Sunday, April 5, 2020

धरलं तर चावत,
अन सोडलं तर पळत..

समाज माध्यमे म्हणजे आपला सोशल मीडिया चे सध्या असे झाले आहे. खूप वेळ जातो फे.बू. च्या नादाने, नकोच सध्या काही. असे ठरत असते आणि कळते कोणीतरी काहीतरी छानसे लिहिते आहे सध्या फेबु च्या भिंतीवर. झाले निग्रह मोडायला निमित्त मिळते.
लेकीची महत्वाची परीक्षा आहे , सध्या नकोच व्हॉट्स अप आणि फेबु ... लेक म्हणते , मी माझा अभ्यास बघेल, तुझी लुडबुड नको. परत निरोप, करा ग मला ऍड.

'मी आहे सोशल मीडियावर पण फार काही बघत किंवा लिहीत नाही' अशा स्थितप्रज्ञ लोकांचा मला फार हेवा वाटतो. कसे काय जमत असेल असे कुंपणावर बसायला ? आहे पण आणि नाही पण. मध्यंतरी निबंध, वक्तृत्व, चित्रकला,इ स्पर्धांमध्ये विषय असायचा 'समाज माध्यमे' म्हणजे आपले 'सो. मी.' शाप की वरदान. हा विषयच मुळात चूक आहे असे नेहमी वाटायचे.... अजूनही वाटते.

प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतातच की , गाडी प्रवासाचा आनंद देते आणि अपघातात आयुष्य नेते, गादी झोपेचे सुख देते पण अनेकांना झोपेतच मारणाधीन करते, रस्ते वाहन चालवण्याचा आनंद देतात तर कधी 2 वाहने एकमेकांवर आदळवतात, अन्न मनुष्यप्राण्याचे पोषण करते तर कधी अन्नातूनच विषबाधा होते, अग्नी ठाई ठाई उपयुक्त ठरतो तर कधी सर्वस्व भक्षण करतो. शिक्षणाने मनुष्य सुशिक्षित होतो तर हेच शिक्षण कधी कुकर्म करण्यास पण प्रवृत्त करते ... अशी अनेक उदाहरणे देता येतील . अगदी आपली पंचमहाभूतेच पहा ना , वळले तर सूत नाहीतर भूत.

सोशल मीडिया हा मित्रा सारखा आहे, अती जवळीक टाळता आली तर मस्त आयुष्यभराचा दोस्त होऊ शकतो. कितीतरी लेख , पुस्तके, गाणी, सुविचार,बातम्या, घडामोडी, कितीतरी माहिती अगदी सहजच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हा मित्र करतो. जगभरातील उत्तमातील उत्तम कला जसे फोटोग्राफी, चित्रकला,मूर्तिकला गायन ,वादन, नृत्य , अभिनय आपल्याला किती सहज उपलबद्ध होतात. ह्या आणि इतर अनेक क्षेत्रातील कित्येक मान्यवर एका मेसेज च्या अंतरावर येतात. माझे बोललेले कोणीतरी ऐकते , कोणाचे तरी छानसे सांगणे मला ऐकायला मिळते, ही देवाणघेवाण अन्यथा कशी घडून आली असती ?

मात्र मला सो.मी. वर इतके हजार मित्र आहेत हा अहंकार कुटुंब आणि खऱ्या खुऱ्या मित्रांना अंतर देणारा नसावा. माझे कोणीतरी तिकडे ऐकते आहे म्हणून घरातला संवाद संपू नये. तेथे उत्तम ऐकायला मिळते आहे म्हणून आजूबाजूच्या निरागस बोबड्या बडबडीकडे दुर्लक्ष व्हायला नको. तेथे उत्तम कलाकृती आहेत म्हणून घरच्या रेघोट्यानचे महत्व कमी होता कामा नये, तेथे चॅटिंग करता करता मित्रांमधला गप्पांचा फड बंद पडू नये, तेथे जेष्ठ - श्रेष्ठ लोकांशी ओळख झाली म्हणजे खऱ्या आयुष्यातली साधी माणसे मागे पडू नयेत. Online शिक्षण आहे म्हणून शाळेत जाणे कोणी सोडते का?

असे अजिबातच नाही की मला सो.मी. चा कंटाळा येतच नाही. बिलकुल येतो ... जेव्हा 'ऑनलाइन' असताना लगेच फोन करून चालू कामात व्यत्यय आणला जातो , काळ वेळ काहीही न बघता मेसेज पाठवून लगेच उत्तराची अपेक्षा केली जाते, 8 लोकांना पाठवा, पुण्य मिळेल सारखे मेसेज येतात, एखादा विचार, चित्र, गाणं , कविता,इ पोस्ट केल्याबरोबर हे कसे चूक आहे आणि आम्हीच कसे बरोबर आहोत सांगणारे तावातावाने ओरबाडलेले मेसेज येतात, विषयाला सोडून राजकीय पक्ष , धार्मिक विचारसरणी, इ वर ताशेरे मारणारा आरडाओरडा जबरदस्ती घुसवला जातो अशा अनेक प्रसंगी नको तो सो.मी. वाटून 'time please' म्हणून कट्टी घेऊन टाकते. .. खूप मस्त , हलकं हलकं वाटत.

अचानक कोणाचा तरी ओरडा पडतो 'काय ग उत्तर नाही' किंवा 'काही प्रतिक्रियाच नाही तुझी' ... मग गडबडून 'हो हो बघते' म्हणायचे आणि पुन्हा मैत्रीचा हात पुढे करून म्हणायचे ...
कळावे, लोभ असावा.

- अडव्होकेट स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment