कोणी नातेवाईक देता
का नातेवाईक...
मैत्रिणीचा फोन आला,'काय ग फोन करत नाहीस, सगळ्या मित्र-मैत्रिणींशी दोन दोनदा बोलून झाले, एकटी तू सापडत नाहीस' 'अग, लेकीची online शाळा आणि क्लास मध्येच फोन व्यस्त असतो, रोज एका नातेवाईकांना फोन करू ठरवले होते पण तेही होत नाही, नशीबवान आहेस तू, दोन दोन वेळा फोन होतो' .... 'तू नीट ऐकले नाहीस, मित्र-मैत्रिणी म्हणाले मी, नातेवाईक नाही. नातेवाईक शब्दाचाच तिटकारा आहे मला, नशीबवान तुम्ही, तुम्हाला फोन करायला चांगले नातेवाईक तरी आहेत' ... कुठल्यातरी जखमेची चुकून सालपटे निघाली होती. 'तू' चा 'तुम्ही' झाला होता. आता निचरा होऊ देणेच भाग होते.
गोष्ट वाहू लागली 'आई-वडिलांनी खूप केले नातेवाईकांचे, उलट्या काळजाचे निघाले सगळे, आई फार माहेरी जात नसे, त्यामुळे गळ्यात पडावे इतके लगट कधी मामाशी नाहीच. चांगले आहेत ते पण आमचेच जाणे नाही त्यामुळे लंकेत सोन्याच्या विटा. लग्न झाल्यावर पण माळरानच नशिबी, मुलांना मग काय येऊन जाऊन मामा आणि मावशी, तेही दूरदेशी त्यामुळे दोन(२) वर्षातून दर्शन. शेवटी ठरवले जे नाही त्याच्याकडे पाठ फिरवायची. इथेच तुम्हा सगळ्यांमध्ये मग नाती शोधली. असे नाही की प्रयत्न नाही केला. पण माळरानावर फुले फुललीच नाहीत. शेवटी ठरवून नांगर फिरवला. मुलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृद्धाश्रम, अनाथाश्रम पालथे घातले, तिथल्या व्यवस्थापनाला आमच्यापेक्षा बरोबर काय आणले आहे त्याच्यातच रस, सगळे आश्रम नसतील ही तसे, पण आमच्या नशिबाने आमच्या गाठी अशाच ठिकाणी मारल्या. आता कशाचे काहीच वाटत नाही. एखाद्या गोष्टीचा तोपर्यंतच त्रास होतो जोपर्यंत तुम्ही ती स्वीकारत नाही. मला का नाही? हा प्रश्न पडेनासा झाला की मग सगळं कसं स्वच्छ आणि निर्मळ. असेच नाही की बिलकुलच काही वाटत नाही. आत्ताच बघ ना, तू नातेवाईक म्हणालीस तर झालच ना थोडे जळायला पण ते तेवढ्यापुरतेच. पुढच्या क्षणाला परत येरे माझ्या मागल्या म्हणून मोकळे'.
मध्ये एक शब्दही न बोलता फक्त ऐकत होते... आकाश मोकळे होत असताना अनुभवत होते.
'अग, सुटका करून घेण्याचा मार्ग तरी होता, कितीतरी घरात बघते, इच्छा मारून 'आ बैल मुझे मार' म्हणावे लागते. नको नको होतं असताना मन मारून हसून साजरे करावे लागते. जाऊदेत, आता मुलांना चांगले जोडीदार मिळाले म्हणजे झाले. त्यांची कुटुंबेच आमचे नातेवाईक. आणि तुम्ही सगळे आहातच की काका-काकू, आत्या-मामा, मित्र-मैत्रीण सगळे तुम्हीच'.
पाऊस थांबला होता, गडगडाट संपला होता, धबधब्याचे शांत वाहणाऱ्या नदीत रूपांतर झाले होते, सुंदर इंद्रधनुष्य मन:पटलावर उमटलेले जाणवत होते, त्या चित्रातच मैत्रिणीला सोडून काहीही न बोलता फोन ठेवला.
असे नाही होऊ शकत का, नातेवाईकांचे एक ग्रंथालय म्हणजे नातेवाईकालय उभे राहू शकत? नाना-नानी पार्क मध्ये किंवा निरुद्देशीय कट्ट्यांवर? त्यांचेही रिकामपण भरून येईल आणि माझ्या मैत्रिणी सारख्यांना कुठल्याही औपचारीकते शिवाय नातेवाईक पण मिळतील. सगळ्यांचाच आनंद. मनाचे मांडे मनातच खावे.
कळावे, लोभ असावा
- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:
Post a Comment