Tuesday, April 6, 2021

 होळी रे होळी

पुरणाची पोळी 


होळी ची सुरवात कशी झाली किंवा होळी का पेटवली जाते , धुळवड का खेळली जाते ह्याच्या अनेक गोष्टी आपण ऐकत असतो. कधी काही गोष्टी पटतात ,काही पटत नाहीत.


मला नेहमीच असे वाटत आले आहे की ज्या अर्थी हिवाळा पूर्ण संपल्यावर आणि उन्हाळा सुरू झाल्यानंतर होळी सण येतो म्हणजेच जे वाळलेले लाकूड आहे ते सर्व जमा करून जाळून नष्ट करण्याचा त्या मागे विचार असावा. सुकलेल्या लाकडाला तीव्र उन्हाळ्यात आग लागून वणवा पेटण्याची शक्यता असल्यामुळे ते नष्ट करण्याकडे पूर्वीच्या लोकांचा कल असावा. मनुष्य जंगलाच्या जवळ रहात असल्याने असा वणवा मोठ्या प्रमाणात विध्वंस करत असणार. त्यापासून वाचण्याचा हा प्रयत्न असेल कदाचित.


  उन्हाळ्यात हवेतील तापमानाने अन्न पदार्थ खराब होण्याचे प्रमाण देखील जास्त असते. त्या मानाने पुरणपोळी उन्हाळ्यात देखील खराब न होता एका पेक्षा जास्त दिवस टिकून रहात असल्याने होळी आणि पुरणपोळीची जोडी जमवली गेली असावी. 


पूर्वी विविध आजारांवर उपाय म्हणून जंगलातील वेगवेगळ्या वनस्पतींवर मनुष्यप्राणी अवलंबून असत. त्यामुळे असेल कदाचित त्या सर्व झाडांच्या सुकलेल्या राखेत औषधी गुण असावेत ह्या विचाराने धुळवड खेळण्याची परंपरा सुरू झाली असावी. 


 रंगपंचमीच्या रंगांचे कारण मात्र काही लक्षात येत नाही. पूर्वी निसर्गातील विविध घटकांपासून नैसर्गिक रंग तयार केले जात असत. तीव्र उन्हात फळे, फुले, पाने, इ वाळवून रंग तयार केले जात. नवीन रंग बनवण्याआधी साठवणीतील रंग संपवण्याकडे कदाचित कल असावा. हल्ली देखील आपण बघतोच ना, जुने रंग हवा तसा परिणाम देऊ शकत नाहीत, मग 'रंग जुने झालेले दिसतात' असे सहजच उद्गार निघून जातात. त्या काळात तर पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून काही संरक्षक रसायने देखील नसावीत. त्यामुळे फार जुने पदार्थ, रंग, वगैरे न वापरण्याकडे लोकांचा कल असावा. त्यातूनच रंग खेळून जुने रंग संपवून टाकण्याची पद्धत सुरू झाली असावी. कालांतराने ह्या सगळ्याच पद्धतींना धार्मिक अधिष्ठान देण्यात आले असावे. जेणेकरून ह्या पद्धतींची पिढ्यानपिढ्या अंमलबजावणी व्हावी. कालानुरूप त्या नष्ट होऊ नयेत. 


विचार काहीही असो, चांगल्या अंतःकरणाने केलेली प्रत्येक कृती समाजात समाधान आणि सकारात्मकता निर्माण करण्यास हातभार लावत असते. फक्त आता नवीन पिढीला प्रत्येक सणामागचा विचार समजावून सांगणे आणि पटवून देणे मात्र आव्हानात्मक होत आहे.


#होळी #धुळवड #रंगपंचमी  #holi #rangpanchami

No comments:

Post a Comment