"सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?"
लोकमान्य टिळकांना दूरदृष्टी होती असे म्हणत..... इतकी ??
कोरोना चा उद्रेक होतो आहे असे आपल्याला वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि समाजमध्यमांकडून कळते. त्यांना ह्या सगळ्या बातम्या आणि आकडेवारी सरकार पुरवते... म्हणजे पुरवत असावे.
ह्याचा अर्थ सरकार ला कोरोनाने घातलेल्या हैदोसाची कल्पना आहे असा घेऊ शकतो.
*तरीही १०वी व १२वी ची बोर्डाची परीक्षा घेणार म्हणजे घेणारच?*
राज्य आणि केंद्र सरकारला माझा एक छोटासा प्रश्न आहे? तुमच्या मंत्रिमंडळातील १०वी तसेच १२ वी उत्तीर्ण असलेल्या किती मंत्र्यांना त्यांच्या १०वी व १२वी च्या गुणांचा उपयोग राजकारण, समाजकारण आणि काही व्यवसाय करण्यासाठी झाला ? ... होत आहे?
माझे शाळांना विचारणे आहे 'खरच१०वी व १२वी च्या मुलांना वर्षभर शिकवले गेले? त्यांचे ज्ञान वाढवले गेले? जर 'नाही' असे उत्तर असेल तर परीक्षा का आणि कशाची घेणार ? केवळ उत्तरपत्रिका पंढऱ्याच्या काळ्या होणे इतके गरजेचे आहे? प्रगतीपुस्तकाचे रकाने भरणे महत्वाचे आहे? अन्यथा अकरावीच्या /प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी गुणांची यादी कशी जाहीर करणार असा काही पेच आहे ? की आम्हाला कशी बोर्डाची परीक्षा द्यावी लागली होती मग ह्या एका बॅचची सुटका कशाला ? मेलीत मुलं तर मरु देत पण परीक्षा होणार म्हणजे होणार, असा काही विचार आहे?
१०वी,१२वी च्या परीक्षाना बोर्ड असावे की नाही? मुलांनी अतिरिक्त ताण घेऊ नये, आत्महत्या करू नये? इंग्रजांची शैक्षणिक गुलामगिरी, शिक्षणाचा देशी नमुना (पॅटर्न), इ अनेक विषयांवर घसा फोडून अक्कल पाजळणारे सर्व बुद्धिजीवी आत्ता गप्प का आहेत? सर्व माध्यमे कोरोनाच्या बातमीने हमखास मिळणारा टि आर पी सोडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या आणि आयुष्याशी निगडित विषयांवर मिठाची गुळणी घेऊन गप्प का आहेत? फी वाढी संदर्भात रस्त्यावर उतरणारे पालक मुलांच्या आरोग्य आणि आयुष्याशी खेळ करणाऱ्या ह्या बोर्ड परिक्षांबाबत मौन बाळगून का आहेत? एखादी दुःखद घटना घडल्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोध पक्षांच्या (केंद्र आणि राज्यातील) कानावर बोर्ड परीक्षांची बातमी पडली नाही की काय? की काही अघटित घडण्याची ते वाट पहात आहेत ? की कोरोनाने तुम्हा सगळ्यांना वचन दिले आहे की बोर्डाची परीक्षा देणाऱ्यांच्या वाटी जाणार नाही म्हणून ?
त्रिवार धिक्कार बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पालकांचा, शिक्षण मंत्रालयाचा, सरकारचा, विरोधी पक्षाचा, मूडदाड मनाच्या समाजाचा आणि त्या समाजातील मक्ख बुद्धिजीवी धुरीणांचा, समाजातील प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या आणि अघटीत घटनेत टी आर पी शोधणाऱ्या माध्यमांचा, शिक्षण पद्धतीचा आणि असंवेदनशील बोर्ड व्यवस्थापनाचा.
- एक (बोर्डाची परीक्षा लादली गेलेल्या विद्यार्थिनीची) आई
#BoardExams2021 #boardexams #educationministry #media #parentteacher #school #exams2021 #Shivsena #bjpmaharashtr #rajthackeray #CongressParty #CongressMaharashtra #NCP #मुख्यमंत्री #शिक्षणमंत्री #varshagaikwad
No comments:
Post a Comment