Sunday, May 10, 2020

मातृदिन ..

मातृदिन ..

एकच असतो का ?? ज्या दिवशी आपण कोणाला 'आई' चा दर्जा देतो, किंवा आपल्याला तो दर्जा प्राप्त होतो तो दिवसही मातृदिनच की. ज्या दिवशी निसर्ग, आपली पृथ्वी आपल्याला आवडू लागते तो दिवस, मातृभूमी बद्दल आतून प्रेम आणि अभिमान वाटू लागतो तो दिवस, मातृभाषेबद्दल मनापासून आदर वाटू लागतो तो दिवस..... असे कितीतरी मातृदिन आयुष्यात येत असतात. मुळात 'मातृत्व' ही संकल्पना एका नात्या पुरती मर्यादित कधीच नव्हती. त्याची व्याप्ती विचारांत, कल्पनेत आणि आवाक्यात येणार नाही इतकी व्यापक.

सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट अशी की जगाच्या पाठीवर कुठेही जा, मातृत्वाबद्दलचा विचार एकच. आदर फक्त आदर. असे नाही होत की अमुक देशात मातेला इतके वाईट वागवले जाते, अशी उदाहरणे नक्कीच आहेत, पण ती सगळ्याच देशात थोड्याफार फरकाने अपवादात्मकरीत्या सापडतात. मातृभूमी, मातृभाषा, पृथ्वीमाता म्हणजेच निसर्ग आणि जननी सगळ्यांच्याच बाबतीत कधी न कधी चुकणारी लेकरे सगळ्याच युगात आणि सर्वच देशांत जन्मली. सर्व जगात, सर्व काळात, सर्व देशात, सर्व युगात वाईट वागणारे मातृत्व पण होतेच की. तरीही कधीही मातृत्व आणि चूक/वाईट/दुष्ट ह्यांची सांगड घालायला मन तयार होत नाही. उदात्त, उत्तम, सुंदर, पवित्र ते मातृत्व हा विचार सर्व पिढ्यांत सगळ्याच देशांत स्वीकारला गेला आहे.

जसे भूमी, भाषा आणि निसर्गात मातृत्व शोधले जाते तसेच कितीतरी नात्यांत पण ते परावर्तित होताना भासते. एखादी मावशी, एखादी काकू, बहीण, मैत्रीण, कोणी शेजारी, ओळखीचे आणि कधी कधी अगदी अल्पकाळ निसटत्या ओळखीचे अनोळखी. चोचीत दाणा भरवणारी पाखरे, पिल्लाना सुरक्षित ठिकाणी तोंडात पकडून नेणारी मांजरे, जन्मल्या जन्मल्या लाथ मारून स्वतःच्याच पोटच्या पिल्लाला उठवणारे प्राणी, जन्मतः पिल्लाना किनाऱ्यावर सोडून जाणारे कासव, प्रत्येकाची मातृत्वाची संकल्पना आणि पद्धत वेगळी. हेतू मात्र एकच, पिल्लांना सुसज्ज करणे, समर्थ करणे.

आपल्या समाजात अजून एक मातृत्व आहे. देवी-देवतांत दिसणारे, जाणवणारे मातृत्व. देवी तर देवी पण देवात सुद्धा माऊली दिसू शकते इतकी अध्यात्मिक मातृत्वाची ताकद. एक गोष्ट मात्र सगळीकडेच समान ती म्हणजे विश्वास. मातृभू, मातृभाषा, माता आणि धरणीमाता कधीही विश्वासघात करणार नाहीत, कधीही एकटे सोडणार नाहीत, सदासर्वदा, सर्व प्रसंगात साथ देणार हा विश्वास. ह्या विश्वासाच्या जोरावर तर आयुष्याच्या सगळ्या लढाया लढल्या आणि जिंकल्या जातात. गम्मत म्हणजे कोणीही, कधीही, कितीही शक्तिशाली असो, मातृत्वासमोर मोठा होऊच शकत नाही. हा लहानपणाचा भावच बहुदा मातृत्वाची ओढ कायम ठेवतो. आनंदात, संकटात, दुःखात, अडचणीत, यशात कोणीतरी सहभागी होणारे आहे ही खात्रीच बहुदा मातृत्वाच्या संकल्पनेचे यश आहे. ती लहान असण्याची जाणीवच मातृत्वाच्या नुसत्या उच्चाराने डोळ्याच्या कडा ओलावत असणार.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment