Tuesday, May 5, 2020

जगात भारी सख्खे शेजारी

जगात भारी
सख्खे शेजारी

भारत-पाकिस्तान नाहीत हो. पण नात जरास तसच आहे, एकाने चावावे आणि दुसर्याने धीराने घ्यावे. चवणार्याला कधी कोणी काही सांगत नाहीत. नको चावूस, हळू चव वगैरे वगैरे पण धीराने घेणाऱ्याला मात्र सदा संयमाचे धडे. आपलेच चावणारे दात आणि त्याची सख्खी शेजारीण धीरोदात्त जीभ.

धारदार आणि चावऱ्या दातांची मराठी भाषेला सुद्धा दहशत आहे. वाक्प्रचार आणि म्हणींचा विषय निघाल्यावर भाषेने पण चावऱ्या दातांच्या बाबतीत हात आखडते घेतले. 'आपलेच दात आणि आपलेच ओठ', 'दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत', 'दात खाणे', इ एका हाताच्या बोटांवर मोजून पण बोटे उरतील इतकेच वाक्प्रचार. जिभेचे तसे नाही. उदरभरणाच्या काळजीने जिभेने खाण्यास मदत करावी तर आरोप होतो 'जीभ खाये, पडजिभ वाट पाहे'. जिभेला पाय तरी आहेत का तरीही तिच्या मागे बोलतात 'जीभ चुरू चुरू चालते'. बोलणार्यांना जिभेच्या फटकाऱ्याने गारद करायचा विचार जरी तिच्या मनात आला तरी 'जिभेवर ताबा नाही' म्हणून हिणवले जाते. कडक पदार्थ तोडणार दात आणि आरोप मात्र जिभेवर 'जिभेला चांगलीच धार आहे'. नुसती पडून राहाते म्हणून म्हणायचे 'जिभेला काही हाडच नाही' सदानकदा लोळलेलीच. आला कंटाळा गेली जरा शेजारी पाजारी तर लगेचच 'जिभेला वळवळच फार' म्हणून कुजबुज सुरू. चांगली 'जीभ हासडावी' बोलणाऱ्याची असा विचार करते आणि 'उचलली जीभ लावली टाळ्याला'....  इतक्यात नाक जवळपास सुग्रास दरवळ असल्याची वर्दी देते मग 'सुटते जिभेला पाणी'. 'जिभल्या चाटत' हात कधी 'जिभेचे चोचले पुरवतात' ह्याची वाट पाहू लागते. हाताकडून येणाऱ्या आणि दातांच्या तावडीतून सुटलेल्या पदार्थांची मग जिभेवर चव कितीतरी वेळ रेंगाळत राहते. जिभेला स्वतःचाच कधी कधी खूप राग येतो. अंतसमयी जेव्हा 'जीभ बाहेर येते', जीव गुदमरतो तिचा.

पण खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे , सगळ्या अवयवांचे डॉक्टर आहेत, जिभेचे कधी कुठे दिसत नाहीत, जीभ दुखते असे कधी कोणी म्हणत नाही, माझ्या जिभेचे हल्ली फार वजन वाढले आहे अशीही कधी कोणाची तक्रार नसते, शिवाय जिभेच्या फटकाऱ्याने भले भले गारद होतात ते वेगळेच. इतक्या चांगल्या जिभेकडे कधी लक्षच जात नाही आपलं. त्याच्या उलट दातांची तऱ्हा. जन्मापासूनच जे हे दात त्रास द्यायला सुरुवात करतात ते बचळी पर्यंत. दात येताना त्रास, दात जातानाही त्रास. बर ह्यांच एकदा जाऊन समाधान होत नाही, दोनदोनदा जातात. येण्याच्या जाण्याच्या प्रवासात दात पुढे असणे पिन लाव, किडणे सिमेंट भर, पडणे नवीन दात लाव, दातांचा रंग काळवंडला किंवा पीळवंडला तकाकी देऊन उजळून घे, भरीस भर ती हिरडी मधेच आजारी पडणे. मधूनच टोपी घाल, पूल बांध असले प्रकार पण चालूच असतात. दिवसातून दोन वेळा ह्यांना घासा, त्याच्यासाठी मंजन, दातुन, गुळण्या करायची औषध , दातांच्या फटींची जळमटे काढायचे दोरे, लाकडी नाहीतर प्लास्टिक च्या काड्या किती हा जामानिमा. लहान मुलांच्या दातांचे डॉक्टर वेगळे, मोठ्यांचे वेगळे. त्यातही परत वैविध्य. किरकोळ आजार हा शब्दच नाही ह्या दातांच्या शब्दकोशात. एरवी किरकोळ आजारपणात कसे घरगुती औषध, मेडिकल दुकान किंवा फार फार तर डॉक्टरांना फोन करून वेळ निभावता येते. इथे तसा काही पर्यायच नाही. जबडा 'आ' वासून छळवाद सहन करण्याला पर्याय नाही. हल्ली माझा थोडा थोडा दात दुखतो किंवा दात दुखी पहिल्या टप्प्यावर आहे असे कधीही ऐकायला येत नाही. कायम शेवटचेच टोक 'भयंकर, प्रचंड, अतिप्रचंड दातदुखी'. 'मरणप्राय वेदना' मारताना पण होत नसतील, तो अनुभव फक्त दातानेच द्यावा. तरीही संयमाचा सल्ला मात्र जिभेलाच.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

( म्हणी आणि वाक्प्रचारांचा पुरवठा : डॉ प्राची जावडेकर आणि मंजुषा अमीन)

No comments:

Post a Comment