Sunday, April 5, 2020

मला पहा ,
फुले वहा ..

साधारण काही मुलांना असे सांगायची सवय असते ,'माझे मी स्वतःला घडवले'. कोणाच्या वागणुकीत काही चांगली गोष्ट आढळली की सहजपणे म्हंटले जाते 'तुझ्या पालकांनी तुला चांगले घडवले आहे'. त्यावर कधी कधी मुलींपेक्षा मुलांकडून साधारण अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ऐकू येते.

असे कित्येकदा होते की पालकांच्या ठायी नसलेले गुण पाल्यात मात्र बघायला मिळतात. ते त्याने एखाद्या नातेवाईक , शेजारी ,मित्र , शिक्षक, ओळखीचे कोणी , नट , खेळाडू, इ कोणाकडून तरी अंगिकारलेले असतात. ते श्रेय त्याचेच पण आपल्या आजूबाजूला असलेल्या समाजातील चांगल्या गोष्टींची दखल घ्यावी , शक्य झाल्यास शिकाव्यात नाहीतर त्याचे कौतुक तरी करावे ही समज त्या पाल्यात आली कुठून ??

बरेचदा अनवधानाने आपण सभोवतालच्या परिसराला आपल्या व्यक्तिमत्वात सामावून घेत असतो. त्यातून ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी सहजपणे शिकल्या जातात आणि कालांतराने व्यक्तिमत्वाचा भाग होतात. ह्यालाच कदाचित ' माझे मी स्वतःला घडवणे,इ' म्हणत असावेत. पण हे असे नकळत शिकणे आणि शिकलेले आचरणात आणणे हे घडले कसे? कोणी शिकवले ? कोणी घडवले?

काही गोष्टी या समोर बसून समजावून देऊन शिकवता किंवा शिकता येतात, काही अनुकरणाने येतात तर काही ठरवून अंगिकाराव्या लागतात. इथे सुद्धा एक मेख आहे , ठरवून काहीतरी चांगले शिकावे हे वाटणे आले कुठून ? त्याचा संस्कार कोणाचा ? त्याची सवय तुम्हालाच का , सगळ्यांनाच का नाही ?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी वेगळा विचार करतो पण मीच का करतो ? विचार करण्याची सवय , प्रेरणा कोणाची ?
आहेच ना कोणीतरी ह्या सर्व प्रक्रियेच्या मागे ? मग दिले पालकांना श्रेय तर बिघडले कुठे ?

अजून एक श्रेणी असते , 'माझे विचार जरा वेगळे आहेत' श्रेणी. घर ,घरातले , शाळा , परिसर , समाज , नातेसंबंध, मैत्र ,इ सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तू वेगळा विचार करू शकतोस हा विश्वास कोणीतरी दिलाच ना ... मग त्या 'देण्याला' श्रेय द्यायला नको ? पण नाही.

मी म्हणजे काहीतरी खूप वेगळा / वेगळी , हुश्शार, विचारी, प्रचंड समज असणारा(री) , इ. गोष्टींचा पगडा एकदा मनावर बसला की आजूबाजूचे नीट दिसेनासे / कळेनासे होते. आणि सुरू होतो 'मला पहा आणि फुले वहा' प्रवास....

ह्याची लक्षणे - सतत फक्त आणि फक्त स्वतःबद्दल बोलणे, दुसऱ्याचे बोलणे मधेच तोडून स्वतःच बोलणे सुरू करणे, दुसऱ्याचे विचार कसे चूक आहेत ह्यावर टिप्पणी करत राहणे, आणि जगातले सर्व मलाच कळते आणि मीच कायम 'बरोबर' असे वाटणे.
बर अडचण अशी आहे की ह्या रोगावर इलाजच नाही, 'help center' कुठेही नाहीत, पोलिसात तक्रार करता येत नाही, कोर्टात केस पण उभी रहात नाही. मग ह्या फुलांना झेलण्याशिवाय पर्याय उरत नाही.

पण त्यावर सुद्धा आम्ही तोडगा शोधला आहे , आम्हाला पण आमच्या आई ने शिकवले आहे 'दुर्लक्ष' करायला. आणि आमचे आम्ही ती कला वाढवून त्यात पारंगत झालो आहोत.... स्वतःच्या स्वतः :)

कळावे, लोभ असावा.

- स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment