भित्या पाठी
ब्राह्मराक्षस...
लहर दहलीज़ पर आई है जब से
समुंदर ख़ौफ़ खाने लग गया है- पूनम यादव
भीती ते भक्ती सगळ्याच भावना निव्वळ कल्पना.
जसा देव कोणी पहिला नाही तसे भूत तरी कुठे पाहिले आहे? जसे काहींना देवाचे अस्तित्व जाणवते, तसेच नानाविध भुते डोक्यावर बसलेली किंवा नाचलेली अनेकांनी अनुभवली मात्र नक्कीच असतील. मोह, माया, मत्सर, ईर्षा, महत्वाकांक्षा, आनंद, दुःख, राग, काम(कार्य:बोली भाषेत work),इ भुताची कितीतरी रूपे. कोणत्या रुपात ती तुमच्या मनाचा ताबा घेतील काही सांगता येत नाही. भूत कोणतेही असो, भीती त्याचा पाठलाग करत मागेमागे येतेच.
बरेचदा प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे आपण वेळोवेळीं वेगवेगळ्या भावनांना व्यक्त होत असतो. त्यात खरेपणा किती आणि सवयीचा परिणाम किती समजून सुद्धा येत नाही. एखाद्याचे 'कर्तृत्व', 'यश' ऐकताना सहजच 'आरे व्वा, अभिनंदन' असे उद्गार सहजच निघून जातात. कदाचित त्यावेळी मन आक्रांदत असेल 'अरेरे, हे तर मला मिळायला हवे होते' किंवा 'माझ्या प्रयत्नांना हे यश का नाही मिळाले', इ. ह्या व्यक्त होण्यात खरेपणा असेल. पण तसे होताना दिसत मात्र नाही. फक्त एखाद्याच्या दुःखात आनंदी होणारे मात्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी बघायला मिळतात.
अभिनय किंवा शास्त्रीय नृत्य शिकत असताना अगदी सुरवातीलाच एक पायरी हमखास ओलांडावी लागते, 'रस' चे प्रकार किती आणि कोणते? श्रृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, अद्भुत, वीभत्स, भयानक, शांत, वात्सल्य, भक्ती आणि भय रस. एकेका विद्यार्थ्याला एकेक प्रकार करून दाखवावा लागतोच लागतो. नशिबाचा भाग की निव्वळ योगायोग परंतु एखाद्या निडर मनोवृत्तीच्या व्यक्तीला 'भय रस' करून दाखवावा लागणे आणि तेही प्रत्येक वेळी... हा निव्वळ योगायोग की भविष्या बद्दल काही सूचक संकेत? एखादा प्रसंग व्यक्तीच्या मनात भीतीचे घर बांधतो आणि त्या निडर व्यक्तीच्या मनाचे बुरुज धाड धाड कोसळू लागतात.
इक ख़ौफ़ सा दरख़्तों पे तारी था रात-भर
पत्ते लरज़ रहे थे हवा के बग़ैर भी - फ़ुज़ैल जाफ़री
आणि मग मनाची अशी काहीशी अवस्था लहानसहान प्रसंगात देखील होऊ लागते. चवीला 'तुरट' असणारी ही भीती मग अधून मधून निमित्ता निमित्ताने डोके वर काढायला लागते.
भावनेलाही चव असू शकते ?? का नाही, आनंदाची-प्रेमाची चव गोड, दुःख कायमच कडू, ईर्षा बहुदा आंबट आणि खारटपणा राग किंवा द्वेषाच्या नशिबी असावा. सगळ्याच भावना त्या त्या वेळी जगून सोडून देता आल्या पाहिजे होत्या. त्यांच्या बरोबर आयुष्याचा प्रवास करू नये. म्हणजे प्रत्येकवेळी नव्या अनुभूतीची मजा नव्याने चाखता आली असती. पण असे होत नाही. एक विचार मांडणे, वाचणे, चर्चा करणे नेहमीच सोप्पे ... त्या प्रमाणे जगणे मात्र अशक्यप्राय. ह्यातूच 'कळत पण वळत नाही' ही म्हण जन्माला आली असावी.
आग कितनी ही ख़ौफ़नाक सही
उस की लपटों की उम्र थोड़ी है- वसीम बरेलवी
हे ही अगदी बरोबर... सुख कायमस्वरूपी मुक्कामी येत नाही तसे दुःखही नाही. आनंदाचे क्षण येतात आणि जातात. तसेच दुःखाचे, अडचणींचे, अपयशाचे आणि भीतीचेही जातीलच की. 'बदल' ही एकमेव गोष्ट 'चिरंतन' आहे. मग ह्या बदलांची सवय का होत नसावी? सगळं सगळं कळतं फक्त वळायची वेळ काही अजून येत नाही.
कळावे, लोभ असावा.
ॲड. स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment