Sunday, April 5, 2020

मागते मन एक काही,
दैव दुसरे घडविते...

सध्या परिस्थिती आपल्या हातात नाही,
आपण 'helpless' आहोत, इ.इ.
हो???
सध्या ???

परिस्थिती कधी आपल्या हातात होती ??
कोणत्या वयात ? कोणत्या परिस्थितीत ?
शाळा , कॉलेज , व्यवसाय कुठे ? कधी ?

डॉक्टर सांगतात परिस्थिती सुधारतेय उद्या घरी सोडू , आणि सुचिचे कलेवर घरी येते,
सगळे सांगतात , परिस्थिती गंभीर आहे ,भेटून जा ... नंतर 15 वर्ष मजेत जगतात ते गृहस्थ
साडे पाच तास भविष्याचे सगळे नियोजन करत एकत्र प्रवास करतात भावंड , आणि सकाळी फोन येतो ...कारण सांगितले जाते हृदयाचा तीव्र झटका
पुणे विद्यापीठातुन अव्वल नंबर ने शिक्षण , उत्तम करियर केले असते पण खेडेगावात लग्न होते
मोहोत्सवाची पूर्ण तयारी होते आता फक्त शेवटचा हात फिरवायचा आणि सांगितले जाते आम्हाला तुम्ही नको
आता हे शेवटचेच घर , परत परत शिफ्टिंग नको आणि कळते महिन्याभरात सगळे सोडून जायचे
सगळे सामान भरून तयार ,जेवणे झाली की निघायचे ,आणि कोणीतरी पळत पळत मुलगा पडला मुलगा पडला सांगत येतो
प्रॅक्टिस सुरू केली आता बस्तान बसेल , आणि अचानक ऑफिस बंद करण्यात आल्याचे कळते
डॉक्टर सांगतात मूल जगणार नाही , आणि त्याच मुलाची मिलिटरी च्या प्रशिक्षणासाठी निवड होते
सगळे सम्पले वाटत असतानाच , अचानक कोणीतरी ठामपणे पाठीशी उभे रहाते
मला फारशा कोणी मैत्रिणी नाही म्हणताना अचानक कुठून शी lifeline मिळते

चांगल्या वाईट अनुभवांचे कोंडाळ आहे हे आयुष्य , अनाकलनीय...
नाते, व्यवसाय , मित्रमंडळ, शेजारी , प्रवास , इ सगळीकडेच रोज उद्भवणारे बदल आणि अचानक येणाऱ्या अडचणी आपण अनुभवत असतो.जन्माने मिळालेले गुण , कला , आवडी ,इ ना देखील न्याय देताना दमछाक होत असते. परिस्थितीला तोंड द्यायला आपण स्वतः तयार असतो आणि मुलांनाही तेच शिकवत असतो. तरीही किती सहज 'सध्या परिस्थिती आपल्या हातात नाही' असे म्हंटले जाते ??

दुःख , अडचणींचे तर सोडाच पण आनंद ,यश , समृद्धी तरी कुठे कोणाच्या हातात असते ??
ध्यानी मनी नसताना मिळणारे यश , समाधान , वैभव , मैत्र , नाते सुद्धा हळुवार पायाने येते आणि सुखावून जाते.
मुलांचे यश , भावंडांचे कौतुकाचे प्रसंग , पालकांच्या नजरेतील कौतुक ते आपल्यापेक्षा लहानांच्या भलत्या प्रसंगाचे ओझे ... कधीही काहीही परिस्थिती दाखवू शकते हे आयुष्य.

कोरोना केवळ निमित्त , परिस्थिती कधीच कोणाच्या हातात नव्हती ..नाही.
आपण फक्त सज्ज रहायचे ,येणाऱ्या प्रसंगांसाठी... कठीण आणि आनंदी सुद्धा.

कळावे , लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment