पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. घरातल्यांच्या पोटोबाची काळजी घेतल्यावर ऑफिस ला गेले आणि घरी परत आल्यावर घरकामे केली तरी चालू शकतात. सकाळीच सगळी कामे करण्याचा आटापिटा कार्यालयीन कामकाजावर परिणाम करू शकतो.
- काय हा आळशीपणाचा कहर? सकाळी सकाळी घरातली सगळी कामे करून, मुलांचा अभ्यास, कार्यालयीन कामकाज सगळी सर्कस जमलीच पाहिजे. ऑफिस मध्ये नाही गेले तर कामवाल्यांना घरी बसल्याचा पगार कोण आणि कसा देणार ?? रोज आठ वाजता दुरचित्रवाणीवर एक निवेदन येण्याची वाट बघत असते ' घर नीट आवरून लख्ख ठेवा. कामवाल्यांना आल्या आल्या कामाचा जास्तीचा ताण नको,  काही माणुसकी आहे की नाही??

केरळ, हत्ती आणि रागा-
कोणी म्हणे केरळ मध्ये घडलेल्या हत्तीच्या अमानुष प्रसंगावर 'रागा' ने प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास का?? तसे तर अनपढ जाहिल गवारांनी अर्थशास्त्रावर बोलू नये हा ही संकेत आहेच की. परंतु अर्थमंत्रालयाने काहीही घोषणा केली की रागा ने प्रतिक्रिया द्यावी म्हणून कोणीतरी लिखाणकाम करतेच ना? मग हत्तीवर कोणी लिहून दिले असते तर असे काय नुकसान होते ? माणूस आहे, राग येणार तर प्रतिक्रिया देणारच ना? पण राग आलाच नाही तर? आणि माणुसकीच नसेल तर?
एरवी आपल्याकडे काहीही विचित्र अथवा वाईट घटना घडली की त्या घटनेचे बळी आणि त्या प्रकरणात सामील असलेल्यांची नावे, गाव, जात, धर्म, इ ची जोरात चर्चा असते. अगदी गुन्हेगार अविवाहित आहे की विवाहित, मुले आहेत की नाही, असतील तर किती, आई वडील कोण, कसे दिसतात , वगैरे वगैरे. पण केरळ हत्ती प्रकरणात शोध-माध्यम आणि त्यांची 'सूत्र' खूपच कमी पडली. एकही नाव, गाव, पान, फुल, फळ, रंग काहीही चर्चा नाही. अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजच्या सगळ्या लष्करी हालचाली दाखवणारे, लष्करी अधिकाऱ्यांच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांची गुप्त ठेवलेली माहिती जगासोर ओरडून सांगणारे मूर्ख आणि बिनडोक पत्रकारितेत माहीर असलेले वृत्तवाहिनीचे सगळे पत्रकार कुठे लॉक डाऊन झाले अचानक??
- किती हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दुस्वास ?? नक्की ह्या वात्रट लेखिकेला संघाने नाहीतर भगव्या झेंड्याने पैसे चारले असणार.
हो, सध्या आपल्याकडे हा अलिखित नियम आहे, तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार असता कामा नये. विचार मांडायचा तर तो राजकीय चष्म्यातूनच.

संकट, मदत आणि आयकर भरणारा पांढरपेशा (हमाल) वर्ग-
कोणतेही संकट येवो, दुरचित्रवाणीवर मदतीच्या हाकेची एक ओळ फिरायला लागते. सगळ्यांना असे वाटत असते की कुठे मोठी रक्कम आहे? कमीतकमी पाचशे, हजार, दीड हजार, तीन हजार ते पाच हजार पर्यंत साधारण आकडा असतो. सगळ्यांना थोडे थोडे देता देता एक एक चिमूट चिमूट करता करता लक्षात येते चांगलाच खोल खड्डा झाला आहे. हे म्हणजे आयुष्यभर कर भरा आणि वेळ प्रसंग आल्यावर सरकारकडे मदतीसाठी बघावे तर तेच कटोरा घेऊन आपल्याच दारात उभे. आहो, कर भरतो म्हणजे खूप डबोले जमवले आहे असा त्याचा अर्थ घेऊ नका. कधीतरी देण्याचा ही विचार करा. आम्हाला ही घेण्याचा आनंद अनुभवू देत. त्यापेक्षा विमा कंपन्यांच्या हातात राज्यकारभार द्या. ते कसे पैसे (कर) घेतात, त्यातच त्यांचे कार्यालय चालवतात शिवाय कंपनी ला भरभराट मिळवून देतात, कंपनीसाठी भरपूर स्थावर जंगम पण खरेदी करतात आणि वेळप्रसंगी जरा सुद्धा मागेपुढे न पहाता आम्हाला पैसेही देतात. कमीतकमी आमच्या वाईट प्रसंगात आमच्याच पुढे कटोरा घेऊन येत नाहीत.
- कसली कंजूस मख्खीचुस प्रवृत्ती आहे. जातीवर गेले. ह्यांच्या हातून कधी काही सुटायचेच नाही. आहो पण आमची जात काही मागत पण नाही, आरक्षण सुद्धा नाही. एखाद्या आमच्या समाजाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली का हो वाचनात?? कुळकायद्यात जमिनी गेल्या, गांधी हत्येच्यावेळी जळीतात घरदार गेले तरीही पाय रोवून उभे आहोत, कुठल्याही सरकारी मदतीशिवाय... आहात कुठे. शिवाय पूर्ण रकमेचा आयकर ही भरतो.

कळावे, लोभ असावा

- स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, June 2, 2020

जागते रहो SSSSSS ...

जागते रहो SSSSSS ...

सध्या अचानक सगळ्यांना 'राजकीय जाग' आली आहे. ज्या लोकांना पूर्वी राजकारण समजत नव्हते किंवा आवडत नव्हते ते ही अचानक समाजमाध्यमांवर राजकीय लेख , त्यावर प्रतिक्रिया , इ प्रकारे व्यक्त होऊ लागले आहेत. फक्त हे अचानक आलेले राजकीय जागृतीचे वादळ 'चहाच्या पेल्यातील वादळ' ठरू नये आणि स्मशान वैराग्यासारखे कालांतराने विस्मरणात जाऊ नये हीच इच्छा.

राजकीय विचारधारेमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या जुन्या आणि नव्या दोन्हीही प्रकारच्या लोकांमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आवर्जून आढळतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे 'आम्ही कसे श्रेष्ठ, उत्तम, अचूक, वगैरे वगैरे सांगणारे. हे लोक नक्कीच परवडतात. ते कोणाच्या अधेमध्ये नाहीत, कोणाला नावे ठेवत नाहीत, कोणावर टीका टिप्पणी नाही. फक्त आम्ही कसे आणि किती योग्य व बरोबर वागतो इतकेच ते सांगत रहातात. त्यांचा फारसा काही कोणाला उपद्रवत असत नाही. पण निष्ठा ठाम, एका निरोपावर धाव घेणारे आणि अंगावर पडलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणारा वर्ग.

दुसरा प्रकार 'आपल्यालाच कसे सगळे समजते' प्रकार. कोणत्याही पक्षाने काहीही लिहू देत, वागू देत, सांगू देत.... ह्या प्रकारातले लोक त्यांना उभे आडवे कापून काढणार. त्यात अपपरभाव नसतो. 'सब घोडे बारा टक्के' न्यायाने सगळ्यांवरच आसूड चालवणार. साधारण 'हम करे सो कायदा' विचारांचा, थोडा तिखट, जहरीला, ठसका लागण्याची शक्यता असणारा हा वर्ग.

 तिसरा प्रकार म्हणचे 'आम्हीच कसे योग्य, ते (समोरचा पक्ष) कसा चूक' प्रकारात मोडणारे. स्वतःच्या निष्ठा सांभाळताना दुसऱ्याच्या निष्ठांवर उभे आडवे घाव घालणारे. वरच्या फळीत 'युती' तुन 'आघाडी'त बदली झाली तरी ह्या कार्यकर्त्यांना काहीच फरक पडत नाही. समोरचा बदलला तरी चालेल पण समोर कोणीतरी आहे ना मग सोलून काढ त्याला, इतकेच त्यांचे काम. आपल्या निष्ठांबद्दल बोलताना त्यांना समोर मीत्र, नातेवाईक, शुभचिंतक काहीही दिसत नाहीत. राजकीय निष्ठांपायी स्वतःचे प्रचंड नुकसान करून घेणारा आणि बऱ्याच आप्तस्वकीयांना दुखावून जवळ जवळ एकटा पडलेला असा हा वर्ग.

सगळ्यात चांगला वर्ग म्हणजे शांत आणि सहनशील, प्रचंड निरुपद्रवी, गुपचूप आपल्याला आवडणाऱ्या चिन्हावर मोहोर उमटवीणारे संत-सज्जन मतदार. व्यक्त होतील तेही अगदी हळू आवाजात. समाजमाध्यमांवर येणाऱ्या लेखाला किंवा संदेशाला प्रतिक्रिया देतील ती पण फक्त 'आवडले/like' इतकीच. कोणाला नावे ठेवणे नाही, आपले मत तावातावाने मांडणे नाही. पण निवडणुकीचे वारे उलटे वाहवण्याची ताकद राखून असणारे. त्यांना त्यांच्या ताकदीची पूर्ण कल्पना असते. कधी कुठल्या राजकीय व्यक्तिमत्वासमोर दबून जाणार नाहीत, कधी आपले कुठले काम घेऊन त्यांच्याकडे जाणार नाहीत, राजकीय विषय आणि व्यक्तिमत्वे अनुल्लेखाने मारण्याची ताकद असलेला वर्ग.

सामाजिक आणि राजकीय बांधिलकीच्या जाणिवेच्या ह्या नव्या लाटेला ओहोटी मात्र लागू नये. उलटपक्षी ही लाट मतदानाच्या महासागरात रूपांतरित व्हावी. समाजीक आणि राजकीय आखाड्यात स्थित्यंतराचा मान ह्या महासागराला मिळावा. २०२१ हे भारतासाठी महासत्ता होण्याच्या शक्यतेचे वर्ष. त्या शक्यतेला सत्यात उतरविण्याची ताकद ह्या महालाटेत निर्माण व्हावी, हीच सदिच्छा.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, May 26, 2020

बाई ग SSSSS ... बाई ग.

बाई ग SSSSS ...
बाई ग.

'रोटी,कपडा,मकान आणि कामवालीबाई' जगण्याच्या मूलभूत गरजा. एक दिवस रात्री आठ वाजता मोदी सर दूरचित्रवाणीवर येतात आणि सांगतात 'उद्यापासून बाई कामावर येणार नाही... लॉक डाऊन. आत्मनिर्भर व्हा'.

साधारण गणपती बसण्याच्या आदल्या रात्री जी हुरहूर असते, रात्री सगळी तयारी करून झोपायला होणारा उशीर, सकाळी जाग येईल का? गजर वाजेल ना? गुरुजी सहा वाजता येणार आहेत, त्या आधी पंचामृत आणि प्रसाद होईल ना? ह्या विचारात जागेपणी गेलेली किंवा घालवलेला रात्र .... अगदी हाच अनुभव त्या रात्री आला. सकाळी घरातली सगळी कामे आणि स्वयंपाक दोन्हीची सर्कस जमेल ना ह्या विचारानेच रात्रीची वाट लागली.

उठल्या उठल्या ज्या गोष्टींची म्हणजेच कामाची सवय असते ते आधी सम्पवून टाकू ह्या विचाराने चहा आणि कुकर एकदमच गॅस वर जाऊन बसले. कणिक मळून एक कोपरा पकडून बसली. भाजीची आणि न्याहारीची तयारी एकदमच होत होती. भाजीची फोडणी आणि इतर सगळी कौतुक होऊन तिने शिजण्यासाठी थोडा वेळ मागून घेतला. तेवढ्या वेळात न्याहारीने नम्बर लावला. सगळ्यांच्या ताटल्यांमध्ये जाऊन सजली सुद्धा. सहजच घड्याळाकडे नजर टाकली आणि नऊ च्या काट्याने 'तू मागे पडलीस' म्हणून सांगितले. आता कामाचा वेग खरोखरच वाढवावा लागणार होता. अकराची सीमारेषा काहीही करून गाठायची होती. मनातल्या मनात आकडेमोड केली. भांडी पंधरा मिनिटं, ओटा गॅस पुसायला दहा मिनिटं,केर लादी दहा दहा मिळून वीस मिनिटं, बाथरूम दहा मिनिटं आणि पुसापुशी पंधरा मिनिटं... इन मिन सत्तर मिनिटं लागणार, दहा सव्वा दहा पर्यंत आटोपेल सगळे मग कपड्याचे मशीन लावता येईल. पोळ्या असेही जेवायला बसल्यावरच करायच्या होत्या. वाटले तेवढे काही सगळे काम घरी एकट्याने करणे अवघड नाहीये.

'हर हर महादेव' चा गजर करत भराभर ओटा पुसायचा चौकोनी स्पंज घेतला. बाईचा एका स्पंज मध्ये दोन्ही ओटे आणि एक गॅस पुसून व्हायचा, आपल्याला फार फार तर दोनदा धुवून घ्यावा लागेल ह्या विचाराने लढाई चा बिगुल वाजवला. एक नाही,दोन नाही, तीन नाही, तब्बल चार वेळा तो चौकोनी तुकडा धुवून घ्यावा लागला तेव्हा कुठे ओटा,गॅस आणि मागच्या टाईल्स स्वच्छ झाल्या. दहा मिनिटाच्या कामाला वीस मिनिटे लागली. आता मात्र उरकपट्टा जोरजोरात फिरवायला हवा होता. कामात बदल आणि स्वयंपाकघरातून जरा बाहेर पडावे म्हणून झाडू आणि सुपलीशी मैत्री केली. बाईचे पाच मिनिटात झाडून होते आपल्याला फार फार तर दहा पंधरा मिनिटे लागतील ह्या विचाराने कामाला लागले. दहा मिनिटांनी फक्त दिवाणखाना झाडून झाला होता. बाकीचे घर अजून आ वासून बघत होते. सूड उगवल्यासारखे जिथे जिथे झाडू जाईल तिथून कचरा, धूळ, पेन्सिल, चमचा, रबर, कंगवा, कागद, एखादे छोटे झाकण काय वाट्टेल ते निघत होते. त्या सगळ्यांची मोट बांधता बांधता पूर्ण अर्धा तास कसा निघून गेला कळालेच नाही. आता पुसापुशी मात्र पटापट आवरायची म्हणून पोछा आणि बादली कडे मोर्चा वळवला. गौरी म्हणजे बाईला अर्धी अर्धी बादली दोनदा घ्यावी लागते हे मी बरेचदा बघितले होते. त्या मापाने अर्धा पेक्षा थोडे जास्त पाणी, फिनेल घेतले आणि त्या अर्ध्या बादलीत फक्त एक खोली पुसून झाली. पाण्याने लगेच कृष्णरंग स्वीकारला. पुन्हा पाणी बदला फिनेल टाका , इ सोपस्कार केले , पुन्हा तेच तब्बल चार वेळा त्या पाण्याने सरड्यासारखा परत परत रंग बदलला आणि मला अक्षरशः तोंडावर पाडले.

बादली, पोछा स्वच्छ धुवून मी निःश्वास सोडला आणि मागून भांड्यांनी आवाज दिला. आता मात्र घड्याळाकडे बघायचेच नाही ठरवून दहा मिनिटात ह्या भांड्यांना मार्गी लावून सरळ बाथरूमचा रस्ता धरायचा ठरवून हातघाईच्या लढाईला सुरवात केली. लांबून जरी ती सगळी एकसारखी भांडी दिसत असली तरी त्यांच्यात गट तट फारच. काचेची, दुधाची, पेले-वाट्या, तवा-कढया हे घसण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीत मोडणारे प्रकार. प्लास्टिक हा अजून एक नखरेल आयटम. सगळ्यांच्या तऱ्हा निराळ्या. प्रत्येकाचा मेकअप करून सगळ्यांना सुकण्यासाठी पंचावर उपडे घालून बेसिन, नळ आणि मागच्या टाईल्स धुवून पुसून , न रहाऊन घड्याळाकडे पहिलेच ... पूर्ण अर्धा तास मोडला होता.

धावत पळत लोकल पकडण्याच्या सवईने बाथरूम चा दरवाजा गाठला. आता काय हारपिक निळा आणि लाल आहेत . जाहिरातीत दाखवतात तसे दोन मिनिटात सगळे चकाचक करून टाकू. झाले हो सगळे चकाचक पण पूर्ण वीस मिनिटं लागले. 'हर हर गंगे' आटोपून बाहेत आले तर 'किती उशीर? बसायचे आहे ना जेवायला?' चा गजर कानी पडला. आरे बापरे, त्या पोळ्या ठेवल्या आहेत ना मागे. स्टेशन वर दादरा चढून उतरावा त्या वेगाने भराभर स्वयंपाकघर गाठून काकडी, कांदा, आमरस, पोळ्या, मागची आवराआवर आटोपून बाहेर पडले तर घड्याळाशी नजरानजर झालीच. काळ वेळेचे गणित पूर्णपणे मोडकळीला आले होते.

आता जरा वेळ शांत बसावे म्हणून सोफ्यावर टेकले आणि पुसापुस राहूनच गेल्याचे लक्षात आले. आता मात्र प्रचंड राग आला. घड्याळाचा, कामाचा की रोज रोज तेच तेच काम करूनही नीट न करणाऱ्या कामवाल्या बाईचा ..काही कळाले नाही. खरच ह्या रोजरोज येतात, तेच तेच काम करतात ... तरीही हवी ती स्वच्छता का होत नसावी?? लहान बाळाला हळुवार हाताने पावडर लावावी तसे वरच्यावर घराला आणि घरातल्या कामाला हळुवारपणे गोंजारून पाळतात बहुदा पुढच्या कामाला. ह्या 'कामवाली' शब्दाची पण एक कमालच आहे. आपल्याकडे काम करणाऱ्यांना जसे 'कामवाली' म्हंटले जाते, तसेच त्या ज्या ज्या घरी काम करतात त्या घरच्या मालकिणीला त्या 'कामवाली' च म्हणतात. म्हणजेच आपल्यासाठी त्या कामवाली आणि त्यांच्यासाठी आपण.

बाकी काहीही असो, घरात बसून जशी त्वचा स्वच्छ होते, तशी घराची आणि बाथरूमची फारशी लख्ख झाली. भांडी नव्याने चमकायला लागली, कपड्यांचे रंग एकमेकांना लागेनासे झाले. घराला एक स्वच्छतेचा वास यायला लागला. आणि 'आता कामवाली आली की तिच्याकडे बघतेच' हा विचार ही मनात घर करू लागला.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 23, 2020

जिंकू किंवा मरू ..

जिंकू किंवा मरू ..

जगात दोन प्रकारचे लोक असतात, कर्ण आणि श्रीकृष्ण प्रवृत्तीचे. दोघांचा जन्म विचित्र वातावरणात झाला. दोघेही जन्मतः मातेपासून दुरावले. दोघांनाही वेळेत शिक्षण नाही मिळाले. राजवंशात जन्म घेऊन सुद्धा एकाला गोपपुत्र आणि एकाला सुतपुत्र म्हणवून घ्यावे लागले.

पण ह्या सर्व परिस्थितीचा दोघांवर झालेला परिणाम मात्र वेगवेगळा होता. 'माझ्यावर अमूक अमुक वेळ आली' अशी एकाने सतत तक्रार केली. तर आलेल्या परिस्थितीशी एकाने हसून मुकाबला केला आणि जी जशी मिळेल त्या संधीचे सोने केले.

आजूबाजूला जरा आजमावले तर ह्या प्रवृत्ती अजूनही सहज बघायला मिळतात. सध्या सगळ्यांच्याच मनावर आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणाव आहे. त्यातही काही लोक मात्र व्यवस्थित मार्ग काढताना दिसतात. एका वृत्तवाहिनीवर दाखवत होते, लाकडी सामानाचे दुकान असणाऱ्या एका गृहस्थांनी सध्या भाजी आणि फळे ह्यांना मिळत असलेला उठाव पाहून त्याच व्यवसायाला सुरवात केली. एकाने दूध विकण्याचे काम करू केले. कितीतरी शहरात रहात असणारे परंतु गावी शेती असणाऱ्या लोकांनी, आपल्या गावच्या लोकांशी संधान बांधून शहरातून भाजी आणि फळांच्या ठोस आगाऊ मागण्या नोंदवून त्याच्या विक्रीचा व्यवसाय नव्याने सुरू केला. कोणी घरगुती मास्क शिवून त्याच्या विक्रीतून पैसे कमावले. कोणी खाद्यपदार्थ, पाठ्यक्रम, कलाकारी, व्यक्तिमत्व विकास, नृत्य, विविध भाषा, इ. अनेक विषयांच्या ऑनलाइन शिकवण्या घेतल्या. हे सर्व त्या श्रीकृष्ण वंशावळीचे प्रतिनिधी.

काही लोक मात्र आता कसे होणार आणि काय होणार ह्या चिंतेत मग्न. अडचणीपेक्षा ह्या लोकांचा त्रास अधिक. समाजमाध्यमांवर कविता, लेख, एखादा मेसेज, चित्र, दुसऱ्याच्या लिखाणावर प्रतिक्रिया,इ कुठेल्याही प्रकारे व्यक्त होण्याची वेळ आली की ह्यांचा नकारात्मक सूर लागतोच लागतो. विचार करा ह्या लोकांच्या संपर्कात त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होत असेल. कोरोनाचा संसर्ग झालाच नाही तर बरे हा विचार सुद्धा ह्या लोकांना शिवत नाही. उलट कोरोनाची चाचणी किती महाग, दवाखाने पूर्ण भरलेले, रुग्णवाहिका नाही मिळत, कदाचित मरण सुद्धा येऊ शकते,इ विचारांनीच हैराण. घरात बसावे लागते, काम नाही, कांम बंद तर पैसे नाही, बाहेर पडावे तर कोरोना पकडले, नाही गेलो तर घरात बसावे लागेल हे असे विचारांचे चक्र त्याच त्याच रुळांवर परत परत फिरत रहाते. ह्यातूनच व्यसने, घरातल्यांचा शारीरिक, मानसिक छळ,इ. गोष्टी घडतात. त्याचा दुष्परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो.

प्रसंग आला आहे, त्याला तोंड देणे हा एकच मार्ग आपल्याकडे आहे. अनंत अडचणी आहेत, त्यातून मार्ग काढावाच लागणार आहे. कदाचित संसर्ग होईल, कदाचित नाही होणार. पन्नास पन्नास टक्के संधी आहे. लस उपलब्ध नाही पण काळजी काय घ्यायची ह्याची पूर्ण कल्पना आहे. पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद आहेत कारण साथीने संपूर्ण जगात उच्छाद मांडला आहे. जाऊन जाणार कुठे? जर लढायचेच आहे तर न रडता मनाची तशी तयारी करूयात. कोरोनाच्या साथीला हरवूयात.

कळावे, लोभ असावा

-Adv स्वाती आवटी दीक्षित

सत्तेचं राजकारण...

सत्तेचं राजकारण...

आई-वडिलांचा घटस्फोट होतो. आईचे दुसरे लग्न होते. आईची इच्छा 'नवीन वडिलांना' मुलांनी आपले म्हणावे. मूळ वडिलांना आता आई 'शत्रू' वाटायला लागली आहे. त्यांना वाटते, मुलांनी माझ्याबरोबर आई आणि नवीन वडिलांवर चिखलफेक करावी. का? वेगळे होताना मुलांना विचारले होतेत का ? मुलांनी तर तुम्हाला एकत्रच निवडले होते. त्यांच्यासाठी आजही तुम्ही एकत्र यावे हीच इच्छा आहे. नको आहेत त्यांना नवीन वडील. तेच जर हवे असते तर त्यांच्याच पोटी जन्म घेतला असता ना. तुमच्या कुटुंबाचा हिस्सा झालोच नसतो. आणि तुम्हाला आई नकोशी झाली, तुम्ही सोडली की तिने जन्मगाठ तोडली आम्हाला घेणे देणे नाही, पण तुमच्या चिखलफेकीचा भाग व्हायला आम्हाला सांगू नका.
उलट एक समंजस, समजूतदार पित्याच्या भूमिकेतून आमच्या पाठीशी उभे रहा.

मान्य आहे की कोर्टाने आमचा ताबा आईकडे दिला आहे. एकटीने मुले सांभाळण्याची तिची ही पहिलीच वेळ. तारेवरची कसरत करताना आणि नवीन कबिल्याशी जमवून घेताना होते आहे आमच्याकडे दुर्लक्ष, होते आहे आमची आबाळ. तर ती कशी चूक आहे, ती कशी कमी पडते, तिचे कसे लक्ष नाही सांगून आमची आबाळ थांबणार आहे का ?? त्यापेक्षा ती जिथे कमी पडते, तिचे जिथे लक्ष नाही, तिच्या जिथे चुका होतात ज्याच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो, तिथे आमच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. एक समांतर प्रणाली राबवा. जेणेकरून तिचा आम्हाला ह्या संकटकाळात उपयोग होईल. ज्याच्या भरवशावर आम्हाला ह्या अडचणीतून वाट काढायला मदत मिळेल. आधीच आम्ही बुडालेलो, त्यात आम्हाला हात देऊन बाहेर काढायचे की हातात फलकाचे ओझे देऊन अजून आत आत रुतवायचे??

आईचेही चुकलेच. तिच्या वडिलांच्या 'इच्छे'खातर तिने आम्हाला वाऱ्यावर सोडले. नव्या कुटुंबाच्या हवाली केले. पण आमची इच्छा काय आहे ? आम्हाला हवाय का नवा बाप? आम्हाला आवडतोय का हा नवा घरोबा ? केला का काही विचार ? तुमच्या ह्या नव्या तडजोडीत आमचे मन मोडलेस बघ तू. झाला असेल ना तुमच्यात वाद. चुकले असाल ना दोघांपैकी एक कोणीतरी. पण इतके टोक गाठलेत की तुमच्या अहंकारापुढे एकालाही आमची आठवण येऊ नाही ?? आणि तुझा तो भाऊ,शकुनीमामा, त्याला तिकडे स्वर्गात पाठवलाय कशाला?? आपल्या भूलोकीचे प्रश्न, मागण्या तिकडे मांडून आपल्यासाठी चांगल्या सोयी सुविधा आणायला ना?? आणि करतोय काय तो मामा, स्वर्गात बसून भूलोकीच्या पंचायती ?? उंटावरून शेळ्या हाकतोय नुसता. त्याचा सगळा जीव इथेच अडकलेला. पाठवला कशाला मग त्याला स्वर्गलोकीला?? कळीचा नारद कुठला... आग भडकली तर विझवायचं त्याच काम होत की अजून तेल ओतायचं?? आपली बहीण राणी व्हावी म्हणून भाचरांचा जीव घेतला त्यानं आणि वरून पोपटपंची चालूच. त्याच्या ह्या कृत्याची कधीही माफी देणार नाही हा भूलोक.

'आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देई ना' अशी अवस्था करून ठेवलीत तुम्ही दोघांनी आमची. तुमच्या भांडणात आम्हाला पडायचं नाही. त्या नव्या घरोब्याशी आमचे काही भांडण नाही पण आम्हाला काही घेणेदेणे पण नाही. आम्हाला त्यांच्याबरोबर नांदायला लावू नका. आणि त्या शकुनीमामाला आवरा. ज्या दिवशी तुम्हाला तुमची चूक उमजेल, परत एका घरात एकोप्याने रहायला लागाल, तेव्हाच आम्ही परत येऊ. तोपर्यंत तुमच्यापैकी एकाचेही तोंड बघायची आणि तुमच्या कोणाच्याही नादी लागायची आमची इच्छा नाही. कदाचित तुमच्या लक्षात येत नाहीये, काडीमोड एक नाही दोन झाले आहेत. एक तुमच्या दोघांमध्ये आणि दुसरा तुमच्या आणि आमच्या मध्ये.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#सेना #शिवसेना #भाजपा #विरोधीपक्ष #सत्ताधारी #राऊत

Friday, May 22, 2020

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥

परवा आईचा फोन आला, तुझे लेखरू(छोटा लेख) वाचले. थोडे रडवलेस, थोडे हसवलेस.

रडायला खरच वेळ आहे सगळ्यांकडे?? कोरोना एक तर बरा होतो नाहीतर फक्त पंधरा (१५) दिवस देतो. ताप येतो आणि उलटी गिनती सुरू होते. कोणी दहा(१०) कोणी पाच(५) कोणी पूर्ण एक(१) पर्यंत पोहोचून मगच निरोप घेतो आणि पितरांच्या भेटीला रवाना होतो. हे जर सगळं माहीत आहे तर जो आहे तो वेळ रडण्यात का वाया घालवावा ?? कदाचित तो आपल्याकडे वळून पहाणारही नाही, कदाचित पुसटसे चाटून जाईल, कदाचित गाढ आलिंगन देईल.... कोण जाणे काय आहे नियतीच्या मनात. कोरोना केवळ निमित्त.

सगळ्यांनीच आयुष्याची लढाई लढली आहे . कोणाची सौम्य, कोणाची कठीण, कोणाची महाकठीण असेल. पण त्याचबरोबर सगळ्यांकडे सुंदर, आनंदी, हसरे क्षण पण असतील. कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त, कोणाकडे प्रचंड साठा. लुटुयात ना ते सगळे आंनदी प्रसंग, करूयात ना यशस्वी क्षणांची लयलूट, सांगूंयात ना हसऱ्या गोष्टी सगळ्या जगाला, देउयात ना सुंदर प्रसंगांची वाणे एकमेकांना, जमवूयात ना गप्पांचा फड पुन्हा एकदा, वाहूदेत ना हास्याचे खळाळते धबधबे, जगुयात बेधुंद आयुष्य आपल्या आपल्या चौकटीत.

शाळेत चोरून खाल्लेल्या चिंचा-बोरे-कैऱ्या-चॉकलेट स्मरणात रहातात की शिक्षकांची बोलणी?? पालकांनी केलेले प्रेम सुख देऊन जाते की केलेली शिक्षा ?? भावंडांबरोबरच्या खट्याळ आठवणी हसवून जातात की लहानपणी केलेली भांडणे?? चांगला शेजार मनात कायम घर करतो की नाठाळ शेजार??

असे जर आहे तर आठवणी आठवताना रडक्या का आठवाव्यात?? प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगले-वाईट अनुभव आणि प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतात. जे जग आजूबाजूला आहे त्या जगातले चांगले बघावे, चांगले शिकावे, त्यांच्याशी चांगलेच वागावे हीच शिकवण दिली जाते ना? मग जे जग सोडून गेले, मागे पडले, आता आपल्याबरोबर नाही त्याची खंत न करता, त्या जगाच्या चांगल्या, मधुर, सुंदर आठवणीत का रमू नये?? आनंदाने त्या जगाची आठवण का काढू नये ?? भूतकाळ हा कायम रडकाच असावा का ??

एरवी असे म्हणत असत, भूतकाळ हातून सुटून गेला, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, उरला फक्त वर्तमानकाळ , तो भरभरून अनुभवून घ्या आणि भविष्याला भिडायला तयार रहा. पण सध्या वर्तमानावरच जर भविष्याची काळी सावली पडली आहे तर कसे जगणार भरभरून ?? केवळ भूतकाळातल्या सुंदर अनुभूतींच्या आधारेच ना ?? तोच एकमात्र आधार आहे प्रत्येकाकडे जगण्यासाठी, हसण्यासाठी, आनंदी होण्यासाठी आणि आठवणी मागे सोडण्यासाठी सुद्धा.

चला तर मग, रोज एक पुरचुंडी बांधुयात एका सुंदर क्षणाची, एका रोमहर्षक आठवणीची, एका सकारात्मक विचाराची, एखाद्य छान जुन्या मैत्रीची, काही निसटलेल्या नात्यांची, काही गवसलेल्या बंधनांची, नव्या-जुन्या खट्या-मिठ्या प्रसंगांची, आपलेपणाची, प्रेमाच्या ओलाव्याची आणि यशाच्या मानाची सुद्धा.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

लोकशाहीचा चौथा स्तंभ ..

लोकशाहीचा चौथा स्तंभ ..

खिळखिळीत झाला आहे का ?? की कुठल्या एखाद्या (अ)राजकीय खिळ्यावर अडकून पडला आहे ?? जगात कोरोना आहे ... मान्य. पण फक्त कोरोनाच आहे असे नाही. बाकी जग पूर्वी होते तसेच आहे, त्यात फक्त कोरोनाची भर पडली आहे. समजतंय का तुम्हाला हे?? की समजत असून पण समजून घ्यायचे नाही असे ठरले आहे ??

कोरोनाच्या बातम्या द्या ना ... जरूर द्या. नव्हे दयायलाच हव्यात. पण किती वेळ आणि किती वेळा ?? तुम्हाला बातम्यांचे एक वेळापत्रक नाही का ठरवता येत ?? दिवसभरातले 2 तास, सकाळी एक आणि संध्याकाळी एक, कोरोनासाठी ठेवता येतील. उरलेल्या वेळात जरा उर्वरित विषयांबद्दल बोलता येणार नाही का ?? की धडधाकट लोकांना कोरोनाने नाही पण त्याच्या विचारांनी घाबरवून हृदयविकाराने परलोकी पोहोचवूयात नाहीतर नैराश्याने ग्रासवूयात असा काही विचार आहे तुमचा ?? की विचारशक्ती कुंठित झाली आहे तुमची ?? की क्रय शक्ती संपुष्टात आली आहे ??

'ब्रेकिंग न्यूज' ची पण जमले तर एखादी 'योग्य' व्याख्या बनवा. आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. अभ्यास म्हणून मागच्या महिनाभरातल्या सगळ्या 'ब्रेकिंग न्यूज' पुन्हा एकदा बघा. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली काय काय खपवले आहे त्याचा जरा खरोखरच आढावा घ्या. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा 'लोक आज घरात अडकले आहेत, तेही थोड्या काळाकरीता, कायमचे नाहीत'. आज त्यांच्याकडे पर्याय नसेल दूरचित्रवाणी बघण्याशिवाय, पण ही परिस्थिती कायम रहाणार नाही आहे. उद्या 'कोणी प्रेक्षक देता का प्रेक्षक' अशी भीक मागायची वेळ तुमच्यावर येऊ शकते ह्याची जाणीव ठेवा.

गरजवंत आणि गरजेला धावून जाणारे सगळ्यांचीच तुम्ही बातमी करतात ना ?? मग त्यांच्या मधला दुवा होण्याचा का नाही प्रयत्न करत?? 'इथे हे नाही आणि तिथे ते नाही' अशी बोंबाबोंब करण्यापेक्षा जिथे ते मिळू शकते किंवा जे ह्या गैरसोयीनसाठी मदतीचा हात बनून पुढे येऊ इच्छितात त्यांच्यापर्यंत ती गैरसोय नेऊन त्या दोन दुव्यांना का नाही जोडायचा प्रयत्न करत ?? जेथे अन्नाची नासाडी होते, तेथे का नाही कमतरता असलेल्या विभागांची माहिती पोहोचवली जात ?? पूर्वी काहीही बातमी कळाली की खातरजमा करण्यासाठी पत्रकारांना किंवा वृत्तपत्र कार्यालयात फोन केला जात असे. आज ती विश्वासार्हता बरकरार राहिली आहे ??

वृत्तवाहिनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक सर्वेक्षण करावे. तुमच्या घरातील, ओळखीतील दहा(१०) आठवी ते बारावी आणि बारावी ते पदवी मध्ये शिकत असलेल्या मुलांना प्रश्न विचारावा की ती मुले तुमची किंवा कोणतीही, कोणत्याही भाषेतील वृत्तवाहिनी बघतात का ?? नाही उत्तर असेल तर 'का' ?? तुमचे तुम्हाला उत्तर मिळेल. काय कार्यक्रम आहेत तुमच्याकडे ह्या मुलांसाठी ?? त्याच त्याच (अ)राजकीय बिनडोक चर्चांचा तुम्हाला कंटाळा नाही आला ?? काहीतरी वेगळे करावे असे नाही वाटत तुम्हाला??

बर चला, जरावेळ असे गृहीत धरू की तुमच्या वाहिनीचा एक ठरलेला कार्यक्रम असतो तुम्हाला त्यातच नाचावे लागते. कलाकार आणि विषय तरी बदला ना त्या नाचकामाचे. थोडा दर्जाचा कधीतरी विचार करा. काय हरकत आहे रात्री दहा(१०) ते अकरा(११) वीस(२०) ते तीस(30) वयोगटाच्या तरुणांसाठी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाची आखणी करायला?? रात्री नऊ(९) ते दहा(१०) आठवी ते बारावीतल्या मुलांसाठी राखीव ठेवायला?? कार्यक्रमाची आखणी म्हणजे एखादा प्रौढ प्रज्ञावंत बोलावून त्याने मुलांना कारकीर्द, व्यवसाय ,इ विषयांवर बोलून कंटाळा आणणे नव्हे. मुलांना येऊ देत ना समोर, त्यांना बोलू देत त्यांच्या मनातले. मुलांनी मुलांसाठी मुलांचे कार्यक्रम असे कार्यक्रमाचे स्वरूप का असू शकत नाही ?? सतत कंटाळवाण्या लांब चेहेऱ्याच्या लोकानी येऊन अक्कल  शिकवणे म्हणजे चांगला कार्यक्रम ?? ही व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे. नाही बदललात तर ही तरुण पिढी वृत्तवाहिनीला पर्याय शोधायला जराही मागेपुढे पाहणार नाही.

आणि हो, 'सूत्रां'च्या नावाखाली वेड्यात काढण्याचे लाजिरवाणे प्रकार जमले तर थांबवा. खणखणीत खरी बातमी देता येत असेल तर द्या म्हणजे सारखा 'सूत्रां'चा बुरखा पांघरण्याची गरज भासणार नाही. वाहिन्या बदलत असताना चुकून वृत्तवाहिनी दिसली तर अजीर्ण होऊन उलटी होते की काय असे वाटण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमचा प्रवास. 'जब गीदड़ की मौत आती है, तो वो शहर की ओर भागता है' ह्याचा अर्थ असा , जेव्हा एखाद्यावर वाईट वेळ येणार असेल तर ती मुसीबत, ती वाईट वेळ त्याला आपल्याकडे बोलावून घेते. सध्या तुमचे काहीसे असेच झाले आहे.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#पत्रकार #पत्रकारिता #वृत्तवाहिन्या #बातम्या

Tuesday, May 19, 2020

हम पांच

हम पांच

आट पाट नगर होतं. नगरात एक सुंदर वसाहत होती. त्या वसाहतीत एक कुटुंब अक्षरशः धुमाकूळ घालत होतं. धुमश्चक्रीचे कारण होते त्या कुटूंबातील पांच पांडव. सगळे प्रकार होते त्या घरात. कलाकार, नकलाकार, चित्रकार, भयंकर चित्रकाढ, गायक, केकाटे, लेखक, न(व)लेखक, नाचरे मोर, वाकड्या अंगणातील लांडोर, अज्ञाधारी, हेकेखोर, सुंदर-सुघड-व्यवस्थित, अजागळ-गबाळे, गुंड, रडुबाई, गडगडाटी हास्य ते मानातल्यामनात हास्य. सगळ्या गुणावगुणांचे एकत्र चित्र. त्यामुळेच त्या घराला बाहेर फारशी मैत्री शोधायची गरज पडली नाही. मुळात घरातील जेष्ठ श्रेष्ठ म्हणजे एक एक विद्यापीठ ... आपोआपच सगळ्या गोष्टींची शिकवण घरातच उपलब्ध. पाच (५) दणदणीत योध्ये न तयार होते तरच नवल. लांबून पाहणाऱ्याला कायम कुतूहल असायचे त्या घराबद्दल. त्या घरात कोणीही कोणालाही काहीही भेटवस्तू दिली तर त्याच्यावर पाचही जणांच्या नावाचे अद्याक्षर लिहिले जाई 'PSTAR'

त्यातला सगळ्यात लहान, दिसायला अतिशय शांत, लांबून बघणाऱ्यांसाठी प्रचंड समजूतदार मुलगा, भाच्यांना उंच कपाटावर उचलून ठेवणारा व्रात्य मामा, भाऊबीजेला मुद्दाम एका विशिष्ट बहिणीला पायाला तेल लावायला लावणारा आणि ते पाय नुकतेच कुठे कुठे जाऊन आले होते ते सांगून रडायला लावणारा नटखट भाऊ, बाबा जिथे जातील तिथे त्यांच्या बरोबर जाणारा आणि आईच्या कारल्याच्या भाजीवर नितांत प्रेम करणारा मुलगा, मित्रांवर स्वतःचा जीव आणि बहिणींनी त्याच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू ओवाळून टाकणारा मित्र, दूरचित्रवाणीवर सतत फक्त प्राण्यांचे  कार्यक्रम पहाणारा, पंजाबी गाणी ऐकणारा, उत्तम गाडी चालवणारा, पोहणारा सहा (६) फूट उंच धाकटा पांडव. पारिजातची लस्सी आठवणीने आणणारा. लहान असताना एकदा रिकामा ग्लास तोंडाला लावून हवा आत ओढायचा उद्योग करता करता तोंडाचा आकार हनुमानासारखा झाला होता, इतके हसले होते सगळे खोखो. खूप चिडवले होते त्याला , आता हे तोंड असेच रहाणार म्हणून. आठवड्यातून एकदा वीज जात असे. TV बघता बघता बंद झाला, त्याने TV च्या मुंग्या बघून मनाने गोष्ट तयार करून सांगायला सुरुवात केली 'एक बाई जा रही थी, उसके कडेपर एक मूल था' पुन्हा घरात सगळे खोखो. शिंगोळे त्याला आणि आर्या ला खूप आवडतात. 'मामासाठी ठेवले आहेत' असे आज्जीने बजावून देखील आर्याने त्याचे शिंगोळे पळवावेत. कधीही बहिणींनी विचारले, काय आणू तुला ? तर ठरलेले उत्तर असते 'काही नाही रे, तुम्ही या फक्त'. मामाची खोली मुलांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. तो पण येऊ देतो, मस्ती करू देतो. त्याने सहज एकदा फणसाची रोपे लावली, दर वर्षी म्हणायचं यंदा फणस येणार पण फणस त्याला काही दाद देत नव्हते. आता मात्र भरपूर फणस लगडतात त्या झाडाला. रुपाचा डिलिव्हरीचा दिवस जवळ जवळ येत चालला होता, तिचा भाऊ भैय्या ही त्याच वयाचा पण तिने ह्याला सांगून ठेवावे 'तुला मला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे, रात्री फोन केला तर लगेच उठशील ना', केवढा विश्वास. त्याच्या गाडीत कायम पंजाबी गाणी लावलेली असतात, घरातले सगळे ओरडतात काहीतरी वेगळे लाव म्हणून. पंजाबी मुलगी पटवली का म्हणून पण चिडवतात. त्याच्या इतके कुशल गाडी चालवणे फार दुर्मिळ. कोणाच्या अध्यात मध्यात नाही. कधी कोणाला नावे ठेवणे नाही, घरात कधी काही कोणाबद्दल बोलताना ऐकले तर म्हणेल 'झाले का तुमचे सुरू'. घरी न सांगता गुपचूप खरेदी करण्यात त्याच आणि बहिणीचे संगनमत. त्यावरून दोघांनी कितीवेळा आईची बोलणी खाल्ली असतील. सगळ्यांमध्ये असून सगळ्यातून अलिप्त नर्म विनोदी सगळ्यांना मदत करणारा 'मुन्ना'.

अत्र तत्र सर्वत्र संचार असणारी, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी बोलणारी, वर्गात असणाऱ्या सगळ्या मुलींशी मैत्री करणारी पण जवळची मैत्रीण तिन्ही काळात आणि साता जन्मात एकच असणारी, सतत कुठेतरी प्रवेश घेऊन काही न काही शिकत राहणारी, वडिलांचा चमचा असलेली, सगळ्यात धाकटी बहीण. लहानपणापासून ''मरतुकडी' शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजे आपणच' असे समजणारी. त्यामुळे झिरो फिगर आपोआप मिळालेली, 'तुमच्या मुलीचा हात चांगला आहे' असे चित्रकलेच्या सरांनी आईला सांगितल्यावर त्यावर पण विनोद करून हसणारी, 'तुझ्या पाठीवर भाऊ आहे' म्हंटल्यावर रडत रडत घरी येऊन 'पाठीत बाऊ आSSSSSहे' म्हणून भोकाड पसरणारी. पावडर लावून गोरी झालेली, घरात सगळ्यात जास्त पदव्या मिळवणारी सगळ्यात धाकटी, लाघवी 'बाळ' उर्फ कन्स्ट्रक्शन.

'तीन नंबर ची बहीण आहे तुला?' किंवा 'तुम्हाला अजून एक मुलगी आहे?' असा प्रश्न जीच्याबाबत पडत असे अशी एक अदृश्य बहीण पण आहे त्या घरात . साधारण घरात असताना ती आईच्या पदरापाशी, तिच्या मागे मागे किंवा मुलींच्या खोलीत हातात पुस्तक , डोळ्यावर चष्मा अशा अवस्थेतच सापडू शकते. फक्त शाळा किंवा कॉलेज साठी बाहेर पडणार. घरी आली की परत आत गुडूप, अंगणात देखील दिसणार नाही. बाबांनी कधी बागेत काम करायला सांगितले तर घरापासून बागेपर्यंतचे अंतर अख्खे अंगण ओलांडून पार करावे लागेल ह्याचाच तिला अधिक ताण. आयुष्याशी करार केल्याप्रणाने एकावेळी एकच मैत्रीण. तिथेही फार पसारा नको. ठाम मते, साजूक तुपाचे व्यसन आणि दह्यादुधाचे वावडं असणारी , सुंदर हस्ताक्षर आणि बुद्धीचे वरदान मिळालेली आईची लाडकी 'बबडु'.

दोन नंबर म्हणजे एकदम मुलगी सारखी मुलगी, कोणत्याही पालकांना जशी मुलगी असावी असे वाटते एकदम तशी. मुलगी गोरी असलीच पाहिजे शिवाय नाकी(?) डोळी नीटसं, तर ती आहेच. शिवाय आईला घरात मदत, हो करते.... अभ्यास ? न सांगता. धाकट्या भावंडांना सांभाळणे, घरात पसारा न करणे, आज्ञाधारक, हळू बोलणारी, घाबरट, नीट आवरून सावरून वेळेत शाळेत जाणारी, शाळेतून एकही तक्रार घरी न आणणारी, कॉलनीत कोणाशीही न भांडणारी, घर,क्लास, शाळा,अभ्यास, खेळ सगळं वेळेत आणि मापात. अडचण फक्त एकच चित्रकला आणि नृत्यकला. चौकोनी खांद्याचा आईस्क्रीमवाला आणि पडदा-कोळी डान्स ची जनक, बाबांची लाडकी रडुबाई 'नकटी'.

आता राहिला फक्त एक धटिंगण. साधारण एखाद्या गुंडाला शाप मिळून त्याला मुलगी म्हणून जन्माला यावे लागले तर जे काय समोर येईल तो प्रकार म्हणजे 'दंताळी'. धसमूसळी, वटवटी, अवतार ह्या शब्दाला पूरेपूर न्याय देणारी, गुंडागर्दी, अक्राळविक्राळ हसणारी, सायकल असो की गाडी जोरात पिटाळणारी, मुलगी ह्या व्याख्येत कुठेही न बसणारी अशी दंताळी.

ही झाली फक्त ओळख. जेव्हा हे पाच(५) पांडव एकत्र येत असतील, तेव्हा कल्पना करा त्या घराची काय अवस्था होत असेल. सतत हालत असत ते घर गडगडाटी हास्याने आणि गप्पांच्या फडाने, सोबत असतो स्वयंपाकघरातून येणारा सुग्रास दरवळ. एक सुगंधित आनंदी घर.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 16, 2020

सातशे खिडक्या नऊशे दारं..

सातशे खिडक्या
नऊशे दारं..

किती खिडक्या, खिडकीमय आयुष्य झाले आहे आपले. इथून डोकाव तिथून डोकाव, किती डोकवायचे, किती पहायचे .... बाहेर पहातापहाता एखादवेळी अंतर्मन हरवून जायचे.

खूप आपली अशी पहिली डोळ्यांची खिडकी, नजर किंवा नजरिया दोन्हीही. आपल्याला सगळे कळायला लागले वाटत असतानाच पटकन बाहेरचे वेगळे चित्र बघायला लावणारी. समजता समजता हातून निसटून जाणारी. कुठेतरी ठाम होता होता, तू चुकलीस सांगणारी. सगळे सम्पले वाटत असताना आशेचा किरण दाखवणारी. सगळे जग पिणारी, पण तरीही अलिप्त राहणारी. कोणाच्यातरी नजरेच्या खिडकीत रेंगाळणारी, कोणाचीतरी नजर चोरणारी, कोणाला तरी टाळणारी, कोणाकडे पाहून आग ओकणारी, कोणालातरी सज्जड दम भरणारी, कोणावर तरी नजर रोखणारी, कोणावरची नजर हटू न देणारी, कोणालातरी सतत नजरेच्या टप्प्यात ठेवणारी. खट्याळ-मदमस्त-गूढ पण मनातले सगळं सांगणारी नजरेची खिडकी.

नकळत ओळख झालेली घराची खिडकी, आतले जग आणि बाहेरचे जग आपआपल्या जागी ठेऊन दोघांच्या मधला दुवा होणारी. पूर्वी आतून बाहेर डोकावता यायचे ह्या खिडकीतून. ती पूर्वी आतल्या लोकांसाठीच तर होती. बाहेर वारा वहातोय, चंदा मामा आला आहे, चांदणे पडले आहे की नाही, पाखरे उठलीत की नाही, सुर्यरावांच्या मनाचा कल काय आणि कसा आहे, पावसाची धार , थंडीचा थरकाप, झाडांची सळसळ सगळं सगळं आतल्या लोकांना संगायचा चोंबडेपणा करणारी घराची खिडकी. हल्ली फितूर झाली आहे मात्र. काल पक्ष्यांना बाहेरून आत अडकलेली माणसे दाखवत होती, सूर्याला आतली खरबात कळवत होती, चंद्र आणि चांदण्यांना हळूच आत डोकावू देत होती. आज तर कहर झाला, वाऱ्याला हाताला धरून आत घेऊन आली, यथेच्छ खेळले दोघेही, आणि आली तशी घेऊन पण गेली त्याला. माहीत होते ना तीला, दारातून बाहेर पडून कोणी आता वाऱ्याचा पाठलाग नाही करू शकणार... त्याचाच फायदा घेऊन, घरातून बाहेर डोकावणारी खिडकी आता बाहेरून घरात डोकावू लागली होती.

ठरवून ओळख करून घेतली होती दूरचित्रवाणीच्या खिडकीशी. बाहेरचे वेगळे , माहीत नसलेले जग बिनधास्त दिवाणखान्यात आणले ह्या खिडकीने. बातम्या, मालिका, जाहिराती, इ मधून बघू लागलो मोहात पाडणारे नवीन जग. सगळं कसं नवीन, चकचकीत, सुंदर, हिरवेगार, मखमाली, गोंडस जग होते त्या खिडकी पलीकडचे. त्या सुरेख जगापुढे मग आमचे आजूबाजूचे रोजचेच राखाडी जग अगदी जीर्ण आणि रसहीन वाटू लागले. आई असावी तर जाहिरातीतल्या आई सारखी, मुले असावीत तर मालिकांमधल्या मुलांसारखी, पालक असावे तर सिनेमात दाखवतात तसे आधुनिक, भाऊ असावा तर हिरो सारखा, बायको असावी तर सिनेमातल्या नायिकेसारखी, बहीण तर अगदी गात गात राखी बांधणारी आणि काहीही न मागणारी असावी. त्या सिनेमा, मालिकांसारखे आपले घर सतत आवरलेले असावे, घरात उंची कपडे घालून बसावे, अशा काही अवास्तव कल्पनांना आमच्या घरात आणून सोडले होते त्या खिडकीने. संध्याकाळी सगळं घर एकत्र जमायचं, खिडकी समोर... एकत्र तरीही एकटे. आपापल्या नजरेने खिडकीकडे बघत. बाकी काही नाही पण आमच्या गप्पांचे विषय बदलवले ह्या खिडकीने.

कालांतराने अंगावर अक्षरशः आदळली ती मोहजालाची खिडकी.. वेड लावणारी. आधी उत्सुकता म्हणून नंतर गरज म्हणून आणि आता व्यसन म्हणून अडकून पडलो आहेत त्या बंद खिडकीपुढे. बंदच की, जेव्हा जे जसे हवे ते तेवढेच दाखवते. दूर दूर पर्यंत पाहता येते पण दूरचे दिसणे मात्र कमी करते. सगळं लक्षात असत तिच्या . काहीही विचारा उत्तर तयार, जबरदस्त स्मरणशक्ती आपल्या बुद्धीला मात्र गंज चढतो की काय भीती निर्माण करते. ही जवळ असली की दुसरे कोणी कोणीही नको. गरजच काय मग माणसाला माणसाची. एकदा ह्या खिडकीत डोकं अडकवल की वर्तमानपत्र, पुस्तक, वाचनालय, निसर्ग, जिवंत माणसं कशाचीही गरज नाही. सगळे खिडकीतच भेटतात. जन्मापासून मारणापर्यंतचा प्रवास तिथूनच एकमेकांना दाखवतात. अगदी सणवार, वाढदिवस सुद्धा खिडकीतच साजरे होतात. फक्त गप्पा तेवढ्या कायमच्या हिरावून घेतल्या तिने. ह्या खिडकीचे एक बरे असते तिथल्यातीथे कार्यालयाचे काम, निसर्ग, नातेवाईक, करमणूक, इ सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी. कदाचित... भविष्यात... मरणही.

आणि आयुष्याची खिडकी. खिडकीतच बसून खिडकीतच बघायचे, खिडकीच अनुभवायची आणि सगळे अनुभव परत खिडकीबरोबरच वाटून घ्यायचे. रडायचे, हसायचे, जिंकायचे, हारायचे, चिडवायचे, चिडवून घ्यायचे, प्रेमात पडायचे, विरहात झुरायचे, पुस्तकं वाचता वाचता कधी आयुष्य वाचायचे, नाचायचे, गायचे, बागडायचे, खेळायचे, थंडीत कुडकुडायचे, पावसात भिजवायचे, वाऱ्यावर डोलायचे, उंच उडायचे आणि कधी कधी धपकन आपटायचे.... काहीही होवो पण ह्या खिडकीतच रमायचे.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Sunday, May 10, 2020

मातृदिन ..

मातृदिन ..

एकच असतो का ?? ज्या दिवशी आपण कोणाला 'आई' चा दर्जा देतो, किंवा आपल्याला तो दर्जा प्राप्त होतो तो दिवसही मातृदिनच की. ज्या दिवशी निसर्ग, आपली पृथ्वी आपल्याला आवडू लागते तो दिवस, मातृभूमी बद्दल आतून प्रेम आणि अभिमान वाटू लागतो तो दिवस, मातृभाषेबद्दल मनापासून आदर वाटू लागतो तो दिवस..... असे कितीतरी मातृदिन आयुष्यात येत असतात. मुळात 'मातृत्व' ही संकल्पना एका नात्या पुरती मर्यादित कधीच नव्हती. त्याची व्याप्ती विचारांत, कल्पनेत आणि आवाक्यात येणार नाही इतकी व्यापक.

सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की जगाच्या पाठीवर कुठेही जा, मातृत्वाबद्दलचा विचार एकच. आदर फक्त आदर. असे नाही होत की अमुक देशात मातेला इतके वाईट वागवले जाते, अशी उदाहरणे नक्कीच आहेत, पण ती सगळ्याच देशात थोड्याफार फरकाने अपवादात्मकरीत्या सापडतात. मातृभूमी, मातृभाषा, पृथ्वीमाता म्हणजेच निसर्ग आणि जननी सगळ्यांच्याच बाबतीत कधी न कधी चुकणारी लेकरे सगळ्याच युगात आणि सर्वच देशांत जन्मली. सर्व जगात, सर्व काळात, सर्व देशात, सर्व युगात वाईट वागणारे मातृत्व पण होतेच की. तरीही कधीही मातृत्व आणि चूक/वाईट/दुष्ट ह्यांची सांगड घालायला मन तयार होत नाही. उदात्त, उत्तम, सुंदर, पवित्र ते मातृत्व हा विचार सर्व पिढ्यांत सगळ्याच देशांत स्वीकारला गेला आहे.

जसे भूमी, भाषा आणि निसर्गात मातृत्व शोधले जाते तसेच कितीतरी नात्यांत पण ते परावर्तित होताना भासते. एखादी मावशी, एखादी काकू, बहीण, मैत्रीण, कोणी शेजारी, ओळखीचे आणि कधी कधी अगदी अल्पकाळ निसटत्या ओळखीचे अनोळखी. चोचीत दाणा भरवणारी पाखरे, पिल्लाना सुरक्षित ठिकाणी तोंडात पकडून नेणारी मांजरे, जन्मल्या जन्मल्या लाथ मारून स्वतःच्याच पोटच्या पिल्लाला उठवणारे प्राणी, जन्मतः पिल्लाना किनाऱ्यावर सोडून जाणारे कासव, प्रत्येकाची मातृत्वाची संकल्पना आणि पद्धत वेगळी. हेतू मात्र एकच, पिल्लांना सुसज्ज करणे, समर्थ करणे.

आपल्या समाजात अजून एक मातृत्व आहे. देवी-देवतांत दिसणारे, जाणवणारे मातृत्व. देवी तर देवी पण देवात सुद्धा माऊली दिसू शकते इतकी अध्यात्मिक मातृत्वाची ताकद. एक गोष्ट मात्र सगळीकडेच समान ती म्हणजे विश्वास. मातृभू, मातृभाषा, माता आणि धरणीमाता कधीही विश्वासघात करणार नाहीत, कधीही एकटे सोडणार नाहीत, सदासर्वदा, सर्व प्रसंगात साथ देणार हा विश्वास. ह्या विश्वासाच्या जोरावर तर आयुष्याच्या सगळ्या लढाया लढल्या आणि जिंकल्या जातात. गम्मत म्हणजे कोणीही, कधीही, कितीही शक्तिशाली असो, मातृत्वासमोर मोठा होऊच शकत नाही. हा लहानपणाचा भावच बहुदा मातृत्वाची ओढ कायम ठेवतो. आनंदात, संकटात, दुःखात, अडचणीत, यशात कोणीतरी सहभागी होणारे आहे ही खात्रीच बहुदा मातृत्वाच्या संकल्पनेचे यश आहे. ती लहान असण्याची जाणीवच मातृत्वाच्या नुसत्या उच्चाराने डोळ्याच्या कडा ओलावत असणार.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

Saturday, May 9, 2020

आलीया भोगासी असावे सादर

आलीया भोगासी
असावे सादर

काम करायचे काही वाटत नाही पण तेच काम जेव्हा परीक्षा पहाते तेव्हा मात्र 'मै तेरा खून पी जाऊंगी' वगैरे वाटायला लागते. काही कामे कशी बिनबोभाट होतात पण काही कामांचा आवाका आणि फाफटपसाराच इतका की जीव नको नको करतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर ही भांडी 'असून अडचण नसून खोळंबा'. तुम्ही कोणत्याही प्रहरी कोणतेही काम करा भांडे धुवायला निघाले नाही असे होतच नाही. केर काढला, कशाच्यातरी खाली केव्हातरी पडलेले भांडे सापडते. फर्निचर पुसा, कोणाची तरी वाटी, ताटली, कप,चमचा, पेला / ग्लास काही न काही मिळणारच. ओटा आवरला, भांडी निघणारच. स्वयंपाक हे तर भांड्यांचे माहेर घरच. 'तुम फोडणी दो, मै भांडी दुंगा' असच तो स्वयंपाक मनातल्या मनात नक्की म्हणत असणार. साधा चहा करा ना, चार (४) तरी भांडी निघणारच. नाश्त्याची वेगळी, दुपारचे जेवण, चारचा चहा, रात्रीचे जेवण. अष्टोप्रहर भांडी, ओटा, फडके, पाणी ,साबण आणि आपण. व्यवस्थित सगळी भांडी घासून, धुवून, पालथी घालून ओटा,गॅस पुसून आपण हाश्शहुश्श करत बाहेर जाण्याचा विचार करावा तर गॅस च्या मागून गरम भांडी ठेवायच्या तबकड्या, चिमटा/पकड किंवा एखादे छोटेसे भांडे आपल्याकडे बघून चक्क वाकुल्या दाखवत असते. त्याच्याशी लढाई उरकून एकदाचे बाहेर पडावे तर एखाद्या टेबलावर, चौपाईवर, फरशीवर कोणीतरी चुकून विसरलेला, कंटाळा आला म्हणून ठेवलेला किंवा नंतर उचलू म्हणून रेंगाळलेला एखादा कप, पाण्याचं भांड नाहीतर वाटी आपल्याचकडे अतिशय कुत्सित नजरेने बघत असते. असलं डोक्यात जात ना त्या भांड्याच ते बघणं. साला, पूर्वजन्मी किंवा सतयुगात कोणा ललनेने एखाद्या भांड्याची कु-चेष्टा केली होती की काय, जो ह्या कलियुगात तो शाप फेडायला जगातल्या तमाम महिलांच्या मागे ही भांडी हात धुवून लागली आहेत ?? बर ह्या भांड्यांचे कापड्यांसारखे नाही, ह्या लॉट मध्ये नाही लागले तर बादलीत ठेवले आणि पुढच्या वेळेस धुतले . बिलकुल चालणार नाही. तुम्ही त्यांना ठेवाच, रागाने इतकी कडक होतील की घासघासून हात झीजून जातील पण भांडी निघतील तर शपथ.

