Wednesday, April 15, 2020

माय मरो
मावशी उरो...

इथे 'माय' म्हणजे आपल्या नेहमीच्या सवयी आणि 'मावशी' म्हणजे सध्या आपल्याकडे परदेशातून पाहुणी आली आहे ना ती 'साथ'. जीच्यासाठी आपण सुट्ट्या घेऊन घरी बसलो आहोत ना तीच ती. स्वाभाविकच आहे ते, 'अतिथी देवो भाव' हा तर आपला स्थायीभाव आहे. त्यात ही परदेशातून आलेली मावशी. हल्ली सगळ्यांनाच परदेशस्थ नातेवाईक असतात. आमच्या पिढीसाठी ही गोष्ट नवी, आमच्या पिढीची भावंडे असतात बाहेर, तेही हल्ली पण मावशी, काका, आत्या,इ प्रकार अभावानेच. एखाद्याच घरातला एखादा सतीश दादा अमेरिकेत असायचा, बाकी कॉलनी 'आमच्या जावेच्या नातीच्या भावाच्या मित्राचे साडू पण असतात परदेशात' सांगण्यात सुख मानणारी.

काही लोकांना घरी पाहुणे आले की किती खर्च होणार किंवा झाला ह्याची चिंता असते. तशीच ती सध्या आमच्या अर्थतज्ञाना लागली आहे. त्याच्यावरून बऱ्याच चर्चा, लेख सारखे येऊन आदळत असतात. पण त्या कशातही एका प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही. जेव्हा खरेदी, प्रवास, बाहेर खाणे-पिणे, चित्रपट-नाटक पाहणे, बँकेत पैसे टाकणे-काढणे, इ. अनेक गोष्टी स्वतःच्या सोयीसाठी किंवा आनंदासाठी करत होतो तेव्हा कोणी सुद्धा आभार व्यक्त करून देशाचा आर्थिक दर्जा राखल्याबद्दल धन्यवाद म्हणाले नाही. उलट आयकराच्या ओझ्याखाली दाबून अगदी हीन-दिन-लिन बनवून टाकत होते. मावशी मुळे ह्या गोष्टी लक्षात तरी आल्या. आज फक्त पंधरा (१५) दिवस सगळ्या गोष्टी करणे काय थांबवले, लगेच आर्थिक आणीबाणी आली?? जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सगळेच लोक करत होते, तेव्हाच आणीबाणी मध्ये उपयोगी पडेल म्हणून बचत का नाही केली ?? म्हणून म्हणते 'मावशी' उरो. त्या निमित्ताने तरी खर्च न करता बचत करण्याची सवय लागेल.

काही लोकांची अजूनच वेगळी तऱ्हा असते. त्यांना त्यांच्या सवयी इतक्या प्रिय असतात की कोणी घरी आलेलेच चालत नाही. 'मै और मेरी तनहाई म्हणजे सवयी' . कोणी आले की दाखवायला तरी बरे वागावे लागते, स्वच्छ रहावे लागते, इ चांगल्या सवयींचा त्रास. सध्या ही हेच तर होतेय, थुंकलात? भरा दंड, सामाजिक माध्यमांवर गडबड केलीत? दंड, उगाच बाहेर भटकलात? दंड, इ इ. बरेच आहे ना. मावशीच्या निमित्ताने रस्ते, गल्ल्या, गावच्या गाव, समाज माध्यम सगळंच स्वच्छ होते आहे. कळाले का मावशी का उरो ते? कायमचच स्वच्छ वातावरणात, स्वच्छ रस्त्यांवर, तुरळक गर्दीत, खरेदी न करता नुसतच बागडायला कोणाला नाही आवडणार ??

ही स्वच्छतेची टूम आपोआपच घरापर्यंत आली. कामवाली नसल्याने घराला स्वतःचे घर समजायला मदत झाली. घर विकत घेतले तेव्हा दिसली होती अगदी तश्शी आणि तेवढीच घराची आणि न्हाणीघराची फरशी परत एकदा लख्ख झाली. कपाटांची ओझी उतरली, घराच्या जळमटांबरोबरच काहींच्या मनाचे कोपरेही स्वच्छ झाले. पुस्तकांना वाचक मिळाले, कित्येक नवीन लेखक, चित्रकार, कलाकार जन्माला आले. नवीन पिढीला घरकामाचे हात नव्याने उगवले. तेच मसाले ,तीच भाजी, तीच कणिक आणि तीच रांधणारी गृहलक्ष्मी पण स्वयंपाकाचा दरवळ पोट आणि मन तृप्त करू लागला. घरच्या अन्नाने आजारपण पळवून लावले. वेळ नाही च्या सबबी हरवून गेल्या. आजी-आजोबांना नातवंडे, मुलांना आई-वडील, भावाला बहीण आणि शेजाऱ्याला शेजार मनसोक्त अनुभवता आला. दूरध्वनी घ्यायला वेळ नसणारे, आठवण करून शब्दांची देवाणघेवाण करून तुंबलेली मने मोकळी करू लागले.
मावशी ... धन्यवाद ग. आम्हाला आमच्याशी, आमच्या वेळेशी, आमच्या घराशी, घरातल्या माणसांशी, माणसांच्या नात्याशी आणि अंगच्या गुणांशी भेट करून दिल्याबद्दल.

'घराला गच्ची नको, ती आत घेऊ आणि घर मोठे करू' असा विचार करणारे घराला एक अंगण, एक परसदार हवे असा विचार करू लागले. 'खेडेगावात कोण जातेय' अशी का-कू करणारे वर्षातून एकदातरी गावी चक्कर टाकणार असा निश्चय करू लागले. गावची शुद्ध हवा, घरचे निर्मळ जेवण, मित्रमैत्रिणी बरोबरच घरातले सद्स्य आणि महत्वाचा म्हणजे स्वतःचा वेळ ह्यांचे महत्व कळून चुकले.
पण बघ ना मावशी तुला 'अजून दोन दिवस रहा' असे म्हणूही शकत नाही. 'पुन्हा परत ये' असा आग्रहही करता येत नाही. तुझ्या गळ्यात पडून तुला मनसोक्त भेटूही शकत नाही. विलगीकरणाचा कायदा आह ना, पोलीस मामा आत टाकेल की ग. पण एक वायदा मात्र नक्की करू शकतो, 'ही तन-मन-धन, समाज आणि गावाची स्वच्छता मात्र तू गेल्यावरही कायम सांभाळू'.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment