Sunday, April 5, 2020

शुभ बोल नाऱ्या ...

आमच्या भावंडांच्या ग्रुप वर सुषमा ताई चा मेसेज आला 'आता यापुढे कोरोनाची कोणत्याही प्रकारची पोस्ट टाकू नका प्लिज' आणि आई चे वाक्य आठवले 'शुभ बोल नाऱ्या'.

तिची कल्पना /समजूत / सांगणे असे की 'नेहमी शुभ बोलावे, वास्तुपुरुष तथास्तु म्हणत असतो'. म्हणजे चांगले बोलाल तर चांगलेच होईल , वाईट बोलाल तर वाईट होण्याची शक्यता वाढते. तिचा शुभ अशुभ , परमेश्वर ,इ गोष्टींवर विश्वास, खरे तर देवाने तिच्याकडून इतके काही हिरावून घेतले , पण तिची श्रद्धा होती म्हणजे आहे .. किंवा अजूनही असावी. माझ्या हे सर्व समजण्याच्या पलीकडचे होते पण माझा तिच्यावर विश्वास होता.
ती एक म्हण आहे ना ,आमचा जीव तुमच्यात ,आणि तुमचा फाटक्यात' तसे 'आमची श्रद्धा आई वर आणि तिची देवावर'.

कालांतराने मेडिटेशन , स्पिरिच्युअलिटी, वगैरे नावाखाली हेच तत्वज्ञान कानावर पडू लागले. तुम्ही जो विचार करतात ,तो ब्रह्मान्ड (युनिव्हर्स ) तुम्हाला परत देतो ,वगैरे . म्हणून सतत फक्त सकारात्मक विचार केला पाहिजे , म्हणजे भविष्यात त्याचे सकारात्मक निकाल मिळतील.

थोडावेळ आपण मानू ,हे खरे आहे.
पण मग ह्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार ?
3 महिन्याच्या बाळाने असा काय नकारात्मक विचार केला असेल की त्याचे पितृछत्र हरवावे ?
तारुण्यात पाऊल टाकणाऱ्या मुलाने काय नकारात्मक विचार केला असेल की भविष्याची असंदिघ्नता त्याच्या वाटी यावी ?
परदेशातून यशस्वी कार्यक्रम करून घरी परतताना गायिकेने असा काय विचार केला असेल की रस्त्यातच यमाशी गाठ पडावी ?
उत्तम शैक्षणिक कारकीर्द असणाऱ्या विद्यार्थ्याने असे काय मागितले असावे की त्याच्या डोक्यावर परिणाम होऊन त्याला मानसिक पंगूत्व यावे ?
गर्भवती मातेने असा काय जप केला असेल की तिच्या पोटी जन्माला येणारे बाळ साधारण नसावे ?
पेरणी करणारा शेतकरी अशी काय कामना करत असेल की डोळ्यादेखत उभं पीक जळून जाव ?

मला मान्य आहे की चांगला आणि चांगलाच विचार करावा, आचरण चांगले असावे , मग वाईट घटनांची जबाबदारी कोणाची? इतका काय आणि कोण वाईट विचार करत असेल की लोकांची आयुष्यच्या आयुष्य उध्वस्त होतात .
होत्याचे नव्हते होणे , पूर्णपणे वाट लागणे, संपूर्ण नायनाट , विनाश ,इ शब्द शब्दकोशात आलेच कुठून ?
जन्माला येणारे प्रत्येक मूल खूपच निरागस असते , मग पुढे जाऊन अत्यंत वाईट , थोडी वाईट , बरी , चांगली , अतिशय सुसंस्कृत अशी वर्गवारी होतेच कशी ? कोणती शक्ती ह्या मागे काम करत असेल ?
पिढ्यानपिढ्या सगळ्यांच्याच भिंतीवरची पाल जर चांगल्या बोलण्याला तथास्तु म्हणत आली असेल तर त्याचे चांगले परिणाम कुठे आहेत ? ज्या परमेश्वराने वास्तुपुरुषाला तथास्तु म्हणायला शिकवले त्याने वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यास का नाही शिकवले ? आपण माणूस असून मुलांच्या चूका पोटात घालतो . आपण त्याची लेकरे ना ,मग  त्या जगतनियंत्याला का नाही जमत त्याच्या लेकरांच्या चूकांकडे दुर्लक्ष करायला ?? का नाही फक्त यश , आनंद , समाधान , सुख आणि उत्कर्ष आपल्या शब्द संग्रहात रहात ??

येणाऱ्या पिढीच्या तरी भिंतीवरची पाल किंवा वास्तुपुरुष फक्त आणि फक्त चांगल्या बोलण्यालाच तथास्तु म्हणेल अशी अपेक्षा आणि कोणत्याही आई ला 'शुभ बोल नाऱ्या' म्हणायची वेळ येणारी पिढी येऊ देणार नाही ही सदिच्छा !!

कळावे , लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment