इयत्ता दहावीची परीक्षा रहीत.
- मा. शिक्षणमंत्री
पेपर मध्ये , दूरदर्शन वर कोरोना बळींची संख्या बघत असताना आपली लेक दहावीच्या पेपर साठी सतत बाहेर जाणार, अजून तिच्या वयासाठी लस द्यायला पण परवानगी नाही, ह्या विचारांनी रोज एक मरण दहावीच्या मुलांचे पालक अनुभवत होते.
दहावीची परीक्षा देऊन पुढे शैक्षणिक कारकिर्दीत काही फार मोठी भर पडणार होती, असेही नाही. मग का मुलांना ह्या मृत्यूच्या सापळ्यात सोडायचे समजत नव्हते. त्यात हल्ली लहान मुले आणि तरुणांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे, हे सतत कानावर पडत होते. घरात मुलांची चलबिचल समजत होती. काय होईल? परीक्षा होईल का? झाली तर कशी होईल? नाही झाली तर मार्क्स कसे देतील? अभ्यास करू की नको? केला तर कसा करू? लिहिण्याचा सराव करू की टायपिंग चा करू ? मुलांचे शंभर प्रश्न आणि पालक निरुत्तर .... काहीही सुचत नव्हते. मुलांची अस्वस्थता कळत होती पण काहीही करता न येण्याची हतबलता परेशान करत होती. आपण वयाने इतके मोठे असून, जगाच्या चांगल्या वाईटाचा अनुभव घेतला असून इतका ताण घेतो तर ह्या कोवळ्या मुलांच्या मनाचे काय होत असेल, ह्या कल्पनेनेच मनाची घुसमट व्हायची?धड लहान नाहीत, धड मोठे नाही असे अर्धवट वय, काय कसे कुठे गुंतवावे ह्या वयाला काही समजत नव्हते.
पालक म्हणून आपण नापास झालो तर , ह्या विचाराने झोप उडाली होती. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी फक्त परीक्षा, परीक्षा आणि परीक्षा दिसत होती. प्रत्येक विषयाचा शेवट परिक्षेवर येऊन थांबत होता. दर वेळेस लेकीच्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह तकलीफ देत होते. उत्तर नसलेले प्रश्न आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आले होते , त्यांची सवय नव्हती असे नाही परंतु ह्या वेळी लेकीच्या भविष्याचा धागा पकडून आले होते.
आज एक ट्विट आले 'दहावीची परीक्षा रहीत- मा. शिक्षणमंत्री' .... मणामणाचे ओझे उतरणे म्हणजे काय, हा अनुभव घेतला. मन पिसासारखे हलके होणे, मन नाचायला लागणे, वगैरे वगैरे सगळे वाक्प्रचार एकदम आठवले. शेवटी एक गोष्ट पक्की कळाली, शिक्षण घेणे जरुरी आहे पण त्याहीपेक्षा आपली मुलं, त्यांचे आरोग्य (मानसिक आणि भावनिकही), आणि त्यांचा आनंद जास्त महत्वाचा आहे. 'सर सलामत तो पगडी पचास' ह्या म्हणीचा अर्थ पुरेपूर समजला.
ह्या निर्णयाच्या मागे असलेला सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक संघटना, पालक संघटना, आणि मंत्रीमहोदयांचे मनःपूर्वक आभार !!!
- एक दहावीच्या विद्यार्थिनीची आई
#BoardExams2021 #इयत्तादहावी #शिक्षणमंत्री #maharashtra #parentteacher #media
No comments:
Post a Comment