Wednesday, December 29, 2021

२५ डिसेंबर : तुळशी पूजन दिवस

 २५ डिसेंबर : तुळशी पूजन दिवस


सकाळीच एक मेसेज आला, २५ डिसेंबर हा तुळशी पूजन दिवस म्हणून साजरा करूयात वगैरे वगैरे. (डिसेंबर ला डिसेंबर म्हंटलेले चालेल ना? कारण तो ही परदेशी शब्द आहे.)


आपल्याकडे तुळशीचे लग्न असतेच की, तेव्हा आपण काहीच करत नाही. आपले बरेचसे सणवार निसर्गाकडे नेणारेच आहेत, तरी सुद्धा हल्ली कुठे करतो आपण काही ?

कितिकसे लोक मुलांना आवर्जून बैलपोळा बघायला नेतात? श्रावणात झाडाला बांधलेला झोका खेळवतात? वटपौर्णिमेला फांदी न तोडता वडाच्या झाडाखाली तासभर जाऊन बसतात? 

अशी कितीतरी उदाहरणे आहेत. 

केवळ दुसऱ्याचा सणाची लोकप्रियत खोडून काढायला आपले काहीतरी नवीन कुचपट काढणे कितिकसे बरोबर? 

मग लहानपणी बिरबलाच्या गोष्ट शिकून काहीच उपयोग झाला नाही असेच होईल. दुसऱ्याची रेघ लहान करण्यासाठी त्याला हात लावायची गरज नसते, त्याच्या बाजूला स्वतःची मोठी रेघ काढावी. ही बिरबलाची शिकवण व्यर्थ गेली.

ख्रिसमस च्या महिनाभर आधी तुळशी विवाह येतो. पुढच्यावर्षी तो घरोघरी साजरा करण्याची सवय लोकांना लावण्याचा प्रयत्न करूयात. 

ख्रिसमस हे आपल्या कोणत्याही सणावर होत असलेले अतिक्रमण नाहीये, आणि दुसऱ्यांच्या धर्मावर, प्रार्थनास्थळांवर किंवा रीती रिवाजावर अतिक्रमण करणे ही हिंदू परंपरा कधीच नव्हती आणि नसेल.

राहिला प्रश्न हल्ली ख्रिसमस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा किंवा पार्टी करण्याचा तर त्यासाठी आधी शाळा, महाविद्यालये, हॉटेल , इ ठिकाणी आपली मुले ख्रिसमस साजरा करताना दिसतात. त्याबाबत आपल्या मुलांना आपणच समज देऊ शकतो ( ज्यांना हरकत आहे त्या लोकांसाठी). घरात ख्रिसमस ट्री लावून ख्रिसमस साजरा करणारी हिंदू मंडळी विरळच असतील. आणि जे करत असतील, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 

ज्या क्षणी आपण आपले सणवार, रूढी, रीती-रिवाज, परंपरा ह्यांना मान देऊन त्या साठी वेळ काढून घराघरात साजरा करण्याची सवय आपल्या मनाला आणि मुलांना लावू त्यानंतर ख्रिसमसच काय मुलांनी ईद पार्टी केली तरी आपले समाजमन असुरक्षित होणार नाही. 

हल्ली हे जे काही वेगळे बदलाचे वारे वहात आहेत, त्याला आपली पिढीच जबाबदार आहे. आपल्या मागच्या पिढीने आपली सर्व परंपरांशी ओळख करून दिली होती. ती धरोहर पुढच्या पिढीला द्यायला आपण चुकलो.

पैसे कमावणे, मोठी मोठी घरे बंधणे, मुलांना उत्तमातले उत्तम 'शालेय' शिक्षण देणे, पैसे साठवणे ह्या चक्रात आपल्याला दसरा, दिवाळी, गणपती सोडले तर इतर सण दिसेनासे झाले होते. त्यासाठी वेळ काढावा लागला तर आपली चिडचिड होत होती, सगळ्या गोष्टींची कटकट वाटायला लागली होती. सणावाराला घरी स्वयंपाक न करता, थाळी रेस्टॉरंट ची वाट आपण पकडली. पुरणपोळी, गुळ पोळी, तिळगुळ, बासुंदी , दिवाळीचा फराळ ह्या सारखे अनेक पारंपरिक पदार्थ आपण विकत आणायला सुरवात केली. त्याचा दरवळ घराघरातून येईनासा झाला. प्रत्येक सणाची पार्टी सोसायटी च्या आवारात साजरी करून  घरात काही करण्याच्या जबाबदारीतून आपण अंग काढून घेतले. ह्या सर्व अतिक्रमणाला आपली पिढी जबाबदार आहे. आपले सण आनंदात साजरे करायला आपल्या मुलांना आपणच नाही शिकवले. कारण त्यासाठी वेळ काढण्याचा , कष्ट करण्याचा आपल्यालाच कंटाळा होता.आहे ते केले नाही आणि अजून नवीन पायंडे पडायचे , हा अधिकार आहे आपल्याला? 

नवीन ( पार्टी प्रेमी) पिढी प्रश्न विचारेल तर उत्तर आहे आपल्याकडे?

आणि हा प्रश्न फक्त शहरांचा आहे बरं का. ठराविक बोटावर मोजण्याइतपतच शहरे ह्या समस्येला तोंड देत आहेत. आमच्या ग्रामीण भागात आजही सगळे सणवार धुमधडाक्यात नाते-गोते, शेजारी-पाजारी, मुलाबाळांसह जोरदार साजरे होतात. त्यामुळे नवीन 'तुळशी पूजन दिवसाची' तशी आम्हाला गरज नाही. पण आग्रहच असेल तर तुळशीचे रोप आणि ख्रिसमस ट्री दोन्हीही शेजारी शेजारी नटवून सकाळी पूरणा वरणा चे जेवण आणि संध्याकाळी घरगुती भेळ, केक आणि चॉकलेट ची अंगणात फक्कड धमाल उडवून देऊ शकतो.

जाता जाता एक प्रश्न : हुरडा पार्टी ला किती (शहरी)लोक आपल्या मुलांना घेऊन गेले आहेत ? केसरी टूर, वीणा वर्ड, राजा-राणी ट्रॅव्हल बरोबर परदेश बघून झाला असेलच ना. आता एखाद्या सुट्टीच्या दिवशी कृषी पर्यटनाचे पर्याय शोधून तिकडे पण फेरफटका मारायला हरकत नाही. 

२५ डिसेंबर : हुरडा दिवस म्हणून साजरा केला तर कसं? आमच्या शेतात तुळस ही असते, बदामाचे झाड ही असते आणि कधी कधी ख्रिसमस ट्री पण असतो. आणि नसेल तर लावू की. आम्हाला कोणत्याच झाडाचे वावडे नाही. नाताळाची सुट्टी मॉल आणि हॉटेल मध्ये व्यतीत करण्यापेक्षा या की कृषी पर्यटनाला ( agro tourism). आणि जाताना एक तुळशीचे रोपटे बरोबर घेऊन जा, पुढच्या वर्षी तुळशी विवाहास कामास येईल.


कळावे, लोभ असावा 


- स्वाती दीक्षित

No comments:

Post a Comment