Friday, September 4, 2020

ग कोणीतरी येणार येणार ग , कोरोना घरी येणार येणार ग

 ग कोणीतरी येणार येणार ग

कोरोना घरी येणार येणार ग


येणार ?? बहुदा आला सुद्धा .... धडकी भरण्याइतका मनातून विचारात उतरला पण. 


आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ जवळ ४ महिन्यांनी मुंबई कोर्टात जाण्याचा योग आला. मास्क लावून तळमजला ते तिसरा मजला पळापळीत जाम दमछाक झाली पण काम करण्याची मज्जा काही औरच. जाता येताना ओळखीचे ट्राफिक, खड्डे, टॅक्सी आणि मधेच घुसणारे रिक्षावाले भेटले. ओला-उबेर मात्र पटलावर गैरहजर असाव्यात. आयुष्य पूर्वपदावर आल्याचा भास झाला.


परंतु घर जसजसे जवळ यायला लागले, कोर्टात बिनामास्क फिरणारे, मास्क खाली करून बोलणारे,इ सर्व चेहेऱ्यांनी मनात फेर धरून भीतीचा भोंडला खेळायला सुरवात केली. त्याक्षणी काम बाजूला ठेवून त्या लोकांना आपण का नाही हटकले, असा पश्चात्ताप मन खाऊ लागला. आणि अचानक आपल्या अंगाखांद्यावर कोरोनाची बाळे मनसोक्त बागडतायेत असे भास होऊ लागले.


घरी पोहोचल्यावर इमारतीच्या दारातच सुरक्षा रक्षकाने 'मॅडम, तुमचे सामान आले आहे' चा पुकारा केला. 'रेहेने दो, मेरे हाथ मे बोहोत कोरोना है, बादमे लेके जाती हूं'. आपण काय बोललो आहे हे त्याच्या चेहेऱ्यावर वाचल्यावर हळूच तिथून निसटले. घरात पाय , दारात पाय लेकीला ओरडून सांगितले 'खूप कोरोना आला आहे, पटकन गिझर चालू कर'. 'लांब रहा, लांब रहा .. कोरोना आला आहे भरपूर'. 'सामान UV लाईट मध्ये ठेव, कोरोना घरात फिरेल'... वेड्या व्यक्तीकडे पाहावे तशी नजर माझ्याकडे टाकून तिने पूर्णपणे दुर्लक्ष करून परत पुस्तकात डोके खुपसले.


कोरोनाच्या मुलाबाळांचा समूळ नायनाट करून झाल्यावर घशाला जाम कोरड पडल्याचा साक्षात्कार झाला पण 'कोरोना दातात असेल तर' विचाराने पाण्यावरची वासनाच उडवली. ब्रश, पेस्ट आणि दात ह्यांची लढाई संपवून पाण्याच्या पेल्याकडे आधाशा सारखे धावले आणि 'कोरोना घशात असेल तर' ... फटाफट मोठ्या गॅस वर पाणी उकळवले, घसा आणि नाकातले कोरोना मारण्यासाठी भरपूर वाफाऱ्याचा फवारा मारला आणि पाण्याकडे मोर्चा वळवला. पण पाणी पिताना कोरोनाची बाळे माझ्या पोटात घसरगुंडी खेळतायेत असे वाटू लागले,  जेवताना प्रत्येक घासाला दाताखाली खड्यांच्या ऐवजी कोरोना येऊ लागला. श्वास घेताना कोरोना पळत पळत धाव घेतोय असा भास होऊ लागला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कोरोना दिसू लागला. 


माझ्या अवस्थेवर देवघरातले आघाडी सरकार खोखो हसू लागले. हो, आमच्या देवघरात उत्तरेतील वैष्णवदेवी ते दक्षिणेतील बालाजी व्हाया महाराष्ट्रातील सर्व कुलदैवते, संत , महंत आनंदाने आणि एकोप्याने आघाडीचे राज्य चालवतात. त्यांच्याकडे श्रीयुत बाळासाहेब थोरातांसारखा नेता नसल्यामूळे असेल, 'आमच्यावर अन्याय झाला, आमच्याकडे दुर्लक्ष झाले, वगैरे' अशी काही तक्रार आमच्या कधी कानावर आली नाही. (माफ करा बाळासाहेब पण माझे आजोळ संगमनेरचे असल्याने तुम्हाला मामा बनवण्याचा मला जन्मतः हक्क आहे.)


'कोरोनाला तू बघितले आहेस?, कोरोना डोळ्यांनी दिसतो?' देवांचा प्रश्न. 'मग काय फक्त आभासी भीतीने येवढी धावाधाव करवलीस?'

'मग आमच्या बाबतीत तुमच्या पूर्वजांनी तरी दुसरे काय केले होते?' कोणी वाईट वागू नये, चांगलेच वागावे म्हणून 'देव बघतोय' चा धाक निर्माण केला. जसा तो धाक कमी झाला तशी वाईट प्रवृत्ती बळावली. आता त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले तर कोणी देवदूत पुन्हा जन्म घेईल आणि वाईट प्रवृत्तींचा नायनाट करेल अशी स्वप्न तुम्हाला पडू लागली. आता हेच बघ ना, सध्या जगात दोन (२) प्रकारचे लोक आहेत. 'काही होत नाही कोरोना'म्हणणारे आणि कोरोनाच्या भीतीने संपूर्ण काळजी घेणारे. काळजी घेणारे आस्तिक आहेत असे जरा वेळ मानुयात. ह्या लोकांमुळे समाजाचे आरोग्य थोडक्यात मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांमुळे अनारोग्य, गुन्हेगारी, इ दुष्टप्रवृत्तीना खतपाणी मिळते. मग कोणती प्रवृत्ती चांगली ?? विश्वास ठेवणारी आणि समाजाला सुदृढ करणारी की अविश्वासाने समाजात असंतोष पसरवणारी??..... उत्तर ज्याचे त्याचे. 


चला, कोरोनाला तेल लावायची वेळ झाली, आता थांबले पाहिजे.

माफ करा, 'डोक्याला' असे म्हणायचे होते.


कळावे, लोभ असावा


- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment