शाळाश्रम ते निवृत्ताश्रम
व्हाया गृहस्थाश्रम ..
जन्म घेऊन ह्या भूतलाला पहिला पदस्पर्श केला जातो तो शिवाजी राजे, लोकमान्य टिळक, वीर सावरकर .. कमीत कमीत देशाचा पंतप्रधान तरी व्हावे असें ठरवूनच. परंतु ...
परंतु अनेकविध आश्रमाच्या योनीतुन मार्गक्रमण करता करता सगळे विचार, सगळी स्वप्ने, सगळे मनोधैर्य मार्गात कुठे हरवून जाते कळतच नाही. पालक नावाच्या शिस्तप्रिय जेलर च्या ताब्यात देऊन देव अंतर्धान पावतात. मग तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी पुढे जात असतो. शाळाश्रम किती योग्य संज्ञा आहे 'शाळा + श्रम = शाळाश्रम'
शाळाश्रमातून सुटका होते आणि कॉलेजाश्रमात पावले अलगद पडायला लागतात. हळूच दोन पंख फुटतात. चहूकडे हिरवळ फुलते, झाडे-पाने-फुले-रस्ते सगळे अचानक देखणे दिसू लागतात, गाऊ लागतात, बागडू लागतात. आता कुठल्याही क्षणी पंख पसरवून उडायचे ...बस्स. आणि जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. मनाला हवे ते आणि तसेच वागायचे. स्वच्छंदी आयुष्य जगायचे. सगळी स्वप्न पूर्ण करायची पण....
पण पालक , कॉलेजाश्रमातला शिक्षक वर्ग आणि अभ्यास तुमच्या पायांना घट्ट जमिनीत रोवून ठेवतात. कितीही पंख पसरा, उडता येतच नाही. पुन्हा घर, कॉलेज, अभ्यास आणि तुम्ही ... जीवन चक्र चालूच आहे.
कॉलेजाश्रमातले रंगीत जग मागे टाकून तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करतात आणि .......
दुःखात सुख, वाळवंटात 'मृगजळ' मिळावे तसे तुम्हाला तुमची वाटणारी मुलं मिळतात. आणि थोडकाळ 'आपले कोणीतरी आहे' चा आनंद देऊन जातात. वाळवंटातला साथी उंट. एरवी उंटाशी कोण मैत्री करे? पण संसार रुपी वाळवंटात साथीदार रुपी उंट आणि मृगजलासम आपली भासणारी मुलं ह्यांच्या सोबतीने गृहस्थाश्रमाचा भवसागर मजल दर मजल करीत पार करावाच लागतो.
सगळ्या जबाबदाऱ्या, विवंचना, कष्ट, ताण, विचार आणि धावपळ सगळे सगळे मागे सोडून मोरपिशी मनाने आणि मोकळ्या विचारांनी पाहिले पाऊल पडते 'निवृत्ताश्रमा'मध्ये. आता बास खूप झाले , खूप केले, आता धावपळ बंद. आता फक्त स्वतःसाठी जगायचे, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे. आवडी-नावडी, छंद , आनंद आणि हक्काची विश्रांती. आणि ....
हळूच मृगजळ हातून निसटून जाते. नव्हे ते तेथे नसतेच , असतो तो फक्त अस्तित्वाचा, अपलेपणाचा भास... जाता जाता ओंजळीत सोडून जातात वाळवंटातले दोन वाळूचे कण. तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून कायमची सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी आयुष्य पुढे जात रहाते. निवृत्ताश्रम किती योग्य संज्ञा आहे 'निवृत्ती + श्रम = निवृत्ताश्रम'
कळावे, लोभ असावा.
- स्वाती आवटी दीक्षित
No comments:
Post a Comment