झाडू- पोछा चे बरे असते, एकदा तुम्ही घर झाडले म्हणजे झाडले. विषय संपला. घर पुसले म्हणजे पुसले. पण हा गुण पसाऱ्याच्या अंगी अजिबात नाही. सगळा पसारा आवरला असा गोड गैरसमज करून आपण दुसरीकडे मोर्चा वळवावा तर लगेच कुठूनतरी टॉवेल, चप्पल, बूट, एखादे भांडे, वर्तमानपत्र, पुस्तक, सुई-दोऱ्याचा डबा, कॅरम च्या सोंगट्या, पत्ते, हातरुमाल, मोजा,पेन, इ काहीही कुठूनही येऊन पडते. ठेवणाऱ्याचा कधीच तपास लागत नाही. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. शेवटी काय पुन्हा पसाऱ्यावरून हात फिरवणे आलेच. धुळीचेही काहीसे असेच. एका खोलीतील धूळ झटक-फटक करून, डेटॉल च्या पाण्याने पुसापूशी करून पुढे जावे तर त्या ओल्या पृष्ठभागावर धुळबाई परत ठाण मांडून बसलेल्याच. आरे खिडकी बंद करा रे , आरे दारे लावा रे, आरे पंखा मोठा करा रे .... 'ए बाई, भीक नको, पण कुत्र आवर, नको तुझी ती पुसापुशी, आम्ही धुळीत एकदम मजेत आहोत' असे म्हणायची वेळ घरच्यांवर येते.

एखादे काम एकदा करून सम्पवून टाकले की बरे वाटते. पण काही कामं चेंगटच असतात. एकदा भिजवा, मग धुवा, परत वाळत टाका, वाळलेले काढून आणा, आणलेले घडी घाला आणि सरतेशेवटी घडी घातलेले कपाटात ठेवा. केवढे ते लांबण. सर्वकाळ चालूच. सकाळी भिजवा ते रात्री कपाटात ठेवा पर्यंत दिवसभर ह्या कपड्याची टूमटुम चालूच. हँगर ला लावायचे वेगळे, सरळ वळत घालायचे वेगेळे, सावलीत वेगळे, उन्हात वेगळे, पांढरे वेगळे, रंगीत वेगळे, निळीत बुडवायचे वेगळे, टिनोपॉल मध्ये वेगळे, स्टार्च करायचे अजूनच वेगळे, नाजूक रेशमी हळूच पिळायचे, लोकरीचे बिलकुल नाही पिळायचे.. किती नाटकं ही.

न्हाणीघर/बाथरूम धुण्याचे अजूनच वेगळे तंत्र. लाल हारपीक, निळे हरपिक, फिनेल, बेसिन धुवायचा ब्रश, बाथरूम धुवायचा ब्रश, कमोडचा वेगळा ब्रश,खालची फरशी पुसायचे फडके, टाईल्स पुसायचे वेगळे, बेसिन चा प्लॅटफॉर्म पुसायचे अजून एक वेगळे.... आरे किती लक्षात ठेवायचे रे. एवढे करून झाले का?.... तर नाही. कोणीतरी म्हणतेच आज डेटॉल नाही टाकले का ? बाथरूम फ्रेशनर सम्पले आहेत का ? डांबराच्या गोळ्यांचा जरा जास्तच वास येतोय,इ. 'बच्चे की जान लोगे क्या?'

आमची आई नेहमी म्हणायची 'हे स्वयंपाकघर सदा व्यायलेलेच असते'. आमचे बाबा समाजकारणात/राजकारणात असल्याने घरी जाणे येणे खूप, त्यामुळे ते स्वाभाविकच होते. पण सध्या तर सगळे आपापल्या घरात स्थानबद्ध आहेत. कोणी कोणाकडे जाऊही शकत नाही. तसेही शहरात विशेष जाणे येणे नसतेच. पण तरीही सध्या ह्या स्वयंपाक घराने नुसता उत आणला आहे. चहा, नाष्टा, मिल्कशेक, लस्सी, दुपारचे जेवण, काहीतरी गोडाचे, चारचा चहा, काहीतरी तोंडात टाकायला चमचमीत वगैरे, रात्रीचे जेवण, इ इ... त्यात आंब्याचा हंगाम, आमरस, आम्रखंड, पन्ह, तात्पुरते लोणचे, गोजे, कैरीची चटणी संपतच नाही यादी. ह्यातून सुटका व्हावी तेवढ्यात कोणीतरी समाजमाध्यमांवर सूप, केक, चीज-चिली टोस्ट, पास्ता पासून जूस , घरगुती वाइन पर्यंत काही न काही चिकटवतात. नेमके तेवढेच मुलांच्या पहाण्यात येते. त्यांच्या अंगात स्वयंपाकी संचारतो आणि ठरवलेला पदार्थ बनवून ते ऐटीत बाहेर पडतात. कौतुकाने स्वयंपाकघरात डोकवावे तर ते अक्षरशः व्यायलेले असते.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, May 8, 2020

गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ

गाढवाचा गोंधळ
व लाथांचा सुकाळ

म्हणजे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ घालवणे. ज्यांचे लॉक डाऊन मूळे नुकसान झाले आहे, ज्यांना प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्याप्रती सहानुभूती आहेच. पण त्याचबरोबर काही प्रश्न ही आहेतच. ज्याची उत्तरे कोणीच देत नाहीत. किंबहुना तसे प्रश्न विचारणे सुद्धा पाप समजले जाण्याचीच शक्यता अधिक.

पालघर मधली घटना अतिशय संतापजनक आणि हृदयद्रावक अशीच आहे परंतु सगळे मोह-माया-पाश सोडलेले संन्यासी अशा कोणत्या मोहापायी सरकारी आदेश झुगारून प्रवासास निघाले होते ? आप्तस्वकीयांच्या अंतिम दर्शनाचा मोह सर्वसामान्यांना होणे स्वाभाविकच पण साधू-संतांकडून ही अपेक्षा नाही.

तान्ही मुले,बायका, म्हातारे कोतारे, बाचकी-बोचकी घेऊन उन्हा-तान्हात ट्रक च्या टपावर बसून प्रवास करणारे मजूर पाहिले की अत्यंत दुःख होते परंतु एक प्रश्नही पडतो, ज्या अर्थी कुटुंब-कबिला बरोबर आहे त्याअर्थी त्या कुटुंबाची शहरात कुठेतरी पत्र्याची का होईना राहण्याची काहीतरी सोय नक्कीच आहे. आधार काढले असेल तर सरकारने खात्यात पैसे वर्ग केलेच असतील. शहरात सामाजिक संस्था, सरकारी संस्था खाण्यापिण्याची सोय करत आहेत. अशा परिस्थितीत अशी कोणती गोष्ट आहे की जिथे जाण्यासाठी आगीतून फुफाट्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा?? रेल्वे रुळावर रात्रीच्या गारठ्यात किडुकमिडुक निघण्याची शक्यता असतानाही ज्यांना इतकी गाढ झोप लागावी की रेल्वेच्या कर्णकर्कश्य शिट्टीचा आवाजही ऐकू येऊ नये. त्यांना एकत्र दहा (१०) बाय बारा (१२) च्या खोलीत राहणे किंवा तात्पुरती सरकारी निवास व्यवस्था किंवा ज्या कारखान्यात काम करत असतील त्या जागेत रहाणे असह्य व्हावे?? पायी पायी घरचा रस्ता जे शोधू शकतात त्यांना पालिका , महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांनी केलेली सोय शोधता येऊ नये ?? गावी काही जीव आपल्यावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी आपला जीव लाखमोलाचा आहे हे अघोरी मार्ग अवलंबण्याआधी लक्षात येऊ नये?? ह्या प्रश्नांची उत्तरं समाजाने, प्रशासनाने, माध्यमांनी शोधायची की 'का ग बाई रोड, (तर म्हणे) गावाची ओढ' म्हणून गप्प बसायचे ??

एरवी सभा, मोर्चा, मागण्या, बंद, वगैरे साठी ह्या आणि अशा मजुरांना पाचशे (५००) रुपये रोजाने ट्रकात भरून नेणारे परप्रांतीय असलेले परंतु आमच्या राज्यात येऊन चणे-फुटाणे विकताविकता करोडपती झालेले नेते आत्ता नेमके लपले आहेत तरी कोणत्या बिळात ?? का नाही ह्या मजुरांसाठी एरवी गळे काढणार्यांनी सध्यपरिप्स्थितीत त्यांची राहण्याची, खाण्याची किंवा प्रवासाची सोय केली??

ज्या भागात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी ह्यांच्यावर हल्ले झाले त्या घटनांचा नुसता निषेध न करता त्या भागाला किंवा त्या विशिष्ट समाजाला सील /बंद करून त्यांच्याशी व्यवहार आणि वैद्यकीय मदत किंवा पोलीस संरक्षण का नाही नाकारले गेले?? का नाही त्यांच्या नेत्यांना माध्यमांनी उभे आडवे कापून काढले ?? का नाही त्या भागाचा किंवा समाजाचा बहिष्कार केला गेला ?? मालेगावात आज कोरोना बळींची संख्या वाढताना दाखवताना का नाही सुरवातीला त्यांनी झुगारून लावलेली बंधने चर्चिली जात ?? का तिथल्या नेत्यांनी सरकारी आदेशाचे पालन करायला सांगणाऱ्या पोलीस कर्मचार्याची केलेली बदली लोकांसमोर आणली जात?? उलट कितीही चुकलात तरी त्यांच्या सणासाठी पहाटे पहाटे दुकाने उघडण्याचा आदेश दिला जातो, ज्याचा कोणीही साधा निषेध करतानाही दिसत नाही.

मागास, अशिक्षित, परप्रांतीय आणि अल्पसंख्यांक विशिष्ट समाज हे कधी चुकूच शकत नाहीत. त्यांना उर्वरित समाजाने फक्त आणि फक्त सहानुभूतीच दाखवायची असा काहीसा कल हल्ली झालेला आहे. कधीच डोळे उघडणार नाही का आपण ?? कधीही योग्य-अयोग्य समजून घेणार नाही का ?? प्रत्येक प्रसंगावर फक्त आणि फक्त डोळ्यातून अश्रू वहायचे, सामाजिक माध्यमांवर चुटपूटायचे, सभा-सम्मेलनातून हळहळायचे, वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने गरळ ओकायची, सरकार आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडायची आणि मागच्या पानावरुन पुढे चालू ठेवायचे पण व्यावहारिक निर्णय मात्र घ्यायचे नाहीत असेच काहीसे ठरवले आहे का आपण ??

जे मजूर महानगरांच्या पुलाखाली किंवा झोपडपट्टीत जन्माला आले त्यांचेही हे आणि असेच हाल आहेत. त्यांनी कोणत्या गावाला जायचे ?? जे निम्नमध्यम वर्गीय आहेत, जे सरकारी मदतीच्या निकषांमध्ये बसत नाहीत, जे चाळीच्या एका खोलीत एका पेक्षा जास्त कुटुंब रहातात, ज्यांची कमाई ज्या त्या महिन्याला पण पुरत नाही, आता तर कमाई पण बंद, जे छोटे उद्योजक आहेत, उद्योगधंदे तर बंद पण जबाबदाऱ्या तर पूर्ण कराव्याच लागतात, कमाई नाही पण देणेदारी काही चुकत नाही , त्यांच्या घरात पण कोरोनाने शिरकाव केला असेल, कोणा आप्तस्वकीयाचा बळी सुद्धा घेतला असेल .... त्यांनी कुठे जायचे ? काय करायचे ? सुसंस्कारित व सहनशील असल्याने कोणाच्या अंगावर धावून पण जाणार नाहीत, मग त्यांनी राग/ द्वेष/ असहाय्यता कोणावर आणि कशी व्यक्त करायची ?? की महामारी चा मारा संपल्यावर समाज, सरकार आणि माध्यमे त्यांचा सत्कार करणार आहेत??

प्रश्न आणि फक्त प्रश्न ... हरवलेल्या, कधीही न मिळणाऱ्या उत्तरांच्या शोधात.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

(ता.क. ज्यांना तुटून पडायचे असेल त्यांनी आधी योग्य उत्तरे शोधावीत. नंतर लाखोली वाहिलीत तरी चालेल.)

Wednesday, May 6, 2020

सरस्वती कॉलनी वॉर्ड न.७

सरस्वती कॉलनी
वॉर्ड न.७

चौदा (१४) बंगल्यांची छोटीशी कॉलनी. सरस्वती नाव असल्यामुळे की काय कॉलनी मध्ये मुलीच मुली होत्या. मुलगे अगदी नावालाच, एका हाताच्या बोटावर मोजले तरी बोटे उरावीत इतके कमी. मुलींच्या मात्र झुंडीच्या झुंडी, एक तुकडी लग्न होऊन बाहेर पडली की दुसरी फलटन तयार असायची. दादागिरी, विट्टी दांडू, सार्वजनिक गणपती ही मुलांची मक्तेदारी असलेले प्रांत पण मुलींच्या ताब्यात.

सार्वजनिक गणपती हा कॉलनी चा जिव्हाळ्याचा विषय. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे, गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी बनवणे, यादीबरहुकूम सामान आणणे, मंडप उभारून त्याची आरास करणे, घरी पताका बनवून चिकटवणे ते गणपती आणण्यापासून गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत नानाविध रंगारंग कार्यक्रम बसवून सादर करणे, विविध स्पर्धा घेणे, रोज वेगळा नैवेद्य एकेका घराच्या गळ्यात मारण्या पर्यंत सगळी कामे बिनबोभाट पद्धतशीरपणे मुलीच पार पाडत. बरेचदा कॉलनीतील मुलामुलींना ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातच आपल्या सुप्त कलागुणांची पहिल्यांदा ओळख होत असे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची (event management) तोंडओळख ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेच झाली. गणपतीबरोबरच माहेरवाशीण गौराई, जेष्ठा आणि कनिष्ठां, चे पण आगमन होत असे. गौरीची आरास आणि प्रत्येकाच्या दारासमोर काढलेली रांगोळी कुठल्याही कलादालनापेक्षा कमी नव्हती.

 महालक्षुम्यांसारखाच चैत्रगौरिला पण 'आरास' चा मान. आमच्या आईची आरास आणि रांगोळी कायमच जगावेगळी आणि उजवी असे. कधी अख्खे एअरपोर्ट तर कधी अगदी खराखुरा दिसणारा मोर आणि बाग... सगळे उद्योग घरातल्या घरात जी उपलब्ध साधने असतील त्यातूनच. टाकाऊ गोष्टींमधून साम्राज्य उभे करण्याची ताकद तिच्यात होती. कॉलनी मधल्या सगळ्या मुली तिच्याकडे कधी न कधी काही न काही शिकायला यायच्याच. त्यामुळे भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककृती, इ अनेक गोष्टींचा क्लास कॉलनी मध्ये कधी कोणाला लावावा लागलाच नाही.

मुलींचा कारभार असल्यामुळे गणपती इतकेच नवरात्रीला पण महत्व. रोज रात्री भोंडला होत असे. भोंडल्याची गाणी सगळ्यांना तोंडी पाठ. कधी,कोणी,कशी शिकवली हे मात्र एकाही मुलीला आठवत नसेल. मातृभाषा शिकावी तसे भोंडल्याची गाणी आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत असत. 'आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला' कानावर पडले की खाऊ ओळखण्याची चढाओढ सुरू होई. नऊ दिवस रोज एका घरचा खाऊ. तो सगळ्यांनी मिळून ओळखायचा. 'आपली मुलगी तिच्या मैत्रिणींना जाऊन सांगेन आणि खाऊ चे गुपित फोडेल' ह्या काळजीने घरातल्या-घरात सगळ्या आया गुपचूप खाऊ बनवून लपवून ठेवत असत. जो ओळखेल त्याला पहिला खाउचा मान. नवरात्रीत अजून एक गंमत असे. अष्टमीच्या दिवशी होणारे कुमारिका पूजन. घरोघरी लहान कुमारिकांना जेवायला बोलावले जाई. गोडाचे जेवण, फ्रॉक साठी कापड, बांगड्या, एक फळ, टीकली, गजरा, वगैरे भरपूर मालामाल केले जाई. शिवाय नऊ दिवसांच्या उपवासांमुळे रोज फराळाच्या नवीन नवीन पदार्थांच्या मेजवान्या म्हणजे सोनेपे सुहागा.

दिवाळीचा फराळ आणि खरेदीची मजा काही औरच. ज्याची खरेदी उरकेलं त्याच्या घरी खरेदी बाघण्यासाठी सगळी टोळधाड धडकत असे. फराळ बनवण्यासाठी 'महाराज' येत. एकाच्या कोणाच्या परसदारी मोठमोठी चुलाण पेटत, केवढाल्या त्या कढया, झारे. सकाळपासून भट्टी पेटे ते पार संध्याकाळपर्यन्त. इतके सगळे पदार्थ करून घेतले तरी काही खास पदार्थ घरच्या चवीचेच. चकली, अनारसा, करंजी चा तो 'घरगुती' चा हक्क. फराळाचे पदार्थ बनत असताना चव घेणे हा तर जन्मसिद्ध अधिकार होताच. तरी सुध्दा दिवाळीच्या तीन दिवसात एकमेकांच्या घरी फराळाला जाण्यात एक अवर्णनीय आनंद होता.

नुसते सणवाराला मजा करून गप्प बसतील तर मुली कसल्या. एखाद्या रविवारी टूम निघे, आज सगळ्यांनी एकत्र पोहे करायचे. सगळ्या मैत्रिणींनी आपापल्या घरातून मूठभर पोहे, दाणे, तेल, मिरच्या, मीठ, साखर, कांदे, इ सगळं समान थोडं थोडं करत जमा करायचं. एका कोणाच्या घरी नाहीतर अंगणात चक्क तीन दगडांची चूल पेटवून पोह्याचा फक्कड कार्यक्रम होत असे. काय चव त्या पोह्यांची. कधी कधी पोह्यांची जागा साबुदाण्याची खिचडी, पावभाजी पण घ्यायचे. पद्धत मात्र एकच... सगळ्यांनी सगळं सामान थोडं थोडं घेऊन यायचे. अंगत-पंगत ची पण एक वेगळीच मजा असते. प्रत्येकाने आपले ताट वाढून आणायचे. मराठे काकूंच्या ओट्यावर सगळे एकत्र जेवणार.मंद मंद वाहणाऱ्या गार वाऱ्याबरोबर एकमेकांच्या ताटातला एकेका घासाचा आनंद घेता घेता ती पंचपक्वान्न पोटाची, रसनेची आणि मनाची तृप्ती करत.

सगळं कसं खूप गोड आणि छान वातावरण आणि किती प्रचंड वळणदार मुली वगैरे वाटून घेऊ नका. युध्दावर निघावं तशा कॉलनीतून सगळ्या मुली सायकल घेऊन धाड-धाड निघत तेव्हा कुठल्या सैन्याच्या तुकडीपेक्षा कमी भासत नसत. हेच सैन्य रात्री गुपचूप कोणाच्या कैऱ्या तोड, कोणाचे पेरू पळव, कोणाच्या चिंचा लंपास कर असेही उद्योग करण्यात एकदम माहिर. सगळ्यांच्याच दारात जवळपास सगळीच झाडे होती. पण चोरीच्या मालाला जी चव लागे त्याची सर घरगुती मेव्याला कुठली. बाहेर खाणे, सिनेमा ह्या गोष्टीना आमच्या विश्वात कधीच स्थान नव्हते पण एकत्र अभ्यास कर, मेंदी लाव, एकत्र बागेत खाऊ घेऊन जा, आमच्या शेतावर डबे घेऊन जा, एकत्र सर्कस बघायला जा, श्रावणात केशव गोविंदाला बनात जा असे प्रकार मात्र खूप केले.

हळू हळू कॉलनीला बहुदा आमच्या द्वाडपणाचा कंटाळा आला. एक एक करत सगळ्या मुली सासुरवाशिणी झाल्या आणि लेकींची जागा नवीन आलेल्या सुनांनी घेतली.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित