Sunday, April 5, 2020

कुछ तो करोना ...

कुछ तो करोना ...

2 दिवस सुट्टी घेऊन कुठेतरी लांब जावे , फोन पण नको हातात .. असे बरेच दिवस वाटत होते. 'वाटणे' ही सीमारेषा ,त्याच्या पलीकडे जायची काही हिम्मत नाही.
ज्यांना आजपर्यंत शत्रू समजत होतो तो चीन कधी काळी माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावून येईल असे मात्र कधी वाटले नव्हते.

लोकांना 21 दिवसाच्या भुताने पछाडले असताना , मी मात्र मस्त शाळेला मे महिन्याची सुट्टी लागावी तशी आनंदात घरात अक्षरशः घुसून बसलेय,
फोन सारखा वाजत नाही , कोणतीही कोणाचीही वेळ सांभाळायची नाही , कुठे पाळायचे नाही , ट्रेन ची वाट बघायची नाही , मनात आले की एखादे पुस्तक वाचत बसायचे ,मुली बरोबर गप्पाष्टक झोडायची , फोन वर फक्त घरगुती गप्पा मारायच्या , timeline नाही , कोणाला काही स्पष्टीकरणं द्यायचे नाही , कोणाचे स्पष्टीकरणं ऐकायचे नाही , वाटले TV बघितला ,नाही वाटले नाही बघितला , रेडिओ अक्षरशः दिवसभर साथीला,
एकंदर मला हा एकांतवास मानवला बहुदा ... अजूनतरी

थोडे काम वाढले आहे , स्वयंपाक ( तो एरवी पण असतोच), B फॉर भांडी  नावाचा राक्षस , J फॉर झाडू , P फॉर पोछा ( सवयीचे नसलेले) .. फक्त ह्या BJP ने जरा दमवले आहे ( ह्याचे राजकारण करू नये कारण कामाने इतके दमलोय की भांडायला पण जोर नाहीये). एरवी ही कामे करत नसतो पण इतर शारीरिक कष्टाची ओढाताण असतेच की , ट्रेन चा प्रवास , कोर्टाचे 3 मजले वर खाली जिन्याने पळापळ , इ. चालूच असते. पण ह्या धावपळी बरोबर जी मानसिक आणि बौद्धिक ओढाताण असते ना ती अचानक गायब झाली आहे. डोकं हलकं हलकं झाल्यासारखे वाटते आहे , छोट्या छोट्या गोष्टींवर हसू फुटतेय , दमलो बुवा ,जरा विश्रांती घेऊ असे वाटत नाहीये , मुली बरोबर गप्पा मारायला जमते आहे ( एरवी ओरडायला , शिकवायला आणि सांगायला फक्त जमायचे).अर्थात जुन्या सवयी अशा पटकन जात नसतात,त्यामुळे मधून मधून काही काम सांगणे ( ज्याला ती ओरडणे असे म्हणते), स्वयंपाकाची ABCD शिकवणे आणि आम्हा भावंडांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगणे चालू आहेच.

अजून एक महत्वाचे - FB वर आयता मिळालेला एखादा मेसेज चिकटवण्यापेक्षा स्वतः काहीतरी लिहावे असे वाटले ( बंपर लॉटरी).
उद्या लेकीबरोबर पेंटिंग करण्याचा प्लॅन आहे ,
सकाळ संध्याकाळ एखादा नवीन श्लोक शिकण्याचा संकल्प पण दोघीनी सोडला आहे,
रोज एका नातेवाईकांना फोन करायचा आणि एकाला पत्र लिहायचे असेही ठरले आहे...

 सुट्टी 'मेड इन चायना' असल्याने सगळे प्लॅन प्रत्यक्षात उतरण्याची गॅरंटी देऊ शकत नाही.

कळावे , लोभ असावा.

-ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment