Monday, April 6, 2020

खायला कोंडा,
अन निजेला धोंडा.

असते असे बरेच लोकांचे. कोंड्याचे माहीत नाही, पण निजेला धोंडा 100% पटले.

पाढे-परवचा म्हणता म्हणता किंवा जेवता जेवता ताटात हात ठेवून तशीच झोपणारी एक व्यक्ती माझ्या परिचयात आहे. झोपेत म्हणे ती उरलेले पाढे म्हणत असे, दिवसभरच्या सगळ्या घडामोडींचा गोषवारा देखील आईला झोपेतच सांगत असे. माझ्या पिढीत बरेच जण असतील असे, कोणी निंदा कोणी वंदा, नऊ(९) वाजले की झोपणे हाच आमचा धंदा. लहानपणी तर आठच(८).

लग्न असो, वाढदिवस असो, दिवाळी असो, पाहुणे येवोत नाहीतर आम्ही गावी जावो, जागा बदलो की देश बदलो झोपणार म्हणजे झोपणार. एकवेळ जेवण नसले तरी चालेल पण झोप अटळ. काही अपवाद ही होते ज्यांना जागा बदलली , भूक लागली , दिवा चालू होता, आवाज येत होता अशा किरकोळ कारणांनी पण निद्रादेवीची आराधना करावी लागत असे. आम्हा झोपाळू लोकांचे कोणाशीच वैर नाही. झिरो चा दिवा आहे - नाही, आवाज आहे-नाही, पांघरून-जागा-गादी-सतरंजी काहीही बदलो, आजारी पडो न पडो, भूक लागो न लागो, कोणी सोबतीला असो नसो .. आम्ही झोपेच्या आधीन होणार म्हणजे होणार. अमच्यावेळी 'जागरणाचा कार्यक्रम' ठरवून करत असत. कोजागिरी, मंगळागौरी, दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या,इ निमित्त पुरायचे असे जागरण गोंधळ करायला. परीक्षेला यायचा नाही येवढा मनावर ताण असायचा, शेवटपर्यंत जागता येईल ना ? मधेच झोप तर येणार नाही? वगैरे प्रश्न देखील झोप उडवायला मदत करत नसत.

अशा ह्या झोपाळू पिढीच्या पोटी रात्र रात्र जागणारी पिढी कशी काय जन्माला येऊ शकते ?? आताशा झोप लागणारे आणि न लागणारे असे प्रकार राहिलेच नसतील. सगळ्यांचीच वटवाघूळे (कोरोनाची नाही, रात्री जागणारी) झाली आहेत. लहानपणी बॅटमॅन चित्रपट बघितल्याचा परिणाम तर नसेल??
एकत्र अभ्यास : रात्री, चित्रपट: रात्री, वाढदिवसाची पार्टी: रात्री 12 वाजता, लॉंग ड्राईव्ह पण रात्री, गप्पा ( चॅट) रात्री , खरेदी पण रात्री ( ऑनलाइन). घरोघरी सकाळी 5/6 ला उठण्याच्या संस्काराने संस्कारीत झालेली पिढी मुलांना सांगताना दिसते , आरे सकाळ झाली आता तरी झोपा.

ह्या रात्रपाळी मुलांच्या वागण्याने मात्र झोपाळू पिढीची झोप खरच उडवली आहे. समजतच नाही नेमकी काय भूमिका घ्यावी? रोज रोज त्याच त्याच विषयावर रागवायचे की त्यांच्या बरोबर रात्रभर आपणपण जागायचे (लक्ष ठेवायला असे कोणी वाचले का ?नाही ना) की त्यांच्या वर विश्वास ठेवून गुडूप झोपून जायचे की घरात CC कॅमेरा बसवायचा की मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचे( स्वतःचेच समुपदेशन करून घ्यायला) काही कळत नाही. त्यांच्याशी बोलावे तर ऐकवले जाते, काळजी करू नकोस मी काही एकटा नसतो. म्हणजे माझ्यासारखे जागृत ( रात्री जागावे लागणारे) पालक अजून आहेत तर.

जागृत पालक संघटनेची कुठे एखादी शाखा असेल तर कळवा. दिवसा भेटत असतील तर सभासद होण्याचा विचार आहे.... रात्री बैठका होत असतील तर माफ करा.
निद्रादेवी प्रसन्न !!!

कळावे, लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment